02 June 2020

News Flash

मैफलीस मुकताना..

करोना विषाणूच्या अघोषित वैश्विक संचारबंदीमुळे इतर बहुतेक क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्राचीही अतोनात हानी झालेली आहे

संग्रहित छायाचित्र

यंदा ‘ग्रँड स्लॅम’ मानल्या जाणाऱ्या टेनिस स्पर्धा नाहीत, यापेक्षाही सभ्यतेचा आब आणि संस्कृतीची बूज राखणारी ‘विम्बल्डन’ नाही, याची चुटपुट अधिक..  

सध्याची भीषण परिस्थिती पाहता हुकलेल्या क्रीडा स्पर्धाविषयी आक्रंदणे कदाचित अपरिपक्वपणाचे आणि हृदयशून्यतेचे लक्षणही ठरवले जाऊ शकते.. पण विम्बल्डन ही केवळ आणखी एक स्पर्धा नव्हे. ती एक संस्कृती आहे.. कितीएक कहाण्या ‘सेंटर कोर्ट’ नामक टेनिसशौकिनांच्या भावनिक राजधानीत मूर्तरूपात उतरल्या आणि मन:पटलावर कायमस्वरूपी कोरल्या गेल्या..

करोना विषाणूच्या अघोषित वैश्विक संचारबंदीमुळे इतर बहुतेक क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्राचीही अतोनात हानी झालेली आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा वर्षभर पुढे ढकलावी लागली. दोन महायुद्धांच्या काळात तीन वेळा ही स्पर्धा रद्दच झाली होती. परंतु युद्धेतर कारणास्तव, ठरलेल्या वर्षी ऑलिम्पिक न होण्याची ही पहिलीच वेळ. ऑलिम्पिक वर्षांतीलच दोन महत्त्वाच्या फुटबॉल स्पर्धा म्हणजे युरो चषक आणि कोपा अमेरिका. यंदा त्याही होणार नाहीत. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलली गेली आहेच. आता विम्बल्डन टेनिस स्पर्धाही थेट पुढील वर्षी होणार आहे. फ्रेंच आणि अमेरिकन स्पर्धाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. अमेरिकन स्पर्धा ऑगस्टमध्ये आणि फ्रेंच स्पर्धा त्यानंतर भरवण्याचे योजिले जात आहे. तेही जवळपास अशक्य दिसते. कारण अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये करोना विषाणू थैमान घालतो आहे. त्यातून सावरण्यास कदाचित दोन्ही देशांना उर्वरित वर्षही पुरेलसे वाटत नाही. अमेरिकन टेनिस संघटनेच्या बिली जीन किंग सेंटरवर लवकरच तात्पुरते रुग्णालय उभे राहणार आहे. नजीकच्या भविष्यात तशीच वेळ ऑल इंग्लंड टेनिस क्लबच्या मालकीच्या विम्बल्डन टेनिस संकुलावर येऊ शकते. सध्याची भीषण परिस्थिती पाहता हुकलेल्या क्रीडा स्पर्धाविषयी आक्रंदणे कदाचित अपरिपक्वपणाचे आणि खचित हृदयशून्यतेचे लक्षणही ठरू शकते. पण क्रीडा  स्पर्धा आस्वादणे हा गेल्या काही वर्षांत आपल्या जगण्याचा भाग बनून गेला होता. आता जगणेच अस्थिर आणि अशाश्वत बनले असता, हा विरंगुळाही गेला त्याचा विषाद वाटणारच. तशातच विम्बल्डनसारख्या स्पर्धेचे महत्त्व निव्वळ क्रीडा आस्वादापलीकडचे ठरते. ती एक संस्कृती आहे. शिस्तीच्या चौकटीत राहूनही टेनिसचा म्हणजेच क्रीडेचा उत्कट आविष्कार सादर करता येऊ शकतो. आणि असा चौकटबद्ध क्रीडा आविष्कारही मनमुराद आस्वादता येऊ शकतो हे विम्बल्डनने वर्षांनुवर्षे दाखवून दिले आहे. यंदा ही स्पर्धाच रद्द झाली त्यामुळे निर्माण झालेली पोकळी चुटपुट लावणारीच.

टेनिस स्पर्धाना, विशेषत: चार ग्रँड स्लॅम स्पर्धाना त्या ज्या देशात खेळवल्या जातात त्यांच्या सीमा ओलांडून एक व्यापक आणि विशाल चाहता वर्ग आहे. भारतात ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवरून या स्पर्धाचे प्रसारण सुरू झाले आणि एक मोठा टेनिस आस्वादक वर्ग निर्माण झाला. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन (इंग्लिश) आणि अमेरिकन या प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा मानल्या जातात. पण विम्बल्डन वगळता इतर तीन स्पर्धामध्ये झालेले संस्मरणीय सामने कोणते, या प्रश्नावर फार उत्तरे मिळणार नाहीत. याउलट बोर्ग-मॅकेन्रो द्वंद्व, मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट यांच्यातील स्पर्धा, बोरिस बेकरचा अफलातून उदय, इव्हान लेंडलच्या वाटय़ाला वारंवार येणारी विम्बल्डन शोकांतिका, पीट सॅम्प्रासचे साम्राज्य, स्टेफी ग्राफची झळाळती कामगिरी, मोनिका सेलेस आणि मार्टिना हिंगिस यांची चमकदार कारकीर्द, आंद्रे आगासीची जिगर, गोरान इव्हानिसेविचच्या सर्व्हिसची दहशत, विल्यम्स भगिनींची मातबरी, मारिया शारापोवाचा सौंदर्योन्मादी खेळ, नवीन सहस्रकात सुरू झालेला रॉजर फेडररचा एकछत्री अंमल, त्याला प्रथम राफाएल नडाल आणि नंतर नोव्हाक जोकोविचने दिलेले यशस्वी आव्हान हे सगळे स्वतंत्र पुस्तकांचे विषय ठरू शकतात. या कहाण्या विम्बल्डनच्या संकुलात, हिरव्यागार नैसर्गिक हिरवळीच्या कोर्टवर आणि त्यातही सेंटर कोर्ट नामक टेनिसशौकिनांच्या भावनिक राजधानीत मूर्तरूपात उतरल्या आणि मन:पटलावर कायमस्वरूपी कोरल्या गेल्या. १९८० मध्ये बोर्गने मॅकेन्रोवर केलेली थरारक मात, २००८ मध्ये फेडररची सद्दी मोडून काढताना नडालने दाखवलेली जिगर किंवा अगदी गेल्या वर्षी जोकोविच आणि फेडरर यांचे पाच सेट्स आणि जवळपास पाच तास रंगलेले द्वंद्व यांची आठवण चटकन पुसण्यातली नाहीच. कोणी कितीही प्रयत्न केला तरी ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि अमेरिकन या इतर तीन स्पर्धामध्ये अशा प्रकारच्या रंगलेल्या सामन्यांच्या (भले रंगलेले सामने भरपूर असले तरी) दंतकथा बनू शकल्या नाहीत. ‘आम्हीही पाहिली ती लढत’ असे अभिमानाने सांगितले जात नाही. विम्बल्डन स्पर्धा इतकी खास कशी काय बनली?

टेनिसमधली ही सर्वात जुनी स्पर्धा. कर्कश परंपरावादाच्या सध्याच्या युगातही विम्बल्डनची पारंपरिक मूल्ये उष्ण झळांमध्ये शीतल सावलीसारखीच. नव्वद टक्के पांढरा पोशाख हे ठळक वैशिष्टय़. पांढरा म्हणजे हस्तिदंती किंवा पिवळसपर पांढराही चालणार नाही. लख्ख पांढराच हवा. या नियमाचा निषेध म्हणून अमेरिकेच्या आंद्रे आगासीने चार वर्षे विम्बल्डनवर बहिष्कार टाकला होता. पण विम्बल्डन अजिंक्यपद नसेल, तर टेनिस माहात्म्य पूर्णत्वाला जात नाही. अखेरीस आगासी विम्बल्डनकडे वळलाच. १९९२ मध्ये जिंकलाही. ‘विम्बल्डनने दोन गोष्टी शिकवल्या. पांढऱ्या पोशाखाचे सौंदर्य आणि नतमस्तक होणे. ते अजिंक्यपद माझ्यासाठी सर्वात मूल्यवान आहे,’ हे त्याचे शब्द या स्पर्धेविषयी आदर व्यक्त करणारेच. विम्बल्डन जिंकलो आणि जगाचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असे बोरिस बेकर त्याच्या इतर दोन अजिंक्यपदांविषयी (ऑस्ट्रेलियन, अमेरिकन) बोलत नाही. नऊ वेळा विम्बल्डन जिंकलेल्या मार्टिना नवरातिलोवासाठी हे दुसरे घरच आहे. गेली तीन दशके ती विम्बल्डनला दरवर्षी न चुकता जातेच. सात वेळची विजेती स्टेफी ग्राफ लहानपणी अनेकदा विम्बल्डनला आली होती. पण सेंटर कोर्टवर पहिल्यांदा जाण्याचा अनुभव तिच्यासाठी थरारून टाकणारा होता. एरवी रंगीबेरंगी आणि वलयांकित राहणारे हे टेनिसपटू विम्बल्डनच्या हिरवळीवर पांढऱ्या पोशाखात उतरतात. हिरव्या आणि जांभळ्या रंगाचे नेपथ्य लाभलेल्या रंगपटावर त्यांचा खेळ सुरू होतो. त्या चैतन्यवादळाला दाद मिळते तीही सभ्यतेचा आब आणि संस्कृतीची बूज राखूनच. पण ही सौम्य, संयमी दादही टेनिसपटूंसाठी ऊर्जादायी ठरते. काही वेळा प्रेक्षकांकडून आगळीक झालीच, तर त्याबद्दल कोर्टवरील पंचांकडून मिळणारी तंबीही नेमक्या शब्दांत आणि परिणामकारक ठरेल अशीच. शिस्त हा एकच धर्म तिथे स्वयंस्फूर्तीने पाळला जातो.

विम्बल्डन स्पर्धा सुरू होते, त्या वेळी इकडे विशेषत: अर्ध्या भारतात तुफान पावसाला सुरुवात झालेली असते. बाहेर पाऊस, ओल्या मातीचा सुगंध, समोर वाफाळणारा चहा आणि टीव्हीवर विम्बल्डनचे सामने असा अपूर्व योग वर्षांतून एकदाच जुळून येतो ही बाब त्या स्पर्धेविषयी आत्मीयता वाढवणारीच. यंदा त्याची अनुभूती टेनिसदर्दीना होणार नाही. आणखी किमान सव्वा वर्ष वाट पाहावी लागणार. यंदाही पाऊस पडेल, मातीचा सुगंध आणि वाफाळणारा चहाही मिळेल, पण या मैफलीत विम्बल्डनला मुकल्याची जाणीव, सगळी मैफलच बेरंग करणारी ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 12:02 am

Web Title: editorial on this years wimbledon tournament is canceled due to corona abn 97
Next Stories
1 चिमण्यांचा गरुड !
2 इस्लाम ‘खतरेमें’.. !
3 पुनश्च हरि ॐ!
Just Now!
X