निक्सन, फोर्ड, रेगन, धाकटे जॉर्ज बुश या अमेरिकी अध्यक्षांच्या काळात सत्तावर्तुळात असलेल्या रम्सफेल्ड यांचा ‘बेडर’पणा, ‘धडाडी’ हे अंतिमत: त्रासदायकच ठरले… 

ज्या युद्धात अमेरिकेने ४,५०० जीव आणि ७०,००० कोटी डॉलर्स अकारण गमावले; त्यासाठी खंत नावाच्या भावनेचा लवलेशही शेवटपर्यंत रम्सफेल्ड यांना नव्हता…

लष्करी कारकीर्द असलेले राजकीय जबाबदारीच्या पदांवर बसले की केवळ युद्धखोरी वाढते. समोरच्याचा खातमा करणे, किमान त्यास धडा शिकवणे या परते अन्य काही या मंडळींस सुचत नाही. कर्तृत्व म्हणजे केवळ मनगटातील शक्ती असाच यांतील अनेकांचा समज. अशांविषयी आइन्स्टाईन याचे काय मत होते याकडे दुर्लक्ष केले तरीही या लष्करी-सेवोत्तर राजकारण्यांचा कार्यानुभव हा रक्तरंजित असल्याचे जगातील अनेक अनुभवांतून दिसून येते. याचे देदीप्यमान उदाहरण म्हणजे डोनाल्ड रम्सफेल्ड. अमेरिकेच्या या माजी संरक्षणमंत्र्याचे गुरुवारी निधन झाले. जगात सर्वाधिक भ्रष्ट गणल्या जातात अशा दोन क्षेत्रांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. लष्करी सामग्री उत्पादन आणि आरोग्य/ औषधनिर्मिती ही ती दोन क्षेत्रे. अविश्वसनीय वाटावी अशा प्रचंड आर्थिक आणि लष्करी ताकदीस बेमुर्वतखोरीची जोड मिळाल्यास काय होऊ शकते याचे रम्सफेल्ड हे उत्तम उदाहरण. शीतयुद्धातील लष्करी अतिरेकापासून हे शीतयुद्ध संपल्यानंतरच्या लष्करी बळजबरीपर्यंत अमेरिकेच्या प्रत्येक दु:साहसाशी त्यांचा संबंध होता. याचा अंतिम हिशेब आता मांडणे समयोचित ठरेल.

बऱ्याच खंडानंतरही संरक्षणमंत्रिपदी बसवली गेलेली दुसरी अन्य व्यक्ती अमेरिकेच्या इतिहासात नाही. याचा अर्थ असा की युद्धाची खुमखुमी आली की अमेरिकी अध्यक्षांनी रम्सफेल्ड यांना जवळ केले. त्यांचा याबाबतचा उत्साह इतका दांडगा होता की त्यासाठी विधिनिषेधशून्यता ही बाब त्यांना अगदीच य:कश्चित वाटे. उदाहरणार्थ ऐंशीच्या दशकात अमेरिकेच्या अध्यक्षपदी रोनाल्ड रेगन असताना रम्सफेल्ड यांची कृती. ते दशक ओळखले जाते इराण आणि इराक यांच्यातील युद्धासाठी. त्यात अमेरिकेची भूमिका नेहमीप्रमाणे वादग्रस्त होती. इराणचे अयातोल्ला खोमेनी आणि इराकचे सद्दाम हुसेन या दोघांनाही अमेरिका लष्करी सामग्री पुरवत होता. जो जिंकेल तो आपला, हे अमेरिकेचे धोरण. त्या युद्धात सद्दाम हुसेन यांच्या हाती जैविक अस्त्रे सोपविण्याची ‘ऐतिहासिक’ जबाबदारी हाताळण्यासाठी रेगन यांना योग्य वाटले ते रम्सफेल्ड. हा गृहस्थ इतका ‘धडाडी’चा की ऐन युद्धात त्यांनी थेट बगदाद येथे जाऊन, जाहीर कार्यक्रमात सद्दाम यांच्या हाती जैविक अस्त्रांचा पहिला हप्ता समारंभपूर्वक सोपवला.

आणि त्यानंतर जवळपास दोन दशकांनी त्याच सद्दाम हुसेन याच्याकडे सामुदायिक संहार करतील अशी भयानक अस्त्रे आहेत असे सांगत त्याच्या विरोधात युद्ध छेडण्याचा निर्लज्जपणाही त्याच रम्सफेल्ड यांनी तितक्याच उत्साहाने केला. यात फरक इतकाच की या वेळी ते अमेरिकेचे अध्यक्ष धाकट्या जॉर्ज बुश यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. त्यामुळे आपली युद्ध खुमखुमी त्यांना दाखवण्यास या वेळी पूर्ण वाव मिळाला. या वेळी ते सद्दाम विरोधात युद्ध का? तर २००१ साली झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात आहे, असे अमेरिकेस वाटले म्हणून. वास्तविक तो हल्ला रचला ओसामा बिन लादेन याच्या अल कईदा या संघटनेने. ती अत्यंत मागास संघटना. तिच्याशी पुरोगामी सद्दामचा (त्याच्या इराकमध्ये महिलांना शिक्षण मोफत दिले जात होते आणि त्यांना बुरखा नव्हता) काडीचाही संबंध नाही. पण या हल्ल्यानंतर केलेल्या अफगाण कारवाईत काहीही फारसे हाती न लागल्यामुळे कोणाला तरी ठार केल्याखेरीज अमेरिकेची भावनिक गरज भागणार नव्हती. त्यासाठी योग्य लक्ष्य म्हणजे सद्दाम. असेही इराकात तेल उपसणाऱ्या अमेरिकी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून सद्दामने अमेरिकेचा रोष ओढवून घेतलाच होता. त्यामुळे सत्यासत्याचा अजिबात विचार  न करता रम्सफेल्ड यांनी इराकविरोधात युद्ध छेडले. हे हिंदी चित्रपटातल्या राजकारण्यासारखे झाले. आधी एखाद्या गुंडास पोसायचे आणि तो डोईजड झाल्यावर त्यास संपवायचे. यातील वेगळेपण म्हणजे या युद्धात अमेरिकेने ४५०० जीव आणि ७०,००० कोटी डॉलर्स अकारण गमावले.

त्यासाठी खंत नावाच्या भावनेचा लवलेशही शेवटपर्यंत रम्सफेल्ड यांना नव्हता. १९७५ साली  कामचलाऊ अध्यक्ष फोर्ड यांच्या काळात जेमतेम दोन वर्षे आणि २००१ पासून सलग सहा वर्षे धाकट्या जॉर्ज बुश यांचे संरक्षणमंत्रिपद रम्सफेल्ड यांनी सांभाळले. निक्सन यांच्या काळातही ते सत्तावर्तुळात होते. त्यांच्या काळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निक्सन यांनी धडाडीच्या रम्सफेल्ड यांना दिल्या. पण वॉटरगेट प्रकरण उघडकीस आले तेव्हा त्यांची नियुक्ती युरोपात ब्रसेल्स येथे नाटो कार्यालयात होती. त्यामुळे ते वाचले. निक्सन यांच्या अन्य साथीदारांसारखी त्यांची गत झाली नाही. निक्सन यांच्या जागी आलेले फोर्ड यांनी त्यांना वॉशिंग्टनला माघारी बोलावून संरक्षणमंत्री केले. पण पुढच्या निवडणुकीत फोर्ड काही जिंकले नाहीत. जिमी कार्टर अध्यक्षपदी आले. सुमारे दीड दशकानंतर -तेवढाच काळ काय ते रम्सफेल्ड सत्तेबाहेर राहिले- पण कार्टर यांना पराभूत करून सत्तेवर आलेल्या साहसवादी रोनाल्ड रेगन यांनी रम्सफेल्ड यांना बोलावून घेतले आणि महत्त्वाची संरक्षण सल्लागाराची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. इराण-इराक युद्धाचा हाच तो काळ. त्यात रम्सफेल्ड यांनी दुसऱ्याच्या जिवावर आपली युद्धकामना मनमुराद पूर्ण केली.

उरलीसुरली ती धाकट्या बुश यांच्या काळात त्यांना भागवता आली. ९/११ घडले त्या वेळी ते पेंटागॉनच्या कार्यालयात होते. विमानांच्या धडकेने वर्ल्डट्रेड सेंटर कोसळले तेव्हा आपले संरक्षणमंत्रिपद विसरून हा गडी मैदानात मदतीला उतरला. अनेक जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याच्या कामात त्यांनी स्वयंसेवकगिरी केली. त्यांच्यातील माणुसकीचा इतकाच काय तो पुरावा. पुढे अफगाणिस्तान आणि इराक यातील दोन्ही लष्करी कारवाया त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि दोन्हीतही अमेरिकेचे चांगलेच हात पोळले. सद्दामला मारता आले हेच तेवढे यश. पण या दोन्ही ठिकाणी अमेरिकेचा अंदाज साफ चुकला. अफगाणिस्तानात कामगिरी फत्ते करून आपण आठवडाभरात माघारी येऊ अशी त्यांची मिजास होती. आज १८ वर्षांनंतरही अमेरिकेला अफगाणिस्तानातून काढता पाय घेणे जमलेले नाही. यावरून रम्सफेल्ड यांचा अंदाज किती चुकला हे कळेल. पण त्याचीही खंत, खेद त्यांना कधीही नव्हता. आपल्या आत्मचरित्रात (नोन अ‍ॅण्ड अननोन) ते याचे इतके प्रच्छन्न समर्थन करतात की वाचताना अंगाचा तिळपापड होतो. ही त्यांची ‘बेडर’(?) वृत्ती अखेर बुश यांनाही पेलवली नाही. तेही त्यांच्यामागे बराच काळ फरफटत गेले. पण इतका मानवी संहार होतो आहे हे पाहून त्यांची पत्नी बार्बरा बुश यांनाही जेव्हा नापसंती व्यक्त करावीशी वाटली तेव्हा पाणी डोक्यावरून जात असल्याचे बुश यांना कळले आणि त्यांनी रम्सफेल्ड यांचा राजीनामा घेतला. वैशिष्ट्य म्हणजे रम्सफेल्ड यांनी घडवलेला सहकारीही तसाच. तोही तितकाच युद्धखोर. डिक चेनी हे त्यांचे चेले. बुश यांचे उपाध्यक्ष. ‘इन माय टाइम’ या आत्मचरित्रात तेही सर्व युद्धांचे, संहाराचे समर्थनच करतात.

पण या दोघांत अधिक धोकादायक बहुधा रम्सफेल्ड ठरतील. त्यांचे अन्य उद्योगही तसेच. एका डब्यात गेलेल्या औषध कंपनीत त्यांनी हात घातला आणि कृत्रिम साखर बनवून, ती सरकारच्या गळ्यात मारून लक्षावधी कमावले. न्यूट्रास्वीट ही ती कृत्रिम साखर आणि ती बनवणारी कंपनी म्हणजे सर्ल. पुढे अशाच अपरिचित वैद्यकीय कंपनीकडे त्यांचे लक्ष गेले. ‘योगायोग’ असा की ही कंपनी बनवत असलेले औषध लागू पडेल अशी आजारसाथ लगेच आली आणि जगाची काळजी वाटून अध्यक्ष बुश यांनी या औषध खरेदीसाठी कोट्यवधी डॉलर्स दिले. गिलाद लाइफसायन्सेस ही कंपनी, बर्ड फ्लू हा आजार आणि त्यावर टॅमी फ्लू हे औषध ही नावे आता सर्वांस ठाऊक झाली आहेत. सध्या अनेकांच्या हृदयात (खरे तर फुप्फुसात) वास करणारे ‘रेमडेसिविर’ हे लोकप्रिय औषधही याच कंपनीचे. या कंपनीच्या मालकी-वाट्याने रम्सफेल्ड अब्जाधीश झाले. आता त्या पैशातून प्रशासक घडवण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. असे हे रम्सफेल्ड.

गदिमांचे एक अप्रतिम बालगीत आहे. ‘‘एक कोल्हा बहु भुकेला…’’ यातील ‘बहु भुकेला’ हे वर्णन कोल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रम्सफेल्ड यांस लागू पडते. फक्त तेव्हा ते निरागस बालगीत राहात नाही. त्याचे रक्तरंजित ‘हाल’गीत होते.