12 August 2020

News Flash

दलालांची मालकी

दक्षिण भारतातील या कंपनीचे बोट धरून अनेक सामान्य गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात पहिले पाऊल टाकले.

काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंग या मध्यस्थ-कंपनीवर व्यवहार परवाना स्थगित करण्याची कारवाई झाल्याने प्रश्न उद्भवतो, तो असलेल्या नियमांच्या पालनाचा..

हर्षद मेहता, केतन पारीख आदींनी गुंतवणूकदारांचा या बाजारपेठेवरील विश्वास आधीच उडवला होता. त्यानंतरच्या ताज्या काव्‍‌र्ही प्रकरणात गुंतवणूकदारांचा पैसा बुडालेला नाही; पण विश्वासाचे काय?

भांडवली बाजाराची नियंत्रक सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – म्हणजे सेबी – या यंत्रणेने काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंग या गुंतवणूकदारांच्या कंपनीवर निर्बंध लादल्यामुळे सध्या बाजारपेठ हवालदिल झाली आहे. हे निर्बंध जसे नैसर्गिक तसे बाजारपेठेचे हवालदिल होणेही नैसर्गिक. यात अनैसर्गिक काही असेल तर ते म्हणजे गुंतवणूकदारांचे नशीब. बँकांत पैसे ठेवावयास जावे तर बँका बुडतात. पण म्हणून पैसे घरी ठेवावेत तर सरकार त्या घामाच्या नोटांना ‘कागज का टुकडा’ असे जाहीर करते. हे दोन्ही नको म्हणून बिगरबँकिंग वित्तसंस्थांचा आधार घ्यावा तर तेथूनही पैसा गायब होतो आणि तक्रार करू गेल्यास वर सरकार तिकडे पैसे ठेवलेतच का म्हणून विचारणार. या सगळ्यास पर्याय म्हणून जागेत पैसे गुंतवावेत तर त्याबाबतच्या मालकीचा संशय आणि तो आहे म्हणून घर घ्यावयाचा विचार करावा तर इमारती पूर्ण होतीलच याची शाश्वती नाही. हे असे आपल्याकडे गुंतवणुकीचे त्रांगडे होऊन बसले आहे. या सगळ्यापेक्षा बाजारपेठेत पैसे गुंतवा असे सरकार कानीकपाळी ओरडून सांगते. तसे करायला जावे तर पहिली अडचण सांस्कृतिक. मराठीत भांडवली बाजारास सट्टाबाजार असे म्हटले जाते. हे सर्वथा गैर. पण त्यामुळे येथे गुंतवणूक करणे म्हणजे सट्टाबाजारात पैसे लावणे असे मानणारा एक मोठा वर्ग आजही आहे. या सगळ्यांचे सांस्कृतिक ओझे टाळून चांगला गुंतवणूक मार्गदर्शक – ब्रोकर – पाहून गुंतवणूक करावी तर हे असे काव्‍‌र्हीसारखे प्रकरण घडते आणि मग सारेच मुसळ केरात.

काव्‍‌र्ही ही अत्यंत नावाजलेली गुंतवणूकदार कंपनी. दक्षिण भारतातील या कंपनीचे बोट धरून अनेक सामान्य गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात पहिले पाऊल टाकले. या कंपनीचे व्यवसाय प्रारूप अगदी सोपे. बाजारात पैसे गुंतवू इच्छिणाऱ्यांकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना हव्या त्या समभागांच्या खरेदीसाठी ते वापरायचे. यात गैर काही नाही. हे असे करणे पूर्ण वैध आहे. दोन वर्गाचा मोठा पाठिंबा या व्यवहारांस मिळतो. एक म्हणजे भांडवली बाजाराविषयी ज्यास फारसे काही माहीत नाही आणि माहिती करून घेण्यात ज्यांना रस नाही त्यांना काव्‍‌र्हीसारख्यांचा आधार होता. त्याच्या उलट ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांच्यासाठीही काव्‍‌र्ही ही उपयुक्त सोय होती. या जोडीस भांडवली बाजारात नव्याने उतरू पाहणाऱ्या कंपन्यांनाही काव्‍‌र्हीचा आधार होता. अशा तऱ्हेने काव्‍‌र्ही आणि गुंतवणूकदार यांचा संसार मोठा सुखात आणि आनंदात सुरू होता. पण बाजारपेठ नियंत्रकाच्या ताज्या आदेशाने या सुखास ग्रहण लागले. सेबीने काव्‍‌र्हीवर निर्बंध आणले आणि नव्या गुंतवणुकीबाबतही प्रश्न उपस्थित केले. इतकेच नव्हे तर काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंग या कंपनीचा व्यवहार परवानादेखील मुंबई आणि राष्ट्रीय अशा दोन्ही भांडवली बाजारांनी स्थगित केला. आता काव्‍‌र्हीस नव्याने कोणताही व्यवसाय तूर्त स्वीकारता येणार नाही. ही घटना दोन आठवडय़ांपूर्वीची. त्यानंतर या प्रकरणी चौकशी झाली. मग काव्‍‌र्हीवरील कारवाईवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे असे सर्वानी काव्‍‌र्हीविरोधात दंड थोपटून उभे राहावे असा काव्‍‌र्हीचा गुन्हा तरी कोणता? अशी कारवाई करण्याची वेळ का आली?

त्याची प्रमुख कारणे दोन. पहिले म्हणजे काव्‍‌र्हीने गुंतवणूकदारांचा निधी आपल्या खासगी खात्यांत विविध व्यवहारांसाठी हलवला असा वहीम असून तो पूर्णपणे दूर केला गेलेला नाही. तसेच खासगी गुंतवणूकदारांनी काव्‍‌र्हीमार्फत खरेदी केलेल्या समभागांना तारण म्हणून वापरून काव्‍‌र्हीने त्याआधारे निधी उभा केल्याचा आरोप आहे. त्यात तथ्य असल्याचे आढळल्याने काव्‍‌र्हीविरोधातील कारवाईस गती आली. या संदर्भात आवर्जून लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे काव्‍‌र्हीने अद्याप कोणाचेही पैसे बुडवलेले नाहीत. त्या अर्थाने जे काही झाले ते ‘आयएल अँड एफएस’ किंवा ‘डीएचएफएल’ यांच्याप्रमाणे नाही. म्हणजे काव्‍‌र्हीकडे रोखतेचा प्रश्न नाही. पण तरीही या सगळ्या प्रकाराने बाजार हादरला. कारण काव्‍‌र्हीचे जर बरेवाईट काही झाले तर तब्बल २९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे काय होणार हा प्रश्न आहे. आधीच सध्याच्या अशक्त बाजारपेठावस्थेत आणखी एका कंपनीचे असे आडवे होणे हे गुंतवणूकदारांचा विश्वास गमावणारे आहे. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. याचे कारण असा उद्योग करणारी काव्‍‌र्ही ही काही पहिलीच कंपनी नाही. आतापर्यंत किमान अर्धा डझन ब्रोकिंग कंपन्यांनी हे उद्योग केल्याचे निष्पन्न झाले आहे. पण यांत आणि काव्‍‌र्हीत फरक असा की या कंपन्यांचे हे उद्योग वेळीच पकडले गेले नाहीत. आताही काव्‍‌र्हीचे हे उद्योग लक्षात आले कारण एकूणच असलेले मंदीसदृश वातावरण. याआधी ज्याचे असे उद्योग लक्षात आले त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून सेबीने या संदर्भात काही नियमावली तयार केली.

तीनुसार या ब्रोकिंग कंपन्यांनी बँकेत खाती कशी काढावीत याबाबत काही नियम केले गेले. ब्रोकिंग कंपन्यांचे प्रवर्तक आणि सामान्य गुंतवणूकदारांकडून आलेला निधी यांत गल्लत होणार नाही अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले गेले. त्याचप्रमाणे या गुंतवणूकदारांचे समभाग खरेदी करून ब्रोकिंग कंपन्यांनी त्याआधारे निधी उभारू नयेत असेही निश्चित केले गेले. गुंतवणूकदार अशा ब्रोकिंग कंपन्यांना गुंतवणुकीसाठी व्यापक असे मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) देतो. त्यांचा उपयोग गुंतवणुकीसाठी केला जावा आणि तारण म्हणून केला जाऊ  नये असे स्पष्ट निर्देश आहेत. ते असतानाही काव्‍‌र्हीने जे करायला नको ते केले. गुंतवणूकदारांच्या निधीचा आणि त्यामुळे त्यांच्या विश्वासाचाही गैरवापर केला. या ब्रोकिंग कंपनीची एक कंपनी घरबांधणी क्षेत्रातही आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी दिलेला पैसा या घरबांधणी क्षेत्राकडे वळवल्याचा आरोप काव्‍‌र्हीवर आहे. याचा अर्थ सर्व नियमावली, आदर्श परिस्थिती कशी असावी आदी नियम नक्की केल्यानंतरही काव्‍‌र्हीसारख्या ब्रोकिंग कंपनीकडून हा उद्योग झाला.

हे उद्वेगजनक म्हणायचे. आधीच आपल्याकडे समभाग संस्कृती नाही. ती जरा कोठे रुजते असे वाटू लागते न लागते तोच काव्‍‌र्हीसारखे नवे काही प्रकरण लक्षात येते. याआधी हर्षद मेहता, केतन पारीख आदींनी गुंतवणूकदारांचा या बाजारपेठेवरील विश्वास असाच उडवला. तो पुन्हा प्राप्त करण्याआधीच हे काव्‍‌र्ही प्रकरण घडले. याचा अर्थ नुसते नियम करून आपल्याकडे भागत नाही. त्यातून त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी होईलच असे नाही. त्यासाठी सतत लक्ष ठेवणेही आले. म्हणजे वाहतुकीचे सिग्नल आहेत म्हणून आपल्याकडे ते पाळले जातीलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या पालनासाठी आपल्याकडे पोलीस कर्मचारीही ठेवावा लागतो. म्हणजे ज्याची गरज कमी करण्यासाठी वाहतूक सिग्नल ही संकल्पना अस्तित्वात आली त्या वाहतूक पोलिसास यातून रजा मिळणे नाहीच. आता वाहतूक सिग्नलही लागतो आणि त्याचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पोलीसही आवश्यक अशी परिस्थिती. पण हे वाहतूक नियमन अधिक सजगतेने व्हायला हवे. तसेच बाजारपेठेवरील विश्वासही पुन्हा स्थापित व्हायला हवा. तोळामासा अर्थसाक्षरता असलेल्या आपल्या देशात गुंतवणूकदारांची पाठ भांडवली बाजारपेठेकडे फिरवलेलीच राहिली तर त्याची मोठी किंमत आपणास द्यावी लागेल. क्षेत्र कोणतेही असो. दलालांहाती मालकी जाणे धोक्याचेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 1:59 am

Web Title: editorial page agent owner harshad mehta ketan parekh investor akp 94
Next Stories
1 हमारा कुसूर निकलेगा..
2 हमारा मिजाज!
3 निर्भीडपणातून न्यायाकडे..
Just Now!
X