02 July 2020

News Flash

जनाधाराची मस्ती

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये नेतान्याहू यांच्या लिकुडप्रणीत आघाडीला बहुमत मिळू शकते, असा अंदाज व्यक्त झाला होता.

सलग तिसऱ्यांदा बहुमतापासून दूरच राहून आणि गंभीर आरोपांची टांगती तलवार असूनही बेन्यामिन नेतान्याहूंचीच सत्ता इस्रायलवर कशी टिकते?

नेतान्याहू, ट्रम्प, जॉन्सन, पुतीन, बोल्सनारो किंवा एर्दोगान यांच्यासारखे नेते देशात आणि काही बाबतींत देशाबाहेर आपापल्या धोरणांमुळे विध्वंसक ठरू लागले असूनही त्यांच्या देशांमध्ये सशक्त पर्यायी विरोधकांचा रेटा त्यांना थोपवू शकत नाही..

करोना विषाणूविरोधी लढय़ातील अनेक उपायांचा एक भाग म्हणून हस्तांदोलनाऐवजी आता एकमेकांना भारतात रूढ असलेल्या ‘नमस्ते’द्वारे अभिवादन करावे, असे इस्रायली पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी नुकतेच इस्रायलमध्ये एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. हा वैश्विक ‘नमस्ते भ्रातृभाव’ डोनाल्ड ट्रम्प, नेतान्याहू, बोरिस जॉन्सन, नरेंद्र मोदी असे अनेक बिंदू जोडणारा ठरतो आहे. यांपैकी ट्रम्प, मोदी आणि नेतान्याहू हे तिघेही एकमेकांचे घनिष्ठ मित्र. फरक इतकाच, की ट्रम्प आणि मोदी यांना भरघोस जनाधार मिळालेला आहे, तसा तो नेतान्याहू यांना वर्षभरात तीन निवडणुका घेऊनही मिळवता आलेला नाही. पण तरीही त्यांचा उत्साह अजिबात ओसरलेला नाही. इस्रायली संसद किंवा क्नेसेटमध्ये बहुमतासाठी ६१ जागा मिळवण्यास ते जंगजंग पछाडत आहेत. त्यांना यंदाही संधी मिळणार नाही आणि इस्रायली जनतेला लवकरच चौथ्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल, ही शक्यताही दाट आहे. या सगळ्याच्या बरोबरीने आणखी एक संकट येऊ घातले आहे. इस्रायली पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले असून येत्या १७ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात होत आहे. म्हणजे येत्या काही दिवसांत दोन प्रमुख आव्हाने आहेत. मित्रपक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करायचे आणि आरोपी ठरवले जाण्यापासून अभय मिळावे यासाठी कायदा संमत करून आणायचा ही ती आव्हाने. यांपैकी काहीही साधले नाही, तर चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जायचे हा शेवटचा पर्याय. तो पर्याय नेतान्याहू यांच्या विरोधकांना अस्वस्थ करतो. कारण सततच्या निवडणुकांनी बहुतेकांचे आर्थिक गणित विस्कटून टाकले आहे. तरी नेतान्याहू मजेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मागील दोन निवडणुकांपेक्षाही या निवडणुकीत त्यांच्या मतांचा टक्का वधारलेला आहे. आपल्याला मत म्हणजे इस्रायलच्या सुरक्षेला, इस्रायलच्या प्रतिष्ठेला मत हे सूत्र निर्विवाद बहुमत मिळवून देत नसले, तरी सर्वाधिक जागा नक्कीच मिळवून देते याची खातरजमा झाल्याचे समाधान नेतान्याहू यांच्या चेहऱ्यावर दिसते. इस्रायलमधील मध्यममार्गी आणि डावे पक्ष त्या देशातील प्राधान्याने ग्रामीण आणि युवा मतदारांचा हा कल पाहून अस्वस्थ होतात.

इस्रायलमध्ये २ मार्च रोजी मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये नेतान्याहू यांच्या लिकुडप्रणीत आघाडीला बहुमत मिळू शकते, असा अंदाज व्यक्त झाला होता. पण गेल्या आठवडय़ात तेथील निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, लिकुड पक्षाला ३६ जागा मिळाल्या. प्रमुख विरोधी नेते बेनी गांत्झ यांच्या ब्लू अ‍ॅण्ड व्हाइट पक्षाला ३३ जागा मिळाल्या. पण १२० सदस्यीय क्नेसेटमध्ये लिकुडप्रणीत आघाडीला ५८ जागाच जिंकता आल्या, ज्या बहुमताच्या आकडय़ापेक्षा (६१) कमीच ठरतात. ‘बहुमत आमचेच. प्रचंड जनाधार मलाच मिळालेला आहे. तेव्हा विरोधकांनी या जनाधाराचा अवमान करू नये,’ असे नेतान्याहू वारंवार सांगत आहेत. त्यांचे विरोधक अशा प्रकारे जाहीर दंड थोपटत नाहीत. त्यांनीही सरकार बनवण्यासाठी जुळणी सुरू केली असली, तरी त्यांच्यात अंतर्विरोध भरपूर आहे, ज्याला नेतान्याहू आपली ताकद समजतात! उदाहरणार्थ, अरबांचे प्राबल्य असलेल्या जॉइन्ट लिस्ट या गटाने तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक १५ जागा जिंकल्या आहेत. या गटाची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी. त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास गांत्झ यांचे कडवे उजवे सहकारी पक्ष तयार नाहीत. नेतान्याहू यांच्या विरोधकांकडे अधिक जागा आहेत, पण त्यांची आघाडी विस्कळीत, विसविशीत आहे. याउलट नेतान्याहू यांची आघाडी एकसंध असली, तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. इस्रायली कायद्यानुसार, निव्वळ आरोप झाले म्हणून पंतप्रधानांनी पदत्याग करण्याची गरज नसते. नेतान्याहू यांनी धनाढय़ मंडळींकडून भेटी स्वीकारल्या, तसेच स्वत:ला ‘सकारात्मक प्रसिद्धी’ मिळावी यासाठी माध्यमसम्राटांना सढळ हस्ते मदत केली, असे गंभीर आरोप आहेत. मात्र हेच नेतान्याहू आता, देशातील न्यायव्यवस्था आणि माध्यमे आपल्या विरोधात उभी ठाकली असून त्यांना जनकौलाची चाड नाही, असे सांगत फिरतात! या सगळ्या व्यापक राष्ट्रीय कटातूनच इस्रायली प्रतिष्ठा आणि इस्रायली सुरक्षा धुळीला मिळाली, देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या असाही कांगावा नेतान्याहू करतात.

त्यांच्या या कांगाव्यास प्रतिसाद देणारा मोठा मतदार वर्ग इस्रायलमध्ये उपस्थित आहे. या वर्गाला नेतान्याहू यांच्याविरोधात खटला भरला जातो आहे याची पर्वा नाही. उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियातील यहुदींचा प्रचंड जनाधार नेतान्याहू यांच्या पाठीशी आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा नेतान्याहू यांच्या पक्षाला पावणेदोन लाख मते अधिक मिळाली. नेतान्याहू यांच्यावरील आरोपांबाबत विरोधकांनी मोठा गाजावाजा केला. मध्यंतरीच्या काळात अनेक राजकीय विश्लेषकांनाही नेतान्याहू संपले असेच वाटत होते. परंतु त्यांचे समर्थक मोठय़ा संख्येने मतदानाला उतरले. मोरोक्को, इजिप्त, लिबिया आणि इराकमधून आलेले ‘मिझरहीम’ यहुदी हे नेतान्याहू यांचे निष्ठावान समर्थक. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा विचार आणि या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न उदारमतवादी पक्षांनी वर्षांनुवर्षे केला. तरीही हा वर्ग लिकुड पक्षाशीच एकनिष्ठ राहिला. आमचे सामाजिक आणि आर्थिक उत्थान लिकुड पक्षामुळेच झाले, असा त्यांचा दावा. पश्चिम किनारपट्टी आणि गाझा पट्टीमध्ये इस्रायली वसाहती वाढण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा या मिझरहीम ज्यूंना झाला. कारण ते या भागातही मोठय़ा संख्येने आहेत. ‘राष्ट्रवाद चेतवण्या’चा प्रयोग यांच्याबाबतीत सर्वाधिक यशस्वी ठरतो, असा लिकुड नेतृत्वाला विश्वास आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात शांतता नांदण्यासाठी अमेरिकेने बनवलेल्या प्रस्तावाला सर्वात प्रथम मान्यता बेन्यामिन नेतान्याहू यांनी दिली, यात त्यांचा राजकीय हितसंबंध उघड आहे. इस्रायलव्याप्त पॅलेस्टाइनमधील अनेक ज्यू वसाहतींना या योजनेत मान्यता देण्यात आलेली आहे.

परंतु इस्रायली निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मध्यममार्गी, उदारमतवादी पण विस्कळीत विरोधकांचा मुद्दा चर्चेत येतोच. नेतान्याहू, ट्रम्प, जॉन्सन, पुतीन, बोल्सनारो किंवा एर्दोगान यांच्यासारखे नेते देशात आणि काही बाबतींत देशाबाहेर आपापल्या धोरणांमुळे विध्वंसक ठरू लागले आहेत. परंतु या सगळ्यांनाच त्यांच्या देशांमध्ये सशक्त पर्यायी विरोधकांचा रेटा थोपवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. एक देश, एक धर्म, एक वर्ण, एक वंश, एक भाषा यांचे श्रेष्ठत्व निर्माण करून ते वादातीत असल्याचा डंका ही सारी मंडळी पिटतात. त्यामुळे सर्वधर्म-सर्ववंश समभाव, धर्मनिरपेक्षता, विरोधी मतांचाही आदर हे मुद्दे यांना अडचणीचेच नव्हे, तर कटकटीचे वाटतात. जनाधार हे यांच्या मनमानीचे अधिष्ठान बनून जाते. अनेक समविचारी राष्ट्रप्रमुखांशी हातमिळवणी करतानाच स्वत:चा देश मात्र व्यापारी, आर्थिक, सांस्कृतिकदृष्टय़ा विलगच राहील, याकडे हे विशेष लक्ष देतात.

या नीतींमुळेच नेतान्याहू वरकरणी अडचणीत असल्यासारखे वाटत असले, तरी आपला जनाधार वाढत चाललेला आहे याविषयी ते आश्वस्त आहेत. हा जनाधार म्हणजे आपण घेतलेल्या निर्णयांना मिळालेली पावतीच असल्याचे धरून चालतात. ते सध्या सत्तेत राहिले किंवा नव्याने निवडणूक होऊन पुन्हा निवडून आले, तर हा टापू अस्थिर आणि खदखदलेलाच राहील. सुप्त वसाहतवाद आणि तुच्छतावादाची ही युती इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा आपलाच प्रदेश अस्थिर, अस्वस्थ आणि असंतुष्ट ठेवते हे नेतान्याहू यांच्यासारख्यांच्या गणतीत कधीही नसते. जनाधाराची ही मस्ती जगभर लोकशाही प्रक्रियेतूनच फोफावत आहे, ही आणखी एक शोकांतिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 12:29 am

Web Title: editorial page corona will fight the virus donald trump narendra modi political leaders akp 94
Next Stories
1 बिनचूक ब्रेख्त!
2 असहायांचा आनंदोत्सव
3 परीक्षेचा काळ
Just Now!
X