‘त्यांनी हे जे काही पाऊल उचलले आहे ते स्वत:च्या हितासाठी बिलकूल नाही,’ हाच युक्तिवाद त्यांच्या भाटांकडून होताना दिसतो..

स्टालिनपेक्षाही अधिक काळ पुतिन रशियाचे नेतृत्व करीत आहेत. स्टालिन साम्यवादाच्या बुरख्याखाली उघड हुकूमशहा बनला. पुतिन यांचे ‘मोठे’पण असे की त्यांचा पडदा लोकशाहीचा आहे आणि कृती हुकूमशहाची..

एकाधिकारशहा कधी राजीनामा देत नाहीत आणि ते कधी निवृत्तही होत नाहीत. काळाच्या ओघात बदल होतो तो फक्त त्यांच्या अधिकारांत. कसा ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दाखवून देतात. गेल्या आठवडय़ात पुतिन यांनी धक्कादायक अशा बदलांचे सूतोवाच केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे या आठवडय़ात ते बदल रेटण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली. हे अपेक्षित होते. गेली दोन दशके सत्तेवर असणाऱ्या पुतिन यांचा सध्याचा सत्ताकाळ २०२४ साली संपेल. नव्या घटनेनुसार त्यांना त्यानंतर अध्यक्षपदावर राहता येणार नाही. म्हणजे पदत्याग करावा लागेल. पण एकाधिकारशाहीवर ठाम विश्वास असणाऱ्यासाठी सत्तात्याग करणे सोपे नसते. याचे कारण एकाधिकारशाहीच्या काळात दडपलेली कृष्णकृत्ये नंतरचा सत्ताधीश बाहेर काढण्याचा धोका असतो. आणि दुसरे असे की आभासी लोकशाहीत अशा एकाधिकारशहानंतर सत्तेवर येणाराही एकाधिकारशहाच असण्याची शक्यता अधिक. एका म्यानात दोन तलवारी ज्याप्रमाणे राहात नाहीत त्याप्रमाणे सत्ताधारी आणि सत्ताच्युत असे आजी/माजी एकाधिकारशहा एका समाजात एकाच काळात राहू शकत नाहीत. अशा वेळी सत्ताधाऱ्यांहाती एकच पर्याय राहतो. तो म्हणजे शक्यतो आजन्म, पण ते जमले नाही तर अधिकाधिक काळ तरी सत्ता आपल्या हाती राहील यासाठी प्रयत्न करणे. पुतिन यांचे सारे उद्योग हे याचेच निदर्शक आहेत.

असा ठाम निष्कर्ष काढता येतो याचे कारण त्यांनी याआधीही हेच केले. खरे तर पुतिन यांचा सारा इतिहासच अधिकाधिक सत्ता बळकावण्याच्या प्रयत्नांचा आढावा आहे. शुद्धीपेक्षा मद्यधुंदतेतच अधिकाधिक काळ घालवणारे बोरीस येल्तसिन यांच्याकडून नवे सहस्रक उंबरठय़ावर असताना १९९९ साली पुतिन यांनी सत्ता घेतली. त्याआधी हा गृहस्थ रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख होता. मृदुभाषी आणि प्रसिद्धिपराङ्मुख असा हा तरुण सत्तेवर आला तरी आपल्या मुळावर येणार नाही, इतकाच काय तो येल्तसिन यांचा विचार. तो पुतिन यांनी त्यांच्यापुरता रास्त ठरवला आणि त्यांना फक्त हात न लावता आपल्या अन्य स्पर्धकांना त्यांनी एकामागून एक संपवले. म्हणजे शब्दश: गायब केले. येल्तसिन यांच्यासाठी त्यांना काही फार करावे लागले नाही. ते २००७ साली गेलेच. पण त्यानंतर मात्र पुतिन यांनी आपली सगळी ताकद रशियास अभेद्य अशा मुठीत घेता येईल यासाठीच खर्च केली. त्यासाठी प्रसंगी बनावट दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या हल्ल्यांमुळे सामान्य रशियनांच्या मनात राष्ट्रवादाची लाट आली आणि या देशप्रेमाच्या भरतीत पुतिन यांचे उरलेसुरले विरोधक नाकातोंडात पाणी जाऊन कायमचे निकालात निघाले. मग पुतिन यांनी यथावकाश अध्यक्षपदही मिळवले आणि आपली पकड घट्ट केली. मग आली पहिली घटनादुरुस्ती.

रशियाच्या कायद्यानुसार सलग दोन वेळा अध्यक्षपद भूषविल्यानंतर कोणालाही तिसऱ्यांदा या पदावर दावा सांगता येत नाही. म्हणजे २००० पासून अध्यक्षपदी राहिलेल्या पुतिन यांना २००८ साली पदत्याग करावा लागला असता. पण मुख्यमंत्रिपदी बसण्यास स्वत: नालायक ठरल्यावर ज्याप्रमाणे आपल्या लालूप्रसाद यादव यांनी पत्नी राबडीदेवी यांस त्या पदावर बसवून आपल्या हाती सत्तेची दोरी राहील अशी व्यवस्था केली त्याप्रमाणे दिमित्री मेदवेदेव या सर्वार्थाने लहानखोऱ्या व्यक्तीच्या हाती अध्यक्षपद देऊन पुतिन त्यांचे पंतप्रधान बनले. ती चार वर्षे त्यांनी पंतप्रधानकी केली आणि २०१२ साली पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढवली. ती त्यांनी लढवावी, देशाला कशी त्यांची गरज आहे आदी मुद्दे पुढे आणून तसा प्रस्ताव मेदवेदेव यांनीच मांडला. हा ‘लोकाग्रह’ आणि ‘कार्यकर्त्यांचे प्रेम’ लक्षात घेऊन पुतिन यांनी २०१२ साली पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. तीत अन्य काही होण्याचा प्रश्नच नव्हता. जवळपास ६५ टक्के मते मिळवून पुतिन ‘प्रचंड मताधिक्याने’ अध्यक्षपदी पुन्हा निवडले गेले. वास्तविक या निवडणुकीत त्यांना मोठा विरोध झाला होता आणि विरोधी पक्षही तयारीत होते. पण त्यांचे कोणतेही प्रतिबिंब या निवडणुकीच्या निकालामध्ये पडले नाही. मग या ‘जनमताचा आदर’ करत पुतिन यांनी अध्यक्षपद निवडले आणि पहिल्या घटनादुरुस्तीद्वारे अध्यक्षपदाची मुदत सहा वर्षे करून घेतली. ती २०१८ साली संपली. त्या वर्षीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ते ‘प्रचंड बहुमताने’ निवडून आले. म्हणजे आणखी सहा वर्षे अध्यक्षपद आपल्याच हाती ठेवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला.

ही मुदत २०२४ साली संपली असती. पुतिन यांची घटनादुरुस्तीची कृती ती हीच मुदत वाढवण्यासाठी. सलग दोन वर्षे दुसऱ्यांदा अध्यक्षपदी राहिल्यानंतर पुतिन यांना २०२४ साली पायउतार व्हावे लागेल. तसे करावे लागू नये म्हणून या सत्ताधीशाने काय करावे? त्यांनी अध्यक्षपदाचे अधिकारच कमी केले आणि ते मोठय़ा प्रमाणात प्रतिनिधी सभा आणि पंतप्रधान यांच्याकडे वर्ग केले. वरवर पाहता ही कृती विरोधाभासी वाटू शकेल. पण पुतिन यांच्यासाठी तिचा अर्थ असा की अध्यक्षपदाची सध्याची मुदत संपली की पुतिन हे पुन्हा पंतप्रधानपद वा प्रतिनिधी सभेचा प्रमुख असे एखादे पद घेतील. यापैकी दुसऱ्याची निर्मिती रशियाच्या इतिहासातच पूर्णपणे नवी असून ‘लोकहितार्थ’ असे काही करण्याची गरज पुतिन यांनी व्यक्त केली, ही सूचक बाब. त्यामुळे रशियाची प्रतिनिधीसभा, म्हणजे आपल्या संसदेप्रमाणे डय़ुमा, ही अधिक शक्तिशाली होईल आणि मंत्री, अध्यक्ष आदी नेमणुकांचे अधिकार त्यांच्याकडे राहतील. आणि पुतिन या यंत्रणेचे प्रमुख. म्हणजे पुन्हा सर्वाधिकार त्यांच्या हाती. तूर्त त्यांनी आपला खेळसवंगडी आणि कर अधिकारी मिखाइल मिशुस्टीन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. कारण पुतिन यांच्या सुधारणेच्या घोषणेनंतर पंतप्रधान मेदवेदेव यांनी पदत्याग केला. पुतिन यांनी त्यांच्या या ‘त्यागा’चा गौरव केला आणि देशाने त्यांच्या नेतृत्वाखाली कशी प्रगती केली याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

आता ही प्रगती पुढे नेण्यासाठी त्यांना हे बदल करावेसे वाटले. तसेच ही प्रगती ज्यांच्यामुळे शक्य झाली त्या व्यक्तीहातीही तसेच अधिकार असणे आवश्यक आहे असे त्यांना वाटले असेल तर तेदेखील सयुक्तिकच म्हणायचे. आता हा केवळ योगायोग की अशी देशास प्रगतीपथावर नेणारी व्यक्ती खुद्द पुतिन हीच आहे. त्यामुळे आधुनिक रशियाचे भाग्यविधाते या नात्याने त्यांना सत्ता स्वत:कडेच ठेवावी असे वाटले असेल तर त्यासाठी त्यांना दोष देता येणार नाही. तेव्हा त्यांनी हे जे काही पाऊल उचलले आहे ते स्वत:च्या हितासाठी बिलकूल नाही. हाच युक्तिवाद त्यांच्या भाटांकडून होताना दिसतो.

सलग वीस वर्षे झाली पुतिन यांच्या हाती सत्ता आहे आणि त्यांना कोणाचे आव्हान नाही. ते तसे निर्माण होऊच न देणे ही पुतिन यांची खासियत. स्टालिनपेक्षाही अधिक काळ पुतिन रशियाचे नेतृत्व करीत आहेत. स्टालिन साम्यवादाच्या बुरख्याखाली उघड हुकूमशहा बनला. पुतिन यांचे ‘मोठे’पण असे की त्यांचा पडदा लोकशाहीचा आहे आणि कृती हुकूमशहाची. त्यांच्या या नव्या प्रारूपानंतर जगात अनेक देशांत त्याच मार्गाने जाणारे नेते तयार झाले. अमेरिकेसारख्या जातिवंत लोकशाही देशाच्या अध्यक्षासही पुतिन प्रारूप मोहवते यातच लोकशाहीवरील काजळी दिसून येते. ती आता अधिक गडद होईल. कोणताही सनदशीर मार्ग या पुतिन प्रहराची अखेर करू शकणार नाही. ती कधी झालीच तर अिहसकही असणार नाही.