25 February 2021

News Flash

आयुर्वेदाच्या मुळावर..

आक्षेप आयुर्वेदास नाही. तर आयुर्वेदाच्या नावे अप्रमाणित काहीबाही विकून आपली झोळी भरणाऱ्यांना आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

डॉक्टर असलेले आपले आरोग्यमंत्री रामदेवबाबांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन औषधाची भलामण करतात, यास आक्षेप घेणारी संघटना कौतुकास पात्र ठरते..

बाबा रामदेव यांच्या या कृतीस विरोध करणारे सारे आयुर्वेदाचे टीकाकर असे सोयीस्कररीत्या भासवले जात असले तरी ते तसे नाहीत. विरोध आयुर्वेदाच्या नावे काहीबाही विकू पाहणाऱ्यांना आहे..

‘भारतीय वैद्यक संघटना’ (इंडियन मेडिकल असोसिएशन) या वैद्यकांच्या संघटनेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आपल्या देशातील सर्व यंत्रणा आपला मेंदू आणि पाठीचा कणा गहाण टाकून सत्ताधीशांपुढे एकापाठोपाठ एक शरणागत होत असताना या संघटनेने वरील दोन्ही अवयवांच्या अस्तित्वाचे दर्शन घडवत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना खडसावण्याचे धैर्य दाखवले ही घटना सांप्रतकाळी अद्भुत वाटावी अशीच. आधुनिक शिक्षणाने डॉक्टरची पदवी मिरवणारे आणि वर आरोग्यमंत्री असे हर्षवर्धन आणि दुसरे देशाचे पायाभूत सुविधाकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गतसप्ताहात बाबा रामदेव यांच्या कथित करोनाऔषध उद्घाटनाच्या कार्यक्रमास जातीने हजेरी लावली. कोणालाही कोठेही जाण्याचे स्वातंत्र्य घटनेने बहाल केलेले असले तरी मंत्रिपद मिरवणाऱ्याने कोणाच्या पंगतीत स्वत:चे ताट मांडावे याचा काही विवेक असावा लागतो. सध्याच्या काळात या विवेकाचे काय झाले आहे हे स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. हे दोघे केंद्रीय मंत्री बाबा रामदेव यांच्या कथित औषध अनावरण कार्यक्रमास केवळ हजेरीच लावते झाले असे नाही तर ते अप्रत्यक्षपणे या कथित औषधाच्या खोटय़ा प्रचारातही सामील झाले. या औषधास जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार केंद्र सरकारच्या औषध नियामक यंत्रणेने आवश्यक ती मान्यता दिल्याची धादांत लोणकढी सदर कार्यक्रमात (ते लोणीही बहुधा भारतीय गाईंचे दूध विरजवून बनवल्याचा दावा असेलच) ठोकून दिली गेली.

पण बाबा रामदेव यांचा हा असत्ययोग दुसऱ्याच दिवशी शीर्षांसनाप्रमाणे उलटा पडला. कारण आपण असे कोणतेही शिफारसपत्र या औषधाला दिलेले नाही असा खुलासा खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच केला. तो धागा पकडून आपल्या वैद्यक संघटनेने त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी केली असून हर्षवर्धन यांच्या कृत्याविषयी रास्त प्रश्न उपस्थित केले आहेत. हर्षवर्षन हे केवळ आरोग्यमंत्री नाहीत. ते स्वत: वैद्यक आहेत. या न्यायाने त्यांना सर्व चाचण्यांतून तावूनसुलाखून निघालेले औषध आणि रस्त्याकडेच्या पालातून कोणत्याही आजारावर दिली जाणारी पुरचुंडी यांतील फरक कळायला हवा. पण राजकारणाने हर्षवर्धन यांच्या वैद्यकज्ञानावर मात केलेली दिसते. त्यामुळे ते अंधविश्वासाने या कार्यक्रमास हजेरी लावते झाले. यातील दुसरा नियमभंग असा की डॉक्टर म्हणवून घेणाऱ्यास कोणत्याही औषधाची ‘जाहिरात’ करता येत नाही. हर्षवर्धन यांनी हा नियमही मोडला. सबब त्यांनी खुलासा द्यायला हवा, ही वैद्यक संघटनेची मागणी अत्यंत रास्त ठरते आणि ती करण्याचे धैर्य त्यांनी दाखवले यासाठी संघटनेचे संबंधित जाहीर अभिनंदनास पात्र ठरतात. या समारंभास नितीन गडकरी हेदेखील हजर होते. गोमाता, गोमूत्र आणि तत्सम छद्म्विज्ञानवरील त्यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. या विषयावर त्यांच्याकडून विज्ञानवादी दृष्टिकोनाची अपेक्षाही करणे व्यर्थ. वास्तविक मंत्रिपदाची शपथ घेताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारास बांधील असल्याचे वचन या उभयतांनी दिले आहे. त्याचाही हा भंग ठरतो.

तथापि या निमित्ताने दोन मुद्दय़ांची चर्चा करायला हवी. आपल्याकडे अनेक सरकारांना, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, असा एखादा बाबा मुळात लागतोच का? अशांची गरज या मंडळींना मुळात का वाटते? पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री वा अत्यंत अल्पकाळ पंतप्रधानपदी असलेले इंदरकुमार गुजराल आदी वगळता अन्य अनेक सरकारांच्या काळात हे असले बाबाबुवा प्रबळ झाले. इंदिरा गांधी यांच्या काळात स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांची चलती होती. नरसिंह राव यांच्या काळात चंद्रास्वामींचे प्रस्थ वाढले. आणि आता तर बाबासदृश दिसणाऱ्या सर्वच वेषधाऱ्यांना रान मोकळे मिळालेले दिसते. अन्यथा बाबा रामदेव यांच्या वाढलेल्या प्रस्थाचा आणि आर्थिक साम्राज्य विस्ताराचा अर्थ लागणेच कठीण. एरवी डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या हर्षवर्धन यांनी सर्व प्रकारच्या शास्त्रीय निकषांपासून मैलोगणती दूर असलेल्या कोणा कथित औषधास राजमान्यतेचा बुक्का लावला नसता. विकसित देशात असे काही घडले असते तर सर्वप्रथम आरोग्यमंत्र्यास घरी जावे लागले असते. असे काहीही आपल्याकडे घडण्याची सुतराम शक्यता नाही. आणि तरीही वैद्यक संघटना या अनैतिक कृत्यासाठी आरोग्यमंत्र्यास जाब विचारण्याचे धाष्टर्य़ दाखवते ही कौतुकाची बाब.

आणि हीच याची मर्यादा. याचे कारण वैद्यक संघटनेच्या या पत्राची कोणतीही दखल केंद्राकडून घेतली जाण्याची शक्यता नाही. तशी ती असती तर या असल्या थोतांडी कार्यक्रमास हजर राहण्याची हिंमत एक नव्हे तर दोन मंत्र्यांनी केली नसती. याउप्पर कोणताही खुलासा वा स्पष्टीकरण न देता या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाईल. आपण ज्याचा अप्रत्यक्ष प्रसारच केला ते उत्पादन औषध नाही हे माहीत असताना डॉक्टर म्हणवून घेणाऱ्याने अशी कृती करणे हे अधिक आक्षेपार्ह ठरते. ‘वैज्ञानिक छाननीचे कुभांड रचून औषध असल्याचा धादांत खोटा, असत्य दावा करणाऱ्या उत्पादनाचा प्रचार करणे कोणत्या नैतिकतेत बसते,’ असा रोकडा सवाल या संघटनेने हर्षवर्धन यांना केला. तो अत्यंत समयोचित आणि रास्त ठरतो. याचे कारण या असल्या भोंदूंना आवरले नाही तर या अशाच कार्यक्रमांची मालिकाच आपल्याकडे सुरू होईल. खोटेही कसे निर्ढावलेपणाने विकता येते याचा अनुभव आपणास आहेच.

दुसरा मुद्दा आयुर्वेदाच्या भवितव्याचा. भारतीय वैद्यक संघटनेने त्यालाही आपल्या पत्रात योग्य ते स्थान दिले आहे. ‘बाजारपेठेत आपल्या उत्पादनाचा वाटा वाढवण्याच्या नादात आपण आयुर्वेदास भ्रष्ट करू नये. ते विनाशकारी ठरेल,’ असा इशारा वैद्यक संघटना या निमित्ताने देते. तो अधिक विचार करण्यासारखा आहे. याचे कारण बाबा रामदेव यांच्या या कृतीस विरोध करणारे

हे आयुर्वेदाचे टीकाकार असे सोयीस्कररीत्या भासवले जात असले तरी ते तसे नाहीत. आक्षेप आयुर्वेदास नाही. तर आयुर्वेदाच्या नावे अप्रमाणित काहीबाही विकून आपली झोळी भरणाऱ्यांना आहे. आताही बाबा रामदेव जो दावा करतात ते उत्पादन शास्त्रकाटय़ाच्या सर्व कसोटय़ांवर उतरून औषध या दर्जास पात्र ठरले तर आनंदच. पण तसे काहीही करायचे नाही, शास्त्रीय चाचण्यांपासून पळ काढायचा, त्यांना सामोरे जायचेच नाही आणि नागरिकांच्या अंधविश्वासास हात घालून काहीही त्यांच्या गळ्यात मारायचे हे सुरू आहे. हे शुद्ध पाप. ते आपल्या देशात अनेकांकडून वर्षांनुवर्षे घडत आले आहे. यात बदल होत नाही याचे कारण आयुर्वेदाविषयी सर्वसामान्यांच्या मनात असलेले ममत्व. ते तसे आहे कारण देशात मुळातच असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. त्यामुळे ‘कोणतेही दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) नाहीत’ हे धडधडीत अशास्त्रीय विधान आयुर्वेदिक औषधांचे ब्रह्मसूत्र असल्यासारखे वापरले जाते आणि अनेकांना त्याचे काही वाटतही नाही. अशाने प्रत्यक्षात आयुर्वेद बदनाम होतो याचेही भान संबंधितांना नाही.

या वेळी तर या संबंधितांत साक्षात देशाचे आरोग्यमंत्रीच सहभागी होतात, या कर्मास काय म्हणावे हा प्रश्नच. बाबा रामदेव यांचे भले म्हणजे आयुर्वेदाचे भले असे मानणे म्हणजे कुणा एखाद्या दलित नेत्यास मंत्रिपद दिले रे दिले की समस्त दलितांचा उद्धार झाला असे मानणे.

या प्रतीकात्मकतेच्या बाहेर जायला काही आपण तयार नाही. या बिनबुद्धीच्या लबाडी खेळात डॉक्टरही सहभागी होणे ही खरी शोकांतिका. म्हणून या मंत्रिद्वयांची ही कृती अंतिमत: आयुर्वेदाच्या मुळावर येणारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:09 am

Web Title: editorial on union health minister for promoting patanjali coronil abn 97
Next Stories
1 भाषा पुरे; कृती हवी…
2 समतेची सवय
3 आजार आणि औषध
Just Now!
X