धर्मवेडय़ांकडे एखादेच वा मोजकीच श्रद्धास्थाने असतील, पण फ्रेंचांकडे उदंड प्रतीके आहेत.. अगदी ‘ईश्वरनिंदेचा अधिकार’ हेसुद्धा फ्रेंच प्रतीकच ठरते! 

प्रतीकांची ही समृद्धी फ्रेंचांनी वैचारिक संघर्षांतून, उद्यमशीलतेतून आणि मुख्य म्हणजे मोकळेपणामधून मिळवलेली आहे; तीही ‘भावना दुखावल्या’ वगैरे फंदात न पडता..

ईश्वरनिंदा हा मुद्दा फ्रान्समध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत येतो. ईश्वरनिंदेला त्या देशात कायदेशीर अधिष्ठान आहे. पण म्हणून साम्यवादी देशांप्रमाणे येथे ईश्वरभक्तांची सरसकट गळचेपी केली जात नाही. ईश्वरी आराधना करण्याचा हक्क जितका पवित्र, तितकाच ईश्वर ही संकल्पनाच झुगारून देऊन तिची टिंगल करण्याचा हक्कही त्या देशात पवित्र मानला जातो. व्यक्तीइतकेच महत्त्व तिच्या अभिव्यक्तीला. अभिव्यक्त होण्याने कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या जातात हा मुद्दाच तेथे गृहीत धरला जात नाही. धर्माच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची टिंगलटवाळी करणे किंवा तिला हिंसाचारास उद्युक्त करणे हे निषिद्ध आहे. परंतु प्रत्यक्ष एखाद्या धर्माची आणि त्या धर्माच्या केंद्रस्थानी असलेल्या ईश्वराची टिंगल निषिद्ध नाही! धर्मनिरपेक्षता ही तेथे विधिसंमत आहे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची तेथे परंपराही आहे. आपल्याकडेही ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द संविधानाच्या सरनाम्यात असला, तरी धार्मिक प्रतीकांविषयी अभिव्यक्त होण्याबाबत काही अलिखित नियम-मर्यादा आहेत. हे स्वातंत्र्य सरसकट आणि अनिर्बंध नाही. फ्रान्समध्ये तसे नाही. किंबहुना, अन्य कित्येक पाश्चिमात्य देशांपेक्षाही अधिक आग्रहाने अभिव्यक्तीची जपणूक फ्रान्समध्ये होते आणि ईश्वरनिंदा करण्याच्या हक्काला मोकळीक दिली जाते. गेल्या काही वर्षांत हा देश इस्लामवादी जिहादींचे लक्ष्य ठरू लागला आहे, याचे प्रमुख कारण हे आहे. १६ ऑक्टोबर रोजी सॅम्युएल पाटी नामे शिक्षकाचा झालेला शिरच्छेद, मग परवा गुरुवारी नाइस शहरातील एका चर्चमध्ये झालेली तिघांची हत्या (त्यातही एकाचा शिरच्छेद) ही कृत्ये इस्लामवादी दहशतवाद्यांनीच केल्याचे सिद्ध झाले आहे. २०१५ मध्ये ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्राधारित मासिकाच्या कार्यालयावर झालेला हल्ला, पॅरिसमध्ये त्याच वर्षी झालेले भयंकर दहशतवादी हल्ले, नाइस शहरातच एका जमावातील ८० जणांना चिरडणारा आणखी एक हल्ला या घटना ताज्या आहेत. अमेरिका आणि भारतानंतर जिहादी दहशतवादाची झळ पोहोचलेला फ्रान्स हा तिसरा मोठा लोकशाहीवादी देश ठरतो. प्रत्येक देशासंदर्भात कारणे वेगवेगळी असली, तरी फ्रान्सच्या बाबतीत हे हल्ले अधिक सातत्याने होताना दिसतात. त्यांमागील कारणे शोधणे आपल्या दृष्टीनेही हितावह आहे.

धर्म आणि ईश्वरी प्रतीकांच्या बाबतीत समाजजीवनात वेगाने झिरपत चाललेला हळवेपणा आणि कडवेपणा हा काही मूलभूत प्रश्नांना तोंड फोडतो. प्रेषित मोहम्मदाचा अवमान करणाऱ्यास मृत्युदंड द्यावा हा धर्मादेशच असल्याचा सोयीस्कर गैरसमज जिहादी गटांनी करून घेतला किंवा या विनाधार गृहीतकाचा राजकीय फायद्यासाठी गैरवापरही केला. अफगाणिस्तानातील तालिबान किंवा सीरिया-इराकमध्ये आयसिस या संघटनांचा उद्देश धार्मिक नव्हे, तर राजकीय होता. सत्ता हेच साध्य होते आणि तथाकथित धर्मयुद्ध हे साधन. धर्मयुद्धाचा मुलामा चढवून धर्मभोळ्यांची सहानुभूती मिळवायची हा तर कोणत्याही धर्माचा ठरलेला खेळ. धर्मयुद्ध का करायचे, तर (म्हणे) धर्म संकटात आहे म्हणून. खरे तर धर्मप्रसार आणि त्या नावाखाली धर्मसंहार या तद्दन मध्ययुगीन संकल्पना. रोजच्या जगण्यातली आव्हानेच इतकी व्यामिश्र आणि प्रचंड आहेत, की धर्मासाठी कुणाशी लढाया करण्याची फुरसत आणि गरज जवळपास संपुष्टात आलेली आहे. ही गरज कोणाला पुनरुज्जीवित आणि पुनस्र्थापित करावीशी वाटणार? ज्यांची बुद्धी व्यग्र नाही आणि हाताला काम नाही अशांपैकीच बहुतांना! एरवी धर्म संकटात आहे यावर अन्य कोणा शहाण्याचा कसा काय विश्वास बसेल? सक्तीने धर्मातर करून किंवा विशिष्ट धर्मीयांचा संहार करून एखादा धर्मच संपुष्टात आणण्याचे दिवस केव्हाच सरले. आज आंतरराष्ट्रीय कायदे आलेत, वैचारिक आदानप्रदान आले, परस्पर सहकार्यातून कामगार, व्यापार आणि सेवांचे आदानप्रदान अपरिहार्य बनले आहे. भूतलावरील कोणताही देश किंवा समूह स्वयंपूर्ण व एकल राहिलेला नाही, राहू शकत नाही. या स्थितीत एखादा धर्म दुसऱ्या धर्माच्या वरचढ ठरेल ही शक्यताच नाही. तरीही तसे भासवले जाते आणि धर्मयुद्धाच्या नावाखाली संहार घडवले जात आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये याबाबतीत इस्लामवादी जिहादी गट आघाडीवर आहेत हे निर्विवाद वास्तव आहे. ज्या कुराणचा हवाला ही मंडळी सरसकट देतात, त्यांच्यापैकी एकानेही पूर्ण कुराण वाचून काढले असते तर जिहादमागील फोलपणा त्याच्या तत्क्षणी लक्षात आला असता. मुळात जिहाद याच शब्दाचा सर्वाधिक गैरवापर झाला. जिहाद म्हणजे संघर्ष. तो केवळ धार्मिक असण्याची गरजच नाही. विषमता, गरिबी, भ्रष्टाचार अशा अनेक मानवरिपुंविरोधात संघर्ष करता येतो, जिहाद छेडता येतो. पण तसे झालेले नाही. कारण इस्लामवाद्यांना अशा अतिरेकापासून परावृत्त करण्यात इस्लामी राजकीय नेतृत्वाइतकेच वैचारिक नेतृत्वही कमी पडते आहे. किंबहुना, राजकीय नेतृत्वाला ‘धार्मिकतेची चटक’ लागल्यानंतर विवेक आणि चिकित्सेचे स्मरण करून देत राहण्याची जबाबदारी विचारवंतांवर येते. फ्रान्समधील घटनांविषयी अशी वैचारिक तत्परता आणि भान इस्लामी विचारवंतांनी

अधिक व्यापकपणे आणि आग्रहाने दाखवण्याची गरज आहे.

फ्रेंच संस्कृती आणि वैचारिक चौकटीमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व राहिलेले आहे. बंधुता, समता, स्वातंत्र्य ही मूल्ये फ्रेंचांनीच जगाला दिली. यातून सर्जनशीलता आणि उद्यमशीलता या दोहोंना धुमारे फुटले. आयफेल टॉवर, लूव्र संग्रहालय आणि सिनेमाथेक फ्रॉन्सेसारखे चित्रपट संग्रहालय इथलेच. आधुनिक ऑलिम्पिक चळवळ आणि विश्वचषक फुटबॉल या संकल्पना याच भूमीत जन्माला आल्या. एअरबसही इथले नि राफेलही इथलेच. ही अस्सल फ्रेंच प्रतीके. पण त्याचबरोबर धर्मसत्ता आणि राजसत्तेच्याही विरोधात लढून आकाराला आलेल्या या देशात ईश्वरनिंदेच्या अधिकाराला एक अव्वल फ्रेंच प्रतीक मानले जाते. जवळपास ५० लाख मुस्लीम लोकसंख्या असलेल्या या देशात त्यातून संघर्षांचे प्रसंग येतात. कारण ईश्वर आणि त्याचा प्रेषित हे इस्लाममध्ये अमूर्त मानले जातात. इतर कोणत्याही युरोपीय देशापेक्षा – खरे तर पाश्चिमात्य देशापेक्षा फ्रान्स आणि जर्मनी हे स्थलांतरितांच्या बाबतीत आग्रहाने उदारमतवादी राहिले. फ्रान्सच्या फुटबॉल संघात विविध वंशीय, धर्मीय खेळाडू दिसतात आणि हा संघ जगज्जेताही होतो. झिनेदिन झिदानही मुस्लीम स्थलांतरितच. यांना आदर्श मानायचे, की भरदिवसा कोणाचा तरी शिरच्छेद करणाऱ्यांचे किंवा संगीतगृहे, मद्यालयांमध्ये निष्पापांवर गोळ्यांचा वर्षांव करणाऱ्यांचे ‘धर्मरक्षक’ म्हणून गुणगान करायचे, हा निर्णय फ्रान्समधील मुस्लिमांनी करायचा आहे. या साऱ्यांनी अधिक जोमाने फ्रेंच धर्मनिरपेक्षतेवरील असे हल्ले रोखण्याची वा धिक्कारण्याची गरज आहे. जगभर ज्या देशांनी भौतिक आणि वैचारिक प्रगती केली, त्या देशांमध्ये कोणत्याही धार्मिक नियम-परंपरेपेक्षा सर्वानुमते ठरवण्यात आलेल्या आणि वर्षांनुवर्षे सखोल चिकित्सा झालेल्या राष्ट्रीय कायद्यांना नेहमी प्राधान्य दिले गेले आहे हे लक्षात ठेवले तरी पुरेसे. ‘मी तुझ्या मताशी सहमत नाही. पण तुला तुझे मत मांडू देण्याच्या अधिकाराचे रक्षण करायला मी नेहमीच पुढे येईन,’ असे सांगणाऱ्या वॉल्टेअरचा हा देश. ते विचार आत्मसात करून स्वत:ची प्रगती करण्याची सुसंधी फ्रान्समधील हल्लेखोरांना होती. त्याऐवजी त्यांनी धर्मयुद्धाचा आत्मघातकी मार्ग पत्करला. यातून सर्वाधिक नुकसान कोणाचे होते आहे इतका तरी विचार इस्लामींनी करायला हवा.. ते त्यांच्यासाठीच गरजेचे आहे!