धार्मिक अतिरेकी आणि असहिष्णू राजकारणाचीच सद्दीआहे की काय असे वाटू लागले असताना अमेरिकी प्रतिनिधीगृहाचा ताजा कौल सुखावणारा ठरतो.

सेनेटवर ट्रम्प यांच्याच पक्षाचे प्राबल्य असले, तरी दुसऱ्या सभागृहावर- प्रतिनिधीगृहावर- डेमोक्रॅटिक पक्षाचा वरचष्मा राहील. त्यामुळे समित्या बदलतीलच, पण प्रसंगी ट्रम्प यांच्यावर महाभियोगही येऊ शकेल. अमेरिका ही फक्त अमेरिकनांची अशी काहीशी ट्रम्प यांची भूमिका; तिला आळाही बसू शकेल..

वाह्य़ात भाष्य आणि आचरट कृती असेच ज्यांचे वर्णन करता येईल, ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेताल राजकारणास मतदारांनी काही प्रमाणात तरी आळा घातला. सर्व जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकी मध्यावधी निवडणुकीत प्रतिनिधीसभेत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने सत्ताधारी रिपब्लिकन्सना मागे टाकत बहुमत मिळवले. गेल्या आठ वर्षांत डेमोक्रॅटिक पक्षास या सदनात बहुमत मिळण्याची ही पहिलीच खेप. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन कारकीर्दीत डेमोक्रॅटिक पक्षास इतके यश मिळाले ही बाब सूचक म्हणावी लागेल. मात्र त्याच वेळी सेनेटमध्ये ट्रम्प यांना आपला प्रभाव वाढवता आला. तसेच विविध राज्यांच्या गव्हर्नरपदीदेखील रिपब्लिकन पक्षास घसघशीत यश मिळाले. या निवडणुकीच्या निकालात बराच अर्थ दडलेला आहे आणि तो फक्त  अमेरिकेपुरताच मर्यादित मानता येणार नाही. म्हणून तो समजून घ्यायला हवा.

अमेरिकी पद्धतीप्रमाणे तेथे दर दोन वर्षांनी प्रतिनिधीगृहाच्या निवडणुका होत असल्याने एक निवडणूक अध्यक्षीय कारकीर्दीच्या मध्यावधीत झडते. या निवडणुका त्यानुसार झाल्या. अमेरिकी सदनाच्या दोन्हीही सभागृहांसाठी या वेळी मतदान होते. यात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् म्हणजे प्रतिनिधी सभेच्या ४३५ पैकी ४२८ सदस्य निवडले जातात. त्याच वेळी सेनेटच्या शंभरपैकी एकतृतीयांश – म्हणजे ३५ – सदस्यांसाठीही या वेळी मतदान होते. सेनेटमध्ये बहुमतासाठी ५१ सदस्यांची गरज असते तर प्रतिनिधीगृहात २१८. विद्यमान परिस्थितीत प्रतिनिधी सभेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होते. त्या पक्षाची सदस्य संख्या २३५ इतकी होती तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे १९३ इतके सदस्य होते. याचा अर्थ या सदनात बहुमतासाठी डेमोक्रॅटिक पक्षास किमान २५ जणांची गरज होती. ताज्या निवडणुकीत प्रत्यक्षात ३५ जागांवर डेमोक्रॅट्स विजयी होताना दिसतात. याचा अर्थ या सदनात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत होईल. परंतु सेनेटमध्ये मात्र रिपब्लिकन पक्षाचेच आधिक्य असेल.

म्हणजे अध्यक्षीय पर्वाच्या दुसऱ्या टप्प्यात माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची जशी स्थिती होती तशी आता ट्रम्प यांची होईल. त्या वर्षी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ओबामा यांच्या विरोधात रिपब्लिकनांनी प्रतिनिधीगृहात मोठा विजय संपादन केला. त्यामुळे ओबामा यांची डोकेदुखी वाढली आणि पदोपदी रिपब्लिकन्स त्यांना आडवे येऊ लागले. परिस्थिती इतकी बिकट झाली की एकदा तर वार्षिक अर्थसंकल्पच मंजूर होऊ शकला नाही आणि सरकारला सर्व खर्च थांबवावे लागले. तो रिपब्लिकनांच्या टोकाच्या राजकीय विरोधाचा परिणाम होता.

आता त्याची परतफेड करण्याची संधी डेमोक्रॅट्सना पुरेपूर मिळेल. रिपब्लिकनांचे ते राजकारण अडाणी होते. त्या वेळी गेलेला राजकारणाचा तोल पुन्हा मिळवायची संधी आता डेमोक्रॅट्सना आहे. स्थलांतरित ते अमेरिकी नागरिकांसाठी आरोग्य योजना अशा अनेक मुद्दय़ांवर डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स यांच्यात विस्तव जात नाही. अमेरिका ही फक्त अमेरिकनांची अशी काहीशी ट्रम्प यांची भूमिका. त्यामुळे प्रत्येक परदेशीयास परतच पाठवायला हवे, असे त्यांचे मत. त्यावरून २०१६ साली अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यापासूनच ट्रम्प यांनी टोकाची भूमिका घेतली. सध्या तेथे गाजतो आहे तो अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण बांधण्याचा मुद्दा. ट्रम्प यांच्या मते या दोन देशांना विभागणाऱ्या रेषेवर भिंतच बांधायला हवी आणि त्याचा खर्चही मेक्सिकोने द्यायला हवा. त्यावरून त्यांनी शेजारी देशाशी भांडण उकरून काढले. असहिष्णुता हे ट्रम्प यांच्या राजकारणाचे वैशिष्टय़. ही असहिष्णुता प्रत्येक टप्प्यावर अमेरिकेस जागतिक राजकारणात एकटे पाडत गेली. पण ट्रम्प यांना त्याची पर्वा नाही. ते आपलेच घोडे दामटत राहिले.

त्यांना आता डेमोक्रॅट्सच्या विजयाने लगाम लागेल. खरा प्रश्न येईल तो ट्रम्प यांच्या निवडणुकीतील कथित गैरव्यवहारांचा. या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला यावर आता जवळपास सगळ्यांचेच एकमत आहे. अपवाद फक्त ट्रम्प यांचा. आपल्या हेकेखोर राजकारणाद्वारे आणि अध्यक्षीय अधिकारांच्या जोरावर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीत शक्य तितके अडथळेच निर्माण केले. प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅट्सच्या विजयामुळे ट्रम्प यांना आपला हेका चालवता येणार नाही. ताज्या बहुमतामुळे डेमोक्रॅट्स हे ट्रम्प यांच्यामागे हात धुवून लागणार हे उघड आहे आणि एका अर्थी त्याची गरजही आहे. याचे कारण ट्रम्प यांचा राजकीय विजय हाच काही केवळ मुद्दा नाही. तर त्यामागून होणारे त्यांचे घृणास्पद आणि प्रतिगामी राजकारण हा चिंतेचा विषय आहे. डेमोक्रॅट्सच्या या विजयाने ट्रम्प यांना आपल्या या बेधुंद धडाडीस आळा घालावा लागेल. हे असे होणारच होणार याची खात्री बाळगण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आता विविध समित्यांची पुनर्रचना होईल. आतापर्यंत दोन्ही सदनांत बहुमत असल्याने ट्रम्प वाटेल तो मुद्दा रेटू शकत होते. आता त्यांना पावलोपावली डेमोक्रॅट्सच्या सहकार्याची गरज लागेल. तिसरा मोठा धोका ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रक्रिया सुरू करण्याचा. अमेरिकी निवडणुकीत झालेला रशियाचा हस्तक्षेप आणि त्याला असलेली ट्रम्प यांची कथित फूस, ट्रम्प आणि रशियाचे पुतिन यांचे संबंध अशा अनेक प्रश्नांवर ट्रम्प यांना कानकोंडे व्हावे लागणार आहे. यात सगळ्यात गंभीर बाब असेल ती डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी िक्लटन यांच्या पराभवासाठी ट्रम्प यांनी रशियाच्या पुतिन यांच्याशी हातमिळवणी केली अथवा नाही. अमेरिकेतील एका मोठय़ा गटाच्या मते ट्रम्प यांच्या विजयासाठी पुतिन यांची फूस होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयातील संगणकप्रणालीत ज्या पद्धतीने रशियाने घुसखोरी केल्याचे आढळले ते पाहता ही बाब सर्वोच्च सत्ताधीशाचा पािठबा असल्याखेरीज शक्य नाही, असे अनेकांचे ठाम मत आहे. या संदर्भात चौकशीही सुरू असून तीत ट्रम्प यांच्याकडून सातत्याने अडथळाच आणण्याचा प्रयत्न झाला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या या विजयामुळे हे चित्र बदलेल आणि ट्रम्प यांना कदाचित महाभियोगासही तोंड द्यावे लागेल.

कडव्या डेमोक्रॅट आणि तितक्याच कडव्या ट्रम्पविरोधक नॅन्सी पलोसी यांच्याकडे आता प्रतिनिधी सदनाचे सभापतिपद येईल. २००७ ते २०११ या काळात पलोसी या पदावर होत्याच. त्या अनुभवी आहेत आणि धोरणात्मकदृष्टय़ा या अत्यंत महत्त्वाच्या पदाचे महत्त्वदेखील जाणून आहेत. त्यांचे या पदावर पुन्हा येणे आणि मोठय़ा प्रमाणावर अमेरिकी महिला उमेदवारांचे विजय हे ट्रम्प यांच्या घृणास्पद, तिरस्करणीय अशा स्त्रीविषयक भूमिकेच्या विरोधातील एक भाष्य आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला ते माजी प्रेयसी आदी अनेकींनी ट्रम्प यांच्या या लाजिरवाण्या इतिहासास चव्हाटय़ावर मांडले. याच्या जोडीला त्यांची शिसारी आणणारी मुक्ताफळे. त्यामुळेही असेल पण या निवडणुकीत महिला मतदार प्रचंड उत्साहाने पुढे आल्या आणि डेमोक्रॅटिक पक्षाने जास्तीत जास्त महिला उमेदवार उभे केले. त्यांना मिळालेला कौल लक्षणीय म्हणावा लागेल. याच्या जोडीला तरुण मतदारही उत्साहाने ट्रम्पविरोधात पुढे आले. ट्रम्प यांच्या संकुचित राजकारणाविरोधात या तरुण मतदारांनी घेतलेली भूमिका सर्वार्थाने आशादायक म्हणावी अशी.

विशेषत धार्मिक अतिरेकी आणि असहिष्णू राजकारणाचीच सद्दी आहे की काय असे वाटू लागले असताना अमेरिकी प्रतिनिधीगृहाचा हा कौल सुखावणारा ठरतो. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाची लाट येईल अशी काहींची अपेक्षा होती. तसे झाले नाही, हे बरेच. कारण लाट ही क्षणिक आणि फसवी असते. तीपेक्षा शांतपणे पण दीर्घकाळ होणारी वातावरणनिर्मिती महत्त्वाची. सेनेट आणि प्रतिनिधीगृह या विभागणीतून अमेरिकेत ती दिसते. टोकाच्या राजकारणाची सुरुवात अमेरिकेने केली. ते रोखण्याचाही प्रारंभ आता अमेरिकेतच होत असेल तर ती बाब निश्चितच स्वागतार्ह. मुजोर एकसंधतेपेक्षा कधी कधी दुभंगावस्थाच दिलासादायक असते.