काँग्रेस वा भाजप या दोन्ही पक्षांत केंद्रीय नेतृत्व सर्वाधिकार आपल्या हाती ठेवू पाहते, ही बाब राजस्थानचे सत्तानाटय़ ज्या प्रकारे चिघळू देण्यात आले त्यातून स्पष्ट झाली..

राजस्थानातील वसुंधरा राजे या मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्याप्रमाणे खाविंदचरणारविंदी विलीन होणाऱ्या नेत्या नाहीत आणि अशोक गेहलोत म्हणजे दरबारी राजकारण करणारे बेफिकीर कमलनाथ नाहीत..

बरोबर एक महिन्यापूर्वी राजस्थानातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना संपादकीयांतून ‘लोकसत्ता’ने दोन स्पष्ट विधाने केली. एक म्हणजे दिवंगत राजेश पायलट यांच्या अनेक बंडांप्रमाणेच त्यांचे चिरंजीव सचिन पायलट यांचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधातील बंड असफल ठरेल आणि दुसरे म्हणजे मध्य प्रदेशात जमले त्याप्रमाणे भाजपस राजस्थानात काँग्रेस सरकार पाडणे जमणार नाही. या महिन्याभरात विविध हॉटेलांचा पाहुणचार घेऊन कंटाळलेल्या काँग्रेस, भाजप आमदारांनी अखेर पाडापाडीचा नाद सोडला आणि आहे ते गोड मानून घेण्याचे ठरवले. त्यामुळे अशोक गेहलोत सरकार आहे तसे वाचेल आणि सचिन पायलट हे होते त्या पक्षामध्ये, म्हणजे काँग्रेसमध्येच राहतील. याचा अर्थ हे दोन्ही अंदाज खरे ठरताना दिसतात. यात आश्चर्य नाही. पण जे तटस्थ निरीक्षकांस दूरवरून समजू शकते ते प्रत्यक्ष मैदानातल्या खेळाडूंना आणि त्यांचे धावते वर्णन करण्यात रममाण झालेल्या माध्यमांना कळू नये, हे आश्चर्य. असो. जे झाले त्यामुळे या नाटय़ातील दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या राजकारणाचा वेध घेणे आवश्यक ठरते.

प्रथम काँग्रेसविषयी. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदास एक वर्ष पूर्ण होत असताना आणि आणखी काही काळासाठी तरी त्या पक्षास हंगामी अध्यक्षावरच समाधान मानावे लागणार असे स्पष्ट होत असतानाच या पायलटांचे विमान जमिनीवर आले. ही गोष्ट त्या पक्षासाठी जितकी आनंदाची तितकीच अनागोंदी निदर्शकदेखील ठरते. अनागोंदी निदर्शक अशासाठी की या काळात अनेक ज्येष्ठ नेत्यांस जे काही सुरू आहे ते अयोग्य आहे असे वाटत होते. पण ते काही करू शकले आणि धजले नाहीत. याचे कारण पक्षश्रेष्ठींच्या मनात, म्हणजे गांधी कुटुंबीयांच्या मनात, सचिन पायलट यांच्याविषयी काय भावना आहेत हे त्यांना कळू शकले नाही. तेव्हा पायलट यांचे जे काही करावयाचे ते गांधी कुटुंबीयांपैकीच कोणास करावे लागेल, हे त्यामुळे उघड होते. अखेर तसेच झाले. राहुल-प्रियांका आणि मातोश्री सोनिया यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतरच कोंडी फुटली. या तिघांच्या पुढाकारानंतर पायलट यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना ‘सन्मानाने’ पक्षातच ठेवण्याचा निर्णय झाला. हे एक महिन्यापूर्वीही करता आले असते. त्यामुळे जी झाली ती शोभा टळली असती आणि पक्षातील अन्य नेत्यांस काही एक संदेश त्यातून गेला असता. पण काँग्रेस श्रेष्ठींनी तेव्हा बघ्याची भूमिका घेतली.

तशी ती त्यांना घ्यायला लावण्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कसलेले राजकारण होते. एका बाजूने त्यांनी पायलट यांची कोंडी करून त्यांच्यावर जवळपास पक्षत्यागाचीच वेळ आणली आणि त्याच वेळी पायलट गटाच्या सुरुवातीच्या १५-२० आमदारांखेरीज अन्य कोणीही फुटणार नाही, याचीही चोख तजवीज केली. कोणत्याही पक्षाच्या आमदार/खासदारांना इतका काळ एकत्र राखणे हे मांजरांचा कळप हाकण्यापेक्षाही अवघड. प्रत्येक मांजरीप्रमाणे प्रत्येक नेताही स्वयंप्रेरित असतो. त्यामुळे तो कोठून पळू शकेल याचा काही नेम नाही. पण तो अशोक गेहलोत यांना लागला आणि त्यामुळे काँग्रेसचा एकही आमदार नंतर पायलट यांच्या आणि पर्यायाने भाजपच्या गळाला लागला नाही. त्यामुळे पायलट यांची दमछाक होऊन त्यांनी ‘सन्मानाने’ स्वगृही राहण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत सचिन पायलट हे किती ‘निकम्मे’ आहेत हे गेहलोत यांनी सांगून टाकले. तसे करून त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनाही कोंडीत पकडले. राजस्थान काँग्रेसमधे आपला शब्द चालतो, श्रेष्ठींचा नाही, असाच संदेश त्यातून त्यांनी दिला.

दुसऱ्या बाजूने भाजपच्या गोटातून या संदेशाचा प्रतिध्वनी वसुंधराराजे यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना- म्हणजे अमित शहा, जेपी नड्डा आदींना-  ऐकवला. काँग्रेसमध्ये फूट घडवून मध्य प्रदेशाप्रमाणे राजस्थानातही आपले सरकार आणता येईल, असा भाजप नेत्यांचा समज होता. त्याच उद्देशाने त्यांनी कच्चे लिंबू सचिन पायलट यांना गोंजारले. त्यातून पायलट यांच्यामागे पुरेशा संख्येने आमदार आले असते तर भाजपचे सरकार आले असते आणि ते आणताना भाजपच्या दिल्लीतील धुरीणांना वसुंधरा राजे यांचे महत्त्व कमी करता आले असते. त्यासाठी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे प्यादे मुख्यमंत्रिपदावर बसवण्याची जय्यत तयारीही होती. हे शेखावत राजस्थानच्या राजकारणात वसुंधरा राजे यांचे स्पर्धक आणि वसुंधरा राजे भाजपच्या दिल्लीस्थित श्रेष्ठींना नकोशा, असे हे समीकरण. त्यामुळे शेखावत यांच्या वहाणेने वसुंधरा राजे यांचा विंचू मारण्याचा हा डाव होता. तो वसुंधरा राजे आणि अशोक गेहलोत यांनी ‘एकमेका साह्य़ करू’ या तत्त्वाने हाणून पाडला. वसुंधरा राजे या मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्याप्रमाणे खाविंदचरणारविंदी विलीन होणाऱ्या नेत्या नाहीत आणि अशोक गेहलोत म्हणजे बेफिकीर कमलनाथ नाहीत. शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात श्रेष्ठींनी दिलेला सत्तेचा चतकोर खाली मान घालून स्वीकारला आणि मंत्रिमंडळात नवभाजपीय ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांचे ओझे वागवायला मान्यता दिली. ज्योतिरादित्य यांची आत्या वसुंधरा राजे यांनी मात्र आपले पाणी दाखवले आणि पक्षश्रेष्ठींचा डाव एक शब्द न बोलता उलटवला. राजे आणि गेहलोत या दोघांना आपल्या राज्यांत काही एक स्थान आहे आणि ते त्यांनी कमावलेले आहे. हे दोघेही कमलनाथ यांच्यासारखे फक्त दरबारी राजकारणी नाहीत. त्यामुळे या दोघांच्या राजकीय कौशल्याची प्रचीती त्यांच्या त्यांच्या पक्षनेतृत्वास यामुळे पुन्हा आली असेल. यातून एक बाब स्पष्ट झाली.

काँग्रेस असो वा भाजप. या दोन्ही पक्षांत केंद्रीय नेतृत्व सर्वाधिकार आपल्या हाती ठेवू पाहते. या दोन्ही पक्षांना राज्य पातळीवर नेते म्हणून कठपुतळ्या हव्या आहेत. स्वतंत्र ‘प्रतिभे’च्या राजकारण्यांचे या दोन्ही पक्षांना सारखेच वावडे. जे झाले त्यातून पक्ष म्हणून काँग्रेस किती विसविशीत आहे हे दिसले आणि सत्तेसाठी भाजपची वखवख किती वाढली आहे, हे समोर आले. या नाटय़ानंतर काही नैतिकनाटक्ये, ‘आता गेहलोत-पायलट एकत्र कसे काय नांदणार,’ असा मोठा गहन प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. गुजरात- २००२ दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी राजीनामा द्यायला हवा होता, असे सुनावणाऱ्या तडफदार नेत्या स्मृती इराणी ज्याप्रमाणे केंद्रीय मोदी मंत्रिमंडळातही आनंदाने सामावल्या जाऊ शकतात किंवा आपल्याविरोधात बंड करणाऱ्या केशुभाई पटेलांना मोदी नंतर ‘आपलेसे’ मानू शकतात तर पायलट आणि गेहलोत पुन्हा एकत्र नांदल्यास कोणास आक्षेप असायचे कारण नाही.

कारण आपल्याकडे राजकारण हे मुख्यत: सत्ताकारण असते. त्यामुळे त्यात असलेल्यांनी

उगा जनतेच्या उद्धाराची भाषा वगैरे करणे ही लबाडी आणि त्यावर विश्वास ठेवून भक्तसंप्रदायात सामील होणे मूर्खपणा. सचिन पायलट यांना या घडीला काँग्रेसमध्ये राहण्यावाचून  आणि  भाजपला वसुंधरा राजे यांच्यामागे जाण्यावाचून पर्याय नाही. भाजपचे ‘कमल’दल मिटलेलेच राहिल्यामुळे पायलट आपली काँग्रेसनिष्ठा नव्याने सिद्ध करू शकतील आणि वसुंधरा राजे यांनी स्वार्थासाठी हे काँग्रेसी ‘भृंग’ रोखले म्हणून भाजप तूर्त फोडाफोडीच्या राजकारणापासून आपण कसे अलिप्त हे मिरवू शकेल. ही शांतता क्षणिकच. कारण हे दोन्ही पक्ष आपला सत्तेचा मकरंद शोषण्याचा ‘घेई छंद’ सोडणार नाहीत, हे सत्य.