02 March 2021

News Flash

संघराज्य सावधान

मीच साऱ्या देशाचा भाग्यविधाता आणि मीच सर्व काय ते निर्णय घेणार असे मध्यवर्ती नेत्याचे म्हणणे असेल तर संघराज्यीय व्यवस्थेचे काय?

संग्रहित छायाचित्र

संघराज्य पद्धतीत संघाच्या अधिकार मर्यादा आणि राज्यांची कर्तव्य-जाणीव यांचे भान सर्वानाच असावे लागते. ते तसे नसेल तर त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी दक्ष माध्यमांची. हे त्रिवेणी संतुलन हा लोकशाहीचा गुरुत्वमध्य..

करोना-भारित टाळेबंदीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार कोणाचा? अनेक प्रांतांत, राज्यांत विभागल्या गेलेल्या देशात स्थानिक मुद्दय़ांवर व्यवस्थापन कोणाचे? त्या देशात संघराज्य व्यवस्था असेल तर केंद्रीय संघप्रमुखाचे अधिकार कोठे संपतात आणि स्थानिक मुख्यमंत्री वा तत्समांचे कोठे सुरू होतात? सर्व देशावर केंद्रीय प्रमुखाचाच अधिकार चालणार असेल तर मग संघराज्य याचा अर्थ काय? पण संघराज्य आहे म्हणून स्थानिक प्रमुख मध्यवर्ती नेतृत्वास डावलू शकतात काय? अशा देशांत या दोघांच्या अधिकारांच्या सीमारेषा आखलेल्या असतात. पण त्यांचा आदर उभयतांकडून केला जात नसेल तर उपाय काय? त्यातही केंद्रीय नेता अधिकारांची मर्यादा ओलांडत असेल तर त्यास आवरणार कोण? मीच साऱ्या देशाचा भाग्यविधाता आणि मीच सर्व काय ते निर्णय घेणार असे मध्यवर्ती नेत्याचे म्हणणे असेल तर केंद्र-राज्य संबंधांचे काय? हे आणि असे अनेक प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित पत्रकार परिषदेमुळे उपस्थित होतात. पत्रकारांचे कर्तव्य आणि ते निर्भीडपणे पार पाडणारे पत्रकार यांचे विलोभनीय दर्शन त्या पत्रकार परिषदेत घडले. ज्या कोणा लोकशाहीप्रेमी नागरिकांनी हा प्रसंग पाहिला नसेल त्यांनी तो तातडीने अनुभवावा. या पत्रकार परिषदेत ट्रम्प चिडले आणि त्यांनी थयथयाट केला. पण पत्रकारांनी आपली पातळी आणि दर्जा यत्किंचितही न सोडता या ‘भावपूर्ण’ प्रसंगात आपल्या बुद्धिनिष्ठेचे दर्शन घडवले. जे काही तेथे घडले ते बऱ्याच जणांस बरेच काही शिकवून जाणारे असू शकते. म्हणून त्याची ही विस्तृत दखल.

आपल्या नैमित्तिक वार्तालपात ट्रम्प यांना देशातील टाळेबंदी उठविण्याबाबत प्रश्न विचारला गेला. अमेरिकेतील ज्या राज्यांत करोनाचा प्रसार संपूर्ण नियंत्रणात आला आहे त्या राज्यांच्या गव्हर्नरांनी (आपले मुख्यमंत्री तसे अमेरिकेत गव्हर्नर. ते राजकीय पक्षांशी निगडित असतात आणि थेट निवडून दिले जातात.) आपापल्या प्रांतातून टाळेबंदी शिस्तबद्धपणे शिथिल करण्याचे योजले आहे. त्याबाबत विचारता ट्रम्प म्हणाले : अमेरिकेत अध्यक्षाचे अधिकार सर्वंकष (टोटल) आहेत आणि ते केंद्र-राज्यात विभागण्याचा प्रश्न नाही. या त्यांच्या उत्तराने धक्का बसलेल्या वार्ताहराने या ‘संपूर्ण अधिकार’ दाव्यावर ट्रम्प यांना सातत्याने छेडले. ‘‘तुम्ही कोणत्या राज्याच्या गव्हर्नरास या संदर्भात विचारले आहे काय’’ हा प्रश्न ट्रम्प यांनी झिडकारला आणि त्याची गरज नाही, असा दावा केला. अध्यक्षाचे अधिकार अंतिम असतात, असे त्यांचे म्हणणे. या मुद्दय़ावर अधिक काही विचारू पाहणाऱ्या वार्ताहरावर ट्रम्प ‘आता बास’ असे म्हणून गुरकावले. मग त्यांनी आपल्या सरकारची या विषाणूस रोखण्याची कामगिरी किती उत्तम आहे हे सांगण्यास सुरुवात केली.

त्यावर दुसऱ्या वार्ताहराने तुम्ही नेमके काय काय केले ते सांगा असे विचारता ट्रम्प यांचा पारा चढू लागला. आपले काम ऐतिहासिक आहे, हाच त्यांचा धोशा. त्याने वार्ताहर शांत होत नाहीत हे दिसल्यावर ट्रम्प आपल्या सरकारी निर्णयांचा तारीखवार तपशील जाहीर करू लागले. त्यास तितक्याच सखोल तपशिलाच्या आधारे वार्ताहराकडून प्रतिप्रश्न येऊ लागले. यावर ट्रम्प यांच्याकडे प्रतिवाद करण्यासारखा मुद्दा खरे तर नव्हता. पण हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली तोफ विरोधी पक्षीय, डेमॉक्रॅटिक पक्षाचे संभाव्य अध्यक्षीय उमेदवार जो बायडन यांच्यावर डागली. वास्तविक या वार्ताहर परिषदेतील चर्चा आणि जो बायडन यांचा काहीही संबंध नव्हता. पण बायडन यांना काही कसे कळत नाही, हे ट्रम्प सांगू लागले. त्यावर, ‘‘बायडन यांच्याशी आम्हाला या क्षणी काही घेणे देणे नाही, तुमच्या सरकारने काय केले ते सांगा,’’ असे तितक्याच तडफेने सदर पत्रकाराने ट्रम्प यांना सुनावले. तेव्हा ट्रम्प यांचा तोल सुटला आणि त्या वेळी एका महासत्तेचा प्रमुख एका तरुण वार्ताहराशी बा-चा-बा-ची करू लागला. ‘‘तुम्हाला माझे महान काम दिसत नाही, कारण तुम्ही सर्व फेक न्यूजचे भाग आहात,’’ हा त्या वादावादीच्या अखेरीस ट्रम्प यांचा निष्कर्ष. त्याआधी ट्रम्प यांनी वार्ताहरांसमोर स्वत:च्या कामगिरीची ध्वनिचित्रफीत सादर केली. पण तीच किती ‘फेक’ आहे हे सीएनएनसह सर्वानी लगोलग सोदाहरण स्पष्ट केले. जे काही झाले त्याने अमेरिकेचे विचारविश्व हादरले असून असा प्रकार देशाच्या इतिहासात कधी घडला नसल्याची भावना सार्वत्रिकपणे व्यक्त होताना दिसते.

हा धक्का दुहेरी आहे. एखाद्या हुकूमशहासारखे सर्वाधिकार स्वत:कडे असल्याचा ट्रम्प यांचा दावा आणि दुसरा धक्का म्हणजे एका निस्सीम लोकशाही उपासक देशाच्या अध्यक्षाचे पत्रकारांशी वर्तन. अमेरिकी नागरिक आपल्या स्वातंत्र्य हक्कास कमालीचा जपतो आणि माध्यमे ही आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतीक आहेत अशी त्याची ठाम श्रद्धा असते. त्यामुळे माध्यमांची गळचेपी करणारा राजकारणी अप्रत्यक्षपणे आपल्याच मुसक्या आवळत आहे असे अमेरिकी नागरिकाचे मत असते. म्हणून ट्रम्प यांच्या वर्तनाचे पडसाद संपूर्ण अमेरिकाभर उमटत असून त्यांचे वर्तन अध्यक्षाच्या सर्वोच्च पदाचा अधिक्षेप करणारे आहे, अशी भावना सर्वसामान्य तसेच राजकारणी यांचीही आहे. त्याचाच आविष्कार ट्रम्प यांच्या या प्रकारानंतर काही क्षणांत दिसला. न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर अँड्रय़ू क्युमो यांनी ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून दिली. ‘‘आपल्याकडे राजेशाही नाही.. लोकनियुक्त व्यक्ती अध्यक्ष असते आणि देशाचा कारभार काही एका घटनेनुसार चालतो,’’ इतक्या स्पष्ट शब्दांत क्युमो यांनी ट्रम्प यांची अरेरावी किती अस्थानी आणि अयोग्य आहे ते दाखवून दिले.

ट्रम्प यांच्या संतापामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सचे गेल्या काही दिवसांतील वार्ताकन. करोनाच्या प्रारंभीच्या काळात ट्रम्प प्रशासनाने त्याकडे कसे दुर्लक्ष केले, त्यांना गांभीर्य कळले कसे नाही, संपूर्ण जानेवारी-फेब्रुवारी महिने ट्रम्प यांनी या विषयात लक्षही घातले नाही इत्यादी तपशील टाइम्स इत्थंभूतपणे मांडत असून त्यामुळे ट्रम्प प्रशासन अडचणीत येऊ लागले आहे. तसेच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचा ट्रम्प यांचा आग्रह किती अशास्त्रीय आहे हे अनेक वैद्यकांच्या साक्षींआधारे टाइम्सने दाखवून दिले. याच औषधासाठी ट्रम्प यांनी भारतास ‘इशारा’ दिला आणि त्यानंतर हे औषध आपण अमेरिकेस देण्याचे मान्य केले. या आणि अशा मुद्दय़ांवर अमेरिकेतील अन्य माध्यमेही आपले निसर्गदत्त कर्तव्य तितक्याच जोरकसपणे पार पाडताना दिसतात. हे, ‘मी म्हणेन ती आणि तीच पूर्व’ अशा वृत्तीच्या ट्रम्प यांना सहन होण्यापलीकडचेच. त्याचमुळे ते घसरले आणि अशोभनीय वर्तन करते झाले. त्यानंतर लगेच किमान तीन राज्यांच्या गव्हर्नरांनी ट्रम्प यांच्या संतापास कवडीचीही किंमत न देता स्वत:च्या राज्यात स्वत:चा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.

हे सर्व त्या देशातील सबल, सक्रिय आणि सजग यंत्रणांचे सुखद दर्शन घडवणारे. संघराज्य पद्धतीत संघाच्या अधिकार-मर्यादा आणि राज्यांची कर्तव्य- जाणीव यांचे भान सर्वानाच असावे लागते. ते तसे नसेल तर त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी दक्ष माध्यमांची. हे त्रिवेणी संतुलन हा लोकशाहीचा गुरुत्वमध्य. तो दक्षिणेकडे सरकू नये म्हणून त्या देशातील व्यवस्था किती सावधान आहेत हे पाहणे आश्वासक ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2020 12:03 am

Web Title: editorial on us president donald trump addresses the daily coronavirus task force briefing abn 97
Next Stories
1 खाल्ल्या औषधाला..
2 खबरदारी-जबाबदारी 
3 ‘तो’सुद्धा तसाच..
Just Now!
X