गेले वर्षभर आम्ही जे काही भोगलं, ते आता आम्ही दहा दिवसांच्या उत्साहात विसरून जाणार आहोत आणि तुला निरोप देताना मनांभोवती आवळलेले निराशेचे फासही आम्ही तोडून विसर्जति करून टाकणार आहोत. नव्या वर्षांत आम्हाला नव्या संकटांशी भक्कमपणे लढण्याची ताकद आमच्या मनांना तुझ्याकडून मिळावी एवढीच आमची प्रार्थना आहे.

संध्याकाळ होणार आणि सूर्यास्त झाल्यावर अंधारच पडणार, हे भौगोलिक सत्य आम्हाला माहीत आहे. पण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीतही, उद्याची पहाट नक्की उगवणार या एकाच जाणिवेने आम्ही आश्वस्तही असतो. पण गेले वर्षभर आम्ही अस्वस्थ आहोत. चिंता आणि काळजीची मनावर धरलेली काजळी दिवसागणिक घट्ट घट्ट होत आहे. उद्याची पहाट उगवेल ना, उगवली तरी, नंतर सूर्योदय होईल ना, ती सोनेरी किरणे सकाळी नवा उत्साह घेऊन येतील, की नवेच काही तरी अप्रिय समोर ठेवतील, या काळजीने प्रत्येक रात्रीच्या अंधारात आमची मने दडपून जात होती. काही तरी चांगले, थोडे फार मनासारखे, आणि अधूनमधून तरी काही हवेहवेसे घडेल, एवढीच आमची अपेक्षा होती. अर्थात, सारे काही छान छान, अच्छे अच्छे दिवस असावेत, असं आमचं म्हणणंच नाही. जगण्याचे सारेच क्षण सुखाने ओसंडून वाहू लागले, तर माणूसपण त्यात हरवून जाईल, हेही आम्हाला माहीत आहे. म्हणूनच, आमच्या अपेक्षाही फार मोठय़ा नव्हत्या. दररोजचा नवा दिवस साऱ्यांना किमान समाधानात साजरा करता यावा, संकटे आली तरी ती पेलवण्याची शक्ती प्रत्येक पाठीच्या कण्यामध्ये असावी अशीच आमची अपेक्षा होती. पण तसे फारसे घडलेच नाही. प्रत्येक दिवस नवी अस्वस्थता, नवी निराशा सोबत घेऊनच जणू उजाडत राहिला. नव्या दिवसागणिक नव्या संकटाचे सावट मनामनावर दाटलेलेच राहिले. असुरक्षिततेच्या, असहायतेच्या ओझ्याखाली दडपून जगणारी मने, मोठी स्वप्नेदेखील पाहू शकत नाहीत. तेवढी त्यांची कुवतच राहात नाही, हा अनुभव आम्हाला काहीसा अस्वस्थ करीत राहिला आणि त्या दडपणाखालीच आम्ही आमचे सरते वर्ष वाया घालविले.
गेल्या वर्षी तू आलास, तेव्हा महाराष्ट्राने एक संकट नुकतेच झेलले होते. पुण्याजवळचं माळीण नावाचं एक टुमदार गाव बघता बघता भूतकाळाच्या पडद्याआड गेलं आणि त्या एका घटनेने अवघ्या आयुष्यांना भविष्याच्या भयानं ग्रासलं. त्यानंतर महाराष्ट्रापुढे संकटांच्या मालिका जणू हातात हात घेऊन सरसावत राहिल्या आणि आमच्या खंबीरपणापुढेच आव्हाने उभी राहिली. आम्ही किती झेललं, किती सोसलं, याचे निराश पाढे तुझ्यासमोर वाचण्याचा आजचा दिवस नाही, कारण तू हे सारे पाहिलेच आहेस अशी आमची भावना आहे. पण तू आमचा पिता आहेस, त्राताही आहेस. भवदु:खाचे डोंगर समोर उभे राहिले की तुझ्या केवळ स्मरणाने त्यावर मात करण्याची िहमत मनावर स्वार होते, ही आमची श्रद्धा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही असंख्य दगडधोंडय़ांना ठेचकाळलो आणि प्रत्येक कळ जणू जीवघेणी होती. त्या त्या क्षणी आम्हाला तुझीच आठवण आली होती.
आज ते वर्ष सरलं आहे. सरल्या वर्षांच्या गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र जीवघेण्या दुष्काळाच्या भयाण सावटाखाली जगतोय. आकाशातल्या प्रत्येक काळ्या ढगाआड दडलेल्या आशाआकांक्षा जलधारांच्या रूपाने भरभरून बरसतील आणि त्या शिडकाव्याने भविष्य आश्वस्त होईल, अशा आशेने अवघं राज्य आकाशाकडे डोळे लावून बसलंय. दुष्काळाच्या भयाने काळवंडलेल्या अनेकांनी धीर सोडून अखेर मृत्यूला कवटाळलं. त्यांचा अखेरचा श्वास मानेभोवतीच्या फासातच गुदमरला आणि कुटुंबाचं भविष्य अधांतरी ठेवून अनेकांनी या जगाचा निरोप घेतला. मनाची उमेदच हिरावून घेणाऱ्या या घटनांनी जवळपास प्रत्येक दिवसच एवढा काळवंडलेला होता, की आसपासचं चांगलं काही अनुभवण्याची, त्याचा आनंद घेण्याची उमेदच त्यामध्ये हरवून गेली. विदर्भात कधीपासून ठाण मांडून बसलेली आत्महत्यांची साथ मराठवाडय़ातही सरकली आणि दुष्काळभयाने ती दिवसागणिक आणखीनच भयाण होत गेली. राज्याला जगविणारा शेतकरी मात्र, मृत्यूला कवटाळत राहिला, यापेक्षा निराशाजनक चित्र कोणते असू शकते? या आत्महत्यांमुळे, मागे राहिलेल्या जिवंत मनांवरदेखील निराशेचे ओरखडे उमटत राहिले. यात भर म्हणून दररोज कानावर आदळणाऱ्या साऱ्या वार्ता जणू अशुभाचे बोट धरूनच वावरत राहिल्या. कुठे खून होताहेत, कुठे बलात्कार होताहेत, रस्त्यारस्त्यावर अपघातांच्या रूपाने जणू संकटे दबा धरून बसल्याच्या भयाण जाणिवेखालीच घराबाहेर पडावे लागत आहे. बेशिस्त रहदारी, कचऱ्याचे ढिगारे, जागोजागी पडलेला थुंकीचा सडा, रस्त्यावरचे खड्डे, तुंबलेले नाले-गटारे आणि यात भर म्हणून, अलीकडे फोफावत चाललेला भावनिक उन्माद.. सर्वधर्मीय मिरवणुका, धर्माच्या नावाखाली चाललेली भावनिक दडपशाही, सार्वजनिक उत्सवांची रस्त्यावरील आक्रमणे, महिलांची असुरक्षितता, असुरक्षित मुले, अशी किती तरी मोठी यादी आज तुझ्यासमोर ठेवायची आहे. महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवणाऱ्या मुंबापुरीवर गेले आठवडाभर काहीसे असुरक्षिततेचे ढग दाटले आहेत. मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरी रेल्वे सलग दोन दिवस रुसली आणि रेल्वेच्या चाकाशी स्पर्धा करत धावणाऱ्या श्रमजीवी आणि बुद्धिजीवी मुंबईकरांची पावले अडखळली. असे काही घडले, की आमची गती मंदावते. पुन्हा उभे राहून पहिल्या गतीने पळण्याची आमची उमेद मात्र कायमच असते. हीच उमेद जगविण्यासाठी आम्हाला तुझा दिलासा हवा आहे.
अर्थात, आम्ही हतबल आहोत. संकटे झेलण्याचे, त्यातून बाहेर पडण्याचे आमचे सारे प्रयत्न आता खुंटले आहेत आणि आता केवळ तुझे चमत्कारच आम्हाला यातून वाचवू शकतील अशा हतबल भावनेने अजूनही आमचा बळी घेतलेला नाही. जगण्याची आणि संकटे झेलण्याची आमची उमेद आम्ही हरवलेली नाही. अशी असंख्य संकटे आली तरी ती पेलण्याची आमची तयारी आहे. आमचे तुझ्याकडे एकच मागणे आहे. ते म्हणजे, संकटे झेलण्याची, त्यांच्याशी लढण्याची आणि ती परतवून लावण्याची शक्ती तूच आम्हाला दिली पाहिजे. हे आमचे तुझ्याकडे हक्काचे साकडे आहे. तू संकटमोचक आहेस, तू सुखकर्ता आहेस. तू सोबत असताना कोणत्याही संकटाचे सावटदेखील आसपास असू नये अशी आमची भावना आहे. म्हणूनच, गेले वर्षभर आम्ही जे जे काही भोगलं, ते आता आम्ही दहा दिवसांच्या उत्साहात विसरून जाणार आहोत आणि तुला निरोप देताना, या यातना, संकटे आणि त्यामुळे मनांभोवती आवळलेले निराशेचे फासही आम्ही तोडून विसर्जति करून टाकणार आहोत. नव्या वर्षांत आम्हाला नव्या संकटांशी भक्कमपणे लढण्याचे बळ हवे आहे. ती ताकद आमच्या मनांना तुझ्याकडून मिळावी एवढीच आमची प्रार्थना आहे. आमच्या भक्तीचा तो पारंपरिक वारसा कदाचित आज हरवत चालला असेल. या भक्तीवर नव्या जगाच्या नव्या संस्कृतीची अप्रिय पुटे चढलीही असतील. पण त्याखालची आमची भक्ती मात्र, आजही पारंपरिक भक्तीएवढीच पारदर्शक आहे. तुझ्या मिरवणुकीसमोरची बेभान आणि क्वचित बीभत्सही वाटणारी आमची नृत्ये आणि त्यासाठी वाजविले जाणारे संगीत भक्तिभावाशी पुरते विसंगत आहे, हे आम्हाला मान्य आहे. तुझ्या दहा दिवसांच्या उत्सवकाळात आम्ही आमच्या परंपरांपासून लांब चालल्याचाच पुरावा मिळतो, हेही आम्हाला मान्य आहे. पण आमची भक्ती आणि तुझ्यावरची श्रद्धा मात्र, तेवढीच निखळ आहे. त्याचा स्वीकार कर. नव्या वर्षांत विघ्नाची वार्ता न उरावी, हीच आम्हा भक्तांची भाबडी भावना आहे.