अमेरिकी अध्यक्ष निवडीपूर्वीच्या जाहीर चर्चेचे सारे संकेत ट्रम्प यांनी मोडलेच; पण आत्मप्रौढी, तपशिलांविना बोलणे यांतून त्यांच्या राजकारणाची पातळीही दिसून आली..

‘त्यांनीही तेच केले’ म्हणत स्वत:चा बचाव करण्याचे तंत्र ट्रम्प यांनी वापरले; त्यापेक्षा लक्षात राहील तो अमली पदार्थासारख्या आरोपांबाबत बायडेन यांच्याकडून दिसलेला सभ्य, संयत प्रांजळपणा..

‘‘मी जे काही ४७ महिन्यांत करून दाखवले ते विरोधक ४७ वर्षांत साध्य करू शकले नाहीत’’, ‘‘देशाच्या इतिहासातले हे सर्वोत्तम सरकार आहे’’, ‘‘देश सध्याइतका आर्थिकदृष्टय़ा समर्थ कधीही नव्हता,’’ वगैरे वगैरे. ही परिचित भासणारी आत्मप्रौढी वाचून अनेकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तो टाळण्यासाठी सांगायला हवे की ही सर्व विधाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आहेत. अवघ्या ३५ दिवसांवर आलेल्या अध्यक्षीय निवडणुकांतील पहिली जाहीर चर्चा अमेरिकेत मंगळवारी (भारतीय वेळेनुसार बुधवारी) झडली. ट्रम्प आणि त्यांच्या दुसऱ्या खेपेस आव्हान देऊ पाहणारे डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात अमेरिकी प्रचारप्रथेनुसार ही चर्चा झाली. सुमारे दीड तासाच्या या वाक्वादळाच्या सूत्रसंचालनाची दुर्दैवी जबाबदारी ‘फॉक्स टीव्ही’चे ज्येष्ठ पत्रकार ख्रिस वॉलेस यांच्याकडे होती. दुर्दैवी अशासाठी की आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यास बेशिस्त वर्तनाबद्दल दटावण्याची वेळ त्यांच्यावर आली. ही चर्चा पाहणाऱ्यांना वॉलेस यांच्याविषयी कमालीची कणव दाटून आली असणार. कारण आपल्या देशाचा उच्चपदस्थ नेता चर्चेपूर्वी मान्य झालेले कोणतेही नियम, संकेत पाळण्यास तयार नाही आणि विरोधी उमेदवारास तो सरळपणे बोलूही देण्यास तयार नाही या धक्क्यातून वॉलेस शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. वास्तविक ते फॉक्स टीव्हीचे. म्हणजे अध्यक्षांच्या अद्वातद्वा वाक्ताडनाशी ते परिचित असणार. पण तरीही आपला अध्यक्ष अध्यक्षीय चर्चेसारख्या गंभीर प्रसंगात ‘असा’ वागेल याची कल्पना वॉलेस यांस नसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसत होते. या वास्तवाने हादरलेल्या वॉलेस यांच्या हातून चर्चेची सूत्रे सुटली ती सुटलीच. ‘‘अरे गृहस्था जरा गप्प बस,’’ असे ट्रम्प यांना सुनावण्याची वेळ बायडेन यांच्यावर आली. मग या चर्चेचे फलित काय?

‘‘आपला अध्यक्ष असा बेछूट, बेपर्वा आहे हे पाहून आज जगात अमेरिकेची लाज गेली असणार,’’ ही सीएनएनच्या सकल वृत्तवृंदाची त्यानंतरची प्रतिक्रिया हे फलित दर्शवते. या चर्चेनंतर खुद्द ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्ष समर्थकांना देखील ट्रम्प यांच्या वर्तनाची तळी उचलणे जड जात होते. ही चर्चा जेथे झाली त्या ओहायोतील रिपब्लिकन मतदारांची या चर्चेनंतरची प्रतिक्रिया या संदर्भात दिशादर्शक ठरावी. ‘‘ट्रम्प यांचे काही मुद्दे निश्चितच आम्हाला पटतात. पण मुद्दे काय आहेत या इतकेच ते कसे मांडले जातात हेही महत्त्वाचे. चर्चेतली ट्रम्प यांची मांडणी पाहून पुन्हा त्यांना आम्ही मत देऊच याची खात्री नाही,’’ अशी २०१६ साली रिपब्लिकन पक्षास मत दिलेल्यांची ताजी प्रतिक्रिया. ‘‘असा आपला अध्यक्ष पाहून आमची मान शरमेने खाली जाते,’’ इतक्या कडक शब्दांत आपल्या भावना सीएनएन आणि बीबीसी या वाहिन्यांवर अनेकांनी व्यक्त केल्या. तशा शब्दांत आपल्या बेताल अध्यक्षाची निर्भर्त्सना करण्याचे स्वातंत्र्य जवळपास प्रत्येक वाहिनीच्या पत्रकारांनी घेतले आणि सर्वानी सर्रास ट्रम्प यांचा उल्लेख ‘‘उच्च दर्जाचा खोटारडा’’ अशा शब्दांत केला. ट्रम्प यांनी जी आकडेवारी चर्चेत फेकली, दावे केले त्यांची सत्यासत्यता तपासण्याची यंत्रणा जवळपास सर्वच वाहिन्या आणि वृत्तसेवांकडे होती आणि त्यातील कोणीही ‘सत्ताधाऱ्यांवर कशी काय टीका करायची’ याची तमा बाळगली नाही. अमेरिकी अर्थव्यवस्थेची सांप्रत स्थिती, करोना हाताळणी, बेरोजगारांची वाढती संख्या आदी प्रत्येक मुद्दय़ावर ट्रम्प धडधडीतपणे वाटेल ते बोलत गेले आणि आपण वास्तवापासून किती फारकत घेत आहोत याची कोणतीही जाणीव त्यांना असल्याचे दिसले नाही. आत्मप्रेमात आकंठ बुडाल्यावर सर्वोच्च सत्ताधिकाऱ्याचे काय होते याचा ट्रम्प हा वस्तुपाठ होता. त्यांच्या या अशा वर्तनामुळे चर्चेत काय झाले, कोणत्या मुद्दय़ांवर ऊहापोह झाला, हे महत्त्वाचे प्रश्न गौण ठरले. या चर्चेनंतर चर्चा आहे ती त्या चर्चेच्या तमाशाचीच.

या चर्चेसाठी खरे तर सहा मुद्दे जाहीर करण्यात आले होते. या दोन्ही उमेदवारांची सरकारातील कामगिरी, सर्वोच्च न्यायालय, करोना हाताळणी, अर्थव्यवस्था, वांशिक दंगली आणि निवडणुकीचे महत्त्व. प्रत्येकावर बोलण्यास दोघांस प्रत्येकी दोन मिनिटे आणि त्यानंतर उलट तपासण्याची संधी. अमेरिकी निवडणूक आयोगाच्या मान्यतेने होणाऱ्या या चर्चाचे नियम आधी उभय उमेदवारांकडून मंजूर करून घेतले जातात. पण तरीही आजची चर्चा संपूर्णपणे रुळावरून घसरली. कारण ट्रम्प हे बायडेन यांना आपले म्हणणे पूर्णच करू देईनात. अखेर वैतागलेल्या बायडेन यांनी ट्रम्प यांचा उल्लेख ‘‘काय विदूषक आहे हा,’’  अशा प्रकारे केला. या सर्व मुद्दय़ांवर ट्रम्प यांचे एकच जालीम उत्तर- ‘‘मी सर्वोत्तम आहे’’. या गृहीतकावर सूत्रसंचालक वा बायडेन यांनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की ट्रम्प हे सरळ हेत्वारोपाचा आधार घेत. इंग्रजीत ज्यास ‘व्हाऊटअबाउटरी’ असे म्हणतात ती प्रथा आता जगातील अनेक सत्ताधीशांनी आत्मसात केली आहे. या प्रथेत आपण काय चांगले केले हे सांगणे अभिप्रेत नाही. तर आपला प्रतिस्पर्धी किती वाईट आहे किंवा होता, याचा कोळसा या पद्धतीत उगाळला जातो. ट्रम्प  यांनी हे उत्तमपणे केले. काहीही विचारले की बायडेन आणि डेमॉक्रॅटिक पक्षाची भूमिका वा कृती यापेक्षा किती वाईट होती, हे ट्रम्प मोठय़ा धडाडीने सांगत. वास्तविक ट्रम्प  काय वा बायडेन काय. या दोघांनाही वक्तृत्व नाही. वाटेल ते बोल, पण रेटून बोल ही ट्रम्प यांची शैली. त्यामुळे त्यासमोर बायडेन हे निष्प्रभ आणि हतोत्साहित वाटत गेले. ट्रम्प यांचा बेताल धबधबा आवरायचा कसा याच चिंतेत ते दिसले. त्यामुळे खणखणीतपणे बायडेन यांनी ट्रम्प यांचा प्रतिवाद केल्याचे फारसे दिसले नाही.

अपवाद फक्त एका प्रसंगाचा. ज्यावेळी ट्रम्प यांनी बायडेन यांच्या दिवंगत चिरंजीवावर अश्लाघ्य आरोप केला तो क्षण. बायडेन यांना दोन चिरंजीव. बिऊ आणि हंटर. यातील लष्करी सेवानुभव असलेला बिऊ हा बायडेन यांचा राजकीय वारस मानला जात असे. पण बायडेन उपाध्यक्षपदी असताना त्याचे अकाली निधन झाले. हंटर हा गुंतवणूक सल्लागार आहे आणि त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. ट्रम्प यांनी या चर्चेत हंटरवर आरोप करण्यासाठी बिऊ बायडेन याचा आधार घेतला. बायडेन चिरंजीवास रशियातून पैसे आले आणि बायडेन सुपुत्रास अमली पदार्थाचे व्यसन होते, हे ट्रम्प यांचे आरोप. यामुळे दुखावलेल्या बायडेन यांनी कॅमेऱ्याकडे थेट पाहात आपल्यातील वडिलांची व्याकूळता दाखवून दिली आणि ‘‘तुमच्यापैकी अनेकांप्रमाणे माझ्याही मुलाचा पाय घसरला होता. पण आता तो त्यातून बाहेर आला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे,’’ हे बायडेन यांचे उद्गार मानवी स्खलनशीलता स्वीकारण्याच्या पाश्चात्त्य सांस्कृतीतील प्रामाणिकपणाचे प्रतीक होते. त्यातून बायडेन यांनी अनेकांची मने जिंकली असे अनेकांचे मत पडले.

या खेरीज निवडणुकीच्या निकालाचे महत्त्व कमी करण्याचा आणि श्वेतवर्णीयांच्या वर्णवर्चस्ववादाचा निषेधही न करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न अमेरिकेत निवडणुकीनंतर पुढे काय वाढून ठेवले आहे, याची चुणूक दाखवणारा ठरतो. श्वेतवर्णीयांच्या ‘प्राऊड बॉइज’ या संघटनेचा निषेध तर ट्रम्प यांनी केला नाहीच; वर तिला ‘सज्ज’ राहण्याचा आदेश त्यांनी दिला. आपण कर किती भरला याचेही थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. ‘मिलियन्स ऑफ डॉलर्स’ इतकेच त्यांचे उत्तर.

अशा तऱ्हेने चर्चेची ही बहुप्रतीक्षित पहिली फेरी दुसऱ्या फेरीच्या उत्साहावर प्रश्न निर्माण करणारी ठरली. ती लक्षात राहील ती ट्रम्प यांच्या आत्मप्रौढीसाठी. स्वत:च स्वत:चे गुणगान करणाऱ्यांची संभावना समर्थ रामदासांनी मूर्खात केली आहे. अशांची चलती आणखी किती काळ, इतकाच काय तो प्रश्न.