केंद्र सरकारकडे एखादे भव्यदिव्य क्रीडासंकुल उभारण्यासाठी निधी व इच्छा असेल तर ते महाराष्ट्र, पंजाब किंवा केरळमध्ये उभारण्याची गरज आहे..

अहमदाबादला देशातील सर्वात मोठी क्रीडानगरी बनवण्याचा महत्त्वाकांक्षी मानस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परवा बोलून दाखवला. निमित्त होते नवनिर्मित नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या उद्घाटनाचे. गुजरातमध्ये क्रिकेटपटूंची फारशी परंपरा नाही. बडोदे आणि सौराष्ट्र या संस्थानी संघांतून खेळलेले अनेक; पण त्यांची ओळख गुजराती क्रिकेटपटू अशी कधीच नव्हती. क्रिकेटेतर क्रीडाप्रकार आणि क्रीडापटूंच्या बाबतीत तर हा प्रांत अधिकच दुष्काळी. हे बदलायला हवे, बदलले पाहिजे असे नरेंद्र मोदी यांना पूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना अनेकदा वाटायचे. सैन्यदले आणि क्रीडापटूंमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व कमी असते. ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणून मोदी यांना वाटे. यातूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल अहमदाबादमध्ये उभे राहिले, अशी मौलिक माहिती एका संकेतस्थळावर वाचावयास मिळते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभे राहून स्थानिक क्रीडा विकासास चालना मिळेल, असे मोदी आणि शहा यांना खात्रीने वाटते, हे निश्चित. सारे काही करायचे ते भव्यदिव्यच, आणि जे विक्रमी आणि भव्यदिव्य उभारायचे ते गुजरातमध्येच. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, स्टॅच्यू ऑफ युनिटी ही काही उदाहरणे. हा गुर्जराभिमान कौतुकास्पद खराच. पण भव्यदिव्य क्रीडासंकुले निर्माण केल्याने क्रीडा संस्कृतीची बीजे रुजतील असे नव्हे. किंबहुना, एका किंवा अधिक खेळांमध्ये विशिष्ट एखाद्याच शहरात वा प्रांतात गुणी खेळाडू का व कसे निर्माण होतात, याविषयी निश्चित असे काही शास्त्र नाही. आता जवळपास त्यासंबंधीच्या सीमारेषाही मिटू लागल्या आहेत. कदाचित गुजरातच्या बाबतीतली तशी उणीव भरून काढण्यासाठी क्रीडानगरीचा बेत आखला जात असावा. त्याची चिकित्सा करताना, देशात इतरत्र खेळांमधील प्रज्ञावान, गुणवान कसे निर्माण झाले याचा धांडोळा घेणे गरजेचे आहे.

सर्वाधिक भारतीयांना आवडणाऱ्या क्रिकेटचे केंद्र बरीच वर्षे मुंबईमध्ये होते. क्रिकेट हा निव्वळ भारतीय नव्हे, तर मराठी खेळ म्हणावा असाच. कसोटी क्रिकेटमध्ये आवश्यक मानली जाणारी चिवट आणि खडूस प्रवृत्ती मुंबईकर मराठीजनांत मुरलेली. पुणे, ठाणे या शहरांमध्ये बॅडमिंटनविषयी गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा होत्या. बुद्धिबळ खेळणाऱ्यांसाठी पुणे, सांगली ही शहरे अनुभवसंवर्धनार्थ समृद्ध मानली जायची. मुंबईच्या कामगार वस्त्यांमध्ये कबड्डी,

खो-खोच्या स्पर्धा रंगल्या. कुस्तीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा एके काळी देशभर होता. पुढे हरयाणा- दिल्ली- पंजाबकडे ते केंद्र सरकले. इतर शहरे आणि प्रांतही विविध खेळांसाठी ओळखले जायचे. हॉकी हा खरे तर क्रिकेटपेक्षाही देशप्रिय खेळ. वांद्रे ते खडकी आणि लखनऊ- भोपाळपासून ओदिशा- झारखंडचे आदिवासी पट्टे ते अगदी बेंगळूरु शहरात उत्तम हॉकी खेळली जाई. पंजाब हे तर हॉकीच्या बाबतीत जणू स्वतंत्र संस्थान होते आणि तेथे आजही हॉकी हा खेळ पंजाबी अस्मितेचा अंश मानला जातो. भारतीय संघात या भागांतून आलेले बहुतांश खेळत आणि चमकत. पूर्व व ईशान्य भारत, केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये भारतातील गुणवान फुटबॉलपटू सुरुवातीची काही वर्षे दिसून यायचे. बुद्धिबळाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रापेक्षाही तुलनेने वेगाने क्लब पातळीवरील स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी सोयीसुविधा चेन्नई, कोलकाता येथे निर्माण झाल्या. आजही देशातील सर्वाधिक २०-२५ ग्रँडमास्टर एकटय़ा चेन्नईतून पुढे आले, जगज्जेत्या विश्वनाथन आनंदसह! तीच बाब बॅडमिंटनची. हैदराबाद आणि बेंगळूरु या शहरांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा लवकर आणि मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्या. या बहुतेक भागांमध्ये खेळांच्या सुविधा आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण केंद्रे उभी राहण्यासाठी अत्यावश्यक अशी बाब होती – स्थानिक गुणवत्ता आणि त्यासाठी पोषक अशी खेळांसाठीची आवड. राजाश्रय आणि अर्थाश्रय मिळण्याआधी लोकाश्रय मिळाला. खेळाची ऊर्मी स्थानभूत होती, म्हणूनच भव्यदिव्य काही घोषित करण्याची गरज तेथील किंवा त्या काळातील कोणाही नेत्याला वाटली नाही. अशा घोषणा करून आणि संकुले उभारून हे शक्य आहे, असे कदाचित अलीकडच्या राजकीय नेत्यांना वाटत असेल. इतिहासात त्याचे पुरावे मिळत नाहीत हे मात्र नक्की. मेयर राधाकृष्णन स्टेडियम उभे राहिले म्हणून चेन्नईमध्ये हॉकीपटू निर्माण होऊ लागल्याचे दिसले नाही. तसेच दिल्लीमध्ये १९८२ मध्ये आशियाई स्पर्धा किंवा २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धासाठीही भव्य अशा सुविधांची निर्मिती झाली. त्यातून त्या शहरात उत्तमोत्तम क्रीडापटू निर्माण झाले किंवा खेळांची आवड वृद्धिंगत झाली असे काही घडलेले नाही. दुसरीकडे, एकटय़ा शिवाजी पार्कमुळे दादर-वांद्रे भागांतील असीम क्रिकेट गुणवत्तेला चालना मिळाली आणि ती आज पालघर, डोंबिवली, बोरिवली या उपनगरांमध्ये झिरपली. त्यासाठी मुंबई किंवा महाराष्ट्राला आहे त्यापेक्षा वेगळे काही उभारण्याची गरज भासलेली नाही. कारण क्रिकेटविषयक गुणवत्ता तेथे उपजत आहे.

या उपजत गुणवत्तेवर विसंबून राहायचे की तिच्या विकासासाठी राज्ययंत्रणेनेही प्रयत्न करायचे, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. तो रास्तच. आज गुजरातेतील जसप्रित बुमरा, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, हार्दिक पंडय़ा असे गुणवान क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. परंतु या प्रांतातून एखादे खाशाबा जाधव, मिल्खासिंग, प्रकाश पडुकोण, पी. टी. उषा, विश्वनाथन आनंद, अभिनव बिंद्रा किंवा सिंधू निर्माण होऊ शकली नाही. याची कारणे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आहेत. उपरोल्लेखित बहुतेक क्रीडापटू स्वयंप्रज्ञेने आणि स्वयंप्रेरणेने, तसेच कौटुंबिक पाठबळावर उच्च स्थानावर पोहोचले. बदलत्या जागतिक परिप्रेक्ष्यात ते पुरेसे नाही, हे हरयाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांच्या सरकारांनी योग्य वेळी हेरले. त्यामुळे या राज्यांमधून सरकारी पाठबळावर, सरकारी कार्यक्रमांतून क्रीडापटूंना आधार मिळाला आणि गुणवंत निर्माण होऊ लागल्याचे दिसून आले. महाराष्ट्रासारख्या क्रीडासंपन्न राज्याने ही बाब अजूनही पुरेशा गांभीर्याने घेतलेली नाही.

मात्र याच कारणामुळे, केंद्र सरकारकडे जर खरोखरच एखादे भव्यदिव्य क्रीडासंकुल उभारण्यासाठी निधी आणि इच्छा असेल तर ते महाराष्ट्र, पंजाब किंवा केरळमध्ये उभारण्याची गरज आहे. ओसाडगावी आयटी पार्क उभारून काय साधणार? उपलब्ध गुणवत्तेलाच चालना आणि दिशा देण्यासाठी उभारण्यासारखे भरपूर काही आहे. त्याऐवजी ‘सहा महिन्यांच्या पूर्वसूचनेवरून सुरू होऊ शकेल’ असे अत्याधुनिक क्रीडासंकुल गुजरातमध्ये पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना उभारायचे आहे. तेथे ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, एशियाडसारख्या स्पर्धाही भरवल्या जातील, असे त्यांना वाटते. या स्पर्धा ‘सहा महिन्यांच्या पूर्वसूचने’वरून एक तर भरवल्या जात नाहीत. शिवाय तशा स्पर्धासाठीचे मूळ प्रारूप राजधानी दिल्लीतच उपलब्ध आहेच की. मग तेथेच उपलब्ध सुविधांवर अधिक इमले चढवणे अवघड नाही. नवीन घोषणेबाबत भीती एवढीच वाटते की, नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे द्यावयाचे, ते जगातील सर्वात मोठे असल्याचे (रास्त) कौतुक करवायचे नि कसोटीचा खेळ मात्र पाचऐवजी दोनच दिवसांत आटोपणार, असे काहीसे या संकुलाबाबत होणार तर नाही? अहमदाबादमधील क्रीडासंकुल खेळाची नव्हे, तर नेत्यांची गरज म्हणून उभे राहते की काय असे त्यामुळेच वाटून जाते!