मुली दत्तक घेण्याचे सर्वाधिक प्रमाण पुण्यातच आहे ही बातमी सुखावणारीच, पण..

प्रेयसीची आळवणी करून तिची मनधरणी करण्यासाठी नव्याने येऊ घातलेल्या ठुमरी या शब्दसंगीतातल्या प्रकाराला वाजिद अली शहाच्या दरबारामुळे प्रतिष्ठा मिळत होती त्याच काळात, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात, महात्मा जोतिबा फुले मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात शाळा काढायला निघाले होते. त्यांचे सहाध्यायी डॉ. विश्राम घोले यांनी आपल्या मुलीला शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना नातेवाईकांकडूनच इतका विरोध झाला, की त्यांनी काचा कुटून घातलेला लाडू खायला देऊन तिचा मृत्यू घडवला. काळाच्या एकाच टप्प्यात घडणाऱ्या या घटना भारताच्या सामाजिक भानाचे हे परस्परविरोधी पुरावे आपली मानसिकता दाखवणाऱ्या आहेत. तेराव्या शतकात याच पुण्याजवळच्या आळंदीमध्ये मुक्ताबाईला संतत्व बहाल करणारा समाज आपापल्या घरातल्या मुलींना मात्र अंधारकोठडीचे आयुष्य भोगायला लावत होता. जगातल्या प्रत्येक प्राणिमात्राचे भले व्हावे, अशी कामना करणाऱ्या ज्ञानेश्वरांना याच मुक्ताईने जगण्यातले शील समजावून सांगितले आणि ‘भेदाभेद अमंगळ’ ही  शिकवण दिली. मुक्ताईचा हा हुंकार समाजापर्यंत पोचायला काही शतके उलटावी लागली. हे सारे समजून घेता घेता आपण एका अशा वळणावर येऊन पोहोचलो आहोत की, टाकून दिलेल्या ‘मुली’चा ‘मुलगी’ म्हणून स्वीकार करण्यासाठी समाजातले मूठभर तरी पुढे येऊ लागले आहेत. मध्ययुगापासून आजपर्यंत हजारोंनी केलेल्या प्रयत्नांचे हे थोडेसे, पण महत्त्वाचे यश.

आई हवी, बहीण हवी, बायको हवी, पण पोटी मुलगी नको, असे का वाटते अनेकांना? मुलीचे शिक्षण, लग्न यावर होणारा खर्च अनाठायी का वाटतो अनेकांना? मुलीचा जन्म म्हणजे अनेक संकटांना आमंत्रण आणि मुलाचा जन्म म्हणजे म्हातारपणाची सोय, असे वाटणाऱ्यांच्या संख्येत अजूनही घट का होत नाही? मुलगी झाल्यावर तिला देवळाच्या दारात किंवा अनाथालयात पाठवणारे का वाढताहेत या शिक्षित समाजात? मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी हे परक्याचे धन, ही मानसिकता शिक्षणाने दूर होत नाही आणि मुलीच्या शिक्षणावर खर्च करून शेवटी ती दुसऱ्याच्याच घरी जाणार, त्यापेक्षा मुलावर अधिक गुंतवणूक करणे उपयुक्त, असा त्यामागचा स्वार्थी विचारही जाता जात नाही. हे सारे एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकात घडते आहे आणि मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत फक्त चिंता व्यक्त होते आहे. समाजाच्या जडणघडणीत मुलींनाही काही स्थान असते, ते महत्त्वाचे असते, त्यासाठी आपले विचार बदलावे लागतात आणि त्यासाठी आधी सामाजिक रचनाही बदलावी लागते, याचे भान येण्यासाठी आपल्याला फार म्हणजे फारच उशीर झाला. हुंडाबळी ही आपल्या समाजाची दुखरी नस अजूनही ठसठसतेच आहे आणि मुलगा होईपर्यंत मुलींना जन्म देण्याची प्रवृत्तीही कमी होताना दिसत नाही. मुलगी झाली, म्हणून सुनेला छळणारी सासू अजूनही आपला तोरा सोडायला तयार नाही आणि तिच्या या प्रवृत्तीला खतपाणी घालणारे पुरुष – नवरे आणि मुलगेही – मागे हटत नाहीत. ही स्थिती केविलवाणी आणि तेवढीच चीड आणणारी. अशा स्थितीत मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, ही केवढी तरी आश्वासक वाटावी अशी घटना.

महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू करायचे ठरवले तेव्हा- १८४८ सालात- त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. आपल्या पत्नीलाच, सावित्रीबाईंना पहिली शिक्षिका बनवणे हे त्या वेळी धाडसच होते. त्याआधी नवऱ्याच्या निधनानंतर त्याच्या चितेवर उडी घेऊन, त्याच्याबरोबरच अनंतात विलीन होण्यास मुलींना प्रवृत्त करणारा समाज होता. असे सती जाणे, हे प्रतिष्ठेचे वाटायला लावणारा तो समाज. तिकडे फाळणीपूर्व बंगालमध्ये राजा राममोहन राय यांच्यासारख्या सुधारकाला त्याविरुद्ध कायदेशीर लढा देण्याची ऊर्मी आली आणि त्यात यशही आले. तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने सतीचा कायदा करून त्यास बंदी केली. पण राजा राममोहन राय यांना मुलींची शाळा का काढावीशी वाटली नाही? आणि त्यांचा हा सुधारणेचा वसा पुण्यातल्या जोतिबा फुलेंनाच का घ्यावासा वाटला, या प्रश्नांना इतिहास उत्तरे देत नसतो. भारतातली पहिली शाळा पुण्यातच सुरू झाली आणि होणार होती, यामागे तेराव्या शतकापासूनचे अनेकांचे प्रयत्न कारणीभूत होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर स्त्रीदाक्षिण्याचा संस्कार घडवणाऱ्या जिजामाता याच पुण्यात होत्या. महाराजांनी त्या काळी समाजमान्यता पावलेला ‘जनानखाना’ ठेवायला विरोध केला, हे त्या शिकवणीचे फलित. तरीही हे बदल तळागाळापर्यंत तर सोडाच, पण त्या वेळच्या सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या मध्यमवर्गापर्यंतही पोहोचले नव्हतेच. नाही तर १८८१ मध्ये याच पुण्यात संगीत नाटकांमध्ये ‘स्त्री पार्ट’ करण्यासाठी पुरुषांना बोलावतेच ना! संगीत नाटकांना रसिक म्हणूनही महिलांना परवानगी नाकारणाऱ्या या रसिकांनी हळूहळू त्यांच्यासाठी ‘बाल्कनी’ राखून ठेवायला परवानगी तरी मिळाली. एवढेच काय, अगदी विसाव्या शतकाच्या प्रारंभी नाटकांमधून भूमिका करू इच्छिणाऱ्या कमलाबाई कामत-गोखलेंनाही पुरुष पात्र म्हणूनच यावे लागले होते रंगभूमीवर.

गाणे ऐकायलाही बंदी असलेल्या बाईला मफलीत स्थान मिळायलाही १९२२ साल उजाडावे लागले. महात्मा फुलेंच्या प्रयत्नांचेच ते यश होते आणि त्यामुळेच हिराबाई बडोदेकर यांना जाहीर मफलीत आपले शालीन, अभिजात संगीत ऐकवण्याची संधी मिळाली. त्यांच्याच भगिनी कमळाबाई बडोदेकर यांनाही नाटकातून पहिली स्त्रीभूमिका करण्याचे ‘भाग्य’ मिळाले आणि त्यांच्या तिसऱ्या भगिनी सरस्वती राणे यांनाही बोलपटाच्या जमान्यात कुलीन पाश्र्वगायिका म्हणून मान्यता मिळाली. मुलींना शिकवावे, मोठे करावे आणि त्यांच्या स्वप्नांना पंख द्यावेत, असे वाटणाऱ्यांसाठी ही सारी उदाहरणे होती. पुण्यात हे सारे घडत राहिले आणि त्याचा प्रसार आपोआपच पंचक्रोशीत होत गेला. बदलाचा वेग कमी असला, तरी तो घडत मात्र होता. तो सगळ्याच क्षेत्रांत होत होता आणि त्याची फळे दिसायलाही लागली होती. मुली दत्तक घेण्याच्या प्रमाणात झालेली वाढ हे त्याचेच फलित. खऱ्या आई-बापांना नको असलेल्या मुलींना हक्काचे घर देणारे हे पालक नुसते सुसंस्कृत नाहीत तर सुजाणही आहेत. दत्तक घेतानाही मुलग्यांना असलेली मागणी कमी होणे, हे विचारांचे परिवर्तन आहे. त्यामागे गेली अनेक शतके प्रवाहाविरुद्ध उभे राहणाऱ्या समाजधुरीणांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. नाही तर न्यायमूर्ती महादेव गोिवद रानडे यांच्या पुढाकारातून परित्यक्तांच्या शिक्षणाची चळवळ या पुण्यात उभीच राहू शकली नसती. सेवासदन ही त्यांनी सुरू केलेली संस्था याची साक्षीदार आहे. समाजाने वाळीत टाकलेल्या महिलांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी दिवसाकाठी दहा-बारा मलांची पायी रपेट करून दारोदारी प प गोळा करणाऱ्या महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा हिंगण्याचा आश्रम याच भूमिकेतून उभा राहिला.

एकीकडे जन्मापूर्वी, गर्भावस्थेतच मुलींना मारून टाकण्याच्या िहसक घटना घडत असताना, दुसरीकडे मुलींना दत्तक घेण्याच्या प्रमाणात पुणे आघाडीवर आहे ही केवळ सुसंस्कृतपणा दाखवणारी घटना नव्हे. त्यास कारणीभूत ठरणारे, गेल्या अनेक दशकांमध्ये अनेकांनी केलेले अथक प्रयत्न मोलाचे आहेत. मुली दत्तक घेण्याचे प्रमाण अजूनही मुंबई-पुण्यातच वाढते आहे, ही गोष्ट महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीची अवस्था दाखवणारी आहे. ती बदलण्यासाठी पुन्हा एकदा फुले-रानडे-कर्वे यांचीच गरज आहे, ती मुली दत्तक घेणाऱ्या पालकांच्या रूपाने काही अंशाने का होईना भरून येते आहे, तिला तिचे घर- तिची जागा मिळते आहे, हे केवढे तरी आश्वासक!