धनाढय़ धर्मगुरूअसे वर्णन झालेले रफसंजानी हेही खोमेनीसमर्थकच, पण तरीही इराणच्या राजकारणाची दिशा बदलू पाहणारे!

खोमेनींचा विश्वास कमावून सभापतिपद मिळवल्यावर इराकयुद्ध झालेच, पण खोमेनींच्या मृत्यूनंतर मिळालेले अध्यक्षपद प्रागतिक प्रयत्नांसाठी रफसंजानी यांनी वापरले. अनेक वादांत अडकलेला हा नेता रविवारी काळाच्या पडद्याआड गेला..

टोकाची भूमिका ही हमखास लोकप्रियता मिळवून देणारी असली तरी तीकडे पाठ फिरवून मध्यममार्गाचा पुरस्कार करणे हे नेमस्तांपुढील आव्हान असते. त्यात आसपासची व्यवस्था जर धर्माधिष्ठित असेल तर हे आव्हान अधिकच कडवे. अकबर हशेमी रफसंजानी यांनी हे आव्हान पेलले आणि इराणसारख्या अतिरेकी देशास चर्चेच्या मध्यम मार्गावर आणले. इराणचे अध्यक्षपद भूषविलेल्या रफसंजानी यांचे रविवारी निधन झाले. त्यांचे मूल्यमापन केवळ एक माजी राष्ट्रप्रमुख इतकेच करून चालणारे नाही. ते ज्या देशाचे प्रमुख होते त्या देशास चर्चेच्या पातळीवर आणणे ही कामगिरी मोठी आहे. रफसंजानी यांनी ती पार पाडली यातच त्यांचे मोठेपण नाही. तर मूलत: धर्मवादी नेते असूनही जागतिक परिस्थितीत झालेला बदल त्यांनी योग्य वेळी टिपला आणि आपल्या तसेच इराणच्या राजकारणाची दिशा बदलली. पश्चिम आशियाच्या तप्त वाळवंटी प्रदेशात असे काळानुरूप बदल घडवून आणू शकतील असे लवचीक राजकारणी फारच अत्यल्प आहेत. रफसंजानी अशांतील एक अग्रणी. तेव्हा त्यांनी नेमके केले काय, हे जाणून घेणे आवश्यक ठरते.

रफसंजानी राजकारणात आले ते अयातोल्ला रूहल्ला खोमेनी यांच्या धर्मक्रांतीच्या लाटेत. किंबहुना ही लाट निर्माण करणाऱ्यांपैकी ते एक होते. रफसंजान गावी शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या रफसंजानी यांचे शिक्षण हे इस्लामी धर्मशास्त्रातील होते आणि  त्यामुळे इराणात धर्मावर आधारित राज्यव्यवस्था आणायला हवी, हे त्यांचे ध्येय होते. तसे त्यांना वाटण्यामागील आणखी एक कारण म्हणजे त्या वेळच्या इराणातील राज्यव्यवस्था. शहा महंमद रझा पहलवी हा गुलछबू गृहस्थ इराणच्या सर्वोच्च स्थानी त्या वेळी होता. पाश्चात्त्यधार्जिणी अशी त्यांची राजवट ही अमेरिकादी देशांसाठी सोयीची होती तरी स्थानिक इराणींना त्यापासून काहीही लाभ नव्हता. अमेरिकेच्या तालावर नाचणारे बुजगावणे अशी या शहा यांची ओळख. त्यांच्या विरोधात जनमत संघटित करण्याचे काम फ्रान्समध्ये राहून इराणी राजकारण करणाऱ्या अयातोल्ला खोमेनी यांनी केले. त्यांचे हे उद्योग इतके स्फोटक होते की १९७९ साली इराणात धर्मक्रांती झाली आणि शहा महंमद रझा पहलवी यांना पदच्युत होऊन अमेरिकेत आश्रय घ्यावा लागला. तेथेच त्यांचे कर्करोगाने निधन झाले. खोमेनी यांची राजवट हा प्रागतिक जगास त्या वेळी मोठा धक्का होता. इराणात खोमेनी सत्तेवर आले, पलीकडच्या अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाच्या फौजा घुसल्या आणि शेजारील सद्दाम हुसेन याच्या इराकने अयातोल्लांच्या इराणशी युद्ध छेडले. इराकशी युद्ध  करण्यामागे अयातोल्ला यांची अनेक कारणे होती. त्यातील प्रमुख होते ते सद्दाम यांचे तौलनिक पुरोगामित्व. इस्लामी देशाचा होता तरी सद्दाम हा विचाराने आधुनिक होता. त्याच्या देशात महिलांना बुरखा नव्हता तसेच शिक्षणही हक्काचे होते. कट्टर धर्मवेडय़ा अयातोल्ला खोमेनी यांना हे मान्य होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी एकाच वेळी दोन आघाडय़ांवर लढाई सुरू केली. देशांतर्गत पातळीवर त्यांनी नेमस्त आणि सुधारणावाद्यांना ठेचण्यास सुरुवात केली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आधी सद्दाम आणि नंतर अमेरिकेस आव्हान दिले. तेहरानमधील अमेरिकी दूतावासात कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्याचा प्रकार अयातोल्ला खोमेनी यांच्या डोळ्यांदेखत घडला. या सर्व काळात रफसंजानी हे खोमेनी यांचे साथीदार होते. त्यातूनच त्यांनी या धर्मगुरूचा असा काही विश्वास कमावला की खोमेनी यांनी त्यांना इराणच्या प्रतिनिधी सभेचे सभापती म्हणून नियुक्त केले. जवळपास आठ वर्षे रफसंजानी या पदावर होते. शासनावर अंकुश ठेवू पाहणारे कडवे धर्मवादी आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करणारे शासक यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी सभापती या नात्याने रफसंजानी यांना सातत्याने पार पाडावी लागली. अयातोल्ला खोमेनी यांच्यासारखा कर्मठ सर्वोच्चपदी असताना ही कामगिरी पार पाडणे सोडाच पण अंगावर घेणे हेदेखील आव्हानात्मक होते. रफसंजानी यांनी ते सहज पेलले. हाच काळ इराण काँट्रा प्रकरण बाहेर येण्याचा. अमेरिकेत एव्हाना अध्यक्षपदी आलेले रोनाल्ड रेगन यांनी इराकविरोधात इराणला रणगाडे आदी आधुनिक शस्त्रसामग्री पुरवली आणि त्यातून निर्माण झालेला पैसा निकाराग्वातील  कम्युनिस्ट विरोधकांना पुरवला. यात मध्यस्थ होता इस्रायल  आणि त्या देशाचे दिवंगत नेते आरियल शेरॉन. या व्यवहारात इराणच्या बाजूने रफसंजानी यांची भूमिका महत्त्वाची होती. यातून इराणला मोठा शस्त्रपुरवठा झाला. पण रफसंजानी यांचे मोठेपण म्हणजे तो होऊनही ते इराकविरोधातील युद्ध संपुष्टात आणले जावे या मताचे होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. इराण अगदीच खंक व्हायची वेळ आल्यावर हे युद्ध संपले. ते संपावे अशी रफसंजानी यांची इच्छा होतीच. पण त्याच वेळी त्यांनी युद्धास विरोध करणाऱ्या इराणमधील डाव्यांनाही संपवले. हे दुहेरी राजकारण  ही रफसंजानी यांची खासियत. पुढील वर्षी, म्हणजे १९८९ साली, अयातोल्ला खोमेनी यांचे निधन झाल्यावर रफसंजानी यांच्याकडे अध्यक्षपद आले.

इराणला आधुनिक करण्यासाठी त्यांची ही अध्यक्षीय कारकीर्द महत्त्वाची ठरली. रफसंजानी यांनी आर्थिक सुधारणांचा मार्ग चोखाळला, शेजारील इराक या देशाशी आणि अन्यांशीही संबंध सुरळीत करण्याची भूमिका घेतली आणि मुख्य म्हणजे इराणी महिलांना बुरख्यातून बाहेर काढले. त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय करून दिली आणि एकंदरीतच सामाजिक सुधारणांचा कार्यक्रम त्यांनी युद्धपातळीवर हाती घेतला. तोवर इराणात संगीत, चित्र, शिल्प, चित्रपट आदींवर बंदी होती. रफसंजानी यांनी ती हळूहळू उठवत नेली. सांस्कृतिक मुक्ततेची जबाबदारी त्यांनी आपले मंत्री महंमद खतामी यांच्याकडे दिली आणि हे बदल वगैरे निर्णयांशी आपला काही थेट संबंध नाही असे दाखवले. तरीही वरवर वाटते तितके हे सोपे नाही. विशेषत: अयातोल्ला खोमेनी यांच्यासारखा कट्टर धर्मवादी नेता काळाच्या पडद्याआड गेल्यावर देशास असा सुधारणेचा मार्ग दाखवणे हे कमालीचा विरोध ओढवून घेणारे असते. रफसंजानी यांना तसा विरोध झाला. परंतु एकाच वेळी हे धर्मवादी आणि दुसरीकडे सुधारणावादी यांच्यात त्यांनी उत्तम संतुलन साधत इराणला आधुनिक जगाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला. या काळात अली खामेनी हे अयातोल्ला खोमेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले. अध्यक्षपदी असणाऱ्या रफसंजानी यांचा त्यात मोठा वाटा होता. त्यामुळे नवे अयातोल्ला हे रफसंजानी पाठीराखे म्हणून ओळखले जात. यातून रफसंजानी यांची अध्यक्षीय पदाची पहिली चार वर्षे सुरळीत गेली. परंतु पुढल्या खेपेत नवे अयातोल्ला खामेनी हे त्यांच्या मार्गात येऊ लागले. इराणात पुन्हा धर्माने डोके वर काढावयास सुरुवात केली. आपला पुढील काळ खडतर असेल हे ओळखत रफसंजानी यांनी या सुमारास आपला एके काळचा मंत्री खातेमी यास पुढे आणले आणि त्याच वेळी स्वत:स अनुकूल नोकरशहांमार्फत आर्थिक सुधारणा रेटत नेल्या. १९९७ सालच्या निवडणुकीत रफसंजानी यांच्या इच्छेनुसार खातेमी निवडले गेले. रफसंजानी यांचा तोपर्यंत सरकारवर चांगलाच पगडा होता. त्यामुळेच अनेक तेल कंत्राटे त्यांनी थेट आपल्या चिरंजीवांच्या कंपनीस मिळतील अशी व्यवस्था केली. यातून त्यांनी इतकी माया केली की फोर्ब्स साप्ताहिकाने रफसंजानी यांचे वर्णन मिल्यनेआर मुल्ला -धनाढय़ धर्मगुरू- असे केले. याचा रफसंजानी यांच्यावर काहीही परिणाम नव्हता. २००० सालच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपणास उतरता येईल काय यासाठी त्यांची चाचपणी सुरू होती. परंतु खातेमी यांनी आपल्या एके काळच्या नेत्याची ही चाल ओळखली आणि तो मार्गच बंद झाला. मेहमूद अहेमदीनेजाद ही अत्यंत आक्रस्ताळी व्यक्ती इराणच्या अध्यक्षपदी निवडली गेली.

तेव्हापासून रफसंजानी काही काळ पडद्याआड गेले. त्यांच्या समन्वयवादी, बेरजेच्या राजकारणाचा तो अंत होता. पुढे अहेमदीनेजाद यांनाही जनतेने नाकारले आणि इराण पुन्हा एकदा समन्वयवादी बनला. इतका की बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय काळात अमेरिकेबरोबर त्या देशाचा अणुकरारदेखील पार पडला. हे सर्व असे व्हावे म्हणून रफसंजानी सातत्याने प्रयत्नात होते. जगापासून फारकत न घेण्यातच आपले यश आहे हे ओळखणारा हा अलीकडच्या इतिहासातील हा महत्त्वाचा मागासांतील आधुनिक.