आणीबाणीच्या आधी ७०च्या दशकात काँग्रेसविरोधी राजकारणात जम बसवण्यासाठी साधासात्त्विक जनसंघ प्रयत्न करीत असताना आधुनिक विचारांच्या तरुणांचा एक वर्ग राजकारणाकडे आकृष्ट झाला. या वर्गास काँग्रेसविषयी तिटकारा होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तसंमत राजकारणही नामंजूर होते. वैचारिकदृष्टय़ा हा वर्ग उजवा; पण एकारलेला अतिउजवेपणा टाळणारा. अरुण जेटली या वर्गाचे देदीप्यमान उदाहरण. जेटली यांच्या आगमनापर्यंत माध्यमांतील.. विशेषत: इंग्रजी माध्यमांतील, उजवा कोपरा रिकामा असे. उजव्यांच्या तुलनेत विचाररेषेच्या डावीकडचे, मग ते समाजवादी कळपातले अगदी जॉर्ज फर्नाडिस का असेनात, हे आपल्या चटपटीत भाषा आणि सादरीकरणामुळे माध्यमांच्या गळ्यातील ताईत बनले होते. त्या तुलनेत उजवे त्यांच्या संस्कृतोद्भव हिंदीमुळे अगदीच सपक आणि कंटाळवाणे वाटत. या काळात राजकीय क्षितिजावर अरुण जेटली यांचे आगमन झाले. उत्कृष्ट भाषा, वादविवादात अत्यंत सभ्य आणि संयतपणे आपला मुद्दा मांडण्याची हातोटी आणि सभामंडप वा चॅनेलीय चर्चात दोन हात करून बाहेर पडल्यावर ज्याच्यावर कडक टीका केली त्याच्या खांद्यावर हात टाकून मोकळ्या गप्पा रंगवण्याची हातोटी यामुळे जेटली हे भाजपचे उच्चभ्रू वर्गातील चेहरा बनले. आज त्यांच्या निधनाने भाजपने हा चेहरा आणि अन्य बरेच काही गमावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थेट संघ ज्यांना नको होता किंवा खरे तर झेपत नव्हता त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदी नेत्यांप्रमाणे जेटलीदेखील अभाविपच्या माध्यमातून राजकारणात आले. दिल्लीत विद्यार्थी राजकारणाची दोन प्रमुख केंद्रे. डाव्यांचे प्राबल्य असलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे जेएनयू आणि अभाविपचे आधिक्य असलेले दिल्ली विद्यापीठ म्हणजे डीयू. या विद्यापीठाचे श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स हे अभाविपच्या राजकारणाचे केंद्र. जेटली ते पत्रकार रजत शर्मा हे सारेच एके काळच्या या अभाविपच्या मांडवाखालून गेलेले. त्या वेळी राजकारण हे नफेखोरीचे केंद्र म्हणून ओळखले जायला सुरुवात व्हायची होती. त्यामुळे कर्तबगारांना पदोन्नती सहज मिळे. जेटली यांना तशी ती मिळाली. भाषा, नेतृत्वगुण आणि सर्वसमावेशक वृत्ती यामुळे जेटलींकडे संघटनेची सूत्रेच आली. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे भाजपचा राजकीय चेहरा होते आणि बाळासाहेब देवरस यांच्यासारख्या समंजस आणि सर्व विचारींशी सुसंवादी व्यक्तीकडे संघाचे प्रमुखपद होते. ‘त्यांची’ आणि आपल्या विचारविरोधींची वा टीकाकारांची आपल्याला गरजच नाही असे मानणाऱ्यांतले हे तिघेही नव्हते. त्यामुळे जेटलीसारख्यांचा उदय आणि प्रगती झपाटय़ाने झाली. राजकारणास हिंसक आणि असभ्य आक्रमकता यायच्या आधीचा तो काळ. त्याचमुळे ‘भाजपचे भविष्यातील नेतृत्व’ असे त्यांचे वर्णन अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. जेटली यांच्याबरोबरीने त्यांनी उल्लेख केला होता प्रमोद महाजन यांचा. पण भाजपचे.. आणि अर्थातच देशाचेही.. दुर्दैव असे की हे दोघेही कर्तृत्वाचे शिखर गाठण्याआधीच काळाच्या पडद्याआड गेले.

जेटली यांची कर्तृत्वक्षमता पहिल्यांदा ओळखली लालकृष्ण अडवाणी यांनी. तोपर्यंत दिल्ली अभाविपचे अध्यक्षपद, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण आंदोलनात सहभाग आणि आणीबाणीतील जवळपास १९ महिन्यांचा तुरुंगवास हे सारे जेटली यांचे उपभोगून झाले होते. एका बाजूने या राजकीय चळवळी सुरू असताना वकील या नात्यानेही जेटली आपले कर्तृत्व सिद्ध करू लागले होते. उत्कृष्ट वकिली कौशल्य आणि राजकीय जाण या दोन गोष्टी त्या वेळेस राजकीय यशाची हमी देणाऱ्या होत्या. जेटली यांना तशी ती मिळाली. १९९१ सालीच त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य केले गेले. तेव्हापासून अखेपर्यंत ते भाजपच्या या सर्वोच्च नेतृत्वगटाचे सदस्य होते. अडवाणी यांनी त्यांना जेव्हा मोठय़ा कामगिरीसाठी हेरले तेव्हा दिल्ली भाजप हा विजयकुमार मल्होत्रा किंवा मदनलाल खुराणा आणि तत्सम पलवानी नेत्यांसाठी ओळखला जात असे. त्या भाजपस आधुनिक चेहऱ्याची गरज होती. ते काम दोघांनी केले. एक जेटली आणि दुसऱ्या सुषमा स्वराज. हे स्थानिक राजकारणात एकमेकांचे स्पर्धक. एक महिन्याच्या आतच दोघांनी या संसारास अंतरावे हा विचित्र आणि दुर्दैवी योगायोग.

त्यात स्थानिक नेतृत्वगुण वा लोकप्रियतेत सुषमा स्वराज आघाडीवर होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळातही स्वराज यांना जेटली यांच्या आधी स्थान मिळाले. यामुळेही असेल किंवा जननेता होण्यातील आपल्या मर्यादांची जाणीव झाल्यामुळेही असेल जेटली हे पुढील काळात पडद्यामागील सूत्रधार राहिले. दिल्लीत राजीव गांधी यांच्याविरोधात बोफोर्सचा बागुलबुवा उभा करणारे जे काही आघाडीचे नेते होते त्यांना पडद्यामागून वकिली रसद पुरवण्याचे काम जेटली यांचे. हे त्यांचे वकिली चातुर्य अजोड म्हणावे लागेल. त्यामुळे एकच मुद्दा ते दोन परस्परविरोधी भूमिका घेऊन तितक्याच ताकदीने मांडत. उदाहरणार्थ: मनमोहन सिंग आणि त्याही आधी राजीव गांधी यांच्या काळात विरोधक संसदेचे कामकाज होऊच देत नसत. त्या वेळी ‘संसदेचे कामकाज बंद पाडणे हा विरोधकांचा हक्क आहे आणि संसद चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे,’ असे जेटली समर्थपणे म्हणत. पण स्वत: सत्तेत गेल्यावर मात्र, ‘विरोधक हे संसदेस सामोरे जाण्याच्या सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण करीत आहेत’ असे तितक्याच जोरकसपणे सांगत. या त्यांच्या गुणांमुळे जेटली हे सत्ताधारी भाजपचे संकटमोचक होते. मग ते संकट गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील असो किंवा केंद्र सरकारसमोरील काही घटनात्मक मुद्दा असो. जेटली हे प्रत्येक भाजप सरकारसाठी महत्त्वाचे होते.

मोदी यांचे महत्त्व ओळखणारे आणि त्यांच्या उदयास मदत करणाऱ्या भाजपतील काही मोजक्या नेत्यांत जेटली यांची गणना करावी लागेल. मुख्यमंत्रिपदी असताना मोदी यांच्याविरोधात उठलेल्या कायदेशीर वावटळीत त्यांना जेटली यांनी केलेली मदत निर्णायक होती. त्यामुळे मोदी यांच्यासाठी जेटली हे कायमच वैयक्तिक पातळीवर महत्त्वाचे राहिले. त्याचमुळे २०१९ साली प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांना घरी जाऊन गळ घालण्याचे औदार्य मोदी यांनी दाखवले ही बाब जेटली यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पुरेशी ठरावी.

हे जेटली यांचे वैशिष्टय़. कायद्याच्या प्रश्नात गुंतलेले कोणी असोत किंवा वैधानिक गुंत्याचा अर्थ लावू पाहणारे पत्रकार असोत, जेटली कायम मदतीसाठी तयार असत. असे गुंते सोडवायचे आणि नंतर त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवून त्याचे किस्से कार्यालय वा दिल्लीतील घरच्या गप्पाष्टक दरबारात सांगायचे हा जेटली यांचा आवडता छंद. या दरबाराचा अनुभव ज्यांनी घेतला असेल त्यांना त्यातील रसाळपणा लक्षात असेल. अशी यजमानगिरी करण्यात जेटली यांना विलक्षण आनंद मिळे.

त्यांच्या निधनाने भाजपतील आणखी एक शोकांतिका समोर येते. लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपतील नेत्यांची एक फळीच्या फळी घडवली. प्रमोद महाजन, अनंतकुमार, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे या पुढच्या पिढीचे तालेवार आणि आश्वासक नेते. आज यांतील कोणीही हयात नाही. आपले पट्टशिष्य हे असे एकामागोमाग जाताना पाहणे गुरू अडवाणी यांच्यासाठी किती क्लेशकारक असेल याची कल्पनाही करता येणे अवघड. जेटली यांच्या निधनाने भाजपने आपल्यातील एक उदारमतवादी नेता गमावला आहे. उदारमतवादासमोर एकूणच आव्हान उभे ठाकत असताना अशा उदारमतवादींचे एकगठ्ठा जाणे चटका लावणारे आणि काळजी वाढवणारे आहे. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे उजवीकडील या उदारमतवाद्यास श्रद्धांजली.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former finance minister arun jaitley passes away mpg 94
First published on: 25-08-2019 at 01:21 IST