21 November 2019

News Flash

कार्नाडाख्यान

गिरीश कार्नाड हे कुणा एका माणसाची नव्हे, नायकाची तर नव्हेच नव्हे; काळाची कथा सांगणारे नाटककार होते..

(संग्रहित छायाचित्र)

आधुनिक कन्नड रंगभूमीची पहिली पावले गिरीश कार्नाड यांच्या नाटकांमधून पडली. आशय पोहोचवण्यासाठी लोकांच्या परिचयाचे रूप आणि परिचित कथा यांचा आधार त्यांनी घेतला आणि तरीही उत्कंठा कायम ठेवली..

रंगभूमी कधीच पोरकी होत नसते. पडदा पडतो, तो पुन्हा उघडण्यासाठीच. तरीही रंगभूमीवर प्रभाव पाडणाऱ्या अनेकांच्या जाण्याने क्षणभर पोरकेपणा जाणवतो. तसे प्रसंग गेल्या दहा-बारा वर्षांत अनेकदा आले. आधी विजय तेंडुलकर. पुढल्या दोनच वर्षांत बादल सरकार. त्याच वर्षी सत्यदेव दुबे. आणि आता गिरीश कार्नाड. मराठीत तेंडुलकरांना आणि बंगालीत बादल सरकारांना एक नाटय़परंपरा आयती मिळाली होती. ती कशी नाकारावी याचाच विचार करावा लागणार होता. शाकुंतलापासूनची संगीत रंगभूमी, तिने घेतलेले वरेरकरी वळण आणि आचार्य अत्र्यांच्या नाटकांनी त्यास दिलेली हंशा आणि टाळ्यांची फोडणी हे सारेच मराठी रंगभूमीवर घडून गेल्यानंतर तेंडुलकर आले. मध्यमवर्गीय ‘सभ्यते’ला हिंसेचा आरसा त्यांनी दाखवला. बादल सरकारांनी तर आपली नाटके ही ‘तिसरी रंगभूमी’ आहे, म्हणून निराळी चूल मांडण्याचे ठरवले. तसे काही कार्नाडांना करावे लागले नाही, कारण मुळात आधुनिक कन्नड नाटक असे काही नसताना ते लिहू लागले. कन्नडमध्ये आधुनिक विचार नव्हतेच असे नाही. पण नाटक नव्हते. आणि बहुधा १९५८ सालीच शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्डमध्ये शिकण्याची संधी मिळाल्याने कार्नाड यांना देशी आणि विदेशी आधुनिकतेतील फरक तरुणपणीच अनुभवता आला असावा.

पण देशी आधुनिकतेइतकाच देशी परंपरावादाचा परिचयही त्यांना घडत्या वयात झाला. शिरसी या धारवाडनजीकच्या गावात त्यांच्या बालपणाचा बराच काळ गेला. तेव्हा तेथे वीजही नव्हती आणि नाटके होत ती बहुतेकदा पौराणिक. यक्षगानाचे खेळे मात्र बऱ्याचदा पाहायला मिळत. वडील डॉक्टर, आईदेखील शिकलेली, घरात आधुनिक विचार, अशा वातावरणात ‘यक्षगान बालपणी फार आवडले नव्हते’ असे कार्नाड सांगत, त्यावर हयवदनसारखे त्यांचे नाटक पाहिलेल्या कुणाचाही चटकन विश्वास बसणे कठीणच. मात्र लोक काय पाहातात, कसे पाहातात, आशय ग्रहण करण्याची लोकांची पद्धत काय असते, याचे अनौपचारिक शिक्षण यक्षगानातून आणि पौराणिक नाटकांतून कार्नाडांना आपसूक मिळाले. कथा सांगणारे, कवने रचणारे, असे लोककलावंत पाहायला मिळाले. त्यातून आशयाच्या मांडणीचा संस्कार होत गेला. तो इतका की, ‘ययाती’ हे पहिले नाटक ‘मला आधी ऐकू आले- संवादांसकट. मग मी फक्त लेखनिक म्हणून बसलो कागदपेन घेऊन’ असे ते सांगत. या स्वत:विषयीच्याही दंतकथाच की काय, असे कुणी म्हणेल. तशा त्या असतीलही. पण कथा सांगण्याचे कसब कार्नाडांच्या अंगी मुरलेले होते एवढे खरे.

निराळे आणि नेहमीचे या दोन्हीचा गोफ म्हणजे नाटक. रंगमंचावरील पात्रांच्या संवादांतून त्यांचे नाते तर चटकन समजले पाहिजे, पण हा संवाद पुढे कुठे जाणार याविषयी उत्कंठा असलीच पाहिजे, ही आधुनिक नाटकाची रीत. याउलट कार्नाड यांच्या काही नाटकांत निवेदन किंवा परिचयगीत असते, अन्य काही नाटकांच्या नावावरूनच कथानक परिचित असल्याचे लोकांना कळते, पण नाटकात काय होणार आणि ते कसे उलगडणार याची उत्कंठा कार्नाड कायम ठेवतात. ‘गोष्ट सांगत जा राव’ ही अपेक्षा तंतोतंत पाळणारे, तरीही समकालीन आशय देणारे नाटक ही कार्नाडांची देणगी. आजच्या डोळ्यांनी, आजच्या सुखदु:खांच्या संदर्भात मिथ्यकथा पुन्हा वाचाव्यात, इतिहासातले अपरिचित भाग पुन्हा वाचून काढावेत, अशा प्रकारे हा समकालीन आशय पुढे जाई. कार्नाडांची कला पुनर्वाचनाची. इतिहासाचे पुनर्लेखन व त्यामागचे राजकीय हेतू हा वादाचा विषय असतो. त्या प्रांतात कार्नाड कधी गेले नाहीत. त्यांनी केले ते पुनर्लेखन नव्हे. पुनर्वाचन केल्यावर आपल्याला काय दिसते, हे नव्याने सांगण्याची धमक त्यांच्यात होती.

कार्नाड यांच्या तुघलक या नाटकाविषयी बरेच बोलले- लिहिले गेले आहे. त्यांचा तुघलक हा चो रामस्वामी यांच्या तुघलकापेक्षा निराळा. चो यांचा तुघलक राजा म्हणून नालायक ठरल्यावर नाटक संपते. यानंतर सहा-सात वर्षांनी आलेला कार्नाड यांचा तुघलक, नालायकपणाची चिकित्साच करतो. तो समतावादी कसा होता, हे संवादांमधून उलगडते, परंतु आपला समतावाद कुणाला कळत नाही याची खात्री झाल्यावर कार्नाडांचा तुघलक सत्तेचा निरंकुश वापर करणार, हे स्पष्ट होते आणि तिथे पडदा पडतो. नेहरूकाळाच्या संदर्भात हे नाटक लिहिले गेले, असे कार्नाडही सांगत. पण त्यात नेहरू म्हणजे तुघलक, असे सवंग समीकरण नव्हते. याचे कारण असे की कार्नाड गोष्ट  सांगायचे ती काळाची. माणसांची नव्हे, नायकाची तर नव्हेच नव्हे. माणसावर काय वेळ येऊ शकते याची गोष्ट म्हणून काळाची गोष्ट, तसेच वेगवेगळ्या कालखंडांत जिने निरनिराळी वळणे घेतली अशी गोष्ट, म्हणूनही. कार्नाडांनी नाटकांतून ज्या गोष्टी सांगितल्या, त्यापैकी अनेक आधीच कुणीतरी लिहिल्या होत्या. काही वेताळपंचविशीत होत्या, काही महाभारतात. पण नाटके कार्नाडांची ठरली. असे होऊ शकले, याचे कारण कार्नाडांचे संवाद. ते साधेच. कार्नाड यांच्या अभिनयासारखे.

अभिनयातील साधेपणा ही केवळ कार्नाडांची मिरास नव्हे. अनेकांना तो साधला. कार्नाडांच्या आधीच्या आणि नंतरच्याही अनेकांना. पण ज्यांना तो साधला, त्यांना नाटय़कलेच्या आधुनिकतेचे मर्म उमगल्याचे दिसून येते. डोळ्यांच्या खालची पापणी किंचितशी उंचावून गालफडे कळतील न कळतील अशी वर घेणे, यासारखी एखादीच लकब कार्नाड यांच्या अभिनयात डोकावून जाईसुद्धा. पण म्हणून कार्नाड म्हणजे अमकी लकब असा गाजावाजा कधीच झाला नाही. त्यांनीही तो होऊ दिला नसावा. सौम्य, गंभीर, तरीही मोकळा आवाज ही त्यांची एक खासियत. हा आवाज त्यांनी जपला. ‘नायपॉल हे उघडच मुस्लीमविरोधी आहेत आणि त्यांना पुरस्कार मिळणे मला पसंत नाही’ किंवा ‘रवीन्द्रनाथ टागोर यांची नाटके दुय्यम दर्जाची आहेत’ यासारखी मते मांडतानाही जपला. हा आवाज मोकळाच राहावा, म्हणून १९९२च्या डिसेंबरात किंवा गौरी लंकेशच्या हत्येनंतर ते रस्त्यावरही उतरले होते. टिपू सुलतानाचे नाव बेंगळूरु विमानतळास द्यावे, या वक्तव्यानंतर तर त्यांना ‘कलबुर्गी करून टाकू’ अशी धमकीही मिळाली होती. पण कार्नाड यांनी सार्वजनिक जीवन आणि खासगीपणा यांतील सीमारेषा ओळखली होती. आपण कार्यकर्ते नसून बुद्धिजीवीच आहोत, हेदेखील त्यांनी ओळखले असावे. मात्र एक बुद्धिजीवी म्हणून जे जे शक्य, ते ते त्यांनी केले. कर्नाटकात लेखकांचे सरळ दोन तट- भैरप्पा आणि अनंतमूर्ती- मानले जात असतानाच्या काळातही कार्नाड आपले वेगळेपण जपू शकले ते आवाज सौम्य आणि मोकळा ठेवल्यामुळेच.

पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी यांसारखे मानसन्मान मिळाल्यानंतरही खासगीपण जपणे अवघड असते. ते कार्नाड यांनी मृत्यूनंतरही जपले असे म्हणावे लागेल. कोणतेही सरकारी इतमाम न घेता कौटुंबिक आणि खासगी पद्धतीनेच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ‘कलावंतांनी फक्त करमणूक करावी’ असे आढय़तेने म्हणणारा वर्ग कार्नाड यांना माहीत नव्हता असे नव्हे. पण यापेक्षा निराळा, कलावंत फक्त करमणूकच करतात अशा भाबडेपणाने यक्षगानादी कलांकडे पाहणारा आणि त्यातून नकळत संस्कारित होणारा ग्रामीण प्रेक्षकवर्ग त्यांनी अगदी जवळून पाहिला होता. आधुनिक भारतीय नाटककार करमणुकीच्या पलीकडे लोकांना कसे नेतात, हेही कार्नाड यांनी पाहिलेच, पण तोवर आपलेही आख्यान सुरू केले. लोकांचा ‘मूड’ ओळखून, त्यांच्या भाषेत विषय मांडणारे हे आख्यान सोमवारी लौकिकार्थाने संपले. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे गिरीश कार्नाड यांना आदरांजली.

First Published on June 11, 2019 12:12 am

Web Title: editorial on veteran actor jnanpith award girish karnad
Just Now!
X