बग्गी आणि टांगा यांना हद्दपार करण्याचा निर्णय सरकारने घेतला खरा, पण त्यातून निर्माण होणारे प्रश्न मात्र महापालिकांना सोडवायचे आहेत..
सगळं जगणं वेगवान होत असताना चाकांवर जगणाऱ्या नागरिकांना आता टांगा क्वचितच दिसतो. उद्यानांभोवती घिरटय़ा घालूनच त्यांना जगावं लागतं आहे. मुलांना घोडागाडीचा आनंद मिळवून देण्यापुरताच काय तो त्यांचा दिमाख.
घोडा नामक प्राण्याच्या पाठीवर बसून मैलोन्मैल प्रवास करण्यात केवढा तरी वेळ गमावला, असे चाकाचा शोध लागल्यानंतर समस्त मानवाचे मत होणे स्वाभाविक होते. चाकाच्या शोधाने संपूर्ण मानवजातीच्या जगण्यात केवढी तरी खुशाली आली. माणसाचे चालण्याचे कष्ट कमी करण्यासाठी या चाकाने जी काही प्रचंड मदत केली आहे, तिला तर तोडच नाही. माणसाने याच घोडय़ाला चाकाची गाडी लावून तिचा टांगा बनवला आणि या टांग्याने दोन ते अडीच शतके इमानेइतबारे सेवा केली. काळ बदलला आणि टांगा ही गोष्ट केवळ बागांपुरतीच मर्यादित राहिली. तरीही टांग्यांनी पूर्णपणे काढता पाय घेतलेला नाही, हे खरेच. आता या टांग्यांना हद्दपार करण्याचा आदेश परंपरेचा कळवळा असलेल्या राज्यातील भाजप सरकारने घेतला आहे. त्यात खरे विशेष हे, की या टांग्यांना जोडलेल्या घोडय़ांची जबाबदारी सरकारने महापालिकांवर टाकली आहे. रस्ते, पाणी, मैलापाणी, पथदिवे, अग्निशामक अशा नानाविध कायदेशीर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या महापालिकेच्या गळ्यात टांग्यांच्या घोडय़ांचीही जबाबदारी टाकणे, म्हणजे उंटाच्या पाठीवरील शेवटची काडीच ठरण्याची शक्यता. सरकारने टांग्यांमुळे रहदारीस होणारा अडथळा दूर केला, तरी पालिकेपुढे नवा अडथळा उभा केलाच आहे. मोठय़ा शहरांप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागातही आता टांगे जवळजवळ दिसेनासे होऊ लागले आहेत. तेथे रिक्षासारख्या नव्या वाहनांची सोय झाल्यामुळे आता टांगे कालबाह्य़ झाले. नाही तरी डांबरी किंवा सिमेंटच्या रस्त्यांवर त्या गरीब आणि तरीही अतिशय चलाख अशा प्राण्याला चालवून चालवून त्याचे जे हाल होत होते, ते पाहवतच नव्हते म्हणा! घोडय़ाच्या पायांना नाल ठोकून त्याला चालण्यासाठी अधिक शक्ती देण्याची कल्पनाही जुनीच. लोखंडी नाल त्याच्या खुरांना चक्क खिळ्यांनी ठोकून त्याला वेदना देण्याची परंपरा पूर्वापारची. एके काळी घोडय़ाचा नाल सापडणे हे सुचिन्हही मानले जात असे.
घोडागाडीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ती बग्गीने. मुंबईमध्ये मागील शतकात अशा बग्ग्या बघायला मिळत. ब्रिटिशांनी आणलेल्या ट्रामच्या बरोबरीने धावणाऱ्या या बग्ग्या अतिशय सुशोभित आणि देखण्या असत. महाजनांसाठी खास बनवलेल्या या बग्गीने त्यात बसलेल्या व्यक्तीची प्रतिष्ठाही तोलली जायची. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागण्यापूर्वीच मुंबईत १८७४ मध्ये परळ आणि कुलाबा भागात पहिली ट्राम धावली. त्यालाही ओढणारे घोडेच होते. त्या काळात ट्रामचे कंत्राट मिळालेल्या ब्रिटिश कंपनीकडे ९०० घोडय़ांचा ताफा होता. १९०७ मध्ये विजेवर चालणारी ट्राम सुरू झाली, तेव्हा त्या घोडय़ांची निगा कोणी राखली, हा खरे तर संशोधनाचाच विषय. ब्रिटिशांच्या ऐटबाज व्हिक्टोरिया बग्गीला आणि टांग्याला हद्दपार करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षीच दिला. बग्गीला बेकायदा ठरवून न्यायालयाने एक वर्षांच्या मुदतीत ती इतिहासजमा करण्याचे आदेश दिले. आजमितीस एकटय़ा मुंबईत व्हिक्टोरिया बग्गी चालवणारी सुमारे ७०० कुटुंबे आहेत. या कुटुंबांना आता घोडय़ांचे पालनपोषण कसे करायचे हा प्रश्न पडलेला असतानाच सरकारने ती जबाबदारी थेट महापालिकेवर टाकून हा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला आहे. ‘टपटप टपटप टाकीत टापा, चाले माझा घोडा, पाठीवरती झूल मखमली, पायी रुपेरी तोडा,’ असे गुणगुणत घोडय़ाचा लगाम हाती ठेवणाऱ्या टांगेवाल्यांना आपल्या घोडय़ाबद्दल केवढा अभिमान असतो. त्याचे खाणेपिणे, त्याचा खरारा याबाबत त्यांच्याकडून कधीच हेळसांड होत नाही, याचे कारण तो घोडा हा केवळ त्यांच्या जगण्याचे साधन बनून राहत नाही. त्याच्याशी त्यांचे मैत्र जुळलेले असते. त्याला सजवताना अपार मायाच उचंबळून येत असते.
घोडा या प्राण्याच्या ऐटीने सगळ्यांनाच भुरळ घातली. त्याच्या बरोबरीने त्यावर स्वार होणाऱ्या ऐटबाजांचे कौतुक व्हायचे तेही त्याचमुळे. ‘घोडय़ावरून आला बसून, कुणी बहादूर सरदार, असेल बाई कोण्या देशी त्याचे गं घरदार’ असे मनोज्ञ चित्र रंगवणारी युवती त्या घोडय़ाच्या ऐटीवरही फिदा असायची, हे वेगळे सांगायलाच नको. या देशातील सगळ्यांना कित्येक दशके या घोडय़ाने इकडून तिकडे सहजपणे नेले आहे. त्याच्या घोडागाडीने अगदी लहान मुलांनाही आकर्षित केले आणि घरातल्या सगळ्या मोठय़ांच्या पाठीवर बसून घोडागाडीचा खेळ खेळण्याची परंपरा आजपर्यंत अबाधित राहिली. घरातल्या लहानग्यांच्या खेळण्यात अगदी अलीकडेपर्यंत लाकडी घोडा हमखास असे. त्या घोडय़ावर बसणाऱ्या त्या छोटय़ांनाही आपण कुणी सरदार असल्याचा ‘फील’ यायचा. आता लाकडी घोडा गेला, त्याला चाके आली. तो टपटप आवाज न करताच पळूही लागला. पण रस्त्यावर धावणाऱ्या टांग्यांच्या घोडय़ांना अजूनही पळावेच लागते आहे. घोडागाडी सामानासह दरवाजासमोर उभी राहणे हा त्या काळी एक ‘सेलिब्रेट’ करण्याचा क्षण असे. उंच टांग्यातून उतरताना होणारी पाहुण्यांची धडपड आणि त्यांच्या सामानाची होणारी हेळसांड यापेक्षा दारी घोडागाडी येणं याला विलक्षण महत्त्व असायचं.
घोडागाडीला मुंबईत पहिला धक्का दिला तो विजेवरच्या ट्रामने. एकाच वेळी अनेक प्रवाशांना जाण्यासाठीची ती एक आधुनिक सुविधा होती. टांग्याच्या मानाने अधिक वेगवान आणि किफायतशीर ट्रामने मुंबईकरांची मनं जिंकून घेतली, तरीही टांगा मात्र आपलं वजन राखून होता. फार लांबच्या नाही, पण छोटय़ा प्रवासासाठी टांगा हेच तेव्हाचं मुख्य साधन होतं. ट्राममुळे मुंबईचा चेहरा मात्र बदलला. तिला आधुनिकतेचं रूपडं ल्यायला मिळालं. त्यानंतरच्या लोकल्सनं तर साऱ्या शहराला चाकावर धावायला शिकवलं. ती त्यांची ‘लाइफलाइन’ बनली. या देशातील पहिली रेल्वेगाडी १८५३ मध्ये याच मुंबईत बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान धावली. तेव्हा नंतर निर्माण झालेल्या ‘लोकल्स’ची ती मुहूर्तमेढ होती, हे कुणाच्या गावीही नव्हतं. रिक्षा हे जनसामान्यांचं प्रवासी साधन बनायला लागल्यानंतर मुंबई-पुण्यातून टांगेवाल्यांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली. तरीही पुण्याच्या मैदानांवर होणाऱ्या क्रिकेट सामन्यांत शतक झळकावणाऱ्या फलंदाजाला थेट मैदानात जाऊन हार घालण्याचा परवाना तेव्हा पुण्याच्या बाबू टांगेवाले यांना होता. अगदी आचार्य अत्रे यांनाही या टांगेवाले यांनी भुरळ घातली होती. पुण्याचे वेगळेपण जपणारे हे गृहस्थ पोटापाण्यासाठी टांगाच चालवायचे. पण त्याबरोबर आपली खेळाची आवडही जपायचे. त्यांच्यानंतर ना टांगेवाले दिसतात ना त्यांच्या घोडागाडय़ा.
सगळं जगणं वेगवान होत असताना चाकांवर जगणाऱ्या नागरिकांना आता टांगा क्वचितच दिसतो. शहरी वाहतुकीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या गाडीला आता उद्यानांभोवती घिरटय़ा घालून जगावं लागतं आहे. लहान मुलांना घोडागाडीचा आनंद मिळवून देण्यापुरताच काय तो त्यांचा दिमाख. शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवण्यात आली. ती देशातील बहुतेक शहरांमध्ये कशीबशी सुरू आहे. मुंबईवगळता एकाही शहराला या वाहतूक व्यवस्थेकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज वाटली नाही. त्यामुळे खासगी क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी यांचा व्यवसाय तेजीत आला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची तामिली करण्याची जबाबदारी पार पाडताना सरकारने ते काम थेट महानगरपालिकेकडे सोपवून टाकले आहे. बग्गी आणि घोडागाडी मुंबईतून हद्दपार करताना, त्यांना जोडलेल्या घोडय़ांची निगराणी तर पालिकेने करायचीच आहे, पण त्या व्यवसायात असलेल्यांचे पुनर्वसनही करायचे आहे. आता या घोडय़ांच्या पागांसाठी महापालिकेला जागा शोधावी लागेल. मग त्यांच्या निगराणीसाठी मनुष्यबळ निर्माण करावे लागेल. त्या घोडय़ांच्या खाण्यापिण्याची तरतूदही करावी लागेल. एवढे करून भागणार नाही, तर टांगेवाल्यांना जगण्याचे पर्यायी साधनही द्यावे लागेल. त्यांना पथारीवाले म्हणून परवानगी द्यायची, तर त्यासाठीच्या धोरणाचाच पत्ता नाही. बग्गी आणि टांगा असा इतिहासजमा होत असताना मुंबईकरांनीही जरा हळवं होण्याची मात्र गरज आहे!