02 July 2020

News Flash

बिनचूक ब्रेख्त!

येस बँक बुडणे ही चोरी असेल तर ती वाचवण्यासाठी स्टेट बँक आणि आयुर्वमिा महामंडळास सांगणे ही त्याहीपेक्षा मोठी चोरी ठरते.

(संग्रहित छायाचित्र)

स्टेट बँक, आयुर्वमिा महामंडळ यांतील पैसा लोकांचा आहे.. बेसुमार कर्जे देऊन बुडीत निघालेल्या एका खासगी बँकेला वाचवण्यासाठी तो का ओतला जातो आहे?

वर्षभर येस बँक जिवंत राहण्यासाठी आवश्यक ते भांडवल उभारू शकली नाही. आता तब्बल २५०० कोटी रुपये स्टेट बँक, आयुर्वमिा महामंडळ यांनी येस बँकेत गुंतवावेत असे सरकार म्हणते! सरकार असे वागणार असेल तर ते आणि वारेमाप उधळपट्टी करणारे राणा कपूर यांच्यात फरक तो काय?

येस बँक बुडणे ही चोरी असेल तर ती वाचवण्यासाठी स्टेट बँक आणि आयुर्वमिा महामंडळास सांगणे ही त्याहीपेक्षा मोठी चोरी ठरते. सामान्य करदात्यांच्या पशावर इतका मोठा घाला भरदिवसा घालणे दरवडेखोरांनादेखील जमले नसते. ते सरकारने करून दाखवले. या एका मुद्दय़ावर खरे तर जनतेत संतापाची लाट उसळू शकली असती. बँक ग्राहकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटना सत्तर, ऐंशीच्या दशकात या देशात होत्या. तशा काही आता असत्या तर त्यांनी या मुद्दय़ावर रान पेटवले असते. आता तसे काहीही होताना दिसत नाही. आपल्याकडील आर्थिक साक्षरतेची पातळी आणि त्यास असलेला राजकीय आपपरभावाचा पदर लक्षात घेता ते होण्याचीही काही शक्यता नाही. हे दुर्दैवी सत्य. पण तरीही जे काही मोजके विचारी शिल्लक असतील त्यांच्यासाठी तरी या विषयाचा ऊहापोह व्हायला हवा.

याचे कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन. त्या म्हणतात की २०१७ पासून आम्ही या बँकेवर नजर ठेवून आहोत. ते सत्य मानले तर येस बँक बुडण्यापासून मग वाचवता का आली नाही, हा प्रश्न पडतो. वास्तविक बँकिंग उद्योगाशी दूरान्वयानेदेखील संबंध असणाऱ्यांस येस बँक कोणत्या दिशेने निघाली आहे, हे माहीत होते. त्यातूनच काही शहाण्यांनी या बँकेतील आपापली गुंतवणूक काढून घेतली. या बँकेचे संस्थापक राणा कपूर हे आपल्याकडील इतरांच्या पशाने मोठेपणा मिरवणारे जे गृहस्थ असतात त्यांतील एक. ते आणि त्यांचे साडू अशोक कपूर यांनी २००३ साली या बँकेची स्थापना केली. दोन वर्षांत ती भांडवली बाजारात उतरली आणि तीत समभागांद्वारे अन्य गुंतवणूकदार आले. त्या वेळी अशोक कपूर अध्यक्ष तर राणा व्यवस्थापैकीय संचालक अशी ही रचना होती आणि राणा यांच्याकडे बँकेची २६ टक्के मालकी होती तर अशोक कपूर यांच्याकडे ११ टक्के इतकी. हे अशोक कपूर ‘२६/११’ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मारले गेल्यावर येस बँकेचे रान राणा यांना मोकळे झाले. अशोक कपूर यांच्या निधनानंतर राणा यांनी त्यांच्या कुटुंबीयांना बँकेतून जणू हुसकावून लावले. आपल्या न्याय्य वाटय़ासाठी त्यांना त्या वेळी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. मग येस बँक ही पूर्णपणे राणा कपूर यांची खासगी जहागीर बनली.

आपल्या उद्योग क्षेत्रात एक खास भारतीयपण आहे. ते असे की अनेक उद्योग ‘सार्वजनिक मालकीचे’ (पब्लिक लिमिटेड) झाले, म्हणजे भांडवली बाजारात त्यांचे समभाग जरी आले तरी त्या आस्थापनांचे नियंत्रण संस्थापक कुटुंबाकडेच राहते. हे उद्योग ही त्या कुटुंबाची सार्वजनिक पशातील खासगी जहागीर बनते. अशा किती तरी कंपन्या आसपास नजर फिरवली तरी आढळतील. येस बँक हे त्याचेच उदाहरण. भांडवली बाजारात सूचिबद्ध असूनही येस बँक म्हणजे राणा कपूर असेच समीकरण होते. त्याचा पुरेपूर वापर करून राणा कपूर यांनी बँकेचा व्यवसाय विस्तार केला आणि आपले प्रतिमासंवर्धन केले. लघु आणि मध्यम उद्योग हे बँकेचे लक्ष्य. त्या क्षेत्रात बँकेने भरपूर पतपुरवठा केला. पण तरीही ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव (?) आहे’  या उक्तीप्रमाणे राणा कपूर यांची वृत्ती होती. बँकिंग क्षेत्रावरून ओवाळून टाकलेल्या कंपन्या. ज्यांना कोणीही शहाणा पतपुरवठा करण्यास धजावत नसे.. त्यांना येस बँकेची कर्जे सहज मिळत. असे करताना राजकीय लागेबांधे तयार होतात. ते झाले की सरकारी व्यवसाय बसल्याजागी मिळतो. आपल्या अनेक नगरपालिका, विद्यापीठे, सहकारी बँका आदींची गलेलठ्ठ खाती येस बँकेत आहेत ती याचमुळे. सर्व काही सुरळीत सुरू असते तेव्हा ही कर्जपुरवठय़ाची अरेरावी खपून जाते. पण फार काळ नाही. गेली तीन वर्षे येस बँक डुगडुगत असल्याचे समोर येत होते. काही बुडीत खात्यात गेलेल्या उद्योगांना दिलेली भरमसाट कर्जे डोळ्यावर येत होती. तसे इशारेही अनेकांनी दिले होते. पण राणा कपूर यांच्या कार्यशैलीवर काहीही परिणाम झाला नाही. अखेर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने राणा कपूर यांना येस बँकेतून हात धरून बाहेर काढले आणि बँकेचे नेतृत्व त्यांना सोडावे लागले. एव्हाना बँकेचे काय होणार हे स्पष्ट झाले होते. अवघ्या काही वर्षांपूर्वी येस बँकेचे समभाग म्हणजे लखलखते हिरे आहेत अशी प्रौढी मिरवणाऱ्या राणा कपूर यांनी स्वत: मात्र ते विकले. म्हणजे बुडण्याआधी या बँकेतील आपली गुंतवणूक भरघोस नफा कमवत सोडवून घेतली.

आणि आता अपेक्षेप्रमाणे ती बँक बुडाल्यावर अर्थमंत्री स्टेट बँकेच्या गळ्यात ती मारू पाहतात, यास काय म्हणावे? गेले वर्षभर येस बँक जिवंत राहण्यासाठी आवश्यक ते भांडवल उभारू शकली नाही. आणि आता सामान्य गुंतवणूकदारांचे तब्बल २५०० कोटी रुपये स्टेट बँक आणि आयुर्वमिा महामंडळ यांनी येस बँकेत गुंतवावेत असे सरकार म्हणत असेल तर त्याइतका आर्थिक बेशरमपणा कोणता? हे काय सुरू आहे याचा विचार करण्याइतका शहाणपणा आपली जनता दाखवणार का? सहकारी क्षेत्रातील पीएमसी बँक अशाच कारणांनी बुडली. ती अशाच मार्गानी वाचवावी असे सरकारला का वाटले नाही? की सहकारी बँकेतील ग्राहकांचा आर्थिक स्तर वेगळा आणि येस बँकेसारख्या चकचकीत खासगी बँकेतील ग्राहकांचा निराळा; म्हणून हा फरक? येस बँक पूर्णपणे खासगी होती. यूटीआय वा तत्सम वित्तसंस्थांप्रमाणे त्यात काहीही सरकारी मालकी नव्हती. मग असे असतानाही ही खासगी संस्था बुडते म्हणून सरकारचे प्राण का कंठाशी यावेत? तसे ते येत असले तरी ही दुसऱ्याच्या पशाने औदार्य आणि दानधर्म करण्याची कोणती रीत? स्टेट बँक, आयुर्वमिा महामंडळ या सरकारी संस्था आहेत. पण म्हणून त्यांतील पसा सरकारी नाही. तो जनतेचा आहे. त्याचा वापर असा बुडत्या जहाजावरील दौलतजादासाठी करण्याचा अधिकार सरकारला दिला कोणी? की जनतेचे अज्ञान आणि त्यातून आलेले मौन हाच सरकारसाठी होकार? जनतेच्या पशाने खासगी उद्योग वाचवणे हा नवाच प्रकार म्हणायचा. जेव्हा नफा होत होता तेव्हा त्यातील वाटा येस बँक सरकारला देत होती काय? नसेल तर मग त्या बँकेचा तोटा झेलायचा हे कोणते अर्थकारण? एचडीएफसी, आयसीआयसीआय वा तत्सम एकाही खासगी बँकेने येस बँक वाचावी यासाठी चकार शब्द काढलेला नाही. मग सरकारलाच का बरे या बँकेचा इतका पुळका? सरकार असे वागणार असेल तर ते आणि वारेमाप उधळपट्टी करणारे राणा कपूर यांच्यात फरक तो काय राहिला? राणा कपूर यांनी गुंतवणूकदारांचा निधी नको त्यांना कर्जे देण्यास वापरला. सरकार जनतेचा पसा अशा बँका वाचवण्यासाठी वापरते. दोघांत वेगळेपण काय? नोटा छापण्याचा अधिकार आहे म्हणून सरकारने तो कसाही वापरावा?

वाटेल ती पापे करून बुडालेल्या राणा कपूरसाठी सरकारने जनतेचा पसा खर्च करावा हे अत्यंत अश्लाघ्य आहे. येस बँक बुडाली यात दु:ख करावे असे नाही. पण त्यातून सरकार नावाचा काळ अधिकाधिक सोकावत चालला आहे, ही खरी चिंतेची बाब. नागरिकांस यात काहीच गर वाटत नसेल तर आपणच आपणास धन्य म्हणावे. ‘थ्री पेनी ऑपेरा’ (पुलंचा ‘तीन पशांचा तमाशा’) लिहिणारा बटरेल्ट ब्रेख्त हा एक कालजयी लेखक. ‘‘बँकेवर दरोडा घालणे हे हौशी मंडळींचे काम, खरे व्यावसायिक बँक स्थापन करतात,’’ हे त्याचे वचन. या जर्मन नाटककारास आपण खरे ठरवून दाखवणार तर..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 12:05 am

Web Title: editorial page state bank life insurance corporation exorbitant loans government finance minister nirmala sitharaman public limited akp 94
Next Stories
1 असहायांचा आनंदोत्सव
2 परीक्षेचा काळ
3 विष आणि विषाणू
Just Now!
X