News Flash

‘दशक’क्रिया!

माणसे ‘काल्यापिल्या’ टॅक्सीतून प्रवास करीत कारण ‘उबर’ ही संकल्पनाच नव्हती.

दशक कधीपासून सुरू होते असे मानावे, याविषयी मतभिन्नता असेल.. पण एवढे निश्चित की, बदल होणार आहेतच..

सरत्या दशकाकडे नजर फिरवली तरी, कोणकोणत्या बदलांना आपण सामोरे जातो आहोत हे लक्षात येईल. तंत्रज्ञानामुळे खासगीपणा आक्रसणे हे आज सॅन फ्रान्सिस्कोलाही मान्य नाही आणि आपल्यासारख्या अनेकांनाही..

सरते दशक तसे फारच मागास म्हणायचे. कारण दहा वर्षांपूर्वी १ जानेवारी रोजी ते सुरू झाले त्या वेळी ‘आयपॅड’ जन्मास यायचे होते, ‘आयवॉच’ किमान पाच वर्षे दूर होते आणि स्टीव्ह जॉब्स हयात होता. माणसे ‘काल्यापिल्या’ टॅक्सीतून प्रवास करीत कारण ‘उबर’ ही संकल्पनाच नव्हती. सर्वसाधारण बाहेर खाणे ही हॉटेलात जाऊन करायची प्रथा होती. हवे ते हॉटेल हात जोडून हातातल्या फोनवर उभे नव्हते. पर्यटनास जायच्या आधी हॉटेल बुकिंग केले जायचे कारण ‘एअर बीएनबी’ म्हणजे काय हेच माहीत नव्हते. कोडॅक कॅमेरा होता आणि त्याच्या चित्रफिती तयार करून आल्यागेल्यास दाखवायची प्रथा होती. कॉम्पॅक, अल्टा व्हिस्टा वगरे कंपन्यांचा दबदबा होता तेव्हा. ‘अलेक्सा’ आणि ‘सिरी’ वगरेंच्या प्रसववेदनादेखील सुरू झाल्या नव्हत्या. माणसे प्राधान्याने कागदी वर्तमानपत्रच वाचायची. त्यामुळे ‘फेक न्यूज’ हा प्रकारच माहीत नव्हता. फारच जे उच्चमध्यमवर्गीय वा तत्सम अन्य होते ते आपण ‘याहू न्यूज’वरून जग कसे समजून घेतो ते मिरवत. बातम्या त्या वेळी शोधाव्या लागायच्या. हातातल्या यंत्रावर आपोआप येऊन त्या आदळायची सुरुवात झाली नव्हती आणि ट्विटरची १४० अक्षरांची मर्यादा महाकाव्य लिहू इच्छिणाऱ्यांनाही शिरोधार्य मानावी लागे. ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आदी वापरणाऱ्या कोटय़वधींच्या फौजा तनात व्हायच्या होत्या. आयुष्य तसे सोपे आणि सरळ होते म्हणायचे.

गेल्या दहा वर्षांत ते बदलले. संगणकाच्या जन्माने सर्वसामान्यांच्या आयुष्यात गती आलीच होती. पण २००९ उलटले ती अधिकच वाढली. इतकी की आपण कसे बदललो ते आपणासच कळेनासे झाले. तसे पाहू गेल्यास इंटरनेट या संकल्पनेचा जन्म १९८९ सालचा. या वर्षांने इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलला. मानवी समूहांना भौतिकदृष्टय़ा विलग करणारी बर्लिनची भिंत याच वर्षांत कोसळली आणि याच वर्षांत टिम बर्नर्स ली या द्रष्टय़ा अभियंत्याने इंटरनेटच्या माध्यमातून मानवी समूहांना जोडण्याचा सेतू जन्मास घातला. नंतर या तंत्राच्या वेगाचा दिवसागणिक फक्त गुणाकार होत राहिला. यानंतर आपल्या आयुष्यात जे काही घडले ते अद्भुत म्हणता येईल असे होते. २०१० सालच्या जानेवारी महिन्यात जॉब्सने पहिल्यावहिल्या आयपॅडचे अनावरण केले. संगणक त्याच्या सर्व तंत्रमंत्रासहित एखाद्या अवयवाप्रमाणे मानवी जीवनाचा अविभाज्य भागच बनला जणू. नंतर असे अनेक घटक तयार झाले ज्यांनी आपल्या आयुष्याचे तंत्रावलंबित्व केवळ वाढवले. तोपर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा याच तीन मुख्य गरजा जगण्यासाठी महत्त्वाच्या असे समजले जायचे. त्यानंतरच्या दशकात अन्न, वस्त्र, निवारा यांच्या जोडीला डेटा हादेखील जगण्यासाठी अत्यावश्यक घटक बनला. जे काही झाले त्याचे गांभीर्य वा महत्त्व किती जणांना अवगत झाले हा प्रश्न असेल. पण हे तंत्रज्ञान बहुसंख्यांनी अवगत केले हे मात्र खरे. आज तर वास्तव हे आहे की एखादा मनुष्यप्राणी हा साक्षर असेल वा नसेल. पण तो मोबाइलसज्ञान मात्र असतोच असतो आणि कोठल्या मोफत डेटावर काय करता येते याची माहिती त्यास असते. जे झाले ते झाले. त्याविषयी भाष्य करावे असे बरेच काही आहे. पण प्रश्न आपण काय अनुभवले हा नाही. तर सुरू होणारे नवे दशक आपणास आगामी १० वर्षांत काय दाखवणार हा आहे. १ जानेवारी २०३० हा दिवस उगवेल त्या वेळी मानवी आयुष्यात काय बदल झालेला असेल? त्याचा कल्पनाविलास रंगवण्यासाठी उच्चकोटीची विज्ञान-तंत्रज्ञान प्रतिभा हवी.

चालकरहित मोटारी हाकेच्या अंतरावर आहेत. त्या या दशकात रस्तोरस्ती दिसू लागतील? शक्य आहे. पण त्यापलीकडेदेखील काही घडले असेल. मोटारी आणि रस्ते यांचा संबंध अन्योन्य आहे. पण या दशकातील मोटारींना धावण्यासाठी रस्त्याची गरज लागेलच असे म्हणता येणार नाही. त्या जमिनीवर असतील त्या फक्त उभ्या राहण्यापुरत्या. कारण त्यांना पंख फुटले असतील. उडत्या मोटारींचे प्रयोग आता सुरू आहेतच. अनेक बडय़ा कंपन्यांची संशोधन मंडळे त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी झटताना दिसतात. कदाचित असेही होऊ शकेल की सध्या एखादे पुस्तक वा खाऊचे डबे घेऊन जाणारे ड्रोन या दशकात माणसेही वाहून नेऊ शकतील. हे सारे आणि अधिक बरेच काहीही प्रत्यक्षात येणार यात तिळमात्र शंका नाही. ती असलीच तर इतकीच की मग चालक आणि त्याचा ‘किन्नर’ यांचे काय होईल? हॉटेलांत यंत्रमानवांनी कर्मचाऱ्यांची जागा घ्यायला सुरुवात झाली आहे. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड येत्या दशकात मिळेल. मग चालकांप्रमाणे हे कर्मचारीही दिसेनासे होतील.

आपल्या हातातील मोबाइल नामक आयताकृती उपकरणाने कशाकशाची जागा घेतली या दशकात याचा कधी आपण विचार करतो? या १ जानेवारीच्या निमित्ताने तो करावयास हरकत नाही. गेल्या दशकात या मोबाइलमधे कॅमेरा आला, संगीतसाठे आले, रेडिओ होताच मोबाइलमध्ये तो अधिक प्रगत झाला, घडय़ाळ आले त्यामुळे गजराची सोय आली, कॅलक्युलेटर आले, बँका आल्या, रस्ता दाखवायची यंत्रणा आली, काही प्रमाणात वैद्यकीय सेवा आल्या.. ही यादी वाढवता येईल तितकी वाढेल. यातील बरेचसे काही हे काल सरलेल्या वर्षांत घडले. आणि आज सुरू होणाऱ्या वर्षांत, त्यानंतर सुरू होणाऱ्या दशकात यातील सर्व काही बदलेलच बदलेल. पण शक्यता ही की खुद्द मोबाइल फोनच बदलेल. आता तो बाळगावा लागतो, दिवसातून किमान एकदा तरी त्याची बॅटरी पुनरुज्जीवित करावी लागते आणि त्याची काळजीही घ्यावी लागते. पुढच्या दशकाचे मोबाइल कदाचित शरीरात आरोपण करता येण्याजोगे सूक्ष्म असतील आणि हाताच्या बोटांनीच ते वापरता येतील. पुढच्या दशकातील बालके ‘कराग्रे वसते लक्ष्मी..’ अशा श्लोकाऐवजी न जाणो ‘कराग्रे वसते मोबाइल..’ असे म्हणू लागतील.

मानवी चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आताही तसे विकसित झालेले आहेच. चीनसारख्या देशाने तर सार्वजनिक ठिकाणी ही यंत्रणा तनात केली असून त्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा कोणताही पर्याय नाही. ही चेहरे शोधक यंत्रणा आणि सरकारी खात्यात जमा असलेली ‘आधार’सारखी आपली माहिती या जोरावर चीनमध्ये कोण कधी कोठे होता हे सारे सरकारला समजून घेणे कमालीचे सोपे झाले आहे. त्यामागचा विचार हा की राजकीय निदर्शने आदी मार्ग चोखाळण्याची सोयही नागरिकांना उपलब्ध राहू नये. या तंत्रज्ञानात भयावह ताकद आहे आणि तिचा उपयोग विधायक कारणांपेक्षा विघातक कारणांसाठीच अधिक आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान जन्मास घालणाऱ्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शहराने त्यावर बंदीच आणली आहे. आगामी दशकात या तंत्राचा विकास इतका होईल की त्यासाठी कॅमेरे लावायची गरजच राहणार नाही. अवकाशातील उपग्रहाचे कॅमेरेदेखील हे काम लीलया करू शकतील. तेव्हा आपले खासगीपण २०३० पर्यंत अधिकच आकसणार हे नक्की.

नव्या दशकाची चर्चा सुरू असताना ही चिंता अनेक शास्त्रप्रेमींच्या मनी असणार. अनेक आघाडय़ांवर यास सुरुवात झाली आहे. छानच म्हणायचे हे सगळे. फक्त आपल्यासारखे अनेक या साऱ्यास किती तयार आहेत ही चिंता तेवढी आहे. नवे दशक काहींच्या मते आज उजाडले नसून ते २०२१ साली उजाडेल. संख्यामोजणीची पद्धत कोणतीही असो.. बदल होणार आहेत हे निश्चित. पुढील दहा वर्षांची ही ‘दशकक्रिया’ मानवी संस्कृतीसाठी संपूर्ण नाही तरी सुफळ होवो अशी शुभेच्छा आजच्या दिवशी देणे इतकेच काय ते आपल्या हाती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 3:48 am

Web Title: editorial page steve jobs eyeball air bnb alexa differences akp 94
Next Stories
1 सांगे ‘वडिलां’ची कीर्ती..
2 घोषणासूर्य
3 हे वर्ष तुझे..
Just Now!
X