विशिष्ट आजार झाला, म्हणून एखाद्याशी सगळे संबंध तोडून टाकून त्याच्यावर मानसिक अत्याचारही करायचे, याला काय म्हणावे? 

पिढय़ान्पिढय़ांच्या मानसिकतेमुळे तर आपण असे वागत नाही ना, याचा विचार सुजाणपणे करायला हवा.

माणसाने समूहाने राहण्याचा निर्णय केला, त्याला भीती हे एक मोठे कारण होते. येणाऱ्या कोणत्याही संकटाला एकटय़ाने सामोरे जाण्यापेक्षा समूहाने ते संकट परतवून लावणे अधिक शक्य असल्याचे त्याच्या लक्षात येण्यासाठी त्याच्या मेंदूची वाढही बऱ्यापैकी झालेली असणार. पण याच मेंदूच्या वाढीने त्या माणसाच्या मनात एकमेकांबद्दल असूया, द्वेष, राग अशा अनेक रिपुंचाही वास सुरू झाला आणि माणसामाणसांमधल्या सामाजिक भिंती दिवसेंदिवस अधिकच दणकट होऊ  लागल्या. मग एकमेकांबद्दलचा राग समूहाने काढला जाऊ  लागला आणि बहिष्काराच्या अस्त्रालाही धार चढू लागली. करोनाच्या निमित्ताने ही अस्त्रे परजून बाहेर काढणाऱ्यांच्या मनातला हा आजार रस्त्यावरही दिसू लागला. कोणाला काही आजार जडणे यात त्याची ती काय चूक? संसर्गाने एखाद्याला रोगाची लागण झाली, तर त्याला त्याच्या घरातही राहू न देण्याचा अगोचरपणा समूहाने करावा, हे केवळ भयंकर. करोनाची लागण झालेल्या रुग्णास रुग्णालयातच स्वतंत्र कक्षात राहण्याची सक्ती केली जाते. परंतु ज्या व्यक्तीला लागण झाली नाही, मात्र होण्याची काही अंशी तरी शक्यता आहे, अशांना त्यांच्या घरीच स्वतंत्रपणे राहण्याची सूचना आणि सक्तीही केली जाते. पुण्यामुंबईत मोठाल्या घरांमध्ये समूहाने राहणाऱ्या नागरिकांना मात्र त्यांच्या सोसायटीत अशा व्यक्तींना त्यांच्या घरातही प्रवेश नाकारण्याचा उद्धटपणा करण्याचे सुचते. मुंबईतील घाटकोपरमधील गृहरचना संस्था काय किंवा पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील संस्था काय, दोन्हीकडे माणसांची प्रवृत्ती एकच आणि आपल्याच शेजाऱ्याकडे तो रुग्णसदृश होताच पाहण्याची नजरही तीच विषारी आणि स्वार्थीही. ‘आमच्या घरात लहान मुले आहेत, तुम्ही दहा घरी कामाला जाता, तेव्हा आजपासून आमच्याकडे कामाला येऊच नका’, असे कामवाल्या बाईंना स्पष्टपणे सांगणाऱ्यांना आपण काही चुकतो आहोत, याचे भानही असत नाही. कारण तीच त्यांची मूळ स्वभावप्रवृत्ती असते.

अमेरिकेहून परतलेल्या एका युवकाला विमानतळावर तपासणी करून घरी जाण्याची परवानगी मिळाली, तरीही तो जेव्हा घराच्या दारात पोहोचला, तेव्हा तुम्हाला करोनाची लागण झालेली नाही, याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा थेट आदेश सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आपल्याला काहीही झालेले नाही. तरीही आपण स्वत:हून स्वतंत्रपणे राहू इच्छितो, असे सांगूनही त्या पदाधिकाऱ्यांना पाझर फुटत नाही. ज्या कुणाला लागण झाली आहे, तो विमानतळावरून थेट रुग्णालयात जातो आणि ज्याला होण्याची शक्यता आहे, त्याला विलग राहण्याचे सांगतानाच त्याच्या मनगटावर तसा शिक्काही मारला जातो. आपण रुग्णालयातही नाही आणि आपल्याकडे तसा शिक्काही नाही, असे समजावून सांगता सांगता त्या युवकाची अक्षरश: दमछाक झाली. तरीही पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या ‘सुरक्षे’साठी त्या युवकाला हाकलून लावले. अशा घटना पुन्हा पुन्हा घडतात, तेव्हा शेकडो वर्षांच्या भारतीय मानसिकतेतच या वाळीत टाकण्याच्या परंपरेचे मूळ असले पाहिजे, असे लक्षात येते. माणसांच्या मनातील असे क्षुद्र विचार त्याला समाजातील सामान्य व्यवस्थेचाही विसर पाडतात आणि तो त्याच्या मूळ पदावर येऊन थांबतो. परदेशातून येणाऱ्यांनी या सोसायटीत प्रवेश करू नये, असा फलक लावण्यापर्यंत त्याची मजल जाते. करोनाची लागण होणे हे जणू त्या व्यक्तीचेच पाप आहे, असे त्याला पुन्हा पुन्हा बजावून सांगणे, हे समाज म्हणून आपण अजूनही किती मागासलेले आहोत, याचेच निदर्शक.

असे वाळीत टाकणे काही आत्ताच घडते आहे, असे नाही. त्यालाही दीर्घ परंपरा आहेच. अगदी संत ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांनाही त्यावेळच्या समाजाने वाळीत टाकून त्यांचा जगण्याचा अधिकारही काढून घेतला. माणसामाणसातला भेद संपवण्याचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाला या अशाच बहिष्काराचा सामना करावा लागला. ज्या पुण्यात राज्यातील करोनाचा पहिला रुग्ण सापडला, त्याच पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेलाही असाच विरोध झाला. हा विरोध केवळ बहिष्कारापुरताच सीमित राहिला नव्हता, तर जोतिबांच्या अंगावर शेण टाकण्यापर्यंत त्यावेळच्या समाजाची मजल गेली होती. याच पुण्यात लोकमान्य टिळकांना प्रायश्चित्त घ्यायला लावणारीही मंडळी होती. एवढेच काय, लहान वयात लग्न होऊन पौगंडावस्थेत येण्याआधीच वैधव्य भाळी आलेल्या मुलींना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा घेतलेले महर्षी धोंडो केशव कर्वे आणि कुटुंब नियोजनाचा प्रचार आणि प्रसार करणारे त्यांचे चिरंजीव रघुनाथराव यांनाही त्या काळातील समाजाने अक्षम्य वागणूक दिली. त्यांना मोकळा श्वासही घेता येणार नाही, अशी कठोर व्यवस्था करणाऱ्या त्या समाजातील पुढच्या पिढय़ांना हा बहिष्काराचा वारसा असा परंपरेनेच मिळालेला आहे.

माणसाचा हा क्षुद्र स्वभाव त्याला प्राणिमात्रांपासून आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुरेसा असतो. विशिष्ट आजार झाला, म्हणून त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकून त्याच्यावर जे मानसिक अत्याचार केले जातात, त्याची संभावना निर्लज्जपणा अशीच करायला हवी. अशा समाजात कुष्ठरुग्णांनाही समाजापासून वेगळे राहण्याची शिक्षा मिळते. बाबा आमटे यांच्यासारख्या संवेदनशील माणसाला या शिक्षेचे दु:ख समजते आणि तो या कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्थाच उभी करण्यात आपले सगळे आयुष्य वेचतो. पण तरीही आपला समाज त्याकडे केवळ कौतुक म्हणूनच पाहतो. बाबा आमटेंच्या मनातली ही ऋजुता आपल्या अंगी बाणवावी, असे मात्र त्याला कधीही वाटत नाही. शिवाशिव हा या समाजाला मिळालेला शाप आहे, त्यामुळे बाबा आमटे यांच्यासारखे आणखी कैक लोक आपल्या समाजात निर्माण होत नाहीत. विशिष्ट जातीत जन्माला येणे, हा गुन्हाच समजण्याची ही प्रवृत्ती भारतीय संस्कृतीत इतकी रुजली आहे, की या जातिभेदाने समाज सतत दुभंगलेलाच राहावा, अशीच व्यवस्था सतत निर्माण होत राहते. त्याला मोठय़ा प्रमाणात सक्रिय दुजोराही मिळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याविरुद्ध आयुष्यभर लढा दिला खरा; पण त्यांच्याही बाबतीत असेच घडले. त्यांच्यासारखे आणखी किती तरी आंबेडकर आज या देशाला हवे आहेत. परंतु या समाजव्यवस्थेत ते घडताना दिसत नाही.

अशा वातावरणात करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्यांच्या घरावरही बहिष्कार टाकणे यात कोणता शहाणपणा? त्यांची तपासणी करणे ठीक, पण त्यांनाही वाळीत टाकण्याचा अधमपणा नागपुरात घडला. त्या कुटुंबाला जाहीरपणे भेटण्यासाठी महापौरांनी जाणे, ही खरे तर कौतुकाची बाब. परंतु असे करण्यामुळे रुग्णाचे नाव आणि पत्ताही जाहीर होण्याची भीती त्यांच्या लक्षात आली नाही. परदेशातून ‘निष्कलंक’ होऊन आलेल्या युवतीच्या मदतीला पुण्यातल्याच एका सोसायटीतल्या सगळ्या रहिवाशांनी संपूर्ण मदतीचा हात देणे हेही तेवढेच समाधानाचे. अशा घटना तुरळक म्हणाव्यात एवढय़ाच. कायदा करून मनांमधल्या भिंती पाडून टाकता येत नाहीत. केवळ कायदा आहे, म्हणूनही अशा घटना कमी होत नाहीत, हे करोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे समाजाच्या मनात खदखदत असलेल्या या वाळीत टाकण्याच्या कल्पनेला मूठमाती देण्यासाठी आधी माणूसपण कमवावे लागेल. करोनाचे संकट दूर होईलही, पण समाजमनही विषाणूग्रस्त असल्याचे हे व्यवच्छेदक लक्षण पुसून टाकण्याएवढी आपली सामूहिक तयारी तरी  आहे का?