सरकारी परवानगी नव्हती तेव्हादेखील मुंबई तशीही जागीच असायची.. आता काही भागांना अधिकृत परवानगी मिळाली!

या महानगरात सर्व काही आलबेल असे नाही. किंबहुना त्यापासून आपण फार दूर आहोत. परंतु आपल्या नगरे-महानगरांनी आता एकूणच झोप कमी करायला हवी. सर्वार्थानेच आपण ‘जागे’ होण्याची आणि राहण्याची गरज आहे..

महानगरे झोपत नाहीत. म्हणून ती महानगरे असतात. दिवेलागणीपासून मंद होत जाणाऱ्या आणि उन्हे वर आल्यावर डोळे चोळत आळोखेपिळोखे देत जाग्या होणाऱ्या मानवी वस्त्यांना महानगरांचा दर्जा प्राप्त होऊ शकत नाही. ती पुढेमागे फार फार तर शहरे म्हणवून घेण्यास पात्र ठरू शकतील. पण महानगरे नाही. साधे पीएचडीधारी विद्वान आणि महामहोपाध्याय असा हा फरक आहे. महानगरांसाठी सदैव जागे राहणे हा ‘दुकान एक ते चार बंद’ अशी मानसिकता मिरवणाऱ्या विस्तारित खेडय़ांच्या दृष्टिकोनातून शाप भासू शकेल. पण तो तसा नाही. सदैव जागे असणे हेच महानगरांचे बलस्थान आहे. महानगराने दिवसाच्या कोणत्याही प्रहरात तसेच असायला हवे. जसे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवस कोणता आणि रात्र कोणती हे समजतदेखील नाही. एका अनामिक ऊर्जेतून सगळे व्यवहार होत असतात आणि त्या ऊर्जेची बाधा तेथे काही काळ घालवावा लागलेल्या प्रत्येकालाच होते. महानगरे अशी ऊर्जा उत्सर्जति करतात. आणि केवळ त्या महानगरांच्या ऊर्जेतूनच नव्हे तर त्याच्या परावíतत ऊर्जेतूनदेखील आसमंत उजळून निघत असतो. लंडन, न्यूयॉर्क, टोक्यो, सिंगापूर इतकेच काय तेल अविव वा इस्तंबूल वा दुबईसारख्या शहरांतूनही अशी महानगरी ऊर्जा पाझरत असते. ही महानगरे ‘दहा ते पाच’ वेळेत काम करणाऱ्या सरकारी कारकुनाप्रमाणे वागत नाहीत. ती २४ तास जागी असतात. त्याच नव्हे पण तशांतील काहींशी स्पर्धा करू पाहणाऱ्या मुंबई या आपल्या देशातील पहिल्या महानगरातील काही भागांस २४ तास जागे राहण्याची अधिकृत मुभा यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून दिली गेली. महानगरी मानसिकता बाळगणाऱ्या सर्वाकडून त्याचे स्वागत व्हावे.

याबाबत ‘अधिकृत मुभा’ असे म्हणायचे कारण सरकारी परवानगी नव्हती तेव्हादेखील मुंबई तशीही जागीच असायची. आता या शहरातील काही भागांना अधिकृतपणे २४ तास आपले व्यवहार सुरू ठेवता येतील. गेली दोन दशके आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने उद्योगांस व्यापले आहे. या क्षेत्रातील आपल्या कंपन्या परदेशी आस्थापनांसाठी काम करतात. आऊटसोìसग असे यास म्हटले जाते. अमेरिका वा युरोपातील अनेक देश आपल्या कंपन्यांकडून अशी कामे करून घेतात. त्यामुळे या कंपन्यांना मुंबईत असूनही त्या त्या देशांच्या घडय़ाळाप्रमाणे काम करावे लागते. अमेरिकेतील वॉशिंग्टन आपल्यापेक्षा १० तासांनी मागे असते तर सिएटल आणि मुंबई यांतील वेळेची तफावत सुमारे साडेतेरा तासांची असते. याचा अर्थ या कंपन्यांसाठी येथून सेवा देणाऱ्या अनेकांना रात्रीचा दिवस करूनच काम करावे लागते. हा जागतिकीकरणाचा परिणाम. तो एकदा मान्य केला की दिवस आणि रात्र यांतील सीमा पुसल्या जातात. त्यामुळे त्या स्थानिक पातळीवरही पुसल्या जाणे आवश्यक होते. मुंबईसंदर्भातल्या ताज्या निर्णयामुळे यास सुरुवात होईल, असे मानण्यास जागा आहे.

हा निर्णय संपूर्ण मुंबईसाठी अद्याप नाही. यामागील कारण प्रत्यक्ष सोयीसुविधांचा अभाव हे जसे आहे तसेच ते सांस्कृतिकदेखील आहे. कारण शहर २४ तास सुरू ठेवण्याच्या मागणीचा संबंध मर्यादित सांस्कृतिक जाणिवांमुळे उगाचच मद्य आणि त्यापुढील काही उपभोग्य वस्तूंशी जोडला गेला आहे. जणू काही दुकाने २४ तास सुरू ठेवण्याच्या मागणीमागे केवळ मद्यपी आणि हे भोगवादीच आहेत. वस्तुस्थिती अजिबात तशी नाही. शहरे २४ तास कार्यरत असण्याचे अन्य अनेक आर्थिक फायदे आहेत. उदाहरणार्थ त्यामुळे २४ तास सुरू राहणाऱ्या दुकानांस अधिक कर्मचारी नेमावे लागतील, सार्वजनिक वाहतूक सेवा रात्रभर सुरू राहिल्यास वाहक/चालकादी रोजगारासह या सेवांच्या महसुलात वाढ होऊ शकेल आणि ऊर्जेचीदेखील मागणी अधिक वाढून अर्थव्यवस्थेसाठी ते उपयोगी ठरेल. मुंबईच्या बेस्ट सेवेने असा रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला हे योग्य झाले. प्रवासी आहेत मग प्रवास सेवा का नको? याखेरीज आताही मुंबई शहरातील अनेक पुलांखाली/ रेल्वे स्थानकानजीक रात्रभर खानपान सेवा देणारे आहेत. पण ते अनधिकृत. ते ही सेवा देतात याचे कारण अशा सेवेस मागणी आहे म्हणून. रात्री-अपरात्री पोटास चार घास हवे असणाऱ्यांची संख्या मोठी असेल तर ती सेवा देणारेही असायला हवेत. ते आपल्याकडे नव्हते. कारण रात्रभर दुकाने वा खाद्यान्नगृहे अधिकृतपणे सुरू ठेवणे आपणास मान्य नव्हते.

हे असे खऱ्या गरजांकडे डोळेझाक करणे हे आपल्यासारख्या दांभिक समाजाचे व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था वा महिलांची सुरक्षा अशी बाळबोध कारणे देत आपण हा निर्णय पुढे ढकलत राहिलो. ही सामाजिक लबाडीच. आपल्याकडे गुन्हे काय फक्त रात्रीच घडतात की काय? आणि महिलांबाबत आपला सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेतला तर दिवसाढवळ्यादेखील पुरुषांवर अनेक निर्बंध लादावे लागतील. त्यामुळे उगाच रात्रीस बदनाम करण्याचे कारण नाही. तक्रारच करावयाची तर आपण अंधाराबाबत करायला हवी. पण मुंबईस अधिकृतपणे २४ तास काम करण्याची मुभा दिली तर या अंधाराचे प्रमाणदेखील कमी होईल. आज जगातील कोणत्याही खऱ्या महानगरास मध्यरात्रोत्तर भेट दिल्यास याचा प्रत्यय येईल. विशिष्ट वेळमर्यादेनंतर आस्थापने बंद करावयाची आहेत या कल्पनेत भौतिक अंधाराचे मूळ आहे. मध्यरात्री तीन वाजताही दुपारच्या तिनाप्रमाणे वर्दळीची हमी असेल तर अंधारावर प्रकाशाचा वचक राहील. तेव्हा मुंबई २४ तास सुरू ठेवण्याच्या निर्णयास या मुद्दय़ांवर आधारित विरोध करणे योग्य नाही.

याचा अर्थ या महानगरात सर्व काही आलबेल असे नाही. किंबहुना त्यापासून आपण फार दूर आहोत. दिवसाच्या आहे त्या प्रहरात काम करण्यासाठी पुरेसे पोलीस या शहरात नाहीत आणि रात्री वाहने नाहीत तरीही वाहतूक सिग्नल पाळायला हवेत इतके प्रगल्भ नागरिक नाहीत. तेव्हा या आघाडय़ांवर सरकारला अधिक खर्च करावा लागेल. त्याची तयारी हवी. लंडनच्या मध्यवर्ती भागांत खासगी वाहनाने गेल्यास अधिक पैसे मोजावे लागतात. कारण त्या परिसरातील भौतिक सोयीसुविधांवरील ताण वाढतो. अशा प्रकारचा कर मुंबईत लावण्यासंदर्भात महापालिका वा सरकारला विचार करावा लागेल. अनेक ऐतिहासिक शहरांत रात्रीच्या वेळी पायी पर्यटनास उत्तेजन दिले जाते. ब्रिटिशांच्या दूरदृष्टीमुळे या मुंबई शहरातही अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. तेथे अशा प्रकारच्या अभ्यासू पर्यटनास उत्तेजन देता येईल. लंडनादी काही शहरांत कार्यालयीन वेळेनंतर वस्तुसंग्रहालये आदींच्या शुल्कात मोठी सवलत दिली जाते. त्यामुळे पर्यटक अशा वेळी अधिक संख्येने या स्थळांना भेटी देतात. मुंबईतही असे काही नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची गरज आहे. ते निश्चितच यशस्वी ठरतील. त्यामुळे जागे राहण्याची प्रेरणा अन्य शहरांनाही मिळेल.

त्याची गरज आहे. खरे तर आपल्या नगरे-महानगरांनी आता एकूणच झोप कमी करायला हवी. सर्वार्थानेच आपण ‘जागे’ होण्याची गरज आहे. ठिकठिकाणच्या शाहीनबागा या जागेपणाची गरजच अधोरेखित करतात. तेव्हा मुंबई जागी राहणार असेल तर ते योग्यच. आपल्या देशातील या एकमेव महानगराने झोपताच नये. कबीरदेखील ‘शून्य गढम् शहर’ लिहिताना ‘कोण सुता कोण जागे है’ विचारतो. मुंबई अर्थातच अशी ‘शून्य गढम्’ नाही. पण ‘इस नगरी के दस दरवाजे’ हे वास्तव लक्षात घेतल्यास ‘तन सोता ब्रह्म जागे है’ ही अवस्था यायला हवी.