नेतृत्व नाहीच, उलट जुन्यांकडून कोंडी- अशा अवस्थेतील ज्योतिरादित्य शिंदे कुठे वळणार हे स्पष्ट असूनही काँग्रेस नेतृत्वाने वर्षभर दखलही घेतली नाही..

आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी ते ज्योतिरादित्य अशा अनेक नव्या दमाच्या नेत्यांना काँग्रेस का आपली वाटत नाही, याचे उत्तर मूलत: राहुल गांधी यांच्या अधांतरी नेतृत्वात आहे..

‘ना करूंगा ना करने दूंगा’ ही राहुल गांधी यांची काँग्रेस नेतृत्वाची शैली लक्षात घेतल्यास ज्योतिरादित्य शिंदे यांचा पक्षत्याग हा आश्चर्य नाही. घरातील भांडणांचा फायदा शेजारच्याने घेत आपला स्वार्थ साधल्यास ज्याप्रमाणे त्यास दोष देणे उचित नाही त्याप्रमाणे शिंदे यांच्या नव्या घरोब्यासाठी भाजपस बोल लावण्यात अर्थ नाही. खरे तर मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांनंतर शिंदे इतके दिवस काँग्रेस पक्षात राहिले कसे हे आश्चर्य होते. त्यांचे पक्षांतर हे आश्चर्य नाही. तथापि ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपच्या आश्रयास जाणे आणि अन्य कोणा नेत्याने तसे करणे यात मोठाच फरक असल्याने त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. एरवी ही राजकीय बदफैली ही तशी आता नित्याचीच बाब म्हणायची.

यात शिंदे यांचा पक्षत्याग वेगळा ठरतो. याचे कारण गांधी परिवारास वगळून काँग्रेसचे नेतृत्व करण्याची ज्याची क्षमता होती, त्यातील एक नाव ज्योतिरादित्य यांचे. वडिलांप्रमाणे व्यक्तिमत्त्व, सर्वपक्षीय दोस्ताना आणि सर्वसमावेशक सहिष्णुता ही त्यांची वैशिष्टय़े. तथापि त्यांचे नेतृत्व जसे फुलावयास हवे होते तितके ते वाढले नाही. ऐंशीच्या दशकात राजीव गांधी यांच्या उदयानंतर काँग्रेस पक्षात नव्या उमद्या नेत्यांची फळी उदयास आली. राजेश पायलट, माधवराव शिंदे हे त्यांपैकी काही. त्यांच्या अस्तानंतर आणि राजीवपुत्र राहुल यांच्या उदयानंतर पायलट वा शिंदे यांचीही पुढची पिढी तितक्याच जोमाने पुढे यायला हवी होती. ते झाले नाही. उलट राहुल यांच्या काळात आज हे दोघेही नेते काँग्रेसमध्ये कुढताना दिसतात. त्या कुढण्यास शिंदे यांनी आपल्या परीने मार्ग काढला. पायलट अजून तरी काँग्रेसमध्ये आहेत इतकेच. याचा प्रामुख्याने दोष जातो तो राहुल गांधी यांच्याकडे. त्यातही त्यांचे अर्धवेळ राजकीय नेतृत्व यास जबाबदार आहे. राजकारण हे २४ तास करावयाचे असते हे सत्य अजूनही त्यांना लक्षात आलेले नाही आणि आले असले तरी त्यांना याची फिकीर नाही. त्यामुळे ते निवडणुकांपुरती लगबग करतात. निकाल लागला आणि त्यात पक्षाचा पराभव झालेला दिसला की ‘हुश्श.. किती दमलो’ म्हणत गायब होतात. आता दिल्ली निवडणुकांनंतरही हे दिसून आले. दिल्ली जळत असताना राहुलबाबा दिल्लीच्या आसपासदेखील नव्हते. अशा वेळी काँग्रेस पक्षात अनेकांची ‘जो राहुलवरी विसंबला..’ त्याचा कार्यभाग बुडाल्याची भावना होणे नैसर्गिक. ज्योतिरादित्य यांचे तसेच झाले असणार.

त्यांच्या पक्षांतराचे समर्थन न करता त्यांच्या कृत्याची अपरिहार्यता लक्षात घेता येते. वास्तविक २०१४ नंतर राहुल यांना साथ करू इच्छिणारे जे कोणी नव्या दमाचे नेते होते त्यातील एक ज्योतिरादित्य. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संपूर्ण देशात नाही तरी निदान मध्य प्रदेशात उभी राहत असल्याचे चित्र निर्माण होत होते. ते फसवे असल्याचे अलीकडच्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकालांनंतर स्पष्ट झाले. त्या वेळी कशाबशा बहुमताचे नेतृत्व करण्याची संधी ज्योतिरादित्य यांना दिली जाईल ही अपेक्षा होती. तसे झाले असते तर ते न्याय्यदेखील ठरले असते. पण त्याऐवजी कमलनाथ यांचा जुनाच घोडा ऐन वेळी पुढे केला गेला. राजस्थानातही सचिन पायलट यांच्याऐवजी अशोक गेहलोत यांच्या हाती सत्तासूत्रे दिली गेली. यातून त्या पक्षातील नव्या-जुन्यांचा संघर्ष तेवढा दिसून आला. राहुल गांधी यांचे तरुण तुर्क विरुद्ध सोनिया यांचे जुने अर्क अशी ही स्पर्धा. ती प्रत्येक पक्षात असते. पण काँग्रेसमध्ये ती उफाळून आली कारण या स्पर्धेत नव्यांचे नेतृत्व करणारा पूर्ण ताकदीने उभा नाही म्हणून. त्यामुळे कष्ट करायला हे तरुण नेते आणि सत्ता आली की तिचे नेतृत्व मात्र पुन्हा जुन्यांकडे असे होत गेले. ज्योतिरादित्य यांनी तेही सहन केले आणि आणखीही केले असते.

पण कमलनाथ यांनी त्यांची पूर्ण कोंडी करण्याचे राजकारण केले. हा त्या पक्षाचा दळभद्रीपणा. मुळात कशीबशी आलेली सत्ता सर्वाना सहभागी करून घेत राबवायची सोडून या कशाबशा मिळालेल्या सत्तेतही कमलनाथ यांनी पक्षांतर्गत विरोधकांचा कोंडमारा सुरू ठेवला. विरोधी पक्ष अशक्त असला की हे असले राजकारण खपून जाते. पण मध्य प्रदेशात तसे नाही. याचे भान कमलनाथ यांना राहिले नाही. निवडणुकांनंतर मुळात ज्योतिरादित्य त्यांच्याऐवजी मुख्यमंत्रिपदी कमलनाथ यांची वर्णी लागली तीच मुळी अशक्त सरकार चालवण्यासाठी सशक्त नेता हवा यासाठी. पण कमलनाथ आपली सशक्तता आतल्या आतच दाखवत राहिले. त्यामुळे ज्योतिरादित्य यांच्यासाठी भाजपने गळ टाकला यात नवल नाही. त्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या. गेले वर्षभर ज्योतिरादित्य यांचे कुढणे राजकीय वर्तुळात घुमत होते. मग तो जम्मू-काश्मीरचा अनुच्छेद ३७० काढण्याचा मुद्दा असो वा राज्यांतर्गत राजकारणाचा. ज्योतिरादित्य यांची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे स्वच्छ होते. तरीही त्याची दखल ना सोनिया गांधी यांनी घेतली ना राहुल-प्रियंका यांनी. यातून या पक्षात आपली गरज नाही असाच संदेश ज्योतिरादित्य यांना दिला गेला.

बाकी ज्योतिरादित्य यांना आपल्याकडे खेचून भाजप एका दगडात अनेक पक्षी मारू पाहात असेल तर तो राजकारणाचाच भाग. ज्योतिरादित्य यांची आजी राजमाता विजयाराजे या भाजपच्या एक संस्थापक सदस्य. त्यांची एक कन्या वसुंधराराजे यांच्याकडे राजस्थानची जहागीर बराच काळ होती. त्यांचे आणि प्रस्थापितविरोधी भाजप नेतृत्वाचे तितके काही सख्य नाही. त्यांची बहीण आणि ज्योतिरादित्य यांची दुसरी आत्या यशोधराराजे यादेखील भाजप नेत्या. वसुंधराराजे यांचे चिरंजीव दुष्यंत हे भाजपचे खासदार. त्यांची आत्या माया सिंग याही भाजप नेत्या. त्या शिवराजसिंग चौहान मंत्रिमंडळात होत्या. यास अपवाद होते ते फक्त माधवराव शिंदे. ते आज हयात असते तर ७५ वर्षांचे असते आणि मंगळवारीच (१० मार्च) त्यांचा जन्मदिन असता. तोच मुहूर्त ज्योतिरादित्य यांनी साधला आणि ते भाजपवासी झाले. यामुळे समस्त शिंदे राजघराणे भाजप सेवेत रुजू झाले असे म्हणता येईल. या माजी राजघराण्यातील विद्यमान मतभेदांचा भाजपला निश्चितच फायदा होईल. ज्योतिरादित्य आता केंद्रात नरेंद्र मोदी सरकारात मंत्री होतील असे दिसते. तेथे असलेली गुणवंतांची कमतरता लक्षात घेतल्यास ज्योतिरादित्य सुस्थळी पडले असे म्हणता येईल. जाता जाता भाजपने हेही करावे. येस बँकेचे राणा कपूर यांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यांनी प्रियंका गांधी यांच्याकडून दोन कोटी रुपयांत खरेदी केलेल्या चित्राची बरीच चर्चा सुरू आहे. त्याची चौकशी करता करता हे कपूर मुंबईत कोणाचे भाडेकरू होते याचीही चौकशी ज्योतिरादित्य यांच्या भाजप-प्रवेशाच्या मुहूर्तावर केली जावी.

दुसरीकडे आपल्या पक्षात हे असे अनेकांचे का होते याचा विचार आता काँग्रेस नेतृत्वास करावा लागेल. आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी ते ज्योतिरादित्य अशा अनेक नव्या दमाच्या नेत्यांना काँग्रेस का आपली वाटत नाही, याचा शोध आणि (जमल्यास) उपाययोजना त्या पक्ष नेत्यांना करावी लागेल. तसे केल्यास या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस आणि मूलत: राहुल गांधी यांच्या अधांतरी नेतृत्वात आहे याची जाणीव त्यांना होईल. तेव्हा याची पुनरावृत्ती टाळावयाची असेल तर त्या पक्षास प्रथम आपला नेतृत्वाचा गोंधळ दूर करावा लागेल. अन्यथा आज जे मध्य प्रदेशात घडले ते उद्या महाराष्ट्रात वा अन्य राज्यात घडेल. तसे झाल्यास काँग्रेसचे वर्णन करण्यास कर्मदरिद्री हेच विशेषण योग्य ठरेल.