फेडररच्या कलात्मकतेने, निगर्वी खेळाने जसे लक्ष वेधले तसेच न्यूझीलंडच्या संघभावनेने देखील. या संघाच्या समर्थकांनीही विचित्र नियमामुळे वाटय़ास आलेले क्रूर प्राक्तन खुल्या मनाने स्वीकारले..

संघनायक आर्यलडचा, महत्त्वाच्या खेळाडूंतील कोणी आफ्रिकन तर कोणी पाकिस्तानी; एक स्पर्धक सर्बियाचा, त्याचा आव्हानवीर स्वित्र्झलडचा आणि प्रेक्षक मात्र स्थानिक. यातील एक क्रिकेटचा अंतिम सामना तर दुसरा विम्बल्डनचा. पहिल्यातल्यांना निदान घरचा संघ तरी होता समोर प्रोत्साहन द्यायला. पण दुसऱ्या अंतिम सामन्यात स्थानिक काहीही नव्हते. होते ते खरेखुरे खेळप्रेमी. खेळाचा खराखरा आनंद लुटायला आलेले. सभ्य आणि सुसंस्कृत. त्यामुळे नव्हते अचकट विचकट वागणारे, राष्ट्रप्रेमाने उन्मादलेले आणि म्हणून समोरचा केवळ खेळातला प्रतिस्पर्धी आहे, शत्रू नव्हे याचे भान असलेले आणि  खेळाकडे खेळ म्हणूनच पाहणारे. प्रत्यक्ष अथवा दूरचित्रवाणीवर ज्यांनी कोणी हे सामने पाहिले त्यांच्या मनांत एकच भावना असेल. डोळ्यांचे पारणे फिटल्याची आणि मने तृप्त झाल्याची.

रविवारी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन वेळा शेवटच्या चेंडूपर्यंत अंतिम सामना रंगला. प्रथम मुख्य सामना आणि नंतर सुपर ओव्हर. दोन्ही वेळा बरोबरी झाली आणि मग कोंडी फोडण्यासाठी सामन्यात सर्वाधिक चौकारांचा काहीसा अन्यायकारक निकष लावला गेला. इंग्लंड विजयी ठरले खरे, पण न्यूझीलंड पराभूत झाले नाहीत. क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सच्या मदानावर ४४ वर्षांपूर्वी क्रिकेटच्या या स्पर्धेला सुरुवात झाली. मूळ खेळ इंग्लंडचा, कसोटी क्रिकेटबरोबरच मर्यादित षटकांच्या सामन्यांचे उगमस्थानही इंग्लंडच. पण या प्रकारात आजवर जगज्जेतेपदे पटकावली ती ज्यांच्यावर इंग्लंडने राज्य केले त्यांनी. वेस्ट इंडिज, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी. आपल्या एके काळच्या राज्यकर्त्यांस पराभूत करण्याचा आनंद या देशांना क्रिकेटच्या विश्वचषकाने दिला. परिणामी आपल्या मांडलिकांकडून पराभूत व्हावे लागत असल्याची जखम ब्रिटिशांनी बराच काळ वागवली. १९९२ पर्यंत किमान तीन वेळा तरी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या इंग्लंडला नंतरच्या बहुतेक स्पर्धामध्ये फार काही करून दाखवता आलेच नाही. परिणामी इंग्लंडमधूनच क्रिकेट हद्दपार होणार की काय, अशी काळजी व्यक्त केली जात होती. अशा वेळी इंग्लंडने हा विश्वचषक जिंकला.

पण त्या विजयातीलही काव्यात्म न्याय म्हणजे या विश्वविजेत्या संघातील महत्त्वाचे खेळाडू इंग्लिश नाहीत. ते स्थलांतरित आहेत. या स्थलांतरितांमुळे इंग्लंडच्या संघात वैविध्य आले आणि गुणवत्तेचा दर्जाही उंचावला. इंग्लंडचा विद्यमान कर्णधार इऑन मॉर्गन हा अगदी अलीकडेपर्यंत आर्यलडकडून खेळत होता. आदिल रशीद, मोईन अली हे फिरकी गोलंदाज मूळचे पाकिस्तानी. बेन स्टोक्स न्यूझीलंडमध्ये आणि जेसन रॉय दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला. इंग्लिश संघाचे आशास्थान आणि सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज जोफ्रा आर्चर हा तर कॅरेबियन वंशाचा. हा एक प्रकारे ब्रेग्झिटच्या संकुचितवाद्यांसाठी मोठा धडाच म्हणायचा. या मुक्त आणि उदारमतवादी धोरणामुळे इंग्लंडची मदार केवळ क्रिकेटच नव्हे, तर फुटबॉलसारख्या खेळातही स्थलांतरितांवर आहे. जर्मनी आणि फ्रान्स या देशांचेही असेच. त्या देशांच्या फुटबॉल संघांनी जे आधीच करून दाखवले, ते आज इंग्लंडच्या क्रिकेट संघाला साधले. भूमिपुत्रांच्या नावे गळा काढणाऱ्या दांभिक राजकारणाने हे साधता आले नसते. एका अर्थी इंग्लंडचा विजय हा आपले दरवाजे बंद करू पाहणाऱ्या देशोदेशीच्या नेत्यांसाठी धडाच म्हणायचा.

पण या धडय़ाचे शीर्षक हे निर्विवाद न्यूझीलंडच्या संघाचे. कारण क्रिकेट या खेळाचा सांघिक आत्मा न्यूझीलंडसारखे संघच चिरंतन ठेवतात. वर्षांनुवर्षे कोणत्याही एखाददुसऱ्या वलयांकित खेळाडूवर विसंबून न राहता हा देश संघ म्हणून खेळतो. इंग्लंड किंवा उपांत्य फेरीतील भारतीय संघ कागदावर न्यूझीलंडपेक्षा अधिक बलवान होते. तरीही या दोन्ही संघांविरुद्ध न्यूझीलंड अपराजित राहिले. या संघातील प्रत्येक सदस्याची गुणवत्ता स्वतंत्रपणे पडताळल्यास इतर संघांमधील व्यक्तिगत गुणवत्तेपेक्षा कमी ठरत असेलही. पण या गुणवत्तेची सांघिक बेरीज बलाढय़ म्हणवल्या जाणाऱ्या बहुतेक संघांपेक्षा भारी असते, हे अनेकदा दिसून आले आहे. या संघाच्या ठायी असलेला विनय तर केवळ कौतुकास्पद आणि अनुकरणीय. दोन वेळा बरोबरी साधूनही एका विचित्र नियमाच्या आधारे त्यांच्या हातातून सामनाच नव्हे, तर विश्वचषकही निसटला. अशी वेळ भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया या संघांवर आली असती, तर या तिन्ही संघांच्या.. आणि त्यातही विशेषत: भारताच्या.. समर्थकांनी काय विलक्षण त्रागा केला असता, याची कल्पनाही करवत नाही. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी, समर्थकांनी हे क्रूर प्राक्तन खुल्या मनाने आणि प्रांजळपणे स्वीकारले याबद्दल त्यांचा स्वतंत्र गौरव करायला हवा! अखेरीस हा खेळ आहे याचे भान आणि जाण न्यूझीलंडसारखे संघ जिवंत ठेवतात. हे झाले खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीविषयी.

पण लॉर्ड्सपासून काही अंतरावरच विम्बल्डनमध्ये देशाच्या सामाजिक खिलाडूवृत्तीचे घडलेले दर्शन हे त्याहीपेक्षा उदात्त होते. वास्तविक विम्बल्डनच्या अंतिम सामन्यातून क्रिकेटप्रमाणे ना कोणी नवीन विजेता गवसणार होता की ना तेथे कोणी स्थानिक खेळाडू होता. या अंतिम सामन्यातील रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच या प्रतिभावंतांनी आजवर विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर अनेक सामने जिंकले आहेत. अनेक अजिंक्यपदेही अनेकदा पटकावलेली आहेत. तरीही रविवारचा सामना अद्भुत आणि ऐतिहासिक होता. पाच तास पाच सेट्स आणि अखेरीस कोंडी फोडणारा टायब्रेकर पाहात असताना आणि पाहिल्यानंतर जगभरच्या टेनिसरसिकांना आपण या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहोत या कल्पनेनेच धन्य धन्य झाले असणार.

यातील फेडररने खेळायला सुरुवात केली तेव्हा ‘९/११’ दोन वर्षे दूर होते आणि टेनिसप्रेमींचे जग बोर्ग, मॅकेन्रो, ख्रिस एव्हर्ट आदींच्या गारूडातून बाहेर यायला तयार नव्हते. विलँडर, एडबर्ग, आगासी, स्टेफी ग्राफ आदींचा उदय होत होता. पण त्यांच्यात दीर्घकाळ जीव रमेल की नाही, याबाबत साशंकता होती. नाही म्हणायला सॅम्प्रास होता काही काळ. पण तो म्हणजे कंटाळा आला म्हणून एखाद्या पेपरला दांडी मारणाऱ्या अत्यंत हुशार विद्यार्थ्यांसारखा. पेपर दिला तर पहिला क्रमांक निश्चित. पण तो देईलच याचा भरवसा नाही. अशा वातावरणात टेनिसच्या क्षितिजावर उगवलेल्या रॉजर फेडरर या खेळाडूच्या कलात्मकतेने आणि निगर्वी खेळाने अनेकांचे लक्ष वेधले.

ते तीन दशकांनंतरही तसेच त्याच्यावर खिळलेले आहे. म्हणून चाळिशीपासून अवघी दोन पावले दूर असलेला फेडरर टेनिसमध्ये जिंकायचे केव्हा थांबवणार वगैरे शंका व्यर्थ ठरतात. उपांत्य फेरीत त्याने नदालला हरवले. पण त्याच्याकडून कोणत्याही एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत नदाल आणि जोकोव्हिच दोघेही हरल्याचे उदाहरण नाही. ती किमया रविवारी तो करून दाखवणार असा त्याचा खेळ होता. पण जोकोव्हिचने तितक्याच ताकदीच्या खेळाने फेडररला तो आनंद मिळू दिला नाही. १९८० मधील मॅकेन्रो-बोर्ग किंवा २००८ मधील फेडरर-नदाल हे आजवरचे सर्वाधिक गाजलेले विम्बल्डन अंतिम सामने. रविवारचा सामना त्या दोन्ही लढतींवर कडी करणारा ठरला. या सामन्यात फेडरर थकल्यासारखा वाटला नाही आणि फेडररच्या पाठीराख्यांसमोर जोकोव्हिच कधी खचल्यासारखा वाटला नाही. हे दोघे आणि नदाल हे महान टेनिसपटू आहेतच. पण एकमेकांसमोर खेळताना त्यांचा खेळ एका वेगळ्याच उंचीवर जातो. त्या खेळाची आणि तो पाहण्याच्या आनंदाची अनुभूती शब्दांत पकडणे केवळ अवघड.

वास्तविक विम्बल्डन आणि अन्यही ग्रँड स्लॅम अंतिम सामन्यात गेली कित्येक वर्षे या तिघांपैकी एक किंवा दोघे असतातच असतात. त्यातून खरे तर हा खेळ कंटाळवाणा किंवा एकसुरी बनायला हवा. पण तसे होत नाही. कारण कोर्टवर फेडरर किंवा जोकोव्हिचच्या खेळात आढळणारा ताजेपणा हा नवोन्मेषशाली आणि म्हणून अजूनही हवाहवासा आहे. यांना खेळताना पाहणे आता व्यसनासक्ततेचे लक्षण आहे. पण हे व्यसन आयुष्य समृद्ध करणारे. रविवार सायंकाळच्या लॉर्ड्स आणि विम्बल्डनच्या या हिरवळीवरच्या कविता दीर्घकाळ लक्षात राहतील.