पारुल खक्कर यांच्या ‘शव वाहिनी गंगा’वरील वादात त्या कवितेशिवाय काहीही नवे नाही… कविता मात्र नवी! त्यातील थेट उपरोध अन्य भाषांनाही नवाच वाटला असणार… 

आपल्या अभिव्यक्तीकडे लक्षही न देता नापसंती व्यक्त झाली, हे कलावंताचे खरे दु:ख. कवितेवर चौकटी लादल्या जाणे, हे तर गळचेपीचे आद्यलक्षण!

संख्या आणि गुणवत्ता यांचा संबंध लावण्याच्या फंदात शहाण्याने पडू नये. तो कधी असतो आणि कधी नसतो याचे व्यावहारिक ठोकताळे असतातही काही, ते तात्पुरते पाळावेत आणि पुढे जावे. बारावी परीक्षेतील टक्केवारीस गुणवत्ता न मानता स्वतंत्र परीक्षेद्वारे आयआयटी वा वैद्यकीय प्रवेशासाठी गुणवत्ता जोखली जाते, हे एक उदाहरण लक्षात ठेवून; तज्ज्ञांना त्यांचे काम करू द्यावे. तसे  होत नाही. म्हणून मग अभ्यासू आणि विदग्ध राजकीय विश्लेषकांना शिव्याशाप देऊ पाहणारे, ‘एवढ्या लोकांनी निवडून दिलंय त्यांना…’ असा युक्तिवाद करतात; किंवा एखादे पुस्तक, नियतकालिक वगैरे खपतच नाही म्हणजे ते वाचनीय नसणार, असा आडाखा बांधतात. ही संख्या व गुणवत्तेची गल्लत समाजमाध्यमी जगात तर अनेकदा होते. म्हणून मग, फेसबुकावरल्या एखाद्या कवितेला इतके ‘लाइक’ मिळाले किंवा इतक्या भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला म्हणून ते श्रेष्ठ काव्य समजण्याचा भोळसटपणा सोकावतो किंवा याच त्या कवितेबद्दल कवयित्रीला २४ तासांत ४८ हजार- म्हणजे सुमारे दर दोन सेकंदाला एक – अशा वेगाने समाजमाध्यमांतून शिव्या घातल्या गेल्या अशी बातमी वाचून, ती कविता वाईटच असणार असा समज बळावतो. हे प्रकार पारुल खक्कर नामक गुजराती कवयित्रीच्या, ‘शव वाहिनी गंगा’ या कवितेबद्दल गेल्या महिन्याभरात झाले. ११ मे रोजी ही गुजराती कविता पारुल खक्कर यांनी स्वत:च्या फेसबुकावर प्रकाशित केली होती. तिचे आसामी, पंजाबी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आदी भाषांत अनुवादही झाले आहेत. याच कवितेबद्दल पारुल यांना ‘ट्रोल’ ऊर्फ समाजमाध्यमी जल्पकांकडून मनस्ताप देणाऱ्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले, अशा बातम्याही देशभरातील प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. मग पारुल यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवरील स्वत:ची खाती स्वत:हूनच बंद केली. याहीनंतर जे झाले, ते मात्र गुणवत्ता जोखण्याची क्षमता बाळगणाऱ्या तज्ज्ञांविषयीच प्रश्न निर्माण करणारे आहे आणि म्हणून त्याची चर्चा करणे महत्त्वाचे आहे.

गुजरात साहित्य अकादमी ही गुजरात राज्य सरकारच्या निधीवर चालणारी आणि बालसाहित्यास अनुदान देण्यापासून वयोवृद्ध लेखकांना निर्वाहवेतन देण्यापर्यंत अनेक कामे करणारी ‘स्वायत्त’ संस्था. ‘शब्दसृष्टी’ हे  या अकादमीचे मासिक. त्याच्या ताज्या अंकातील संपादकीयामध्ये या अकादमीचे अध्यक्ष विष्णु पंड्या यांनी पारुल खक्कर यांच्या कवितेचे नाव न घेता मतप्रदर्शन केले आहे. ते म्हणतात की हा काहीच अर्थ नसलेला विमनस्क उद्गार आहे, पण अशा कवितेचा ‘केंद्र सरकारविरोधी आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रवादी धोरणांविरुद्ध काम करणाऱ्यांनी गैरवापर चालविला आहे’. कोण हे गैरवापर करणारे? याचेही उत्तर ते संपादकीय देते. ‘डावे, कथित उदारमतवादी, ज्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही’ असे हे गैरवापर करणारे लोक! पण त्यांचा हेतू ‘अराजक’ फैलावण्याचा आहे आणि लोकांच्या दु:खाचा वापर करणारे हे ‘लिटररी नक्षल’ आहेत, असे या संपादकीयात विष्णु पंड्या लिहितात. आपणच ते लिहिले असल्याचे त्यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीस सांगितले. ‘शव वाहिनी गंगा’बद्दल त्यांनी ‘याला मी कविता म्हणणार नाही’ असे मत मांडले आणि वर, ‘पारुल खक्कर यांनी यापुढे चांगले काहीतरी लिहावे’ अशी अपेक्षाही जाहीर केली. याच पंड्या यांनी यापूर्वी खक्कर यांना, ‘गुजराती कवितेची भविष्यकालीन नायिका’ म्हटले होते म्हणे. अर्थात, ‘साहित्याचे मूल्यमापन व्यक्तिनिष्ठ असते’ या कलावादी समजाचा फायदा पंड्या यांना दिला तर सारेच सोपे होते. मग पंड्या यांचे व्यक्तिनिष्ठ मत बदलू शकणारच, त्याला त्यांचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्य कारणीभूत असणार, आदी समजून घेण्याची जबाबदारी इतरांवर येते. पण इतके साधे आहे का हे? पंड्या हे तज्ज्ञ मानले गेल्याशिवाय त्यांची नेमणूक ‘गुजरात साहित्य अकादमी’च्या अध्यक्षपदी होणे शक्यच नव्हते आणि सार्वजनिक पैशावर चालणाऱ्या या संस्थेच्या मुखपत्राचे संपादकीय कुणाच्या व्यक्तिगत आवडीनिवडींवर ठरण्याचे काहीच कारण नाही. ही संस्था ‘स्वायत्त’ असल्याने सरकारी मतांनाही तेथे थारा मिळणे चूकच, पण समजा सरकारी भूमिकेची पाठराखण करायचीच तर राज्यघटनेनुसार ती भूमिका, अगदी अपवादात्मक निर्बंधांखेरीज अभिव्यक्तिस्वातंत्र्याला प्रोत्साहनच देणारी असायला हवी. त्याऐवजी ‘डावे, कथित उदारमतवादी’ अशा थेट राजकीय विरोधकांचा उद्धार करण्याचा राजकारणी कार्यक्रम सरकारी पैशावर का बरे राबविला जावा? ‘लिटररी नक्षल’ असा उल्लेख करून या कवितेचा अनेक भाषांत अनुवाद करणाऱ्यांना का धमकावले जावे?  पंड्या यांना ‘ती कविताच नव्हे’ असे म्हणण्याचा हक्क जरूर आहे. तज्ज्ञ म्हणून तो त्यांचा हक्क. पण मग पंड्या हे ‘अमुक म्हणजेच कविता’ समजतात का, कवितेसाठी चौकटी आखून देतात का? मंगेश पाडगावकरांची ‘सलाम’ ही ‘कविताच नाही’ असे तर कुणी आणीबाणीतही म्हणाले नव्हते. कारण कवितेवर चौकटी लादणे हे तर गळचेपीचे आद्यलक्षण. हे ज्यांना माहीत नाही त्यांना तज्ज्ञ तरी का म्हणावे, अशी चर्चा खुलेपणाने होणेही रास्त ठरेल. फक्त चौकटच पाळणारे पद्य ‘कविता’ ठरते का, हा मुद्दा लोकशाहीच्याही चौकटीपर्यंत भिडवता येईल. पण याखेरीज दोन मुद्द्यांचीही चर्चा हवी.

पहिला म्हणजे पंड्या यांच्यासारख्यांच्या प्रोत्साहनामुळे कवयित्री म्हणून पारुल खक्कर वाढल्या, गुजराती ग़्ाजलकार म्हणून तसेच आजच्या काळातील तगमगीला शब्दरूप देणाऱ्या म्हणून त्यांचे नाव झाले, त्यांनी आल्या प्रसंगास तोंड देण्याऐवजी स्वत:हूनच समाजमाध्यमातील खाती बंद का केली? ज्यांच्यावर जल्पकांचा हल्ला झाला, त्या सर्वांना याचे उत्तर माहीत असेल. किंवा एरवीही, प्रक्षुब्धांच्या जमावाला आपले म्हणणे कळलेच नाही, आपल्या अभिव्यक्तीकडे लक्षच न देता नापसंती व्यक्त झाली, हे कलावंत, साहित्यिकाचे मोठेच दु:ख म्हणायला हवे. अशाच उद्वेगातून पेरुमल मुरुगन या तमिळ लेखकाने ‘यापुढे लेखक म्हणून मी आत्महत्या करतो,’ असे जाहीर केले होते. पारुल खक्कर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ‘कळपाबाहेर’ घालवले जाण्याच्या भीतीतून फक्त चौकट स्वीकारणाऱ्या, कथित ‘चांगल्या’ कविताच त्या लिहू लागल्या, तरी नवल नाही.

दुसरा मुद्दा सरकारप्रणीत किंवा सार्वजनिक निधीवर चालणाऱ्या संस्थेच्या गैरवापराचा. तो आधीपासून होता असे सांगणाऱ्यांचे अभिनंदन; कारण हे सांगण्यातून त्यांनी स्वत:देखील गैरवापर करण्याचा परवाना मिळवलेला असतो! असा इतिहासदत्त परवाना आज लागू आहेच, पण त्याची व्याप्ती निवडणूक आयोगापासून साहित्यिकांच्या संस्थेपर्यंत वाढलेली दिसते आहे. झुंडीला सरकारी पाठबळ मिळाल्याची शंका ‘शब्दसृष्टी’च्या संपादकीयाने अधिकच दृढ केलेली आहे.

म्हणजे थोडक्यात, पारुल खक्कर यांच्या ‘शव वाहिनी गंगा’वरील वादात त्या कवितेशिवाय काहीही नवे नाही. कविता मात्र नवी. वेदनेला आणि संतापालासुद्धा थेट उपरोधाचा हुंकार देणारी. पारुल खक्करांची हीच रचना श्रेष्ठ, असे कुणीही म्हणू नये. ‘शव वाहिनी गंगा’ ही कविता काळाच्या संदर्भात नवी ठरली, इतकेच काय ते खरे. सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवण्याचा थेटपणा नवा ठरला, म्हणून देशभरच्या अन्य भाषांनीही ‘शव वाहिनी गंगा’मधून तो आपलासा केला. पण अभिव्यक्तीची उमेद आणि ती मारण्याचे प्रयत्न यांची गोष्ट संपणार नाही. ती वाढेल. म्हणजे उमेद वाढेल, उमेदीला मारू पाहणारे वाढतील आणि म्हणून गोष्टही वाढत राहील. गोष्ट संपलेली नसल्यामुळे, तिचे तात्पर्य कुणी कुणाला सांगण्याचा प्रश्नच येणार नाही. तरीदेखील तात्पर्याचे तंतू हवेत उडत राहतील… मोकळा श्वास घेऊ पाहणाऱ्यांच्या श्वासांवाटे आत जातील… मग काय होईल? माहीत नाही! सांगितले ना? गोष्ट संपलेली नाही…