कथा-कादंबरी ऐतिहासिक व्यक्तीवरील असली तरी त्यात कल्पनेने रंग भरावे लागतातच. परंतु या कल्पनेलाही आधार अखेर वास्तवाचाच असला पाहिजे. इतिहासच समाजाच्या वर्तमान आणि भविष्याला आधार देत असतो. त्याच्याशी खेळ घातकच.

बाजीराव-मस्तानी या आगामी चित्रपटातील एका गीतावरून सध्या वादाचा िपगा उठला असून, इतिहासाचा अपलाप हा त्यातील आक्षेपाचा मुद्दा आहे. तो योग्यच आहे. राजघराण्यातील आणि त्याही पेशव्यांच्या कर्मठ कुटुंबातील बायका अशा पद्धतीने नाचतील हे काही पटणारे नाही. तेव्हा त्यावर टीका ही होणारच. प्रश्न एवढाच आहे की अशी टीका करण्याचा हक्क एक समाज म्हणून आपल्याला उरलेला आहे का? एखाद्या कलाकृतीत ऐतिहासिक सत्याला बाधा आली, वस्तुस्थितीचा विपर्यास झाला म्हणून आपण त्याला विरोध करू शकतो. पण तसा नतिक हक्क एक समाज म्हणून आपल्याला राहिला आहे का, हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे आपली एकूणच इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी.
या ठिकाणी आपली दृष्टी असे जेव्हा म्हटले आहे तेव्हा त्यात अर्थातच इतिहासतज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक यांचा समावेश नाही. कारण एक तर अशी मंडळी ही नेहमीच अल्पसंख्य असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची इतिहासाकडे पाहण्याची नजर वेगळी असते/असावी असे मानले जाते. किंबहुना त्यांचा इतिहास आणि सर्वसामान्यांचा इतिहास या दोन गोष्टीच आहेत की काय असे वाटावे अशी अनेकदा परिस्थिती असते. आपल्या दृष्टीने इतिहास म्हणजे जुन्या राजे-रजवाडय़ांच्या कथा-कहाण्या आणि आख्यायिका. आपण मराठीजन तर इतिहासात एवढे दूरवरही जात नाही. आपल्या दृष्टीने महाराष्ट्राचा इतिहास सुरू होतो तो छत्रपती शिवाजी महाराजांपासून आणि संपतोही त्यांच्यापाशीच. मराठय़ांच्या त्या इतिहासपर्वातच आपण रमतो. त्याच्या पलीकडे महाराष्ट्राला भलाथोरला इतिहास आहे आणि तो थेट सातवाहनांपर्यंत आणि त्याच्याही आधी जाऊन पोचतो हे अनेकांच्या गावीही नसते. पाठय़पुस्तकांत वाचलेला शिवरायांचा इतिहास आपल्याला पुरतो. हे इतिहासाच्या बाबतीतच घडते असे नव्हे. भाषा, संस्कृती याबाबतीतही आपण लघुदृष्टीचेच आहोत. हालसातवाहनाची गाथासप्तशती हा आद्य मराठी ग्रंथ. महाराष्ट्रातील तत्कालीन नागरी आणि ग्रामीण लोकजीवन उलगडून दाखविणारा हा ग्रंथ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात होऊन गेला हे फारसे कोणाला माहीतही नसते. कारण आपला भाषासंस्कृतीचा अभिमान ज्ञानेश्वरीपासून, फार फार तर लीळाचरित्रापासून सुरू होतो. आपण यांपासून अनेक कोस दूर असतो याचे कारण आपल्या समाजाच्या गुणसूत्रांतच इतिहासाचे भान अभावानेच आढळते असे म्हणावे लागेल. आपणांस कहाण्या प्रिय. त्यातून होणारे रंजन प्रिय. इतिहास हा तसा रूक्ष विषय. तेथे पुराव्यांना महत्त्व. इतिहास सांगताना ते द्यावे लागतात. त्या भानगडीत पडण्यापेक्षा त्याचे पोवाडे गाणे केव्हाही चांगले. त्यात हव्या तशा कल्पनेच्या भराऱ्या मारता येतात. मराठीतील तथाकथित ऐतिहासिक लेखनाला ही पोवाडय़ांची परंपरा चांगलीच मानवली आहे. मराठीचा पद्यातून गद्यात विकास झाला आणि आपल्याकडे बखर वाङ्मय अवतरले. पण आपल्या बखरींनीही पोवाडय़ांचीच कास धरली. वस्तुस्थिती, पुरावे तपासून पाहण्याची सक्ती त्यांनीही पाळली नाही. त्यातही कल्पनेच्या भराऱ्या वा ऐकीव आख्यायिका यांचीच भरताड. याचे एक उदाहरण म्हणून मल्हार रामराव चिटणीसाची बखर सांगता येईल. शिवरायांच्या चरित्र साधनांत ही बखर सर्वात अविश्वसनीय मानली जाते. तरीही तिच्यावर विसंबून अनेकांनी संभाजी महाराजांना दुर्वर्तनी, मद्यासक्त आणि स्त्रीलंपट ठरविले. हीच गत कृष्णाजी विनायक सोहनींच्या ‘पेशव्यांची बखरी’ची. मस्तानीविषयी तेव्हा उठविण्यात आलेल्या कंडय़ा या बखरीत आढळतात. त्या सत्यापासून एवढय़ा लांब आहेत की त्या राजकन्येला त्यात चक्क वारयोषिता ठरविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या बखरीत छत्रसालाच्या या कन्येचे पितृत्व एका मुघल सरदाराला देण्यात आले आहे. असे करण्यामागे त्या बखरकारांचे उद्देश कोणते होते, हे आज सांगता येणे कठीण. ते काहीही असले तरी इतिहासाचे मात्र त्यांनी थोरले नुकसान केले. हा काही गिरवण्यासारखा कित्ता नाही. परंतु पुढील ऐतिहासिक कथा-कादंबऱ्या लिहिणारांनीही तीच वहिवाट कायम धरल्याचे दिसते. रणजित देसाई यांची श्रीमान योगी ही मराठीतील अत्यंत गाजलेली कादंबरी. पण ती लिहिताना ‘मी इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका, सारेच घेणार आहे,’ असे त्यांनी म्हटल्याचा उल्लेख त्या कादंबरीच्या कुरुंदकरकृत प्रस्तावनेतच आहे. असे असेल तर त्या कादंबरीतून खरा इतिहास तेवढाच मांडला गेला असे म्हणता येईल?
यातील वाईट भाग असा की अशा कथा, कादंबऱ्या आणि नाटके आणि त्यांवर आधारलेल्या चित्रपटांतून सांगितलेला इतिहास हाच खरा असे मानले जाते. शिवचरित्रातील भवानी तलवार, कल्याणच्या सुभेदाराची सून अशा घटना पुराव्यांवर न टिकणाऱ्या आहेत असे इतिहासकारांनी कितीही सांगितले तरी त्यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही. असा कल्पितालाच खरे मानणारा समाज आपल्या कथा-कादंबऱ्या आणि नाटकांनी तयार केला आहे. हे या काल्पनिक ऐतिहासिक वाङ्मयाचे पाप आहे. असे साहित्य समाजाच्या नतिक, वैचारिक धारणेसाठी आवश्यक असते हे येथे अमान्य करण्याचे कारणच नाही. येथे मुद्दा आहे तो या साहित्याची मर्यादा किती असावी हा. कथा-कादंबरी ऐतिहासिक व्यक्तीवरील असली तरी त्यात कल्पनेने रंग भरावे लागतातच. त्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक जागा मोकळ्या असतात. त्या भरून कलाकृतीला एकसंधत्व द्यायचे तर हे करणे आवश्यकच आहे. परंतु या कल्पनेलाही आधार अखेर वास्तवाचाच असला पाहिजे. अन्यथा तो केवळ करमणुकीचा ऐवज होतो. अशा साहित्यकृती आपल्याकडे पायलीला पन्नास मिळतील. खंत याचीच की त्यांना आक्षेप घेत समाज उठला आहे असे चित्र आपल्याकडे क्वचितच दिसले आहे. ते दिसले तेव्हाही त्याचा हेतू इतिहासाचे पावित्र्य जपणे हाच होता असे छातीवर हात ठेवून सांगता येणार नाही. अशा तथाकथित इतिहासावर मोठा झालेला समाज जेव्हा चित्रपटांत भवानीदेवी शिवाजी महाराजांच्या हाती तलवार ठेवताना पाहतो, तेव्हा त्या प्रसंगाला तो टाळ्याच वाजवतो. त्यातून शिवरायांच्या कर्तृत्वाला गौणत्व येत असते हे त्याच्या जाणिवेतही नसते. ते चित्रपटीय स्वातंत्र्य देण्यास आपण एका पायावर उभे असतो. आणि जर एका चित्रपटाला असे स्वातंत्र्य देण्यास आपण तयार असू तर दुसऱ्याला ते नाकारण्याचा आपल्याला नतिक अधिकारच उरत नाही. सारेच जर करमणुकीसाठी असेल तर मग कशासाठी कोणाला बोल लावायचा?
इतिहास हा ज्यांच्या करमणुकीचे साधन असते त्यांचा वर्तमानकाळ गोंधळलेला आणि भविष्यकाळ काळवंडलेला असणार यात काही शंका नाही. कारण इतिहासच समाजाच्या वर्तमान आणि भविष्याला आधार देत असतो. समाजाला एका धाग्याने बांधून ठेवत असतो. त्याच्याशी खेळ घातकच. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाच्या निमित्ताने ही बाब नीटच लक्षात घेतली पाहिजे. मात्र इतिहासाचे करमणुकीकरण केले म्हणून त्या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करणेही चूकच आहे. अशा करमणुकीला उत्तर गंभीर प्रतिवादानेच देता येऊ शकते. काशीबाई पायाने अधू असूनही कशा नाचतात, हा प्रश्न जसा त्या गाण्याच्या निमित्ताने विचारायचा असतो, तसाच त्यात मस्तानीसारख्या राजकन्येला आणि पेशवेपत्नीला एखाद्या कलावंतिणीप्रमाणे नाचताना कसे दाखविले, असा प्रश्नही विचारायचा असतो. त्यासाठी मूळ इतिहास- कथाकादंबरी वा चित्रपटांतून नव्हे, तर इतिहास ग्रंथांतून समजून घ्यायचा असतो. तो अभ्यास नसेल तर असे घेतलेले आक्षेपही हितसंबंधी आणि म्हणून समाजात करमणुकीचाच िपगा घालणारे ठरणार.