दोन समदु:खींनी एकत्र यावे तसे भाजप-मनसे सहमतीचे होईल. तसे झाल्यास फायदा असेल तो भाजपचाच.. मनसेचे काय?

प्रतिस्पर्धी काय करतात हे पाहून आपले राजकारण ठरविल्याने तात्पुरती सोय होत असेल. पण दीर्घकालीन तोटाच त्यातून दिसतो. तो टाळायचा तर ‘निवडणुका ते निवडणुका’ अशी जनतेत हजेरी लावणे बंद करून अन्य पक्षांप्रमाणे पूर्णवेळ राजकारण करावे लागेल..

गुणवान म्हणून गणला जाणाऱ्या आणि म्हणून ‘बोर्डा’त येईल अशी अपेक्षा ज्याच्याबाबत बाळगली जाते अशा विद्यार्थ्यांने ऐन वेळी परीक्षेत ‘ड्रॉप’ घ्यावा असे राज ठाकरे यांचे राजकारण राहिलेले आहे. स्थापनेनंतर १४ वर्षांनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईत भरले. वास्तविक विद्यमान महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ सदस्यांत मनसेची सदस्यसंख्या एक इतकीच आहे. म्हणजे संख्याबळ या निकषावर राज्याच्या राजकारणात हा पक्ष तूर्त तरी दखलपात्र नाही. पण कोठेही सत्तेवर नसताना आणि तशी ती मिळण्याची शक्यता नसताना त्यांच्या अधिवेशनास मिळत असलेला प्रतिसाद आणि ठाकरे यांच्याविषयी जनतेच्या मनात अजूनही असलेल्या अपेक्षा लक्षात घेता मनसेच्या अस्तित्वाचे प्रयोजन आणि ठाकरे यांचे आगामी राजकारण यांचे विश्लेषण व्हायला हवे. याची गरज आहे कारण मनसेच्या आजच्या अधिवेशनात जे काही घडले त्यातून पक्षनेतृत्वाच्या मनात स्वपक्षाच्या राजकारणाविषयी संदिग्धता दिसते. मनसे चिकित्सा दोन मुद्दय़ांभोवती फिरते. पहिले म्हणजे या पक्षाच्या राजकारणाचे या टोकाकडून त्या टोकाकडे सुरू असलेले झोके आणि दुसरे, त्याहूनही महत्त्वाचे कारण म्हणजे या पक्षाचे संपूर्ण प्रतिक्रियावादी राजकारण.

प्रथम मनसेच्या राजकीय झोक्यांविषयी. भूमिपुत्रांचे, मराठीचे राजकारण हा मनसेचा पाया. त्याआधी त्याच पायावर राजकारण उभे करणाऱ्या शिवसेनेने तो सोडला आणि मनसे त्यावर स्वार झाला. त्यामुळे पहिल्याच फटक्यात २००९ साली या पक्षाचे तब्बल १३ आमदार विधानसभेत निवडून आले. हे यश सर्वार्थाने अभूतपूर्व होते. तथापि पदार्पणात शतक झळकावणाऱ्या खेळाडूस नंतरच्या सामन्यांत दुहेरीही धावसंख्या गाठता येऊ नये तसे मनसेचे झाले. आपल्या पहिल्या काही निवडणुकांत मनसेने घसघशीत मतेही घेतली. परंतु प्रारंभाला ५.७१ टक्के इतकी मतांची बेगमी करणाऱ्या मनसेचे मतांचे प्रमाण नंतरच्या निवडणुकांत, ३.१ टक्के आणि आता २.३० टक्के असे सातत्याने घसरत गेले. या काळात अन्य काही पक्ष फार मोठी प्रभावी कामगिरी करीत होते असे नाही. पण तरी जनतेने मनसेस मते दिली नाहीत.

म्हणजे या गतिशून्यतेस अन्य पक्षांनी घेतलेली गती हे कारण नाही. तर मनसेने गती गमावणे कारणीभूत आहे. सुरुवातीस राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांचे समर्थक होते. मोदी यांनी गुजरातेत जे काही केले त्यामुळे भारावून जाऊन त्यांनी मोदी यांना पाठिंबा दिला आणि एक निवडणूक लढविली नाही. ते ठीक. पण पुढे त्यांचा भ्रमनिरास झाला आणि ते मोदी यांचे टीकाकार झाले. तेही ठीक. पण आपले हे असे ‘मतांतर’ का झाले हे राज ठाकरे जनतेस स्पष्ट करू शकले नाहीत. त्यांनी प्रयत्न केला. पण तो पुरेसा विश्वसनीय होता असे म्हणता येणार नाही. या काळात त्यांच्या पक्षाने काही महत्त्वाची जनआंदोलने केली. तीदेखील पूर्ण यशस्वी झाल्याचे जनतेस दिसले नाही. परिणामी त्यांच्या पक्षास ओहोटी लागली आणि जे कोणी मोजके शिलेदार त्यांच्या सोबत होते, ते सोडून गेले. राजकारणात हे असे होते. अशा वेळी नव्या शिलेदारांना हाताशी घेऊन नव्या जोमाने पक्षउभारणी करावयाची असते. ती कशी, याचे मूíतमंत आणि मित्रत्वाचे उदाहरण शरद पवार यांच्या रूपाने हाताशी असताना राज ठाकरे यांनी ते केले नाही. परिणामी या पक्षाचे अस्तित्व विधानसभेतून जवळजवळ पुसले गेले आणि आता तर त्यांच्या पक्षाकडे एकमेव आमदारकी आहे. आणि आता राज ठाकरे पुन्हा आपल्या पक्षाच्या राजकारणाची दिशा बदलू पाहतात.

हा मुद्दा क्रमांक दोन. एखादा विषय वा कार्यक्रम घेणे वा सोडणे हे मनसेसाठी प्रतिक्रियात्मक राहिलेले आहे. याचा अर्थ मनसे आपला कार्यक्रम प्रतिस्पध्र्यानुसार ठरवतो. शिवसेना मराठीचा मुद्दा सोडते काय? मग मनसेने तो घेतला. आता शिवसेनेने कथित हिंदुत्व सोडले म्हणून मनसे हिंदुत्वाचा जयजयकार करणार. यास अर्थ नाही आणि त्यातून फक्त पक्षाचा गोंधळच दिसतो. यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे शिवसेनेसाठीही हिंदुत्ववाद ही सोय होती आणि मनसेसाठीही ती अडचणीतील सोयच असणार आहे. मराठीचा मुद्दा हातून गेल्यावर सेनेस हिंदुत्वाची भगवी वल्कले ल्यावी लागली. मनसेचेही तेच. अशा पद्धतीने स्वपक्षाचा कार्यक्रम विरोधी पक्षावर बेतणारे पक्ष मतदारांना आकर्षित करत नाहीत. कारण त्यांच्या राजकारणात स्वत:चे अस्सल असे काही आढळत नाही. मनसेसदेखील हाच धोका आहे.

आणि त्याचा विचार न करता हा पक्ष भाजपशी हातमिळवणी करू पाहतो. हे म्हणजे ‘सटवाईला नव्हता नवरा आणि म्हसोबाला नव्हती बायको’ असे होईल. तीन दशकांच्या जोडीदाराने भलतीच शय्यासोबत केली आणि वर त्यांचा तिहेरी संसार सुखाने सुरू आहे हे भाजपचे दु:ख. तर निवडणुकीत प्रचाराचा घाम ज्यांच्यासाठी गाळला ते काँग्रेस-राष्ट्रवादी मोक्याच्या वेळी आपला हात सोडून शिवसेनेचा संग करतात ही मनसेची वेदना. त्यामुळे दोन समदु:खींनी एकत्र यावे तसे भाजप-मनसे सहमतीचे होईल. तसे झाल्यास फायदा असेल तो भाजपचाच. ज्याप्रमाणे ताज्या निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादीस प्रचारासाठी राज ठाकरे यांच्यासारखा दिलखेचक गडी मिळाला त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांत तो भाजपस मिळेल. मनसेचे काय?

तो पक्ष आहे तेथेच राहण्याचा धोका यातून संभवतो. हे असे झोके घेतल्याने तात्पुरती सोय होत असेल. पण दीर्घकालीन तोटाच त्यातून दिसतो. तो टाळायचा असेल तर ‘निवडणुका ते निवडणुका’ अशी जनतेत हजेरी लावणे बंद करून अन्य पक्षांप्रमाणे पूर्णवेळ राजकारण करावे लागेल. त्यासाठी पक्षाची उभारणी करावी लागेल आणि ती करायची तर माणसे उभी करावी लागतील. तशी ती आल्यावर त्यांच्याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा लागेल. अर्थात अनेकदा फक्त मुख्य नेत्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच मतदार निर्णय घेतात आणि अशा वेळी शेंदूर फासलेल्या कोणत्याही दगडास मतदान होते, हे खरे. पण ते तसे दरवेळी होतेच असे नाही. एकाच मुद्दय़ावर मतदारांना अनेक वेळा फसवता येत नाही. तसा प्रयत्न केला की काय होते हे देशात सध्या दिसते आहेच.

तेव्हा झेंडय़ाचा रंग बदलणे, त्यावरील इंजिनाची दिशा बदलणे, नंतर इंजिनाच्या बरोबरीने  शिवाजी महाराजांच्या  राजमुद्रेचा आणखी एक झेंडा अंगिकारणे वगरेत काहीही अर्थ नाही. या दुय्यम बाबी आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास न करताच परीक्षेस सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांलाच अंगारे, शकुन वगरेचा आधार घ्यावा लागतो, तसे हे आहे. अभ्यास चोख असेल तर सर्व अपशकुनांना आडवे करता येते.

तेव्हा गरज आहे ती  राज ठाकरे यांनी पक्षाचे पूर्णवेळ नेतृत्व करण्याची  आणि  पक्ष बांधून काढण्याची. असे करायचे असेल तर आधी आजार  काय आहे  आणि आपण उपाय काय करतो आहोत हेही एकदा तपासावे. अलीकडे पचनाच्या विकारांवर घरातील प्रसाधनगृहांची दिशा बदला असे सल्ले देणाऱ्या भोंदूतज्ज्ञांची चलती आहे. अशा विज्ञानदुष्टांवर विश्वास ठेवल्यास व्याधी बळावून प्राण कंठाशी येण्याचा धोका अधिक.