26 February 2021

News Flash

बेगमा आणि बेगमी

बांगलादेशातील ही निवडणूक लोकशाहीसाठी महत्त्वाची ठरेल ..  

बांगलादेशातील ही निवडणूक लोकशाहीसाठी महत्त्वाची ठरेल ..  

सलग जवळपास पाच वर्षे मानव्य विकास निर्देशांकात केलेली घसघशीत प्रगती, देशांतील गरिबीचे प्रमाण कमी करण्यात आलेले लक्षणीय यश, वाढता रोजगार, कृषी उत्पादनवृद्धी आणि महिलांच्या सबलीकरणातही झालेली चांगली प्रगती आणि या सगळ्यामुळे दारिद्रय़ावस्थेतून निम्न मध्यमवर्गाकडे झालेला प्रवास. परंतु त्याच वेळी सर्व संस्थात्मक रचना मोडीत निघालेली, विरोधकांची सार्वत्रिक आणि सर्रास धरपकड, विसंवादी सूर लावण्यास जवळपास असलेली मनाई आणि माध्यमांच्या मुंडय़ा मुरगळलेल्या, त्यामुळे एक प्रकारची एकाधिकारशाही. आपल्या शेजारी बांगलादेशाचे हे वर्तमान वास्तव. त्याची दखल घ्यावी असे कारण त्या देशातील सार्वत्रिक निवडणूक. आज, सोमवारी तिचा निकाल लागेल. १९७१ साली जन्मास आल्यानंतर निवडणुकांच्या मार्गाने सत्ताबदलाचा प्रयत्न करण्याची बांगलादेशाची ही ११ वी वेळ. दरम्यानच्या काळात लष्कराने दोन वेळा केलेला हस्तक्षेप या देशाचे तिसऱ्या जगातील अस्तित्व दाखवून देणारा. आशिया खंडातील बऱ्याच देशांचे हे प्राक्तन म्हणता येईल इतके सत्य. यापैकी अनेक देशांनी आर्थिक प्रगती साध्य केलेली परंतु विकसित देश म्हणवून घेण्याकडे मात्र त्यांचा प्रवास रोखला गेलेला. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे अर्थातच या देशांत मागे पडलेली – वा पाडली गेलेली – संस्थात्मक रचना. बांगलादेशातील निवडणुकांच्या तोंडावर हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून बांगलादेशीय नागरिक या निवडणुकांत काय कौल देतात, हे पाहण्यासारखे असेल.

एका बाजूला आहेत सत्ताधारी पंतप्रधान आणि अवामी लीग या पक्षाच्या सर्वेसर्वा बेगम शेख हसीना आणि दुसरीकडे त्यांना कसेबसे आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे तुरुंगवासी, गलितगात्र, रुग्णशय्येवरच्या बेगम खलिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीची दीड डझनभर पक्षांची आघाडी. गेली जवळपास चार दशके या देशांतील राजकारण हे या दोन बेगमांभोवतीच फिरत राहिले. त्यातील गेले एक दशकभर सत्तेत आहेत अवामी लीगच्या बेगम शेख हसीना. सत्तेवर आल्या आल्या त्यांनी पहिले काम हाती घेतले ते विरोधकांचे कंबरडे मोडण्याचे. त्यात त्या अत्यंत यशस्वी झाल्या. अर्थात यात खलिदा झिया यांच्याविषयी सहानुभूती बाळगावी असे काही नाही. कारण खलिदा झिया यांची राजवट म्हणजे बजबजपुरी होती आणि भ्रष्टाचार हेच समांतर सत्ताकारण बनले होते. त्यांचे चिरंजीव तारिक रेहमान प्रत्येक सरकारी व्यवहारात हात मारत. या व्यवहारांसाठी ते किती बदनाम होते ते अमेरिकेच्या त्या देशातील राजदूताच्या विकिलीक्स तपशिलावरून समजते. या रेहमानच्या हाती घसघशीत वजन ठेवल्याखेरीज सरकारात कोणाचेही कामच होत नाही, असे अमेरिकी राजदूताने मायदेशी कळवले होते. सत्ताधीशांची अशी बजबजपुरी ही नेहमीच हुकूमशाहीसाठी पहिली पायरी ठरते.

बांगलादेशात तेच झाले. बेगम झिया यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आरोळी ठोकत बेगम हसीना यांनी बीएनपीविरोधात मोहीम उघडली. भ्रष्टाचार हा जनसामान्यांसाठी नेहमीच हेवायुक्त आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. त्याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे मोठय़ा प्रमाणावरील नागरिकांचा तो नैतिक आधार असतो आणि दुसरे म्हणजे आपल्या सर्व विवंचनांसाठी त्यांना सत्ताधीशांच्या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवता येते. याचा फायदा या विरोधात हाळी देणारे नेहमीच उचलतात आणि यशस्वी ठरतात. तथापि भ्रष्टाचाराविरोधात तार स्वर लावणारे सत्तेवर आल्यावर काही संस्थात्मक उभारणी करतात असे नाही. त्यामुळे व्यवस्थेत सुधारणा होतच नाहीत. इतिहास असा की भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेऊन सत्तेवर येणारे तशा भ्रष्टाचाराच्या अधिकारांचे केंद्रीकरण करतात आणि त्याचा बोभाटा होणार नाही, याची योग्य ती दक्षता घेतात. तिसऱ्या जगात हे असेच होत आले आहे आणि बांगलादेशातही तेच झालेले आहे. या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून शेख हसीना यांनी आपल्या पूर्वसुरींना सर्रास तुरुंगात डांबले. त्यांची दमनशाही इतकी की त्यामुळे त्यांच्या विरोधात ब्र काढण्याची कोणाची हिंमत नाही. अशा तऱ्हेने आपल्या विरोधात कोणी बोलणारे उरणार नाही, याची निश्चिती केल्यानंतर शेख हसीना यांनी ताकदीने अर्थव्यवहारास गती दिली. गुंतवणूक वाढेल असे प्रयत्न केले आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाच्या प्रतिमासंवर्धनासाठी ठाशीव पावले उचलली. त्याचे फळ म्हणजे बांगलादेशाने दरिद्री देशांच्या वर्गवारीतून मध्यम उत्पन्न देशांच्या गटाकडे सुरू केलेला दमदार प्रवास. हे श्रेय शेख हसीना यांचे. त्यांचे हे यश इतके नेत्रदीपक आहे की पाकिस्तानचे नवखुरे पंतप्रधान जनाब इम्रान खान यांनाही त्या देशाच्या प्रगतीबद्दल चार शब्द बरे बोलावे लागले.

अशा तऱ्हेने या प्रगतीच्या जोरावर बेगम हसीना यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळावी यासाठी आपले सर्वस्व पणास लावले आहे. हे विधान शब्दश: खरे. म्हणजे त्यांनी निवडणुकांच्या तोंडावर विरोधक वा विरोधक भासतील अशा सर्वाची गठडी वळून त्यांना तुरुंगात डांबले. अशा देशांत निवडणुकांच्या तोंडावर हिंसाचार होतोच होतो. गेल्या दोन आठवडय़ांत अशा हिंसाचारात डझनभराहून अधिकांनी प्राण गमावले. हिंदू घरांवरही हल्ल्याचे प्रकार घडले. वातावरण असे की सरकारी दडपशाही असूनही मुख्य निवडणूक आयुक्त नूरुल हुडा यांना या वाढत्या दमनसत्राविषयी चिंता व्यक्त करावीशी वाटली. या वातावरणाचाच परिणाम म्हणूनही असेल परंतु निवडणूक आयोगाने ऐनवेळी जमाते इस्लामी या पक्षावरील बंदी उठवून निवडणुका लढवण्याची अनुमती दिली. वास्तविक धर्माधतेच्या कारणांवरून या पक्षास निवडणूक व्यवहारातून गेली काही वर्षे बहिष्कृत केले गेले होते. परंतु यंदा हा पक्ष निवडणुकीच्या मैदानात असेल आणि तुरुंगवासी बेगम झिया यांच्या व्यापक विरोधी आघाडीच्या वतीने निवडणूक लढवेल. तुरुंगवासी बेगम झिया यांना पक्षाघाताच्या आजाराने अपंग केल्याची बोलवा आहे. त्यांचे चिरंजीव रेहमान हे अटकेच्या भीतीने लंडनवासी झाले आहेत. अशा परिस्थितीत विरोधकांचे नेतृत्व करीत आहेत ते कमाल हसन हे त्या देशातील विख्यात विधिज्ञ. जातिया औक्य फ्रंट या नावाने विरोधकांची एकजूट असून तब्बल २० पक्ष या आघाडीत आहेत.

ही आघाडी जन्मास आली नव्हती तोपर्यंत निवडणुकांकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. कारण विद्यमान पंतप्रधान बेगम हसीना यांना तोपर्यंत आव्हानच नव्हते. तथापि ही आघाडी मैदानात उतरली आणि पाहता पाहता चित्र बदलले. त्या देशातील निरीक्षकांच्या मते आता पूर्वीसारखी एकतर्फी स्थिती नसून पंतप्रधान बेगम हसीना यांना कडव्या विरोधास तोंड द्यावे लागणार आहे. जनमताचा कौल अद्याप या पक्षास आहे किंवा काय हे पुरेसे स्पष्ट नाही. परंतु पंतप्रधान बेगम हसीना यांना विरोधी वाऱ्याचा सामना करावा लागत आहे, याबाबत सर्वाचे एकमत दिसते. त्याचमुळे पंतप्रधान हसीना अधिकाधिक आक्रस्ताळ्या वागू लागल्याचे मानले जाते. मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी विरोधकांवर कट केल्याचा आरोप करणे हे त्याचेच निदर्शक. विरोधक मतदानावर बहिष्कार घालतील अशीही भीती त्या व्यक्त करतात. पण त्यात तथ्य नाही. कारण बेगम झिया यांच्या पक्षाने तो खेळ एकदा करून पाहिला. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा परत जर त्या पक्षाने बहिष्कार घातला तर निवडणूक आयोगाकडून त्यांना बाद केले जाण्याचा धोका संभवतो.

बांगलादेशाच्या जातीय संसदेच्या – म्हणजे पार्लमेंट – ३०० जागांसाठी ही निवडणूक होईल. अनेक पक्ष रिंगणात असले तरी ही लढाई प्रामुख्याने असेल ती दोन बेगमांत. तिच्या निकालांतून लोकशाहीची बेगमी होते किंवा काय, हे पाहायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:15 am

Web Title: election in bangladesh
Next Stories
1 लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..
2 न मोडलेले जोडणे
3 धडाडी की दांडगाई?
Just Now!
X