गृहमंत्री नोकरशाहीशी नीट वागत नाहीत, म्हणून सचिवाने राजीनामा देऊन मंत्र्यांविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी करणे, हे ब्रिटिश पद्धतीत घडू शकते..

त्या देशात मंत्र्यांसाठी आचारसंहिता असते. ती न पाळल्याचा आरोप सिद्ध झाल्यास प्रीती पटेल यांना पद सोडावे लागेल. मात्र ‘एक उत्साही मंत्री’ अशी त्यांची भलामण तेथील पंतप्रधान करीत आहेत..

सत्ताधारी शहांपुढे मान तुकवणे हे नोकरशहांचे काम नाही. तर बेबंदपणे वागू पाहणाऱ्या मंत्र्याच्या नाकात नियमांची वेसण घालून त्यांना उधळण्यापासून रोखणे हे खऱ्या नोकरशहाचे कर्तव्य. त्यासाठी नोकरशहाने सत्ताधाऱ्यांच्या मर्जीची फिकीर करायची नसते. कारण मंत्रिपदावरील व्यक्ती येतात/जातात. पण नोकरशहा कायम असतो. म्हणून त्याची जबाबदारी अधिक. आपल्याकडे अशा प्रकारच्या नि:स्पृह नोकरशहांचा अनुभव काळाच्या ओघात आकसत गेला असला तरी ज्या देशातील व्यवस्थेवर आपण आपली प्रशासकीय व्यवस्था बेतून घेतली त्या ग्रेट ब्रिटन या देशातील नोकरशाहीने मात्र आपला पीळ कायम राखला असून त्याचा प्रत्यय पंतप्रधान बोरिस जॉन्सन मंत्रिमंडळातील गृहमंत्री प्रीती पटेल यांना सध्या येत आहे. यात खुद्द पंतप्रधान जॉन्सन यांनी पटेल यांची बाजू घेऊन जे झाले त्याचे खापर अधिकाऱ्याच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करून पाहिला. तो अंगाशी आल्याने आता प्रीती पटेल यांचेच मंत्रिपद धोक्यात आल्याचे मानले जाते. आपल्याकडे ‘कार्यक्षम’ मंत्री नोकरशाहीस बोल लावण्यात धन्यता मानतात. ‘या पाश्चात्त्य नोकरशाहीमुळेच प्रगतीत अडथळा येतो,’ असे मानणारी आणि ‘नोकरशहांना सरळ करण्याची’ भाषा तर अलीकडे सर्रास कानी येते. अशा वेळी आपण ज्यांचे अनुकरण केले म्हणून स्वत:स दोष देतो त्या ब्रिटनमधील नोकरशाही आजही कशी आहे, ते समजून घेणे आवश्यक ठरते.

याचे कारण प्रीती पटेल यांच्या गृह खात्यातील माजी सर्वोच्च अधिकाऱ्यानेच पटेल यांच्याविरोधात न्यायालयात खटला गुदरण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याच्या या कृत्याने त्या देशात चांगलीच खळबळ माजली आहे. सर फिलिप रत्नॅम हे ब्रिटिश गृहखात्यातील कायम सचिव. त्या त्या खात्यातील ज्येष्ठतम अधिकाऱ्यास कायम सचिव केले जाण्याची प्रथा त्या देशात आहे. म्हणजे सरकारबदल झाला तरी बदललेल्या सत्ताधारी पक्षानुसार या पदावरील व्यक्तींना बदलले जात नाही. या पदावरील व्यक्ती या बिगरराजकीय मानल्या जातात आणि त्या थेट संसदेस उत्तरदायी असतात. अशा या महत्त्वाच्या पदावरील सर फिलिप यांनी शनिवारी राजीनामा दिला. इतकेच नव्हे तर गृहमंत्री पटेल यांच्या विरोधात न्यायालयीन मार्गाने कारवाई करण्याची प्रक्रियाही त्यांनी सुरू केली. ‘‘पटेल यांची कार्यशैली अत्यंत हडेलहप्पी असून त्यांच्या अशा वागण्याने कर्मचारी त्यांना अकारण घाबरून असतात आणि त्याचा एकंदर व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो,’’ असा थेट आरोप प्रीती पटेल यांच्यावर सर फिलिप यांनी केला. पटेल या आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना घालून पाडून बोलतात आणि त्यांची आरडाओरड तर नित्याचीच, असे त्यांचे म्हणणे. परिणामी गृहखात्यातील कर्मचाऱ्यांचे नैतिक खच्चीकरण होत असून त्याबाबत केवळ बघ्याची भूमिका घेत बसून राहणे हे रास्त नाही असे सर फिलिप यांना वाटले आणि त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याआधी मंत्रिमंडळ सचिवापर्यंत हा मुद्दा त्यांनी नेला. मंत्रिमंडळ सचिव हा सर्वोच्च नोकरशहा. त्यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केल्यावर पटेल यांनी हा आरोप अव्हेरला. पण त्यांच्या कार्यशैलीत काहीही सुधारणा दिसली नाही. उलट त्यांच्या अरेरावी वृत्तीत वाढच झाल्याचे आढळले.

त्यामुळे सर फिलिप यांनी अखेर पदत्याग केला. पण त्यांच्या पदत्यागापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे ती त्यांची पटेल यांच्यावर खटला भरण्याची कृती. सरकारी कर्मचाऱ्यांचा अपमान, त्यांचे नैतिक खच्चीकरण आदी कारणांसाठी पटेल यांना आरोपी करण्यात आले आहे. नोकरशहाने त्याच्या खात्याच्या मंत्र्यास न्यायालयात खेचणे ही बाब अभूतपूर्व खरीच. त्यातील महत्त्वाचा मुद्दा असा की सर फिलिप यांच्या आरोपांत तथ्य असल्याचे आढळल्यास प्रीती पटेल यांना राजीनामा द्यावा लागेल. ही शक्यता अगदीच काल्पनिक नाही, असे लंडनस्थित अनेक विधिज्ञांचे मत. ‘‘आपल्या खात्यातील ३५ हजार कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण ही माझी जबाबदारी. पण मंत्र्याच्या वर्तनाने ती पार पाडण्यात अडथळा येत असेल तर तो निश्चितच गुन्हा ठरतो,’’ असे सर फिलिप यांचे म्हणणे. पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्या गृहमंत्र्यांची तरफदारी करण्याचा प्रयत्न केला. पण तो पूर्ण यशस्वी ठरला असे मानता येणारे नाही. ‘‘पटेल या मोठय़ा उत्साही मंत्री आहेत,’’ हे जॉन्सन यांचे मत. पण पटेल यांना उत्साह आणि अतिरेक यांतील फरक समजत नसावा अशी टीका त्यांच्यावर सुरू आहे.

याचे कारण त्यांचा राजकीय इतिहास. त्यास अभिमानास्पद मानणे अतिरेकी आशावाद्यांसदेखील जमू शकणार नाही. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या पटेल यांना आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी नियमांचा वळसा घालण्यात काही गर वाटत नाही. त्यामुळे या आधीही त्यांना अनेकदा वादळांस तोंड द्यावे लागले आहे. जनसंपर्क व्यवसायातून राजकारणाकडे वळलेल्या पटेल तंबाखू आणि मद्यकंपन्यांशी असलेल्या संबंधांबाबत टीकेच्या धनी झाल्या होत्या. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने पटेल यांच्या अनेक उद्योगांना वाचा फोडली. हुजूर पक्षातून राजकारणात येऊ पाहणाऱ्या पटेल यांना डेव्हिड कॅमेरून यांनी हेरले आणि त्या खासदार बनल्या. स्वत: भारतीय/अफ्रिकी स्थलांतरित घराण्यातील असणाऱ्या पटेल यांचा ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरित आणि निर्वासितांना कडवा विरोध. त्याचमुळे त्या ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडावे यासाठी प्रचारक होत्या. त्यातूनच ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर पंतप्रधान कॅमेरून यांची चांगलीच शोभा झाली. त्यांना पायउतार व्हावे लागल्यावर पटेल यांनी थेरेसा मे यांचा पदर धरला. मे यांनीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. पण म्हणून त्यांना पदाचे गांभीर्य आले असे नाही. मे या इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना अधिकृतपणे भेटणार असताना त्याआधी पटेल यांनी यहुदी देशात जाऊन इस्रायली नेत्यांशी गुप्त चर्चा केली. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी आपल्या पंतप्रधान मे यांना या भेटीबाबत अंधारात ठेवले. बीबीसी या वृत्तवाहिनीने पटेल यांच्या या उद्योगांचे बिंग फोडले. परिणाम मे यांच्यासमोर पटेल यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याखेरीज अन्य पर्यायच राहिला नाही. मध्यंतरी या पटेल भारतात आल्या होत्या आणि त्या वेळी गुजरातेत त्यांचे जंगी स्वागत, सत्कार झाले. ही बहुधा त्यांनी बीबीसी वाहिनीशी नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वृत्तांकनाबाबत दिलेल्या लढाईची बक्षिशी असावी. २०१४ सालच्या निवडणूक काळात बीबीसी मोदींवर अन्याय करीत असल्याचे पटेल यांना वाटत होते. मोदी यांची सकारात्मक बाजू दाखवावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. आता या प्रीती पटेल नकारात्मक वर्तनासाठी टीकेच्या धनी झाल्या आहेत. त्या देशात मंत्र्यांसाठी आचारसंहिता असते. पटेल यांनी आपल्या वर्तनाने या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगाने न्यायालयात तक्रार करण्याचा सर फिलिप यांचा इरादा आहे.

या निमित्ताने तेथे जॉन्सन सरकारच्या कार्यशैलीचीदेखील चर्चा सुरू झाली आहे. जॉन्सन यांना स्वत:ला व्यवस्थेविषयी आदर नाही. त्याचमुळे त्यांचे मंत्रीही तसेच वागतात असा आरोप होतो. अगदी अलीकडेच जॉन्सन यांचे अर्थमंत्री साजिद जावेद यांनी पदत्याग केला. त्यांचे आणि जॉन्सन यांचे पटले नाही. त्या वादातून सरकार पूर्ण बाहेर यायच्या आधीच प्रीती पटेल यांनी सरकारला नव्या संकटात लोटले. त्यांचे हे वर्तन पटण्यासारखे निश्चितच नाही. त्याबाबतच्या न्यायालयीन लढाईत पटेल दोषी ठरल्या तर व्यवस्थेपेक्षा स्वत:स मोठे मानणाऱ्या नेत्यांसाठी तो धडा ठरेल.