23 November 2017

News Flash

भेदाभेद भ्रम.. कसले काय?

गुन्हा म्हणजे गुन्हाच आणि त्याची शिक्षा त्या फसवणूक करणाऱ्याला झालीच पाहिजे.

लोकसत्ता टीम | Updated: September 9, 2017 2:14 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

 

वाद सोवळ्या-ओवळ्याचा असला, तरी तो केवळ वैयक्तिक धर्मपालनाच्या स्वातंत्र्यापुरताच मर्यादित नाही..

फसवणूक हा गुन्हाच आहे. तो कोणी आणि कशासाठी केला याला काही महत्त्व नाही. गुन्हा म्हणजे गुन्हाच आणि त्याची शिक्षा त्या फसवणूक करणाऱ्याला झालीच पाहिजे. याबाबत आपण सारेच सहमत आहोत. कारण आपण देशाची राज्यघटना मानतो, येथील कायदे आपणांस प्रमाण आहेत आणि आपण कायदाप्रेमी देशप्रेमी नागरिक आहोत. पुण्यातील ‘त्या’ घटनेबाबत बोलताना सुरुवात करायची तर ती येथूनच झाली पाहिजे. परंतु त्या आधी एक बाब समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे खरोखरच ती घटना चर्चेला घ्यावी अशी आहे का? तेवढे महत्त्व तिला द्यावे का? की दोन व्यक्तींमधील ते एक छोटेसे भांडण म्हणून त्या घटनेकडे दुर्लक्ष करावे? तसे पाहिल्यास ती घटना खूपच छोटीशी आहे. एका ब्राह्मण महिलेची अब्राह्मण महिलेने फसवणूक केली. जात लपवून तिचे सोवळे मोडले. त्याबाबत जाब विचारला असता त्या दोघींत भांडण झाले. प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनाही त्यात काय करावे हे समजेना. त्यांनी सामोपचाराने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर तक्रार नोंदविली. आता याला किती महत्त्व द्यायचे? खासगी भांडण म्हणून ही बाब सोडून देता येणार नाही का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. हे भांडण वैयक्तिक असले, तरी ही बाब खासगी नाही. वाद सोवळ्या-ओवळ्याचा असला, तरी तो केवळ वैयक्तिक धर्मपालनाच्या स्वातंत्र्यापुरताच मर्यादित नाही. कोणी तरी कोणाची फसवणूक केली हीच त्याची लक्ष्मणरेषाही नाही. त्यापलीकडे जाऊन आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जातीय अस्मिता बाजूला ठेवून या संपूर्ण प्रकरणाकडे पाहावे लागेल. कारण या घटनेचा संबंध आपणांस नेमकी कोणती समाजव्यवस्था अभिप्रेत आहे याच्याशी आहे.

हिंदुस्थानच्या इतिहासात वर्णव्यवस्था कधी आली आणि अस्पृश्यता, जातिव्यवस्था कधी सुरू झाली याबाबत इतिहासतज्ज्ञांनी वाद घालावेत. वर्ण कोणत्या पुरुषाच्या कोणत्या अंगातून निर्माण झाले याबाबत तोंड फुटेपर्यंत चर्चा कराव्यात. वर्णभेद हे गुणकर्मानुसार होते अशी पांघरुणेही खुशाल घालावीत. मुद्दा आजचा आहे. काहींच्या म्हणण्यानुसार इसवीसनाच्या चौथ्या शतकापूर्वी भारतात अस्पृश्यता होती. जातिप्रथा दृढ झालेली होती. त्या जातिप्रथेच्या साखळ्या आजच्या काळात सैल झालेल्या आहेत की नाहीत हा खरा आजचा प्रश्न आहे. पुण्यातील त्या घटनेने तो उपस्थित झाला आहे. याचा अर्थ तो नव्हता किंवा त्याची चर्चा होत नव्हती, असे नाही. तो प्रश्न कायमचा आहे. आपले सारे सुधारक जातिअंताची लढाईच तर लढत होते. ते सुधारक गेले. लढाई कायम आहे. परंतु आपल्या, म्हणजे शहरी उच्च मध्यमवर्गीय सुशिक्षितांच्या दृष्टीने हा जो जातिअंताचा वा खरे तर जातिभेदाचा मुद्दा आहे तो सध्याच्या काळात राहिलेला नाही. त्यातही आपण थोडे अधिक पुरोगामी असू, तर असे म्हणू की त्याची तीव्रता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्याची सत्यता पटवून देण्यासाठी आपल्याकडे दाखल्यांची कमतरता नसते. आपले मित्र खालच्या जातीतील असतात. ते आपल्या घरी सत्यनारायणालाही येत असतात. त्यांच्यासाठी काही आपण वेगळी भांडी ठेवत नसतो वगैरे. आपल्याला हा जातीयवाद भेडसावतो तो दोनच ठिकाणी. त्यातील एक ठिकाण निवडणुकीचे आहे आणि दुसरे आरक्षणाचे. या दोन घटनांमुळेच जातीचे राजकारण वाढले आहे. मंडल आयोगामुळेच तर जातिभेद वाढला आहे असे आपले म्हणणे असते. त्याही पुढे जाऊन, आता या आरक्षणाची आवश्यकताच नाही. कारण की आता जातिभेद वगैरे काही राहिलेला नाही. ‘त्यांच्यातले’सुद्धा आता पुढारले आहेत, असे आपण एकमेकांना सांगत असतो. त्यासाठीचे खंडीभर पुरावे आणि युक्तिवादही आपल्याकडे तयार असतात. पुण्यातली ती घटना यासाठी महत्त्वाची, की तिने आपल्या भोवतीचे हे सगळे छान छान हवामानच बिघडवून, विस्कटून टाकले. एक कोट रचला होता आपण आपल्या मनाभोवती. जातीय अत्याचाराच्या घटना आपल्या काळजापर्यंत पोहोचूच नयेत याची मोठी खबरदारी घेतली होती आपण. त्यामुळे कुठे कुणाची गाढवावरून धिंड निघाली, कुठे कोण मंदिरात प्रवेश केला म्हणून मेला, कुठे कुणाच्या विहिरींत विष्ठा टाकण्यात आली, ही आपल्या दृष्टीने फार फार तर साधी गुन्हेगारी कृत्येच ठरत असत भारतीय दंडविधानाच्या कलमांतली. कुठे आहे जातिभेद, असे म्हणण्यासाठी ती कलमे यापूर्वी उपयोगीही पडली आहेत. पुण्यातील त्या घटनेने मात्र ती सोयही ठेवलेली नाही. अतिवृष्टीने आलेल्या पुरानंतर अवघी गटारघाण रस्त्यावर यावी, त्याप्रमाणे त्या घटनेमुळे आपल्या मनातील जातीय भावनांचे झाले आहे. पेठापेठांतील गप्पांतून, समाजमाध्यमांतून त्याचा कचरा स्पष्टपणे तरंगताना दिसत आहे. आपली सगळी तर्कबुद्धी, आपले सगळे वकिली शहाणपण पणाला लावून आपण आज ती जातीयवादाची घाण झाकण्याचा प्रयत्न करीत आहोत.

खरोखरच सोवळे-ओवळे पाळणे हा ज्याचा-त्याचा खासगी प्रश्न आहे? ज्यांना वाटते की तसा तो आहे, त्यांनी स्वत:च्याच मनास विचारावे, की ‘ज्याचा-त्याचा खासगी प्रश्न’ ही कल्पना आपणास पूर्णत: मान्य आहे का? ही वैयक्तिक स्वातंत्र्याच्या, खासगीपणाच्या अधिकाराच्या जवळ जाणारी कल्पना. आपण इतरांना तो अधिकार देण्यास तयार आहोत का? ज्याने-त्याने आपल्या घरात हवे ते खावे-प्यावे, हवे तसे – हवे तर ‘लिव्ह इन’ पद्धतीने – राहावे, अशा गोष्टी आपण मान्य करण्यास तयार आहोत का? त्याला मात्र आपला विरोध असतो. हा दुटप्पीपणा झाला. परंतु तो मान्य केला आणि जोवर आपले सोवळ्याचे धर्मस्वातंत्र्य इतरांच्या स्वातंत्र्याआड येत नाही, तो घरगुतीच मामला असतो, तोवर ते अयोग्य नाही असे मानले, तरी त्यातून जो स्पृश्यास्पृश्यतेचा, वर्णश्रेष्ठत्वाचा, जातिभेदाचा मुद्दा समोर येतो त्याचे काय, हा प्रश्न आहेच. सोवळे पाळणे ही काही कोण्या पोकळीतून उगवलेली बाब नाही. तिला जेवढे धार्मिक संदर्भ आहेत, तेवढेच सामाजिकही आहेत. ते संदर्भ हटवून पुण्यातील त्या घटनेकडे कोणी पाहात असेल, तर ते आपल्या पारंपरिक दांभिक वृत्तीला शोभेसेच होईल. त्यामुळे सोवळ्या-ओवळ्याची कल्पना आणि अस्पृश्यता यांचा संबंध काही तुटणार नाही. मुळात जन्मजात विषमतेच्या कल्पनेच्या पायावर हे सोवळे उभे आहे. आपल्या अनेक संतांनी त्याचा धिक्कार केला आहे. सुधारकांनी त्याविरोधात रान उठवले आहे. हा इतिहास असल्याने अलीकडे या अशा मूढ धार्मिक कल्पनांना विज्ञानाचा झगा नेसवला जातो. सोवळ्याने स्वयंपाक करणे हे कसे स्वच्छतेशी, आरोग्याशी निगडित आहे असे हल्ली बजावून सांगितले जाते. मनूने कधी तरी सांगितले की, रज:स्वलेची दृष्टी पडलेले अन्नही ब्राह्मणाने वर्ज्य मानावे. त्यामागे किती तरी मोठे शास्त्र आहे असे सांगणारे लोक आज आहेत. ‘विटाळशी’च्या शरीरातून कसलेसे किरण बाहेर पडत असतात. ते अन्नात गेले की ते विष बनते अशी काहीही भंपकबाजी केली जाते. स्त्रियाही त्यापुढे माना डोलावताना दिसतात.. स्वच्छतेला कोणाची ना असणार? ती हवीच. त्याचे सोवळ्याशी नाते जोडणे, स्वयंपाकासाठी विधवा नको, तर ‘सुवासिनी’च हवी असे मानणे, यातून मात्र आपण केवळ अवैज्ञानिकतेलाच खतपाणी घालत नसतो, तर मानवी प्रतिष्ठेचाच अपमान करीत असतो. जी व्यक्ती विधवेला अपवित्र मानते ती धार्मिक भलेही असेल, तिला सुसंस्कृत कसे म्हणणार?

ही असुसंस्कृतता खरे तर कोण्या एका समाजगटाची मक्तेदारी नाही. आज एका ब्राह्मण महिलेशी संबंधित घटना घडली म्हणून सगळे ब्राह्मण जातीयवादीच अशी झोड कोणी उठवीत असेल, तर त्याच्याहून जातीयवादी अन्य कोणी नाही. जातिश्रेष्ठत्वाची भावना हीसुद्धा आज कोण्या एका जातीची मक्तेदारी राहिलेली नाही. ही बाब लक्षात घेऊनच, पुण्यातील त्या घटनेकडे पाहावे लागेल. तसे पाहणे शक्य नसेल, तर मात्र आपल्यासमोर दुसरा पर्याय आहेच. त्या घटनेकडे केवळ फसवणुकीचे प्रकरण म्हणून दुर्लक्ष करण्याचा. आता त्यात कोणाला दांभिकता दिसेल. पण त्याला नाइलाज आहे. तसे एरवीही ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ वगैरे भजने म्हणत आपण छानपैकी जातिभेद पाळत असतोच.

First Published on September 9, 2017 2:14 am

Web Title: former pune imd director medha kolhle files cheating case against her cook for hiding caste