धर्माच्या कडेकोट बंदोबस्तात मिळणारी सुरक्षितता आधुनिकपूर्व काळातील समूहांना सुखावणारी होतीच, पण भारतीयांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण आता राज्यघटना करते..

व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच तांत्रिकदृष्टय़ा कायदेशीर ठरवता येईलही; पण सांस्कृतिक प्रगतीला त्यातून नकार मिळेल..

समाज म्हणून माणूस एकत्रित राहू लागल्यानंतर  माणसांच्या आहारविहाराचे नियमन करण्याची कल्पना पुढे आली. कोणी कसे वागावे, कोणी कसे बोलावे, कोणी काय खावे, कोणी कोणाशी विवाह करावा या पद्धतीचे नियम रूढी म्हणून सर्वमान्य झाल्याचे समजण्यात येऊ लागले. एका अर्थाने हे विचाराऐवजी विश्वासच केवळ महत्त्वाचा मानणारे समाजाच्या त्या-त्या वेळच्या वैचारिक घडणीशी हे नियम सुसंगत नसले, तर संघर्ष निर्माण होतो. याच समाजातील काहींना असे नीतीनियम हे बेडय़ा वाटतात. त्यांच्या अभिव्यक्तीला, आचार विचाराला, स्वायत्ततेला खीळ घालणारे वाटू लागतात. हा संघर्ष आधी मूठभरांचा त्रागा भासेल, पण त्यातूनच नव समाजरचनेचा उदय होतो. बदल काळाच्या ओघात संथपणे घडत राहतात. समाज त्यांना अप्रत्यक्षपणे मान्यता देत राहतो आणि त्यातून नव्या रचनेला संधी मिळते. मानवी समाजातील या चालीरीतींचे कधी सामाजिक संकेत होतात, तर कधी कायदे. ते त्या त्या परिसरातील समूहासाठी असतात. त्यात बदल कसा घडतो, तो कोणा सत्तेमुळे घडू शकतो का? धर्म, जात या चौकटी भेदणारा आधुनिक काळ पुन्हा धर्मभेदांच्या आश्रयाला कसा जातो, हे प्रश्न हळूहळू टोकदार होत आहेत.

धर्माच्या कडेकोट बंदोबस्तात मिळणारी सुरक्षितता आधुनिकपूर्व काळातील समूहांना सुखावणारी होती, हे खरे. परंतु त्यालाही अंतर्गत विरोध होत राहणे हे मानवाच्या ठायी वृद्धिंगत होत असलेल्या बुद्धीमुळे स्वाभाविकच. त्यामुळेच धर्माने आखून दिलेल्या चौकटी आतून मोठय़ा करण्याचे काम अनेक धुरिणांनी केले. त्यांच्या हयातीत, बहुसंख्येने असलेल्या अन्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांना वाळीतही टाकले. परंतु काळाच्या प्रत्येक टप्प्यावर असे धुरीण निपजत राहिले आणि सामाजिक सुधारणांची लढाई चालूच राहिली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने विवाहासंबंधाने नुकत्याच दिलेल्या निवाडय़ात केवळ विवाहासाठी धर्म बदलणे अयोग्य ठरवले आहे. आजवर सांस्कृतिक उत्कर्षांची लढाई ही मानवाच्या आंतरिक इच्छापूर्तीची राहिली नाही, तर धर्ममरतड विरुद्ध बंडखोर धुरीण अशी होत आली आहे. माणसाच्या सांस्कृतिक उन्नयनाच्या काही लाख वर्षांच्या इतिहासात होत गेलेले बदल पाहिले, तर अशा प्रकारचा निवाडा पुन्हा एकदा काही शतके तरी मागे ढकलणारा आहे, असे म्हणावे लागेल. दोन विभिन्न विचारप्रवाहांची सरमिसळ होत राहणे हे माणसाच्या मेंदुवृद्धीचे लक्षण मानले गेले. त्यामुळे धर्माचरण की आंतरिक ऊर्मी अशी नवीच लढाई जगाच्या सगळ्या भागात लढली जाऊ लागली. पृथ्वीवरील मानवी संस्कृती प्रगत होत गेली, तसतशी ती एकमेकांचे स्वातंत्र्य जपण्यासच प्राधान्य देत आली. ‘तुझे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मी अधिक प्रयत्नशील राहीन’ हा संस्कृतीचा आविष्कार ठरला. परंतु सत्ता या कल्पनेचा उगम त्याही आधीचा आणि ती संकल्पना संस्कृतीचे संस्कार स्वीकारतेच असे नाही. त्यामुळे ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ यासाठी हमरीतुमरी सुरू झाली. त्यातूनच धर्मसत्ता आणि राजसत्ता यांना खतपाणी मिळत गेले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामागे गेल्या काही दशकांत मुस्लिमांकडून हिंदू मुलींचे होत असलेले अपहरण आणि त्यामागील धर्मवृद्धीची कल्पना याचा संदर्भ आहे. अशा प्रकारच्या घटनांसाठी ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना रुजवण्यात आली. प्रत्येक आंतरधर्मीय विवाहात सक्ती आणि बलप्रयोगच असतो, असे या संकल्पनेचे गृहीतक आहे. ते सर्वथा चुकीचे आहे किंवा नाही, याविषयी सार्वत्रिक पातळीवर चर्चा करण्याची कुणाची तयारी नाही. परंतु ‘हे असेच असते,’ असे ठामपणे म्हणणाऱ्यांना केवळ बहुसंख्यांचे पाठबळ मात्र दिसते. परंतु बहुसंख्य म्हणतात किंवा मानतात ते बरोबर आणि त्याचे पालन हीच समाजसंस्कृती असे मानणे हे समाजरचनेचा वैचारिक आधारच नाकारणारे आहे. भौतिक प्रगतीबरोबर माणसाच्या विचारविश्वातही खूप त्सुनामी आल्या. त्यांना परतवून लावताना संख्येने मूठभरच, परंतु विचारसमृद्ध असलेल्या माणसांची कमालीची दमछाकही झाली. तरीही प्रयत्न मात्र थांबले नाहीत. परिणामी, मानवी समूहातील वैचारिक धारणांमध्ये हळूहळू कालसुसंगत बदल होत गेले, असे इतिहास सांगतो. तो मान्य करायचा, तर प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि त्याच्याशी इमान राखण्याची मुभा असायलाच हवी. स्त्री आणि पुरुष यांच्यातच विवाह होऊ शकतो या कठोर चौकटीपासून समलिंगी विवाहास मान्यता देण्यापर्यंतचा प्रवास सहजसोपा निश्चितच नव्हता. म्हणूनच प्रत्येक विवाह हा धार्मिक चालीरीतींशीच निगडित असायला हवा, असे म्हणणे म्हणजे पुन्हा एकदा भूतकाळात जाण्यासारखे. ‘लव्ह जिहाद’ या कल्पनेत नेमके हेच अनुस्यूत दिसते. घटनेने दिलेले विचार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य करायचे, तर अशा प्रत्येक विवाहात कोणीतरी कोणावर तरी सक्तीच केली आहे, असे मानणे सर्वथा चुकीचे. आईवडिलांनी ठरवून दिलेल्या मुलाशीच विवाह करण्याची संस्कृती जवळजवळ नामशेष होत आली असली, तरी तिचे भग्नावशेष अजूनही असे डोके वर काढतातच.

एकाच धर्मातील विवाह पद्धतींबाबतही अनेक कठोर नियमांचे पालन होण्याची सक्ती वैचारिक क्रांतीनंतरच्या काळात सैलावत गेली. परंतु तरीही ती ‘कोणतीही मुलगी आण, पण परधर्मातील नको’ येथपर्यंतच येऊन थांबली. त्यालाही छेद द्याल तर दोन्ही धर्मातील बहुसंख्यांच्या रोषाला बळी पडाल, अशी रचना वैयक्तिक आणि सांस्कृतिक विकासापासून माणसाला वंचित करणारीच ठरते. कोणाशी संसार करायचा, हे ठरवण्याचा अधिकारही केवळ धर्माच्या आधारावर हिरावून घेणे हे अधिक धोक्याचे. अर्थात आजही संसार करणाऱ्या दोघांपैकी कुणीही एकमेकांवर सक्तीचा आरोप करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतेच. हे केवळ भिन्न धर्मीयच नव्हे, तर एकाच धर्मातील, अगदी जात- पोटजात पाहून केलेल्या विवाहांतही घडतेच. कुटुंब न्यायालयात प्रचंड संख्येने दाखल होत असलेल्या तक्रारींवरून तर हे स्पष्टच होते. तरीही राजसत्तेने अशा व्यवहारांमध्ये नाक खुपसून विभिन्न धर्मातील स्त्री-पुरुषांनी केवळ विवाहासाठी धर्मातर करण्यास बंदी घालणारे कायदे करणे, हे राज्यघटनेतील स्वातंत्र्याच्या चौकटीत कसे काय बसू शकते? उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे अमलात आणण्याची तयारी सुरू आहे. हा प्रयत्न एक प्रकारे, धर्माभिमानी आग्रहांना राज्यघटनेच्या चौकटीत कोंबण्याचा. तो तांत्रिकदृष्टय़ा- विधानसभांतील संख्याबळामुळे- यशस्वी होईलही. पण त्याने सांस्कृतिक विकासाचा कोणता टप्पा आपण गाठणार आहोत? व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणे, व्यक्तींना निवडीचे स्वातंत्र्य देणे हे मूल्य गेल्या दोनशे वर्षांत जगभर डोळसपणे स्वीकारले गेले. धर्म बुडतो अशी आवई उठवून या निवडस्वातंत्र्याचा छुपा अव्हेर करणे, त्यासाठी या मूल्यावरच ‘पाश्चात्त्य’ असा शिक्का मारणे, हे आपलाच खुजेपणा दाखवणारे. त्याने कदाचित बहुसंख्याक समाजाचा तात्कालिक फायदा होईल, त्यातून राजकीय सत्तेलाही अधिक बळ मिळेल वगैरे ठीक. पण मानवी प्रयत्नांवर विश्वास ठेवून विज्ञानाला वाव देण्यासाठी निवडस्वातंत्र्याचे मूल्य महत्त्वाचे मानणारी जी संस्कृती मानवसमाजाने जोपासली, तिच्या पुढे न जाता उलट तिच्याशी तात्कालिक फायद्यासाठी आणि निव्वळ एखाद्या- किंवा जन्माने दिलेल्या- धर्माच्या भल्यासाठी आपण आपल्याच प्रगत संस्कृतीशी धर्मयुद्ध पुकारण्यात काय हशील आहे?