जग आजही गांधीजींचा देश म्हणून भारतास ओळखते; पण भारतीयांना गांधीजी भिडतात का? असल्यास कसे?

काही कार्यक्रम निव्वळ प्रघात वा प्रथा म्हणून पार पाडले जातात. महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणून ज्ञात असलेले मोहनदास करमचंद गांधी यांची जयंती अथवा त्यांचा स्मृतिदिन पाळणे, हा त्यातील एक. यंदा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीवर्षांची सांगता, त्यामुळे हा प्रघात अधिकच पाळला जाईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम होतीलच पण उदाहरणार्थ, गब्बर झालेला एखाद्या गल्लीतील कार्यसम्राट आपल्या गल्लीत गांधी सप्ताह साजरा करील. गांधीजी कसे थोर होते, हे आपापल्या परीने सारेच सांगतील. त्यांचे थोरपण कशात होते, ते आज का म्हणून स्वीकारायचे, हे प्रश्न गांधींबाबत हल्लीच्या काळात किमान सार्वजनिक कार्यक्रमांतून तरी उद्भवलेले नाहीत. तशा कार्यक्रमांपासून फटकून राहणारे लोकच असले प्रश्न स्वत:ला पाडून घेतात आणि जमल्यास इतरांना विचारतात. यापैकी काही प्रश्न महत्त्वाचे आहेत : गांधीजींना आज आपण का आठवायचे? त्यांची ‘महात्मा’ किंवा ‘राष्ट्रपिता’ ही वर्णने अर्थवाही आहेत असे आपण खरोखरच मानतो का? गांधींना आजच्या संदर्भात समजून घेताना आपण त्यांच्या कथाच उगाळणार? ‘काँग्रेस पक्ष विसर्जित करा’ यासारख्या त्यांच्या इच्छेची आठवण आज तो पक्ष अर्धमेल्या अवस्थेत असताना कशा रीतीने करावी? गांधी हे आपणास स्वच्छतेपुरतेच हवे आहेत का? असे काही प्रश्न. खेदाची बाब अशी की, या प्रश्नांची चर्चादेखील निव्वळ प्रघात म्हणून, औपचारिकपणे होत राहाते. हे प्रश्न आपल्याला भिडत नाहीत.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

असे होत असेल, तर एक सर्वात अप्रिय असा प्रश्न विचारावाच लागेल : आपण या प्रश्नांना भिडत नाही, याचे कारण आपल्याला हल्ली गांधीजीच पुरेसे भिडत नाहीत, असे तर नव्हे? या प्रश्नाचे उत्तर अवघड. जग आजही गांधीजींचा देश म्हणून भारतास ओळखते. दक्षिण आफ्रिका या देशात नेल्सन मंडेलांनी घालून दिलेला ‘ट्रथ अ‍ॅण्ड रिकन्सिलिएशन कमिशन’चा (टीआरसी) आदर्श, दक्षिण अमेरिकी देशांमधून सुरू झालेली ‘लिबरेशन थिऑलॉजी’ किंवा पश्चिम युरोपातला पर्यावरणवाद या साऱ्या वैचारिक कृतींना ‘गांधीवादा’चा आधार असल्याचे सांगितले जाते. यापैकी टीआरसी तर गांधीवादी अहिंसक क्षमाशीलतेच्या पायावरच उभी राहिली. वर्णद्वेषी राजवटीदरम्यान गोऱ्यांची जीवित-वित्तहानी करणारे कृष्णवर्णीय आणि काळ्यांवर नित्य हिंसा करणारे गौरवर्णीय यांनी खुनांबद्दल, सुरामारीच्या प्रकारांबद्दल एकमेकांना माफ करावे, अशी कल्पना या टीआरसीमागे होती आणि ती प्रत्यक्षात आली, हे विशेषच. अशा वेळी आम्हाला गांधी भिडत नाहीत असे भारतीयांनी स्पष्टपणे सांगणे अशक्यच. भारतीयांना आज भिडणारे भिडे निराळे असले, तरीही अशक्य. जगभरच्या विद्यापीठांत गांधी हे एक राजकीय विचारवंत म्हणून अभ्यासले जात असताना भारतीय भाषांमध्ये गांधींविषयीचा अर्वाच्य मजकूर व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातून पसरविला जातो, हे व्हॉट्सअ‍ॅप नव्हते तेव्हा काही सवंग ‘गांधी-विनोद’ शाळकरी विद्यार्थ्यांनाही माहीत असत, हे आपण जगाला कसे काय सांगणार? किंवा आपल्या शेजारी देशाच्या द्वेषाखेरीज आपल्याला स्वदेशाचा अभिमान असू शकत नाही, हे मान्य करूनच आपण गांधी आणि फाळणी याविषयी बोलतो वा ऐकतो, याची कबुली कोणत्या जाहीर व्यासपीठावरून देणार? गांधीजींच्या मारेकऱ्याची जाहीर भलामण करणारे संसदेत जातात, त्यांना ‘माफ नही करूंगा’ म्हणणारे पंतप्रधान नेमके याबाबत क्षमाशील राहतात, पाकिस्तान हे गांधींचे पाप आणि स्वच्छ भारत हे महात्माजींचे ‘सत्तर साल अधूरे’ राहिलेले स्वप्न, एवढीच गांधीजींची नवी ओळख असल्याचे आपण जगाला सांगून का नाही टाकत?

याचे महत्त्वाचे कारण असे की फक्त गांधीच नव्हे, साऱ्याच पूर्वसूरींवर बोलण्याचा मक्ता आपण अभ्यासकांऐवजी राजकारण्यांकडे सोपवलेला आहे. राजकीय शक्ती असलेले समूह कशाने खूश होतील, मते कशाने मिळतील, फार जबाबदारी न घेता काय झेपेल, हे पाहून मगच पूर्वसूरींना स्वीकारण्याची एक राजकीय रीत १९४७ पासून चालत आलेली आहे. त्यात अन्याय होतच असेल, तर तो एकटय़ा गांधींवर नव्हे. सावरकर यांचा विज्ञानवाद वा त्यांचे अस्पृश्यताविरोधी विचार विसरणे, हादेखील अन्यायच. किंबहुना तोच राजकीय न्याय.

असले राजकीय हिशेब नाकारून गांधी आज हवे असतील, तर सत्याग्रह आणि साधनशुचिता या संकल्पनांचा विचार टाळता येणारच नाही. इंग्रज वा कुणालाही गांधी यांनी ‘शत्रू’ मानले नव्हते, हे विसरून चालणार नाही. आजघडीला स्वदेशी, ग्रामस्वराज्य, स्वयंपूर्ण खेडे या गांधीवादी संकल्पनांचा विचार करताना खुद्द गांधी यांची बिर्ला/बजाज आदी धनिकांशी जवळीक का होती, याचे उत्तर साकल्याने शोधणे किंवा त्या संकल्पना आज गैरलागू ठरवणे यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. ‘विन-विन सिच्युएशन’ या आज व्यवस्थापनशास्त्रात नावाजल्या जाणाऱ्या तोडगा-तंत्राचा वापर गांधीजींनी राजकारणात कसा केला, हेही पाहावे लागेलच. मात्र आज अशा प्रकारे जर गांधी यांचा विचार केला, तर काश्मीर आणि अनुच्छेद ३७० यांविषयी फार अभिमान बाळगता येईल, अशी परिस्थिती नाही. ब्रिटिश इतिहासकार आनरेल्ड टॉयनबी यांनी ‘माझ्या वसाहतवादी देशालाही गांधी यांनी सन्मानानेच वागविले आणि त्या माझ्या देशाची शान ढळू दिली नाही’ असे म्हटले आहे, ती ‘शत्रू न मानण्या’च्या संकल्पनेला मिळालेली सर्वोच्च दाद. ब्रिटिश हे शत्रूच आहेत, आपल्या भारतमातेवर ते अत्याचार करताहेत आणि त्यांचा नायनाट केला पाहिजे, असे सांगणाऱ्या अनेकांपेक्षा गांधीजींचे का ऐकले गेले, याचे उत्तर त्यांनी प्रत्येकाला ‘सत्याग्रहा’चे जे हत्यार दिले त्यात शोधावे लागते. तूच तुझा दिवा हो,  या बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे काम करण्याची ताकद सत्याग्रहाच्या विचारामध्ये आजही आहे. सत्याग्रह या विचाराशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ते तेव्हा ‘चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे’ या विश्वासामुळे भोळसट, मूर्खच ठरविले जात. आजही साधनशुचितेवर, धर्मनिरपेक्षतेवर किंवा राज्यघटनेतील अन्य तत्त्वांवर विश्वास असणाऱ्यांकडे त्याच नजरेने पाहण्याची मुभा आहे. परंतु सत्याग्रहाच्या विचाराने जे आत्मिक बळ दिले, ते आजही नाकारता येणारे नाही. सरकार कोणाचे आहे, अर्थव्यवस्था समाजवादी आहे की गांधीवादी की नवउदारमतवादी, इतकेच काय देश कोणता आहे, दमनयंत्रणा नेमकी किती प्रबळ आहे या तपशिलांमुळेही सत्याग्रहाच्या विचारात काही फरक पडणे अशक्यच. मी जे करीत आहे ते व्यापक भल्यासाठी आणि व्यापक सत्याच्या आधाराने टिकणारे आहे, हा विश्वास जेव्हा असतो, तेव्हा तो देशकालनिरपेक्षच असतो.

धोका एकच. अप्रामाणिकपणा. आजच्या इंटरनेट युगात आणखी एक धोका म्हणजे दिखाऊपणाला प्रामाणिकपणा मानण्याची सहज सोय. हे धोके आधी नव्हतेच, असे नव्हे. स्वत:स गांधीवादी म्हणविणाऱ्या अनेकांचे हसे झाले, तेव्हा या धोक्यानेचआपले काम चोख केले होते. काही वेळा, अप्रामाणिकपणा उघड होण्यास वेळ लागला इतकेच. त्यातून सत्याग्रह या शब्दावरही अपरिहार्यपणे धूळ साचली.

तसे न होता सत्याग्रहाची झळाळी कायम राहो, एवढीच गांधी जयंतीची प्रार्थना असू शकते.