त्या-त्या देशांच्या सद्य आर्थिक, सामाजिक स्थितीचे, राजकारण आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब विश्वचषक फुटबॉलमध्येही दिसले..

‘‘आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने हा केवळ खेळ नसतो. हे सामने त्या त्या देशांच्या संघर्षांचे आणि व्यक्तिमत्त्वांचे प्रतीक असतात,’’ या विख्यात इतिहासकार, सामाजिक भाष्यकार एरिक हॉब्सबॉम यांच्या विधानाची प्रचीती ज्यांनी कोणी रशियातील फुटबॉल विश्वचषक सामने उत्साहाने पाहिले असतील त्यांना येईल. हा विश्वचषक फ्रान्सने जिंकला. अत्यंत कलात्मक खेळाने मने जिंकणाऱ्या क्रोएशिया या नवथर देशास फ्रान्सने अंतिम सामन्यात पराभूत केले. हा झाला निकाल. परंतु गेले महिनाभर या निमित्ताने जे काही रशियाच्या मदानांवर दिसले ते जागतिक राजकारणाचा ‘खेळकर’ आविष्कार होता. सर्वसामान्यांसाठी त्याचे स्वरूप भले केवळ मनोरंजनार्थ खेळ अशा स्वरूपाचे असू शकेल. पण ते तसे आणि तेवढेच नसते. ‘युद्धामुळे जसा देशांचा चेहरामोहरा बदलतो, तसा फुटबॉल विश्वचषकाच्या विजेतेपदामुळेही बदलतो,’ असे क्रोएशियाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो टुडमन देश जन्मास आल्यानंतर म्हणाले होते. याचा अर्थ या सामन्यांच्या निकालाची परिणामकारकता वा संहारकता ही युद्धाइतकीच असते. तरीही हे विजेतेपद मिळवणे क्रोएशियास जमले नाही. त्याचप्रमाणे जागतिक फुटबॉलमधील महारथी अर्जेटिना, ब्राझील, स्पेन वा जर्मनी यांनाही या विश्वचषकात नामुष्की सहन करावी लागली. या विश्वचषकात प्रचंड उलथापालथ झाली.

याचे कारण हे सामने खेळणाऱ्या देशांत ती सुरू आहे. ती समजून घेत नाही, तोपर्यंत केवळ खेळाकडे पाहणे दूधखुळेपणाचे ठरेल. फुटबॉलसारखा खेळ हा राष्ट्रीय अस्मितांचा प्रतीक असतो हे एकदा का मान्य केले की हे देश आणि त्यांची फुटबॉलमधील कामगिरी यांची सांगड घालणे समजून घेता येईल. यातील अर्जेटिना हा देश गेली दहा वर्षे महाआर्थिक गत्रेत अडकलेला आहे आणि त्या देशातील उच्चपदस्थांपासून अन्य अनेकांना त्यातील विविध कारणांसाठी तुरुंगवास घडलेला आहे. अर्जेटिनाची फुटबॉलमधील घसरण आणि त्या देशाची आर्थिक संकटे यांचा प्रवास समांतर असल्याचे आढळते ते त्यामुळे. त्या देशाची परिस्थिती इतकी गंभीर की पेसो हे त्यांचे चलन रद्दबातल करावे लागते की काय, असा प्रश्न निर्माण झाला असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या देशास वाचवायचे कसे या चिंतेत आहे. ब्राझील या माजी फुटबॉल जगज्जेत्याची गत यापेक्षा जरा बरी इतकेच म्हणता येईल. त्या देशाच्या अध्यक्षांसह अन्य अनेकांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागत आहे. २०१४ साली त्या देशाच्या घसरगुंडीस सुरुवात झाली. त्याच वर्षी त्याच देशात भरलेल्या फुटबॉल विश्वचषकात जर्मनीने ब्राझीलची अक्षरश: चाळण केली. सात विरुद्ध एक अशा नामुष्कीच्या फरकाने यजमान ब्राझील हा पाहुण्या जर्मनीकडून उपांत्य फेरीत हरला. त्या वेळी जर्मनी जोशात होता आणि युरोपीय संघाची जबाबदारी आपल्या एकटय़ाच्या खांद्यावर वागवत होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. जर्मनीत कडव्या उजव्यांचे आव्हान मोठय़ा प्रमाणावर वाढू लागले असून २०१४ साली खमक्या वाटलेल्या चॅन्सेलर अँगेला मर्केल सध्या कसेबसे आघाडीचे सरकार रेटत आहेत. युरोपातील अन्य देशांची जबाबदारी घेता घेता जर्मनी आर्थिकदृष्टय़ा थकला असून त्या थकलेपणाची सावली त्या देशाच्या फुटबॉल संघावर नि:संशयपणे दिसून आली. अगदी पहिल्या सामन्यापासूनच जर्मनी गडबडताना दिसला. युरोपातील स्पेनची परिस्थितीही वेगळी नाही. तो देश फुटीच्या उंबरठय़ावर आहे. त्या देशातील कॅटालोनिया हा प्रांत वेगळा होऊ पाहतो. युरोपातील हे सर्व देश स्थलांतरितांच्या प्रश्नानेही गांजले असून एके काळची सुसंस्कृत शांतता आज युरोपातून हरवलेली आहे. उघडय़ा डोळ्यांनी पाहू गेल्यास या सगळ्याचे प्रतििबब युरोपीय देशांच्या फुटबॉल संघातून या वेळी दिसत होते. अशा वेळी क्रोएशिया आणि फ्रान्स यांच्या विजयामागील कारणेही पुरेशी बोलकी आहेत.

क्रोएशियाचा कप्तान लुका मॉड्रिच हा यंदा संपूर्ण फुटबॉल विश्वाचा आकर्षणिबदू ठरला. परंतु मातृभूमीत मात्र तो टीकेचा आणि देशाच्या नाराजीचा धनी आहे. याचे कारण क्रोएशियन फुटबॉल संघटनेचे प्रशासक झेद्राव्को मामीच यांना वाचवण्यासाठी त्याचे शपथेवर खोटे बोलणे. एखाद्या भारतीय खेळ संघटनेचे प्रमुख वाटावेत असे या मामीच यांचे वर्तन. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते सिद्ध झाले असते परंतु मॉड्रिच  याने त्यांना वाचवले. म्हणून जनतेचा त्याच्यावर राग आहे. हे प्रकरण येथेच संपत नाही. त्या देशाचा मधल्या फळीत खेळणारा देजन लॉव्रेन हा मॉड्रिच याचा या प्रकरणातील साथीदार. यंदाच्या विश्वचषक स्पर्धास सुरुवात होण्याच्या अवघे १० दिवस आधी मामीच यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. या मामीच यांचे घनिष्ठ संबंध आहेत कोलिंदा ग्राबर कितारोविच यांच्याशी. या क्रोएशियाच्या अध्यक्ष. रशियात लालपांढरा चौकटीचा टीशर्ट घालून खेळांडूसमवेत वावरताना दिसल्या त्या बाई याच. त्यांच्या निवडणूक निधीस मामीच यांनी भरघोस मदत केल्याचा आरोप आहे. आता या मामीच यांचीच चौकशी सुरू असल्याने अध्यक्षीणबाईंचे प्रतापही बाहेर येतील अशी शक्यता आहे. तेव्हा क्रोएशियाचा विजयवारीच्या प्रकाशात जास्तीत जास्त न्हाऊन निघण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो यामुळे. तो पूर्ण यशस्वी झाला नाही. क्रोएशियाने विश्वचषक जिंकला असता तर अध्यक्षीणबाईंना त्याचा निश्चितच फायदा झाला असता.

फ्रान्सचा संघ मात्र या असल्या कोणत्याही वादंगापासून मुक्त होता. त्यांना फक्त खेळायचे होते. त्यांच्या खेळास फ्रान्सचे नवे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या खमक्या आणि प्रामाणिक नेतृत्वाची पाश्र्वभूमी आहे. फ्रान्सचे याआधीचे दोन अध्यक्ष फ्रान्स्वां ओलां आणि निकोलस सार्कोझी हे दोघेही गुलछबू उद्योगांसाठी प्रसिद्ध होते आणि त्याआधीचे जॅक शिराक आर्थिक घोटाळ्यांसाठी ओळखले गेले. परंतु विद्यमान मॅक्रोन यांचे मायदेशात वेगळ्याच कारणासाठी कौतुक होते. त्यांचे आपली शिक्षिका ब्रिगेट मारी क्लॉड यांच्यावर प्रेम होते. विद्यार्थी म्हणून इमॅन्युएल आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांचे वय होते अवघे १५ आणि शिक्षिका होत्या ३९ वर्षांच्या. गेली ११ वर्षे त्यांचा संसार निष्ठेने सुरू आहे. फ्रान्सच्या मानाने हे तसे अप्रूपच. इमॅन्युएल विद्वान आहेत आणि अर्थशास्त्र ते काव्यशास्त्रविनोद अशा सगळ्यांत त्यांना रस आहे. या सगळ्यामुळे देशांतर्गत पातळीवर ते अतिशय लोकप्रिय आहेत. त्यात अलीकडे मॅक्रोन यांनी थेट अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच खडसावण्याचे धारिष्टय़ दाखवल्यामुळे त्यांचा खमकेपणा दिसून लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. तर हे असे हे फ्रान्सचे अध्यक्ष आणि त्या देशाचा फुटबॉल विजेता संघ यांत आणखी एक विलक्षण साम्य लक्षात घ्यायला हवे असेच.

ते म्हणजे वय. मॅक्रॉन फ्रान्सचे सर्वात तरुण अध्यक्ष. या पदासाठी ते निवडून आले तेव्हा अवघे ३९ वर्षांचे होते. फुटबॉल विश्वचषकातील ३२ संघांपैकी आज फ्रान्सचा संघ सर्वात तरुण आहे. फ्रान्सचा नायक ठरलेला एम्बेपेसारखा खेळाडू तर अवघा १९ वर्षांचा आहे. हे एक. परत फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन हे अमेरिकेच्या ट्रम्प वा ऑस्ट्रिया आदी देशप्रमुखांप्रमाणे गोरे/काळे असे वंशवादी नाहीत. ते उदारमतवादी आहेत. याचा थेट संबंध फ्रान्सच्या संघाशी आहे. फ्रान्सच्या २३ सदस्यांच्या संघातील तब्बल १७ खेळाडू हे फ्रेंचेतर म्हणजे अफ्रिकी आदी देशांचे आहेत. एम्बेपेसारखा खेळाडू तर पॅरिसमधील झोपडपट्टीतून वर आलेला आहे. अगदी अलीकडेपर्यंत तो दूध/पाणी- पाव खाऊन दिवस ढकलत असे. प्रभावी खेळ करणाऱ्या अनेक संघांतील खेळाडू हे विस्थापित वा स्थलांतरित आहेत. मग तो फ्रान्सचाच पोग्बा असेल वा बेल्जियमचा लुकाकु. एका देशातील भणंग वाटणारे निर्वासित, भिन्नधर्मीय असले तरी, दुसऱ्या देशासाठी हुकमाचे एक्के ठरू शकतात. हा या विश्वचषकाने दिलेला आणखी एक धडा.

फक्त त्या दुसऱ्या देशांस ही दृष्टी हवी आणि नेतृत्व उदारमतवादी हवे. असे असेल तर काय होऊ शकते हे या फुटबॉल विश्वचषकाकडून शिकता येईल. विश्वचषकातील विजेते आणि पराभूत यांतून हा फरक दिसतो. ‘केवळ गुणवत्ता वा अंत:प्रेरणा यांच्या जोरावर तुम्ही गोलपोस्टपर्यंत जाऊ शकता, पण सातत्याने गोल करावयाचे असतील तर अन्य गुणांचाही समुच्चय तुमच्याकडे असावा लागतो,’ अशा अर्थाची म्हण जर्मन व्यवस्थापनशास्त्रात आहे. गुणवान खूप असतात. पण प्रत्येक गुणवान विजयी होतोच असे नाही. उदाहरणार्थ रॉजर फेडरर यास हरवून विम्बल्डन अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला केविन अँडरसन वा फुटबॉलमधील क्रोएशिया किंवा बेल्जियम. कारण गुणवान ते विजेते अशा प्रवासात अनेकांच्या प्रयत्नसाध्य पुण्याईची साथ लागते. म्हणूनच फुटबॉल खेळणाऱ्या २०० देशांत विश्वविजेते अवघे आठच आहेत. विश्वचषक फुटबॉल पाहून शिकायचे ते हे.