यशवंत देव यांच्या गाण्यांवर लुब्ध झालेल्या साऱ्याच रसिकांना त्यांनी हमखास काव्यलुब्धही केले..

आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर काढलेली तीस वर्षे, प्रभाकर जोग ते शांताबाई शेळके व्हाया सुधीर फडके अशा अनेक आठवणी सांगणाऱ्या यशवंत देव यांच्या जगण्यात एक तत्त्वशील उत्साह असे..

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
issues of society
शब्द शिमगोत्सव
readers reaction on different article of chaturang
पडसाद : ‘पुरुषी एकटेपण’ पटले

भक्तीचे नऊ प्रकार असतात. नवविधा भक्ती. मूर्त ते अमूर्त असा तो प्रवास असतो. शब्द आणि स्वर यांचेही असेच असते. व्यक्त ते अव्यक्त असा हा प्रवास असतो. यावर गुणात्मक भाष्य करावे असे काही नाही. कोणास अव्यक्ताची आवड असू शकते तर कोणी व्यक्ततेत आनंद मानणारा असू शकतो. परंतु व्यक्ततेच्या पातळीवरून अव्यक्तापर्यंत पोहोचण्याची आस असणाऱ्यांना यशवंत देव यांच्यासारख्या शब्दावर प्रेम करणाऱ्या स्वरसाधकाचा मोठा आधार असतो. यशवंत देव यांनी हा आधार या महाराष्ट्रातील तीन पिढय़ांना तरी दिला. ते संगीतकार होते. पण तितकेच कवीही होते. त्यामुळे त्यांची स्वरवेल ही शब्दांच्या आधारे बहरत असे. संगीतकाराने आपापल्या स्वरपट्टय़ा बेतून ठेवायच्या आणि गीतकाराने त्या मापाने त्यात शब्द बसवायचे असा तो काळ नव्हता. त्या काळात एक उत्तम कविता सुचली म्हणून कवी संगीतकारांना ती ऐकवायला फोन करीत आणि संगीतकार त्या शब्दांना सुरांत ओवत.

त्या काळी रात्रीचा शेवट पिंगळ्यांच्या त्या विशिष्ट झांजस्वरांनी होत असे आणि पाठोपाठ आकाशवाणीची सिग्नेचर टय़ून दिवसाच्या प्रारंभाची ग्वाही देत असे. या दिवसाचेही ठळक टप्पे होते त्या काळात. प्रत्येक टप्प्याचा शेवट आणि पुढच्याची सुरुवात आकाशवाणीचे बोट धरून होत असे. कधी काय असेल याची शाश्वती होती. आज जशी भर आषाढात आढळणारी कलिंगडे ऋतुभंग करतात तसे त्या वेळी होत नव्हते. दिवसाचा दुसरा टप्पा ११ वाजता कामगार सभेने सुरू होत असे आणि दिवसाच्या अखेरच्या प्रहरास संध्याकाळच्या सातच्या बातम्यांचा प्रारंभ असे. दिवस संपे तो आकाशवाणीवरच्याच ‘आपली आवड’ किंवा ‘बेला के फूल’च्या साक्षीने. हा यशवंत देवांचा काळ. हा ना. सी. फडके यांच्या स्वप्नाळू नायकांचा काळ. या काळात गजानन वाटवे, बबनराव नावडीकर, राना रानांत गेली बाई शीळ म्हणणारे जीएन जोशी हे मिटत आले होते आणि मंगेश पाडगावकर, सूर्यकांत खांडेकर, भ. श्री. पंडित, मधुकर जोशी, बगळ्यांची माळ फुले लिहिणारे वा. रा. कांत आदी उगवत होते. देव या काळाचे प्रतिनिधी. ज्या काळात गेले द्यायचे राहुनी असे लिहिणारे आरती प्रभू आणि त्यास संगीत देणारे हृदयनाथ मंगेशकर काळाच्या पुढचे वाटत आणि श्रीनिवास खळे यांचे मोठेपण लक्षात यायचे होते, तो हा काळ. त्या काळावर देवांचे राज्य होते. याच काळात ते आकाशवाणीच्या सेवेतही होते. इतिहासात पाहू गेल्यास आकाशवाणीचा हेवा वाटावा अशा माणसांनी आपली उमेदीची वर्षे तेथे व्यतीत केली. बोरकर, सीताकांत लाड, व्यंकटेश माडगूळकर, मंगेश पाडगावकर अशी किती नावे सांगावीत. या सर्वानी आकाशवाणी श्रीमंत केली आणि त्या आकाशवाणीने माध्यमांच्या माऱ्याखाली गुदमरण्याची वेळ अद्याप न आलेल्या श्रोत्यांना शब्दसुरांची संथा दिली. जे त्याच मार्गाने जाणारे होते त्यांना साथ दिली आणि जे नव्हते त्यांना तेथे आणले.

भक्तीचा संदर्भ येतो तो या मुद्दय़ावर. रसिकतेच्या मार्गावर वाटचाल करू पाहणाऱ्यास सुरुवातीलाच कवितेचा टप्पा लागला तर तो तिथे जास्त रेंगाळेलच याची शाश्वती नसते. तो तेथे न थांबण्याचीच शक्यता जास्त. त्याउलट त्या पथिकास सुलभ गाणे मिळाले तर ती स्वरांची पारंबी त्याला अलगदपणे शब्दवृक्षाच्या पारावर आणणार हे नक्की. भले यास कदाचित विलंब लागेल. पण आजचा गाणेलुब्ध हा उद्याचा काव्यलुब्ध होण्याची शक्यता अधिक असते. यशवंत देवांचा मोठेपणा म्हणजे त्यांनी या शक्यतेचे हमखासतेत रूपांतर केले. मंगेश पाडगाकर, शांता शेळके असे अनेक कवी या नात्याने उत्तम होतेच. पण त्यांच्या उत्तमतेचा सुगावा एका मोठय़ा वर्गाला पहिल्यांदा त्यांच्या गाण्यांनी दिला. यात देवांचा वाटा मोठा. असे करताना भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी.. असे फिल्मी भासणारे गाणेही गाजे कधी कधी. पण तो तसा अपवादच.

एरवी आपल्या अस्सल गाण्यांच्या आधारे यशवंत देव यांनी मराठी जनांचे भावविश्व श्रीमंत केले. ही शब्दश: सहज मिळालेली श्रीमंती होती. अखेरचे येतील माझ्या, कुणी जाल का सांगाल का, दिवस तुझे हे फुलायचे, तुझे गीत गाण्यासाठी, तिन्ही लोक आनंदाने, भेट तुझी माझी स्मरते, अशी पाखरे येती, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, डोळ्यांमधले आसू पुसतील, डोळ्यांत सांज वेळी.. अशी एकापेक्षा एक सरस गाणी यशवंत देवांनी दिली. ती जशी त्या काळाची गाणी होती तशीच ती या काळाच्या निरागसतेचीही प्रतिबिंबे होती. खरे तर मूळ प्रतिमा दिसेनाशी झाल्यावर प्रतिबिंबही गायब व्हायला हवे. पण त्या गाण्यांबाबत तसे झाले नाही. ती अजूनही आठवतात. कारण अन्य अनेक गोष्टींप्रमाणे निरागसता ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक असावी. अन्यथा झोपाळेच गेले असताना झोपाळ्यावाचून झुलायचे.. हे गाणे अजूनही लोकांना आठवण्याचेच नव्हे तर नव्या पिढीला आवडण्याचेही कारण नाही. तरीही ते आवडते. देव असेच आवडत गेले.

त्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे त्यांचे कधीही किरकिऱ्या वृद्धात रूपांतर झाले नाही. नव्याशी जोडून घेण्याची विलक्षण क्षमता आणि कौशल्य असलेल्या गुलजारांइतके कधी देव तरुण वाटले नसतील. पण ते.. कठोर शब्द वापरायचा तर.. म्हातारेही वाटले नाहीत. आपण किती कालसापेक्ष आहोत हे दाखवण्याच्या नादात ते उगाच शिंगे मोडून तरुणांच्या कळपांत शिरले नाहीत की नानानानी पार्कात जाऊन गेले ते दिवस.. म्हणत उसासे सोडत बसले नाहीत. देव आपल्या मठीत निवांत होते. फोन कधी केला की उत्साहात बोलत, गप्पा मारायला या म्हणत आणि गेले की दुर्मुखतेने काय काळ आला आहे असे अजिबात म्हणत नसत. वयपरत्वे स्मरणयात्रा तुटत असे त्यांची. पण गाण्यांचे तपशील अचूक आठवत. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर काढलेली तीस वर्षे, प्रभाकर जोग ते शांताबाई शेळके व्हाया सुधीर फडके अशा अनेक आठवणी ते उत्साहाने सांगत. त्यांच्या जगण्यात एक तत्त्वशील उत्साह असे. ही तत्त्वशीलता आचार्य रजनीश यांच्या ओशो काळातील त्यांच्या शिष्यत्वाचा परिणाम असावी. त्या काळात देव हे मराठी रसिकांपासून काही काळ तुटल्यासारखे झाले होते.

पण तो दोष देवांचा नाही. रजनीश म्हटले की मराठी मध्यमवर्गीयांना ‘संभोगातून समाधीकडे’ या त्यांच्या सल्ल्यापेक्षा अधिक काहीही माहीत नाही. हे वास्तव आहे. वास्तविक रजनीश हे उच्च प्रतीचे तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे भाष्यकार होते. सर्जनशील व्यक्तीस आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर हे सगळे कोठून येते या प्रश्नाप्रमाणे तत्त्वचिंतनाची आस लागते. त्याचप्रमाणे ती देवांनाही लागली असावी. पण आपल्याला जे समजत नाही ते सारे थिल्लर असे मानण्याच्या मराठी मध्यमवर्गीय वृत्तीमुळे ते या काळात काहीसे एकटे पडले. त्यांच्या एकटेपणाच्या काळात पूर्वाश्रमीच्या नीलम प्रभू यांनी दिलेली साथ ही एक हृद्य अणि विलोभनीय बाब होती. ती साथ तुटल्यावरही यशवंत देव आयुष्याविषयी कधीही कडवट नव्हते. ही बाब सर्वार्थाने विरळाच.

आता ते या सगळ्या कडूगोडाच्या पलीकडे गेले. खऱ्या अर्थाने करुणेच्या जगात त्यांनी प्रवेश केला. यशवंत देव ज्या काळाचे प्रतिनिधी होते तो काळ कधीच सरला. पण त्या काळातील त्यांची गाणी, कविता आणि एकूणच त्यांच्या कलाविष्काराचे आकाश आजही तसे आहे. त्याकडे पाहून.. देवा तुझे किती सुंदर आकाश.. असे सहज म्हणता येईल. त्या निखळनिरभ्र आकाशास ‘लोकसत्ता’ची आदरांजली.