28 January 2020

News Flash

‘बाल’कांड!

भविष्यात मिरवता येईल असे काही वर्तमानात हाती लागत नसेल तर माणसे इतिहासात आधार शोधू लागतात.

मोदी हे ‘आज के शिवाजी’ ठरवणे किंवा सावरकरांना ‘वीर’ का म्हणावे असा प्रश्न पडणे.. दोहोंची प्रेरणा एकच : मिळेल त्या मार्गाने आपल्या धन्याचे लक्ष वेधून घेणे!

कोणत्याही सत्ताधीशांस खरे आव्हान विरोधकांपेक्षा अशा अविचारी अज्ञ स्वकीयांचे असते. हे असे स्वकीय विरोधकांहाती कोलीत देतात. भाजप आणि काँग्रेस यांच्याबाबत नेमके आता हेच घडले आहे.

भविष्यात मिरवता येईल असे काही वर्तमानात हाती लागत नसेल तर माणसे इतिहासात आधार शोधू लागतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावरून आपल्याकडे सध्या जो काही धुरळा उडताना दिसतो तो या सत्याचे प्रतीक मानता येईल. भाजपच्या कोणा जय भगवान गोयल नामक लांगूलचालकाने आपले मायबाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि त्याआधी कोणा बालबुद्धी काँग्रेसींनी सावरकर यांच्यासंदर्भात काही अनुदार तपशील दिला. यापैकी स्वत:स अधिकृतपणे भाजपनेता म्हणविणाऱ्या गोयलाने पुस्तक लिहिले तर काँग्रेसने पुस्तिका. त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भाजपच्या मुख्यालयात घडवून आणणाऱ्या गोयलास पंतप्रधान मोदी यांच्यात छत्रपती दिसले तर काँग्रेसींना सावरकर यांना वीर का म्हणावे असा प्रश्न पडला. याबद्दल या दोन्ही पक्षांना मात्रेचे काही वळसे चाटवावे लागतील.

प्रथम भाजप. या कोणा गोयल यांना खरे तर भाजपने नारळ द्यायला हवा. मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करतात म्हणजे काय? हा मोदी यांचा घोर अपमान तर ठरतोच पण तो करून हे गोयल आपल्या अज्ञानाचेही प्रदर्शन करवतात. अशा इतक्या अज्ञानी माणसास भाजपनेता म्हणविण्याची मुभा कशी काय असू शकते? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे देशाचे उपराष्ट्रपती, आपल्या एकवाक्यी पांडित्यासाठी ओळखले जाणारे वेंकय्या नायडू यांनी सर्वाच्या आधी मोदी हे ईश्वरी अवतार असल्याचे जाहीर केले असताना परत त्यांची तुलना अन्य कोणाशी करण्याचे पातक हे गोयल कसे काय करू शकतात? शिवाजी महाराज हे लोकोत्तर आणि मानवी कर्तृत्वाचा एक उदात्त आविष्कार. त्याचा विचार या गोयलांनी केला असण्याची शक्यता नाही. पण निदान तो भाजपच्या धुरीणांनी तरी करायला हवा होता. नायडू यांच्यानंतर मध्य प्रदेशचे पराभूत मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनीदेखील मोदी यांच्या परमेश्वरी अवताराची द्वाही फिरवली होती. आता नायडू यांना मोदी यांच्यातील ईश्वरी अवताराचा प्रत्यय उपराष्ट्रपतिपद मिळण्याआधी आला की नंतर हा प्रश्न फजूल. या त्यांच्या कौतुकाचे वर्णन ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’ असे करणे म्हणजे तर नतद्रष्टपणाच ठरेल. तेव्हा तसे करण्याचे              पातक न करता हा साक्षात्कार कधी झाला याकडे दुर्लक्ष केले जावे. तो झाला हे महत्त्वाचे. तेव्हा गोयल यांनी त्याचा तरी विचार करायला हवा होता.

खरे तर आपल्या देशाच्या पंतप्रधानाची तुलना अन्य कोणाशी करावी असे वाटणे हेच अक्षम्य पाप. तसे झाल्याने त्यातून भाजपचा गोंधळ दिसतो काय? तसेही असू शकेल. याचे कारण एकदा ‘या सम हा’ असे मोदी यांचे वर्णन केले गेल्यानंतर हा नेता अन्य कोणासारखा असूच शकत नाही. एकमेवाद्वितीय असलेली व्यक्ती अन्य कोणासारखी असणे जीवशास्त्रीयदृष्टय़ादेखील शक्य नाही. तेव्हा त्या अर्थानेही या गोयल यांची कृती मोदी यांचा अपमान करणारीच ठरते. त्यांच्या या गुन्ह्य़ांस शासन व्हायला हवे. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याची आरती ओवाळणाऱ्या आणि हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांना आपण कधीही माफ करू शकणार नाही, असे खुद्द मोदी वदले होते. तशीच तंबी या गोयल यांनाही देण्याची गरज आहे. आणि दुसरे असे की यानंतर आपल्या पंतप्रधानाची तुलना नक्की कोणाकोणाशी करावी याचाही विचार भाजपने करायला हवा. वाटल्यास त्यासाठी एखादे चिंतन शिबीर बोलवावे किंवा काही नेत्यांची समिती नेमावी. याचे कारण याआधी या पक्षातील काहींनी मोदी यांची तुलना भारताचे पहिले पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशीही केल्याचे स्मरते. वास्तविक मधल्या कालखंडात ही उपाधी लालकृष्ण अडवाणी यांनादेखील दिली गेली होती. पण सत्ताकारणातून मार्गदर्शक मंडलात रवानगी झाल्यानंतर त्यांनी ही उपाधीही गमावली असावी. तेव्हा ईश्वरी अवतार की छत्रपती की पोलादी पुरुष याचा सोक्षमोक्ष एकदा काय तो भाजपने करावा.

याबाबतचा गृहपाठ काँग्रेस नेत्यांनीही करण्याची गरज आहे. तसा तो करून झाल्यावर ‘वीर’ म्हणवून घेण्यास पात्र कोण याचा तपशील त्यांनी जाहीर करावा. त्यामुळे त्यास पात्र होण्यासाठी गांधी/नेहरू घराण्याबाहेरच्या कोणास संधी आहे, ते तरी एकदाचे कळेल. अलीकडे काँग्रेस सेवा दलाने काढलेल्या पुस्तिकेत सावरकरांविषयी काही अनावश्यक भाष्य केल्याने वाद निर्माण झाला. त्याचा परामर्श घेण्याआधी यानिमित्ताने काँग्रेसची ‘सेवा दल’ नावाची संघटना हयात आहे, हे तरी जनतेस कळले. सत्तेच्या उबेत राहावयाची सवय जडल्याने समस्त काँग्रेस पक्षाचे रूपांतर ‘मेवा दला’त कसे झाले यास देश साक्षी आहे. त्यामुळे आजच्या पिढीच्या अनेकांना ‘काँग्रेस सेवा दल’ हे ‘काय प्रकरण आहे बुवा’ असा प्रश्न पडला असल्यास त्यांना दोष देता येणार नाही. तर अशा या सेवा दलास सावरकर आणि गांधीहत्येस जबाबदार असणारा नथुराम गोडसे यांच्यातील संबंधांविषयी प्रश्न पडला. तो नुसताच पडला नाही तर तो या सेवा दलाने पुस्तिकेतही नमूद केला.

प्रश्न असा की ही नसती उठाठेव करण्याचे या सेवा दलास कारणच काय? यात कोणती आली आहे सेवा? प्रश्न सावरकरांच्या राजकीय भूमिकेचा असता आणि त्याबाबत या सेवा दलास काही प्रश्न पडला असता तर ते एक वेळ समजण्यासारखे होते. पण विषय राजकारणाचा नाही, सावरकरांच्या सामाजिक सुधारणावादी भूमिकेचा नाही, त्यांच्या काव्यकलेचा तर नाहीच नाही. मग नको त्या ‘विषया’ची उठाठेव करायला या सेवा दलास सांगितले कोणी? हा विषय उपस्थित झाल्याने कोणाची कसली सेवा झाली, हे तरी त्यांनी एकदा सांगावे. राहता राहिला मुद्दा सावरकरांना ‘वीर’ म्हणावे किंवा काय, हा. त्याचे उत्तर इंदिरा गांधी यांनीच इतिहासात देऊन ठेवले आहे. सावरकरांशी संबंधित संस्थेस लिहिलेल्या पत्रात खुद्द इंदिरा गांधी यांनी त्यांनी ब्रिटिशांविरोधात दिलेल्या लढय़ाचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला याची तरी किमान माहिती या कथित सेवा दलाच्या अतिउत्साही पुस्तिकाकर्त्यांना असायला हवी.

याचा अर्थ इतकाच की हे अतिउत्साही आणि तितकेच अक्कलशून्य काँग्रेस कार्यकत्रे काय किंवा काही भाजपवासीय काय! या दोहोंचा पिंड आणि राजकीय यत्ता एकच. मिळेल त्या मार्गाने आपल्या धन्याचे लक्ष वेधून घेणे इतकाच यांचा विचार आणि तितकीच यांची कुवत. हे असे अतिउत्साही आपल्या नेत्यांस कसे संकटात आणतात याचा मोठा इतिहास आपल्या आसपास आहे. तो सत्ताधीशांनी अभ्यासावा. कोणत्याही सत्ताधीशांस खरे आव्हान विरोधकांपेक्षा अशा अविचारी अज्ञ स्वकीयांचे असते. हे असे स्वकीय विरोधकांहाती कोलीत देतात. भाजप आणि काँग्रेस यांच्याबाबत नेमके आता हेच घडले आहे. काहीही कारण नसताना या दोघांनी आपल्याच नेत्यांस आणि पक्षांस संकटात आणले. या बालिश बहु बडबडणाऱ्यांची कमतरता अजिबात नसल्यामुळे राजकारणातील हे ‘बाल’कांड संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसला इतिहासात ते जमले नाही. पण शिस्तीत वाढलेल्या भाजपलाही ते वर्तमानात जमत नसेल तर ते देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

First Published on January 15, 2020 12:01 am

Web Title: editorial page narendra modi aaj ke shivaji bjp congress freedom fighter vinayak damodar savarkar akp 94
Next Stories
1 इच्छा आणि धोरण
2 सर्वोच्च; पण संदिग्ध!
3 ‘नवा करार’
Just Now!
X