19 February 2019

News Flash

सकारात्मक ढेकर!

वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या क्रमवारीतील आपल्या देशाचा क्रमांक घसरला अशा ‘नकारात्मक’ वास्तवाकडे लक्ष न दिलेलेच बरे..

वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या क्रमवारीतील आपल्या देशाचा क्रमांक घसरला अशा ‘नकारात्मक’ वास्तवाकडे लक्ष न दिलेलेच बरे..

गेल्या गुरुवारी जगभरात वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांपासून विविध राष्ट्रप्रमुखांपर्यंत अनेकांनी हे स्वातंत्र्य झिंदाबाद राहो अशी मनोकामना व्यक्त केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. स्वतंत्र माध्यमांमुळेच लोकशाही भक्कम होते असे ते म्हणाले. ते नेहमीप्रमाणे खरेच बोलले. वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या जागतिक क्रमवारीत आपल्या देशाचा क्रमांक या वर्षी दोन अंकांनी घसरला. तो १३८व्या स्थानी आला म्हणून काय झाले? पाकिस्तान तर आपल्याखालीच आहे. एका क्रमांकाने. आणि बांगलादेश? तो १४६व्या क्रमांकावर आहे. तेव्हा आपण घसरलो म्हणून एवढे बिचकून जाण्याचे कारण नाही. पंतप्रधानांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची आवश्यकता व्यक्त करतानाच त्याचे रक्षण करण्यासाठी समाजमाध्यमांतील असंख्य व्यक्तींच्या भरीव योगदानाची भरभरून दखल घेतली. मोठीच गोष्ट ही. तिचेही स्वागत केले पाहिजे. अर्थात वृत्तपत्रस्वातंत्र्याबाबत बांधिलकी व्यक्त करणाऱ्यांत केवळ त्यांचाच समावेश होता असे नव्हे. पृथ्वीगोलावरील असे एकही राष्ट्र नाही, की ज्याच्या प्रमुखांचे याबाबत दुमत आहे. तेव्हा त्यांच्या संदेशांवर सर्वानीच संतोष व्यक्त केला पाहिजे. अशा प्रकारे समाधानी राहणे ही एक साधना आहे. ती ज्यांना साधते ते नेहमीच आनंदी राहू शकतात. तो आनंद महत्त्वाचा. मात्र त्याकरिता काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते, काही बाबी विसराव्या लागतात. उदाहरणार्थ वृत्तपत्रस्वातंत्र्य दिनाच्या तीनच दिवस आधी काबूलमध्ये झालेला बॉम्बहल्ला.

अफगाणिस्तानसारख्या देशातील बॉम्बहल्ले, हत्या, तेथील धर्मप्रधान व्यवस्थेकडून नागरिकांवर घालण्यात आलेली बंधने, त्यांचे पालन न केल्यास देव, देश अन् धर्मासाठी लढत असलेल्या वीरांकडून केले जाणारे अत्याचार या गोष्टींकडे आपण एरवीही दुर्लक्षच करतो. एकदा देशात तालिबानसारख्या धर्मनिष्ठांची चलती असल्यानंतर अशा गोष्टी या स्वाभाविकच असतात. तेव्हा गेल्या सोमवारी तेथे झालेल्या बॉम्बहल्ल्याची फारशी दखल घेण्याची गरज नाही. आयसिस आणि तालिबान या दोन दहशतवादी संघटनांनी त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनांचे वैशिष्टय़ हे की त्यांना विरोध करणाऱ्या अनेकांची महत्त्वाकांक्षा मात्र त्यांच्यासारखेच बनणे ही असते. तर अशा या संघटनांनी काबूलमध्ये ते दोन स्फोट घडवून आणले. पहिला स्फोट होताच त्याचे वार्ताकन करण्यासाठी तेथे तातडीने पत्रकार आणि वृत्तछायाचित्रकार धावले. त्यांच्या घोळक्यात, बहुधा छायाचित्रकाराच्या वेशात एक मानवी बॉम्ब घुसला. पुरेसे पत्रकार जमा झाल्याचे पाहून त्याने स्वत:स उडवून दिले. नऊ  पत्रकार मारले गेले त्यात. त्याच दिवशी काबूलमध्ये अन्यत्र बीबीसीच्या एका पत्रकाराला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. एका दिवशी एका शहरात दहा पत्रकारांची हत्या करण्यात आली. ही घटना आपल्याला विसरावीच लागेल. भारतात यंदा आतापर्यंत तीन पत्रकारांना ठार मारण्यात आले. गतवर्षी ही संख्या ११ होती. हे सारे आपण जसे कानाआड केले, तसेच याकडेही काणाडोळा करावा लागेल. अन्यथा त्यातून काही भलतेच प्रश्न निर्माण होतील. उदाहरणार्थ पत्रकारांना का मारण्यात येते? वृत्तपत्रस्वातंत्र्य नको असते का त्या मारेकऱ्यांना?

तर ते तसे नाही. वृत्तपत्रस्वातंत्र्याला आपला, आपल्या नेत्यांचा, त्यांच्या संघटनांचा.. सर्वाचाच बिनशर्त पाठिंबा असतो. पण अट एकच असते, की वृत्तपत्रांनी या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेता कामा नये. त्यांनी नि:पक्षपाती आणि सकारात्मक असले पाहिजे. समाजाच्या हिताचे तेवढे सांगितले पाहिजे. योग्यच आहे ते. आपल्या मराठी पत्रकारितेपुरते बोलायचे झाल्यास, तत्कालीन सत्तेविरोधात ठाम उभे राहण्याची देदीप्यमान परंपरा आहे तिला. परंतु आजची पत्रे अगदीच परंपराहीन झाली आहेत. त्यातील काही पत्रे तशी रुळावर आणण्यात आली आहेत. परंतु काहींनी अगदीच ताळतंत्र सोडलेले दिसते. लोकांचा पक्ष घेतानाच नि:पक्षपातीपणा जपणे हे त्यांना जमतच नाही. परिणामी ही पत्रे थेट व्यवस्थेच्या विरोधात उभी राहतात. त्या-त्या वेळी सत्तेवर जो असेल, त्याला प्रश्न विचारतात. वस्तुत: जेव्हा ‘आपले’ सरकार सत्तेवर असते, तेव्हा त्याला प्रश्न विचारायचे नसतात. प्रश्न विचारले तर त्याला नकारात्मकता म्हणतात. वृत्तपत्रांनी सतत सकारात्मकतेची लालीपावडर लावून सजले पाहिजे. सत्तेला आरसा दाखविणे याला काही सकारात्मकता म्हणत नाहीत. त्याला बकवास बातम्या पेरणे म्हणतात आणि ते पेरणाऱ्यांना वृत्तवारांगना. फार त्रास होतो लोकशाहीला याचा. फार काय, हिटलरलासुद्धा या बकवास बातम्यांचा त्रास सहन करावा लागला होता. आपल्या सरकारविरोधात नकारात्मक बातम्या देणाऱ्या पत्रांना त्याने छान नाव ठेवले होते – ‘ल्युगनप्रेस’. म्हणजे खोटे बोलणारी माध्यमे. ती सरकार वा व्यवस्था जे सांगत असते, त्याविषयी सातत्याने सवाल निर्माण करण्याचे काम करतात. परिणामी लोकमानसात नाना शंका-कुशंका निर्माण होतात. ज्या देशात सत्ताधीश आणि राष्ट्र यांतील द्वंद्व संपलेले असते, तेथे तर अशाने बिकटच परिस्थिती निर्माण होते. हे टाळायचे असेल, तर बकवास बातम्या आणि वृत्तवारांगना यांना संपवावेच लागते. किमान त्यांना लेखनलकवा येईल अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. त्यासाठी त्यांच्या अंगावर जल्पक अर्थात ट्रोल्सनामक शब्दमारेकरी सोडावे लागतात. असे केले, की ही पत्रे लगेच वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला असा बकवा करू लागतात. परंतु वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्याकडे आपण लक्ष न दिलेलेच बरे. लक्ष दिले तर भलतेच प्रश्न पडू शकतात, की नकारात्मक खोटय़ा बातम्या म्हणजे काय?

त्याची साधी कसोटी आहे. आपला प्रिय विचार, नेता, पक्ष, संघटना, धर्म, जात, पंथ यांच्या विरोधात जे जे वृत्त प्रसिद्ध होते ते ते सारे ‘फेक’. नाण्याला असलेली दुसरी बाजू ‘फेक’. सरकारी सत्याच्या विरोधात जाते ते सारे ‘फेक’. एकदा का बकवास बातमी म्हणजे काय हे अशा रीतीने सुस्पष्ट झाले की मग वृत्तपत्रस्वातंत्र्याचा प्रश्नच कुठे उरतो? अशी ‘बनावट वृत्ते’ देणारी माध्यमे स्वातंत्र्याची हक्कदार असूच शकत नाहीत. शासकीय वरवंटा, जल्पकांची शिवीगाळ, त्यानेही भागले नाही तर बंदुकीची गोळी हेच त्यांचे भागधेय उरते. काबूलमध्ये आयसिसच्या धर्मनिष्ठांनी आणि राष्ट्रवीरांनी तेच केले. त्यांनी पत्रकारांना संपविले. विरोधी विचार संपवून, आपल्या सत्याची प्रतिष्ठापना करण्याचा हाच उत्तम मार्ग. तो त्यांनी चोखाळला. तो सर्वत्र चोखाळला जातो. परंतु आपण त्याचा विचारही न करणे हेच उत्तम. विचार केल्यास प्रश्न पडू लागतील, की अशाने लोकांपर्यंत खरी माहिती कशी पोचेल?

पण लोकांनी माहितीची उठाठेव करावीच कशाला? त्यांनी सरकारी व्यवस्थेवर विश्वासच ठेवायचा असतो. ‘वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणारे’ समाजमाध्यमवीर त्यासाठीच नेमलेले असतातच. शिवाय सरकारी-नि:पक्षपाती माध्यमे असतातच. ती सकारात्मक बातम्या देतात. बकवास बातम्या छापणाऱ्यांविरुद्ध तुटून पडतात. सरकारच्या मांडीवर बसून असा स्वतंत्र बाणा जपणे हे काही सोपे नसते. सतीचे वाणच ते. तथ्यांचा, विवेकाचा, सभ्यतेचा, पत्रकारितेचा बळी देऊनच ही स्वातंत्र्यदेवता प्रसन्न करवून घेतलेली असते त्यांनी. एकदा ती प्रसन्न झाली, की मग मात्र प्रसाद-पंचामृताला तोटा नसतो. त्यात सामान्य नागरिकांचाही फायदाच असतो. त्यांना ‘आवश्यक’ आणि ‘बिन-फेक’ तेवढीच माहिती छान गाळून, चमकदार कागदात गुंडाळून मिळते. त्यांनी ती पचवावी आणि सकारात्मक ढेकर द्यावा. आज जगभरात अशीच ‘स्वतंत्र माध्यमे’ भलतीच वाढत आहेत. अशा वेळी वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या क्रमवारीतील आपल्या देशाचा क्रमांक घसरला, पत्रकारांचे खून पडले, काबूलसारख्या ठिकाणी स्फोटात पत्रकार मारले गेले.. या ‘नकारात्मक’ बातम्यांना खरोखरच काही अर्थ राहात नाही. सकारात्मक ढेकर देण्यात उलट त्याचा अडथळाच.

First Published on May 5, 2018 2:46 am

Web Title: fake news in india