निरर्थकतेच्या जाणिवेने हबकलेली अशी किती तरी सर्वसामान्य माणसे, प्रत्यक्षात त्यांना काहीही झालेले नसतानाही आपल्यातून निघून गेली असतील…

सिद्धार्थ शुक्ला वलयांकित, त्यामुळे त्याच्या अचानक मृत्यूची चर्चा ठीकच. परंतु या चर्चेतून अपरिहार्यपणे जो चिंतेचा सूर उमटतो, तो स्वत:बद्दलचाही असतो… न सरणारा करोनाकाळ, त्यातील हाल हे सारेही नेणिवेत असतेच…

मनोरंजन विश्वातील सिद्धार्थ शुक्ला या अवघ्या ४० वर्षांच्या उमद्या कलाकाराच्या अचानक झालेल्या मृत्यूने समाजाच्या सगळ्या स्तरांमधून धक्का बसल्याची जी भावना व्यक्त होते आहे, ती समजण्यासारखी आहे. आरोग्याविषयी अत्यंत दक्ष असलेला, तंदुरुस्त असा सिद्धार्थ शुक्लासारखा माणूस हृदयविकाराने तडकाफडकी जातो हेच अनेकांसाठी अनाकलनीय आहे. जीवनातील अटळ मृत्यूचे वास्तव सगळ्यांनाच माहीत असते आणि सगळ्यांनीच ते स्वीकारलेलेही असते हे खरे; पण जगण्यामधले हे अपरिहार्य, अंतिम असे सत्य गेली दीड वर्षे आपल्या सगळ्यांच्याच दारांवर सातत्याने धडका मारते आहे, ही बाब सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची हळहळ अधिक गडद करते हे नीट समजून घेतले पाहिजे. या गेल्या दीड वर्षांच्या काळास अर्थातच संदर्भ आहे तो कोविडकहराचा.

दीड वर्षांपूर्वी केवळ सूक्ष्मदर्शकाखालीच दिसू शकेल इतक्याच आकाराच्या, एरवी ज्याला आपण य:कश्चितदेखील गणणार नाही अशा कोविडच्या विषाणूने आपल्या सगळ्यांच्या हसत्या- खेळत्या- नांदत्या जगाची जणू काही स्मशानभूमी करून टाकली. कोविडसंसर्गाच्या आणि त्यातून येणाऱ्या मृत्यूच्या भीतीने एका क्षणात सगळे जग कुंठित होऊन गेले. कुठेही न दिसणाऱ्या पण ज्याने जणू काही सगळा भवतालच व्यापून टाकला आहे, अशा मानवजातीच्या एका अज्ञात शत्रूने सगळ्यांना वेठीला धरले होते. कष्टाचा भाकरतुकडा खाणाऱ्यापासून ते गर्भश्रीमंतापर्यंत सगळ्यांना एका अनाकलनीय भीतीने घेरले होते. उद्याचा दिवस आपल्यासाठीदेखील आहे या विश्वासावर आपण आपले जगणे गृहीत धरलेले असताना अचानक आलेल्या निरर्थकाच्या भोवऱ्यामध्ये आपले म्हणून जे काही आहे, ते सगळे काही उद्ध्वस्त होऊ शकते हेच कुणाला स्वीकारता येत नव्हते. जगण्याचे सगळे संदर्भ अचानकच बदलून गेले होते. सगळे जग आपल्या टापूखाली आहे अशा भ्रमात वावरणाऱ्या माणसांना जणू काही नजरकैदेत वावरावे लागले. ‘समाजप्रिय प्राणी’ असलेल्या माणसाला घराबाहेर पडणेही मुश्कील होऊन गेले. माणसाने त्याच्या मूलभूत कुतूहलातून आजचे जग घडवले आहे. ते असे एकाएकी मिटून चालले होते. माणसाला माणूस भेटत नव्हता. चेहऱ्यामोहऱ्यासह सगळे शरीर आवृत्त करून, दुसऱ्याला भेटावे तर नजरभेटीतूनही कोविड पसरत असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. कुणाकुणाचे प्रियजन कुठेकुठे अडकले होते. ते परत कधी भेटणार याच्या साध्या शक्यताही वर्तवता येत नव्हत्या. कुणाकुणाचे जिवलग कोविडच्या संसर्गामुळे अज्ञानाच्या प्रवासाला निघून गेले होते आणि त्यांना त्यांचा शेवटचा निरोपही घेता आला नव्हता. रोजच्या रोज संसर्गाचे, मृत्यूचे आकडे वाढत होते. आपल्या जिवावर उठलेले अज्ञात असे काही तरी आपल्या आसपास वावरते आहे ही जाणीव आपण जणू काही एखाद्या गूढकथेत वावरतो आहोत याचा भास करून देत होती.

कधीच न अनुभवलेली अशी ही भीती होती. अवघ्या अस्तित्वाच्या जाणिवेवर घाला घालणारी ही भीती युरोपियनांनी अनुभवली होती ती महायुद्धांच्या काळात. जीवनाच्या नश्वरतेचा आपण भारतीयांनीही अनुभव घेतला तो फाळणीच्या काळात. अर्थात सीमेपासून सुदूर असणाऱ्यांना ती झळ तितकी जाणवली नाही आणि तिची तितकी दाहकताही आकळली नाही. पण कोविडकाळातली भीतीची ही जाणीव सगळे जग व्यापून उरली आहे, हेच आकलनाच्या पलीकडचे होते. ज्यासाठी ऊरतोड धावाधाव केली, जीवतोड स्पर्धा केली ते सगळे एका क्षणात निरर्थक होऊन जाते? बँकेतला पैसा, गाडीघोडा हे सगळे बाजूला पडून केवळ किराणा माल आणि भाजी मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते? श्वास घ्यायलाही वेळ नाही असे म्हणणाऱ्या माणसाला सेकंदकाटाही मोजत बसायची वेळ येते? उच्चशिक्षण घेऊन लाखोंमध्ये पगार घेणाऱ्यावर भाजी, मासे, जेवणाचे डबे विकायची वेळ येते? ‘राहिले रे दूर घर माझे’ म्हणत पोटापाण्यासाठी दुसरी शहरे गाठणाऱ्यांना दूरवरच्या, त्या घरी परत जाण्यासाठी हजारो किलोमीटरचे अंतर मुलाबाळांसह पायपीट करत पार पाडावे लागते? आज एकदम तंदुरुस्त असलेला माणूस उद्या नसतो? कुणाकडेच कसलेच उत्तर नसलेले असे अनेक प्रश्न माणसे जगत होती. त्या प्रश्नांसकट मिळालेला वर्तमानाचा मोकळा अवकाश कसा भरून काढायचा हा गोंधळ त्या काळामधल्या समाजमाध्यमांमधून दिसत होता. या सगळ्या अनुभवातून माणसे हलली होती, अगदी मुळापासून हलली होती हेच त्यामधून प्रतिबिंबित होत होते. सर्दीपडशापासून यच्चयावत शारीरिक आजारांबाबत त्याला बोलता सांगता येत होते. पण या जीवघेण्या मनोवस्थेबद्दल मात्र सांगताही येत नव्हते. इतकी अनिश्चितता, इतके रिकामपण, इतकी पोकळी त्याने कधीच अनुभवली नव्हती. राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थैर्य आजवर त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले होते. पण उद्याचे तर सोडूनच द्या, आजचेही काही माहीत नाही, असे मानसिक अस्थैर्य सगळ्या समाजाने एकाच वेळी अनुभवावे हे अघटितच होते. कुणी कुणाकडे पाहायचे आणि कुणी कुणाला धीर द्यायचा? मुलांच्या शाळा, महाविद्यालये केव्हाच बंद झाली होती. कुणाकुणाचे कार्यालय एका लॅपटॉपवर येऊन विसावले होते. कुणाकुणाच्या नोकऱ्या जात होत्या. या सगळ्यातून आलेल्या बधिरावस्थेतून रोजचे जगणे तर जगावेच लागत होते. दीड वर्षानंतर परिस्थिती थोडी बदलली आहे, नाही असे नाही. पण कोविडचे भय आजही तसेच आहे. कोविडच्या महासाथीची पहिली लाट समजून घेता घेता, दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. ती ओसरण्याची चिन्हे दिसत असतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली. अल्फा, बीटा, गॅमानंतर आता डेल्टा या विषाणूप्रकाराच्या संसर्गाची भीती आहे. कुणी सांगावे त्यानंतर कदाचित पुढले ग्रीक अक्षर – लॅम्बडादेखील येईल. पुन्हा बाजारपेठा बंद होतील का, रस्ते ओस पडतील का, रात्रीची संचारबंदी होईल का, सगळे ठप्प झाले असे होईल का ही भीती माणसांच्या नेणिवेत अजूनही वास करून आहे.

लसीकरणामुळे कोविडच्या परिस्थितीत फरक पडतो आहे, हे खरे आहे. पण माणसांच्या मनावर धरलेली ती कोविडकाजळी अजूनही तशीच आहे. ती कदाचित दिसणार नाही. त्यांना त्याबद्दल सांगताही येणार नाही. शिक्षण, व्यापार, कला, क्रीडा या आणि अशा सगळ्याच क्षेत्रांना तिने व्यापले आहे. तिने केलेल्या नुकसानीची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. कशानेच ते नुकसान भरूनही निघू शकत नाही. नेणिवेमधल्या असहायतेच्या, बधिरतेच्या या जाणिवेसह माणसे जगताहेत. यापुढच्या काळासाठी त्यांचे जगणे कायमचे बदलले आहे. हे सगळे लक्षात घेतले तर सिद्धार्थ शुक्लासारखा धडधाकट माणूस अचानक कसा जाऊ शकतो याची कदाचित संगती लावता येईल. त्याच्यासारख्या वलयांकित माणसाच्या मृत्यूची निदान दखल घेतली जाते. पण निरर्थकतेच्या जाणिवेने हबकलेली आणि कुणाच्याही खिजगणतीत नसलेली, अशी किती तरी सर्वसामान्य माणसेही प्रत्यक्षात त्यांना काहीही झालेले नसतानाही आपल्यातून निघून गेली असतील. अर्थात हे असेच कायम असणार नाही, माणूस त्याच्या विजिगीषू वृत्तीने या कोविडकाजळीवर पूर्ण मात करेल आणि हे जग पुन्हा एकदा पूर्वीसारखे होईल. पण तोपर्यंत तरी हे निरर्थकाच्या भोवऱ्याचे बळी आपल्याला पुन:पुन्हा अस्वस्थ करत राहणार आहेत.