कितीही उदारमतवादी चष्म्यातून पाहिले तरी काँग्रेस/ राष्ट्रवादी आणि शिवसेना हे समीकरण चालण्यायोग्य भासत नाही.. हे तीनही पक्ष एकाचवेळी इतके लघुदृष्टीचे कसे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या पक्षांच्या विरोधावर निवडणुका लढवल्या त्याच पक्षांशी नंतर हातमिळवणी करावयाची असेल तर या सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाच्या ध्येयधोरणांना अधिकृतपणे मूठमाती द्यावी. कारण त्यांना काहीही अर्थच राहात नाही..

राजकीय पक्षांकडून नैतिकतेची अपेक्षा करणे म्हणजे दुधखुळेपणा हे मान्य. पण हे राजकारण किमान निलाजरे तरी नसावे अशी देखील इच्छा आता अतिशयोक्ती ठरेल, असे दिसते. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्या घटस्फोटानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा जो शय्यासोबतीचा नवा तिहेरी खेळ सुरू होताना दिसला तो पाहिल्यावर हे जाणवते. या तिहेरी संसार प्रयोगामुळे राजकारण म्हणजे कोणीही कोणाबरोबर जाऊन वेळ साजरी करावी ही नवीनच पद्धत रूढ होणार असून या तीनही पक्षांचा लोभ तेवढा त्यातून दिसतो. चार आण्याच्या हुशारीसाठी बारा आण्यांचा म्रू्खपणा करून दाखवण्याची या पक्षांची क्षमता अभूतपूर्व मानायला हवी. सत्तासंधीने हे तीनही पक्ष इतके आंधळे झालेले दिसले की या आततायीपणामुळे अंतिम नुकसान आपलेच होणार आहे, हे कळण्याइतकाही विवेक त्यांच्या लेखी शिल्लक राहिलेला नाही.  जे काही सुरू आहे ते पोरखेळापेक्षाही भयानक म्हणायला हवे.

आपण वडिलांना शब्द दिला होता म्हणून मुख्यमंत्रीपद शिवसेनेस हवे हा उद्धव ठाकरे यांचा दावा. असे दिल्या शब्दास जागणे केव्हाही चांगलेच. त्यात हा शब्द आपल्या दिवंगत तीर्थरूपांना दिला असेल तर त्याच्या पूर्ततेसाठी चिरंजीवांनी प्रयत्न करणे हे तसे कर्तव्यच. पण उद्धव ठाकरे यांच्या मनात ही कर्तव्यपूर्तीची भावना दाटून येत असताना काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांचे तीर्थरूप सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सारे राजकारण काँग्रेसविरोधावर चालले. किंबहुना सेनेची स्थापना काँग्रेसच्या मराठीद्वेष्टय़ा राजकारणामुळे झाली. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधाचे राजकारण कागदोपत्री तरी केले. अशा वेळी त्यांच्या कथित शब्दपूर्तीसाठी काँग्रेसशीच हातमिळवणी करणे हा बाळासाहेबांच्या स्मृतींचा सन्मान मानायचा काय? काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे राजकारण हा कायम सेनेच्या द्वेषाचा विषय राहिलेला आहे. काँग्रेसी नेते भ्रष्ट आहेत, हिंदुविरोधी आहेत, ते मुसलमानांचे लांगूलचालन करतात, त्यांनी अल्पसंख्याकांना डोक्यावर बसवून ठेवले आहे आदी आरोप हे सेना नेत्यांकडून सातत्याने केले गेलेच. पण शरद पवार यांच्यासारख्यांची संभावना बाळासाहेबांनी सातत्याने ‘मैद्याचे पोते’ अशा असभ्य शब्दांत केली. आता त्या विशेषणधारी व्यक्तीकडेच मुख्यमंत्री पदासाठी पदर पसरण्याची वेळ सेनेवर आली, यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीस आनंद वाटेल की विषाद? सेनेची पुढची पाती आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना रावण ठरवत त्यांच्या दहनाची हाक दिल्याचा इतिहास ताजा आहे. आता ते या ‘रावणां’बरोबर सत्ता स्थापन करणार काय?

यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या वडिलांना दिलेला शब्द स्वत:च्या सामर्थ्यांवर पूर्ण करायचा की वडिलांनी आयुष्यभर ज्यास शत्रू मानले त्याच्या आश्रयास जाऊन ही शब्दपूर्ती करायची? यात अधिक गौरवपूर्ण काय? शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या शब्दांचे महत्त्व लक्षात घेता शिवसेनेने खरे तर निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करणेच चुकीचे होते. मर्द मराठय़ांच्या गौरवार्थ लढणाऱ्या पक्षाने हिंदी भाषकांचा अनुनय करणाऱ्या भाजपसमोर इतके लोटांगण घालायची काही गरज नव्हती. त्यामुळे नरेंद्र मोदी / अमित शहा यांच्या भाजपला आव्हान देत शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या असत्या आणि आवश्यक ते मताधिक्य मिळवून मुख्यमंत्रीपदावर झडप घातली असती तर ते त्या पक्षाच्या शौर्य दाव्यास शोभून दिसले असते. तसा प्रयत्नही सेनेने केल्याचे दिसले नाही. उलट मोठा भाऊ वगैरे म्हणवून घेणाऱ्या सेनेची बोळवण या निवडणुकीत भाजपने कमी जागांवर केली. त्यावेळी बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाची आठवण सेना नेत्यांना झाली असती तर त्यांना अधिक आनंद झाला असता.

आता दुसऱ्या बाजूविषयी. काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी यांच्यासाठी शिवसेना हा नेहमीच जातीय, धर्माध असा पक्ष राहिलेला आहे. बाबरी मशीद पाडणे रा. स्व. संघ परिवारातील धार्मिक वा राजकीय नेत्यांनी मिरवले नसेल तितके ते शिवसेनेने मिरवले. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या रक्षणाचा मुद्दा असो वा भारत-पाकिस्तान सामने असोत. सेनेची भूमिका काँग्रेसच्या नजरेतून ही कायमच संकुचित राहिलेली आहे. त्यामुळे कितीही उदारमतवादी चष्म्यातून पाहिले तरी काँग्रेस/ राष्ट्रवादी आणि शिवसेना हे समीकरण चालण्यायोग्य भासत नाही. समान नागरी कायदा ते जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद ३७०चे उच्चाटन या मुद्दय़ांवर सेनेची भूमिका काय हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना माहीत नसणे शक्य नाही. तरीही त्यांना शिवसेना पाठिंब्यायोग्य वाटत असेल तर ते या दोन्ही पक्षांच्या विवेकशून्यतेचेच लक्षण ठरते.

गेला काही काळ, विशेषत: गेले काही महिने, भाजपचे वर्तन हे घटक पक्षांसाठी आक्षेपार्ह होते यात शंका नाही. आपल्या अंगणातून सत्तासूर्य कधीच मावळणार नाही, असा त्या पक्षाचा आविर्भाव होता. ज्या पद्धतीने त्या पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील एकापेक्षा एक गणंगांना आयात करण्याचा सपाटा लावला होता तो ऐन भरात असताना दाखवण्याची हिंमत काँग्रेसलाही झाली नसती. ही भाजपची बेमुर्वतखोरी होती आणि त्याची शिक्षा त्यांना मिळणे ही काळाची गरज होती. ती त्यांना मिळाली. पण भाजपच्या त्या पापात सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेचाही सहभाग होता, हे नाकारता येणार नाही. तेव्हा भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यावर मग सेनेचा आत्मसन्मान जागा झाला आणि पुढे जे काही झाले ते झाले.

पण यातून राजकारणाचा या सर्वानी किती बट्टय़ाबोळ केलेला आहे ते दाखवून देणारे आहे. ज्या पक्षांच्या विरोधावर निवडणुका लढवल्या त्याच पक्षांशी नंतर हातमिळवणी करावयाची असेल तर या सर्व  राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाच्या ध्येयधोरणांना अधिकृतपणे मूठमाती द्यावी. कारण त्यांना काहीही अर्थच रहात नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात. शिवसेनेस पाठिंबा देणे ही कोणती धर्मनिरपेक्षता? आता हा जो काही बट्टय़ाबोळ होऊ घातला आहे त्यातून काँग्रेस वा राष्ट्रवादी हेही आता हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकावू लागणार की शिवसेना आता पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार?

याबरोबरीने एक महत्त्वाचा प्रश्न असा की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकाचवेळी इतके लघुदृष्टीचे कसे? या तिघांचे तिरपागडे आघाडी सरकार आल्यास ते टिकाऊ असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यासाठी या तिघांसाठी आता विरोधी बनलेल्या भाजपने काही विरोध करायचीदेखील गरज नाही. हे तीनही पक्ष आपापल्यांतील अंतर्वरिोधाच्या वजनानेच आज ना उद्या आपटणार, कारण हे सरकार पाच वर्षे टिकणे केवळ अशक्य. आणि असे झाल्यास जेव्हा केव्हा निवडणुका होतील त्यावेळेस भाजप या तिघांच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल याचीही जाण त्यांना असू नये? हे  तीनही पक्ष घराणेशाहीचे प्रतीक. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भाजपच्या मते भ्रष्टाचाराचे आगर. त्यात त्यांना शिवसेना मिळाली तर पुढच्या वेळी भाजपच्या प्रचाराचा जोर असा काही असेल की त्यात ही तिरपागडी युती वाहून जाण्याचा धोका आहे. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जो काही प्रचार केला त्याची काही एक पुण्याई फळास आली. पण ‘‘आपणास मताधिक्य नाही, आम्ही विरोधी पक्षांत बसू,’’ ही त्यांनी घेतलेली भूमिका समंजस शहाणपणाची होती. त्यानंतर शिवसेनेच्या आग्रहास बळी पडून पवार हे देखील आपली अनुभवी शिंगे मोडून या वासरांत सहभागी होणार असतील तर त्यांची पुण्याई धुपून जाण्याचा धोका आहे.

तेव्हा सध्या सुरू आहे त्यात तात्कालिक फायद्यापेक्षा अधिक काही नाही. सबब हा तीन ‘पक्षांचा’ तमाशा महाराष्ट्रासाठी फार आनंददायक आणि आशादायी असेल असे नाही.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial on shiv sena congress ncp alliance abn
First published on: 12-11-2019 at 00:05 IST