कोणत्याही साथीच्या आजारास केवळ वैद्यकीय वा शारीरिक इतकेच परिमाण नसते; ते प्राधान्याने आर्थिकही असते. सद्य:स्थितीत करोना साथीसही ते आहे..

आतापर्यंत करोनाचे तीन रुग्ण केरळात आढळले आहेत. सामाजिक वैद्यक क्षेत्रात आघाडीवर असलेले हे राज्य या नव्या साथीचा मुकाबला करेलच करेल. पण तोपर्यंत या आजाराच्या विषाणूने उत्तर प्रदेश वा बिहार यांसारख्या सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता यांचा दूरान्वयानेही संबंध नसलेल्या राज्यांत हातपाय पसरले तर काय, हा प्रश्न आहे..

करोना विषाणूजन्य आजाराची वस्तुस्थिती दडपण्याचे प्रयत्न चीनने सोडल्यानंतर या आजारसाथीचे गांभीर्य समोर येताना दिसते. आधी ही साथ २००३ साली आलेल्या सार्स (सीव्हीअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी सीण्ड्रोम) आजाराइतकी भयानक नाही असे मानले गेले. निदान तसे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. त्या साथीत चीनमध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक जणांचे प्राण गेले. पण ताज्या करोना विषाणूचे बळी त्यापेक्षा अधिक झाले असून या आजार प्रसारात खंड पडण्याची चिन्हे नाहीत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात जेव्हा अशा काही साथीच्या आजाराची चाहूल लागली, त्या वेळी या आजाराने ग्रासलेल्यांची संख्या २८२ इतकी होती आणि वुहान प्रांतापुरतीच तिची लागण होती. पण फेब्रुवारीच्या सुरुवातीला, म्हणजे अवघ्या दहा दिवसांत, या आजाराने आडवे पडलेल्यांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक आहे आणि तो आजार वुहानबरोबरीने अन्य १९ प्रांतांत पसरलेला आहे. चीनबाहेरही डझनभर देशांत या आजाराची लागण झाल्याचे दिसते. फिलिपाइन्स आणि हाँगकाँग या दोन प्रांतांनी चीनबाहेरचे पहिले दोन बळी नोंदवले. भारतातील केरळात किमान तीन जणांना याची बाधा झाल्याचे दिसून येते. अशा नव्या आजाराची साथ रोखण्यात बऱ्याच अडचणी येतात.

उदाहरणार्थ हा आजार नक्की कशामुळे आणि का होतो आहे, हे समजून घेण्यात बराच काळ जातो. याचे कारण अशा आजारांत पहिल्यांदा बळी पडणारे हे त्या साथीचेच आहेत हे लक्षात येत नाही. बऱ्याचदा त्यांना अन्य काही आजार असतात आणि खचलेल्या प्रतिकारशक्तीमुळे नवे विषाणू त्यांना गाठतात. वुहान प्रांतातच हा आजार उपटला याची काही कारणे आहेत किंवा काय, याचाही तपास सुरू होता. पण हे सर्व काही कळायच्या आता तो इतक्या झपाटय़ाने पसरला की, तो वेग पाहून विज्ञान/वैद्यकीय जगदेखील सर्द झाले. या आजाराची म्हणून प्रसाराची एक वेगळी शैली दिसून आली. सर्वसाधारणपणे अन्य साथीचा प्रसार तिची लागण झालेल्यांकडून होतो. म्हणजे या विषाणूंची बाधा होऊन जे आजारी पडले आहेत त्यांच्याकडून साथीच्या आजाराचा प्रसार होतो. पण या आजारात तसे झालेले दिसत नाही. वरकरणी निरोगी दिसणारेही या आजाराचे वाहक ठरले. त्यामुळे त्यास रोखणे अधिकाधिक अवघड होत गेले. तसेच हवेतील आद्र्रता कणांवर स्वार होऊन किंवा धूलिकणांस चिकटून साथीच्या आजारांचे विषाणू पसरतात. पण या विषाणूने प्रसारासाठी अन्य काही नवीन माध्यमेही निवडल्याचे दिसते. ही ‘अनंत हस्ते’ पसरण्याची त्याची क्षमता त्यास रोखण्यास प्रतिबंध करते. ते लक्षात घेतल्यास, सांगितले जाते त्याच्या किती तरी पट व्यक्तींना या नव्या विषाणूची बाधा झालेली असावी. आतापर्यंतची आकडेवारी दर्शवते की, एकूण बाधा झालेल्यांपैकी साधारण दोन टक्के रुग्ण यात प्राण सोडतात. हे झाले चीनचे चीनपुरते. पण याच प्रमाणात अन्यत्र बळी जाणार असतील, तर मृतांची संख्या वाढण्याचा धोका संभवतो.

तो अधिक वाढला याचे कारण सुरुवातीस या आजारास दडपण्याचे चीनचे प्रयत्न. या आजाराची साथ म्हणजे जणू काही राजकीय चळवळच आहे असे मानून चीनने तीस प्रतिबंध करायचा प्रयत्न केला. म्हणजे सुरुवातीला या आजाराच्या बातम्या दडपल्या आणि कोणत्याही प्रकारे कसल्या आजाराची साथ आहे हेच नाकारले. नंतर साथ असल्याचे सरकारने कबूल केले, पण त्यास हाताळण्याच्या पद्धतीवरून माओंच्या काळातील सांस्कृतिक क्रांतीची आठवण करून दिली. शहरेच्या शहरे अधिकाऱ्यांनी कोंडली आणि त्यातून सरकारने घरांचे रूपांतर कोंडवाडय़ांत केले. वुहान आणि आसपासच्या प्रांतांची पूर्ण नाकाबंदी केली गेली. कोणास या प्रांतात जाता येईना आणि जे गेलेले आहेत त्यांना बाहेर पडता येईना. जगात अशा प्रकारे साथ आटोक्यात आल्याचे एकही उदाहरण नाही. या काळात या विषाणूंची जनुकीय रचना शोधून दाखवण्यात चिनी वैद्यक संशोधकांना यश आले खरे. पण या आजारास रोखण्याची कोणतीही लस मात्र त्यांना तयार करता आली नाही. कारण अशा लशीच्या निर्मितीसाठी किमान सहा महिने ते वर्ष असा कालावधी गरजेचा असतो.

कोणत्याही साथीच्या आजारास केवळ वैद्यकीय वा शारीरिक इतकेच परिमाण नसते. ते प्राधान्याने आर्थिकही असते. चीनबाबत ते अधिक लागू पडते. या साथीच्या आजाराची बातमी फुटली त्या दिवशी वुहान प्रांतातील भांडवली बाजार कोसळला. साथीची खातरजमा होण्याआधी चीनच्या आर्थिक प्रगतीचा दर जेमतेम सहा टक्के इतका होता. त्यात या विषाणूने किमान दोन टक्क्यांनी घट केल्याचे दिसते. हे नुकसान केवळ चीनपुरतेच मर्यादित नाही. साऱ्या जगास त्याचा फटका बसणार आहे. दशकभरापूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा वाटा जेमतेम दोन ते तीन टक्के होता. आज तो १६ टक्के इतका आहे. जागतिक औद्योगिक उत्पादनांतील एकपंचमांश वाटा चीनचा असतो. अनेक देशांत चिनी यंत्रसामग्री वा औद्योगिक उत्पादनांची निर्यात होत असते. हे सर्व गेल्या काही आठवडय़ांपासून ठप्प वा मंद झाले आहे. तसेच चिनी पर्यटक हा अनेक देशांतील पर्यटन उद्योगांचा आधारस्तंभ असतो. पण चीन सरकारने आपल्या नागरिकांना देश सोडण्यास मनाई केली आहे. म्हणजे अनेक देशांच्या पर्यटनाचे बारा वाजणार, हे उघड आहे. याच्या जोडीला अनेक कंपन्यांनी चीनमधील आपापले उद्योग तात्पुरते बंद केलेत. यात ‘स्टारबक्स’सारख्या कॉफी साखळीगृहांचाही समावेश आहे. या सगळ्यांचा अर्थ इतकाच की, या विषाणूमुळे होणारे आर्थिक नुकसानही मोठे असेल. म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.

अशा वेळी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी विमानतळांवर वैद्यकीय तुकडय़ा तनात केल्या जातात. चित्रविचित्र गणवेश आणि हाती तशीच चित्रविचित्र अस्त्रे यांसह प्रवाशांची तपासणी करणाऱ्या पथकांमुळे आजाराची साथ रोखण्यात काहीही उपयोग होत नाही; पण प्रदर्शन तेवढे होते, असे वैद्यकतज्ज्ञांचे मत. भारतापुरते तरी ते रास्त ठरल्याचे दिसते. याचे कारण सीमेवरील कडेकोट गस्तीनंतरही चीनमधील या विषाणूने ‘देवभूमी’ केरळात सुखेनव वास्तव्य केल्याचे दिसते. त्या आजाराचे तीन रुग्ण आढळल्यानंतर केरळ सरकारने वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली असून ही साथ रोखण्यावर सर्व सरकारी लक्ष केंद्रित केले आहे. तथापि प्रश्न केरळचा नाही. कारण सामाजिक वैद्यक क्षेत्रात आघाडीवर असलेले हे राज्य नव्या साथीचा मुकाबला करेलच करेल. पण तोपर्यंत या आजाराच्या विषाणूने उत्तर प्रदेश वा बिहार यांसारख्या सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता यांचा दूरान्वयानेही संबंध नसलेल्या राज्यांत हातपाय पसरले तर काय, हा खरा प्रश्न आहे. जागतिक पातळीवर तज्ज्ञांना जी चिंता आफ्रिकी देशांबाबत आहे, ती आपल्याला दाट लोकवस्तीच्या राज्यांबाबत असायला हवी.

याचे कारण अशा प्रकारच्या साथीच्या आजारांची बाधा जर भारतासही झाली तर ते आपणास वैद्यक आणि आर्थिक अशा दोन्ही अंगांनी परवडणारे नाही. एरवी चीनशी स्पर्धा करू पाहणारे आपण या मुद्दय़ावर मात्र चीनचे ‘अनुकरण’ करताना दिसता नये. हे ‘मेड इन चायना’ उत्पादन चार हात लांबच राहील यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आताच सुरू करायला हवेत.