एकाच ताटात बसून खवय्यांच्या रसना तृप्त करणारे पदार्थ पुन्हा अस्मितावादात गुरफटविले, तर खाद्यसंस्कृतीचा तो अनादर ठरेल..

मुंबईच्या दादरमध्ये गेली अनेक दशके मराठमोळ्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या एका रेस्टॉरंटमधील ‘मिसळ’ नावाच्या अस्सल मराठमोळ्या पाककृतीला लंडनच्या ‘फूडी हब’ने एक मानाचा पुरस्कार दिला आणि तमाम मराठी माणसाची रसना खऱ्या अर्थाने तृप्त तृप्त झाली, मराठीपणाची अस्मिताही सुखावली. मिसळ हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा अस्मिताबिंदू असल्याने लंडनमध्ये मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल तमाम महाराष्ट्राची हृदये अभिमानाने फुलून यावीत हे योग्यच असले तरी त्याच वेळी आम्हाला यानिमित्ताने एक भलतीच शंका येऊ लागली होती. मुंबईच्या मिसळीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळत असेल, तर कोल्हापूरच्या मिसळीला काय वाटले असेल? मिसळीची खरी राजधानी असल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या नाशिकची मिसळ हे वृत्त वाचून थोडी जास्तच तिखट तर झाली नसेल? पुणेरी मिसळीच्या मटकीच्या उसळीचा रस्सा थोडे अधिकच पाणी काढून रडला तर नसेल?.. काही झाले तरी मिसळ ही महाराष्ट्राची अस्मिता आहेच, पण ती नाशिकची, कोल्हापूरची, पुण्याची की मुंबईची यावर एकदा साधकबाधक चर्चा होऊन या वादाचा सोक्षमोक्ष लागायला हवा, यात शंका नाही. कारण, लंडनच्या एखाद्या मराठमोळ्या उद्योजकाने उद्या त्याच्या रेस्टॉरंटमध्ये चमचमीत मराठमोळी मिसळ हा ‘महाराष्ट्रियन स्पेशालिटी’ म्हणून सादर केला, आणि तो खाण्यासाठी लंडनकरांची रीघ लागली, तर उद्या मराठमोळी मिसळ हाच लंडनच्या ‘अस्मितेचा ऐवज’ होण्याची भीती नाकारता येत नाही. तसे होण्याआधी, मिसळ नावाच्या या, मराठी संस्कृतीला तंतोतंत शोभेल अशा पदार्थावर महाराष्ट्राच्या मालकीचा शिक्का बसण्यात काहीच गैर नाही. उलट तो शिक्का शक्य तितका व्यापक करून उद्या होणारे वाद आजच टाळले पाहिजेत. कारण संकुचितपणे ‘हे आपलेच’ अशी अस्मिता आपण जपत बसलो तर वाद घडणारच आणि विकोपालाही जाणार, हे इतिहासातून आपण शिकले पाहिजे. आज गंमत म्हणून त्यावर चर्चा झडत असल्या, तरी उद्या हा वाद अस्मितांचा होऊन अगदी कावेरी किंवा कृष्णा पाणीवाटप तंटय़ाएवढा तीव्र होऊ शकतो.

हे सारे आठवायचे कारण म्हणजे, अलीकडेच तसेही वाद पेटले. ‘रसगुल्ला’ नावाचा, कुठेही मिळणारा एक मिठ्ठास पदार्थ बंगालचा की ओदिशाचा यावरून उफाळलेल्या वादापुढे बाकीचे अनेक वाद फिजूल होऊ पाहत होते. कर्नाटकचाच मानला जाणारा ‘म्हैसूर पाक’ कर्नाटकाचा की आणखी कुठला यावरही वाद उकरला जातो आहे. आता या प्रांताच्या सहिष्णुतेची कसोटी लागणार आहे. महाराष्ट्रात मात्र असा वाद झालेला नाही. याचे प्रमुख कारण हेच असावे की, मराठी खाद्यसंस्कृतीच्या अस्मितेचे अनेक मानिबदू सांगता येतात. पुरणपोळी, श्रीखंड, आणि आजकाल नाक्यानाक्यांवर दिमाखात विकला जाणारा वडापाव ही मराठी अस्मितेची अस्सल उदाहरणे आहेत. उद्या इंग्लंड-अमेरिकेतल्या एखाद्या फुटपाथवर कुणी ‘शिववडा’ या नावाने एखादी गाडी टाकलीच, तर तिकडे स्थायिक झालेल्या तमाम मुंबईकरांच्या जिव्हा पुन्हा पूर्वजांच्या खाद्यसंस्कृतीच्या अभिमानाने आणि देशाशी जोडले जाण्याच्या कृतार्थभावाने वडापावच्या गाडय़ांवर गर्दी करतील यात शंका नाही. आजपासून तब्बल आठ वर्षांपूर्वी- तो बहुधा २००९ मधील जून महिन्यातील एक दिवस होता.- दादरच्या शिवसेना भवनात ‘शिववडापाव’ नावाच्या, त्याआधी काही काळ औद्योगिकदृष्टय़ा मरगळलेल्या मराठमोळ्या अस्मितेवर नवचतन्याची फुंकर घालणाऱ्या एका अभूतपूर्व योजनेचा शुभारंभ झाला होता. वडापाव हा अस्सल मराठमोळा पदार्थ केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर मॅक्डोनाल्डच्या बरोबरीने लंडन, सिंगापूर, न्यूयॉर्क अशा जागतिक दर्जाच्या शहरांमध्ये नेण्याचा आपला प्रयत्न असेल आणि चमचमीत, झणझणीत, खमंग अशी ही अस्सल मराठमोळी खाद्यसंस्कृती साता समुद्रापार नेताना, ‘मराठी माणूस’ हाच तिचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ असेल अशी गर्जना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्या सोहळ्यात सेना भवनाच्या सभागृहातून केली, तेव्हा तमाम महाराष्ट्राची अस्मिता कमालीची सुखावली होती. एका अर्थाने, ‘वडापाव’वर मराठमोळेपणाचा शिक्का बसल्याने, वडापाव ही आमच्या प्रांताची अस्मिता आहे असा दावा करण्यास देशातील कोणतेही राज्य त्यानंतर आजतागायत धजावलेले नाही, हे त्या घोषणेचेच फळ असले पाहिजे. मराठी अस्मितेचे मानचिन्ह असलेला हा अस्सल पदार्थ तेव्हापासून साता समुद्रांच्या सीमा ओलांडण्याच्या प्रतीक्षेत नाक्यानाक्यांवरील गाडय़ांवरच्या कढईतील तेलात आनंदाने उकळतो आहे, म्हणून या पदार्थाची लज्जत दिवसागणिक वाढू लागली आहे. शेवटी अस्मितेला महत्त्व असते, ते असे! वडापावाच्या रूपाने जागृत झालेली मराठमोळी अस्मिता तेव्हापासून पुढे अशी मायेने जपली गेली नसती, तर आज वडापाव नावाच्या खाद्यसंस्कृतीच्या जन्मस्थानावरून प्रांतोप्रांती वादळे उफाळली असती आणि शेवटी, महाराष्ट्रात जन्माला येऊनदेखील भलत्याच एखाद्या प्रांताने त्याच्या जन्मदात्याचा मान उकळला असता.. तेव्हा कदाचित महाराष्ट्रीयांना मूग गिळून बसावे लागले असते.

मूग गिळण्याची ती वेळ आली नाही. पण मुगाची खिचडी सर्वानाच गिळावी लागणार असे दिसते.  खाद्यसंस्कृती ही संपूर्ण देशाच्या अस्मितेची ओळख असते, याकडे गेल्या काही वर्षांत सरकारी पातळीवर फारसे लक्षच दिले गेले नव्हते असे आमचे मत आहे. तसे नसते, तर राष्ट्रीय खाद्यपदार्थाची निवड याआधीच कधी होऊन गेली असती. मुळात, राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून एखाद्या पदार्थाची निवड करताना, समन्यायी असणे हे सरकारचे कर्तव्यच असते. म्हणजे असे, की कोणत्या एखाद्या पदार्थाची निवड केली, तर एखाद्याच कोणा विशिष्ट प्रांताच्या अस्मिता सुखावून जाव्यात आणि आपल्या खाद्यपदार्थास डावलले जात असल्याच्या भावनेने अन्य प्रांतांच्या अस्मिता दुखावाव्यात, हे योग्य ठरत नाही. मातेला ज्याप्रमाणे सारी मुले समान असतात, तसेच केंद्र सरकारचेही असले पाहिजे. त्याने राज्याराज्यांत दुजाभाव करू नये, अशी अपेक्षाच असते. यामुळेच, राष्ट्रीय खाद्यपदार्थ निवडताना असा कोणताही झुकलेपणाचा ठपका ओढवून घेतला जाणार नाही याचा विचार सरकार म्हणून करावाच लागतो. असे विचारमंथन अलीकडे सुरू झाले, हे अभिनंदनीयच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या खाद्यसंस्कृतीच्या अस्मितेला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. म्हणूनच, राष्ट्रीय खाद्यपदार्थाची निवड करताना, जो पदार्थ या स्पर्धेत आघाडीवर आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह उत्तरेकडील सर्व प्रांतांची अस्मिता खरोखरीच सुखावणार आहे.  ‘खिचडी’ या पदार्थाशी कुणा एका प्रांताचे नाते नाही ही चांगलीच बाब, पण राजकारणाशीही या पदार्थाने आपली जवळीक जोडलेली आहे हे अधिक महत्त्वाचे. तरीही दक्षिणेकडील राज्यांचा कल घेण्यासाठी जणू ही खिचडी आता थांबून राहिली आहे. आजकाल, खरे म्हणजे, प्रांतोप्रांतींच्या खाद्यसंस्कृतीने त्यांच्या प्रांतांच्या सीमा ओलांडलेल्याच आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये ‘साऊथ इंडियन’ आणि दक्षिणेकडील राज्यांत ‘नॉर्थ इंडियन फूड’ मिळणे ही काही आश्चर्याची बाब राहिलेली नाही. बंगालच्या मिठाया मुंबईच्या मराठमोळ्या घरांतही सणासुदीचे ताट सजवत असतात. प्रांतभेद विसरून एकाच ताटात शेजारी शेजारी बसून खवय्यांच्या रसना तृप्त करणारे हे पदार्थ पुन्हा अस्मितावादात गुरफटविले, तर खाद्यसंस्कृतीचा तो अनादर ठरेल. आपापल्या जाती-पोटजातींच्या अस्मिता आता ऊठसूट या ना त्या चित्रपटांवर आक्षेप घेताना दिसतात, तसे काही खाद्यपदार्थाबाबत झालेले नाही, हे भलेच!

तेव्हा, खाद्यसंस्कृतीच्या अस्मितेच्या नावाने भांडणे झाली, तरी सौख्याच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. खरे तर, प्रांतोप्रांतीच्या खाद्यसंस्कृतीने आपापल्या सीमा ओलांडून अस्मिता व्यापकच असायला हवी ती कशी, हे दाखवून दिले आहे.