राजकीय विरोधक म्हणजे शत्रुराष्ट्र असे सूचित करणे, हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय असू शकत नाही..

गुजरात निवडणुकीचा प्रचार आज एकदाचा संपला. देशातील सुजाण तो कधी संपतो याची वाटच पाहात होते. याचे कारण या प्रचाराची क्षणाक्षणास उतरत चाललेली पातळी. निवडणुका या लोकशाहीच्या जीवनचक्राचा अविभाज्य घटक आहेत आणि त्या तशाच राहणार. परंतु त्या संपल्यानंतर राजकीय जनजीवन पूर्वपदावर यायला हवे. याचे कारण निवडणुकांत स्पर्धा असणे अपेक्षित असते; शत्रुत्व नव्हे. परंतु गुजरात निवडणुका या पारंपरिक राजकीय सभ्यतेच्या संकेतास अपवाद ठरतील असे दिसते. विशेषत: पाकिस्तानी उच्चाधिकाऱ्यांशी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माजी लष्करप्रमुख ते राजनैतिक अधिकारी ते काही संपादक यांच्या उपस्थितीत केलेली चर्चा ज्या दिशेने वाहत गेली ते पाहता काँग्रेस आणि भाजप या दोन महत्त्वाच्या पक्षांत निवडणुकोत्तर समेटाची फारशी लक्षणे नाहीत. ही चर्चा माजी राजनैतिक अधिकारी आणि आजी वाह्य़ात शब्दभ्रमकार मणिशंकर अय्यर यांच्या घरी झाली. माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, माजी मंत्री नटवरसिंग, माजी सनदी अधिकारी सलमान हैदर, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काही संपादक असे निवडक या भोजनबठकीस निमंत्रित होते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांचा अधिकृत भारत दौरा हे या बठकीचे निमित्त. तीस पाकिस्तानचे भारतातील राजदूतदेखील हजर होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत अधिकृत भूमिका काहीही असली तरी पडद्यामागून अनेक पातळ्यांवर अनौपचारिक बातचीत सुरूच असते. ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’ या नावाने हे उपद्व्याप ओळखले जातात. या समांतर मुत्सद्देगिरीतून काही हाताला लागल्याचे ऐकिवात नाही. परंतु ते करणाऱ्यांस काही केल्याचे समाधान मिळते इतकेच. पंतप्रधान मोदी यांच्या मते अय्यर यांच्या घरची ही बैठक गुप्त होती. हे तर अगदीच हास्यास्पद. रीतसर निमंत्रणे पाठवून अनेकांना बोलाविले गेलेली बैठक गुप्त कशी? यानंतर अन्यत्र बोलताना पंतप्रधानांनी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख अर्शद रफीक यांनी अहमद पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले. यातील हास्यास्पद बाब म्हणजे हे अशा नावाचे कोणी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी कधीच नव्हते. म्हणजे हादेखील कल्पनाविलासच. तेव्हा मुळात या बठकीतही गुजरात निवडणुकांची चर्चा झाल्याची लोणकढी पंतप्रधानांनी मारण्याचे काही कारणच नव्हते. तो आता त्यांचा स्वभावच आहे असे म्हणून हे सोडून देता येईल. परंतु माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत असे म्हणता येणार नाही.

सिंग हे काही कोणी सरकारी राजनैतिक अधिकारी नव्हेत. ते पंतप्रधान होते आणि त्या नात्याने उभय देशांतील संबंधांचे गांभीर्य त्यांना आहे. तरीही त्यांनी मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या वाचाळेश्वराने आयोजित केलेल्या बठकीस जावे, हे अनाकलनीय तर निश्चित. हे अय्यर आपल्या सरकारी सेवाकाळात पाकिस्तानातही होते. त्यामुळे त्या प्रश्नावर आपणास इतरांपेक्षा जरा जास्तच कळते असा त्यांचा आविर्भाव असतो. अर्थात आपल्याला सगळ्यांतले सगळेच सर्वाधिक कळते असे अय्यर यांना नेहमीच वाटत असते, ही बाब अलाहिदा. तेव्हा या वायफळांच्या गप्पांत सहभागी होण्याची सिंग यांना गरज नव्हती. तशी ती होती हे मान्य केले तर त्याआधी सिंग यांनी विद्यमान सरकारला त्याची कल्पना द्यावयास हवी होती, हे निश्चित. माजी पंतप्रधान या नात्याने त्यांचे ते कर्तव्यच होते. तेव्हा या प्रश्नावर सिंग यांचे तसे जरा चुकलेच हे मान्य करायला हवे.

परंतु म्हणून माजी पंतप्रधानाच्या एका चुकीवर आजी पंतप्रधानाने अधिक मोठी चूक करणे हा शहाणा मार्ग असू शकत नाही. मोदी यांनी नेमका तोच निवडला आणि या बठकीत गुजरात निवडणुकांवर चर्चा झाल्याचा आरोप केला. तो एकाच वेळी हास्यास्पद आणि कुटिल असा दोन्ही आहे. याचे कारण ज्या व्यक्तीस सत्तेच्या सर्वोच्च पदी असताना आपल्या पक्षाची सत्ता वाचवता आली नाही ती व्यक्ती विरोधी पक्षात असताना गुजरातसारख्या राज्यात आपल्या पक्षास कशी काय वाचवणार? दुसरे असे की वादासाठी समजा चर्चा झाली असे गृहीत धरले तरी गुजरातेतील मतदारांनी त्यावर आपला मतदानाचा निर्णय बदलण्याचे कारणच काय? इतका किमान तर्क सर्वोच्च पदांवरील व्यक्तीस लावता येत नसेल असे मानता येणारे नाही. तेव्हा यामागे अन्य विचार असणार हे उघड आहे. तो विचार म्हणजे आपल्या प्रतिस्पध्र्याचे शत्रूशी संधान आहे असे दाखवून देणे. तसे असेल तर ते निश्चितच घातक ठरते. मोदी यांनी असे सूचित करणे सर्वार्थाने अयोग्यच.

याचे कारण म्हणजे असे केल्याने मोदी थेट आपले पक्षाध्यक्ष अमित शहा वा गिरीराज सिंग किंवा तत्समांच्या पातळीवर खाली येऊन बसतात. बिहारात विरोधक जिंकले, भाजपचा पराभव झाला तर शेजारील पाकिस्तानात आनंदाचे फटाके फुटतील असे विधान शहा यांनी केले होते. त्याही वेळी त्यांना आपल्या विरोधकांचे पाकिस्तानशी साटेलोटे आहे असेच सुचवायचे होते. मोदी यांना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे असे फर्मान गिरीराज सिंग यांनी काढले होते. त्यामागील अर्थही तोच होता. आणि आताही आपले विरोधक हे गुजरातेत भाजपला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानचा आधार घेत आहेत असे पंतप्रधान सुचवतात तेव्हा त्यामागील अर्थही विरोधक म्हणजे शत्रुराष्ट्र असाच असतो. हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय असू शकत नाही. त्याचप्रमाणे यामागे आणखी एक सूचकता दडलेली आहे. ती अय्यर यांच्या घरी चच्रेत सहभागी झालेल्यांच्या परिचयात आहे. हमीद अन्सारी, सलमान हैदर अशांची उपस्थिती असलेली बैठक ही पाकिस्तानच्या हस्तक्षेपाची द्योतक आहे असे सूचित करणे म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्मास राष्ट्रविरोधी रंगात रंगवण्यासारखे आहे. हा अगदी दुय्यम मंडळींचा उद्योग. २०१४ सालच्या मे महिन्यापासून आपल्याकडे तो मोठय़ा जोमात सुरू आहे. परंतु या उद्योगात पंतप्रधानांनी आपले हात बरबटवण्याचे काहीही कारण नव्हते. मोठय़ा पदांवरील व्यक्तींनी लहान गोष्टी करणे तसेही वाईटच.

परंतु जे झाले ते अधिकच वाईट. याचे कारण मग इतके दिवस धार्मिक विद्वेषासाठी परिघावरच्या मंडळींना बोल लावण्याची असलेली सोय यापुढे पंतप्रधानांना मिळणार नाही. उत्तर प्रदेशात गोवंश मांसाच्या संशयावरून झालेली हत्या असो किंवा कत्तलीसाठी गाई नेल्या जात असल्याचा खोटा संशय असो किंवा राजस्थानातील अगदी अलीकडची लव्ह-जिहादला जरब बसवण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरणासह करण्यात आलेली हत्या असो. या सगळ्यामागे परिघावरील वा बाहेरील हिंदू माथेफिरू आहेत, असे आतापर्यंत आपणास सांगितले गेले. त्यावर संशय घेण्याचे कारण नाही. या परिघावरील हे असले कर्मठ हे भाजपसाठीच नव्हे तर आपल्या देशासाठीही डोकेदुखी झाले आहेत हे कोणीही अमान्य करणार नाही. पण त्यांना आवरतानाही कोणी दिसत नाही. जेव्हा जेव्हा या अतिरेकी घटकांमुळे भाजपवर टीका झाली तेव्हा तेव्हा भाजपने हे आमचे नाहीत, आमच्या परिघाबाहेरचे आहेत असाच युक्तिवाद केला. त्यावर त्या वेळी विश्वासही ठेवला गेला. परंतु यापुढे भाजप धार्मिक विद्वेषाच्या कारणांसाठी परिघाबाहेरील व्यक्तींना बोल लावू शकणार नाही. याचे कारण या वर्तुळाच्या केंद्रस्थानी असलेल्या पंतप्रधानांनीच थेट विरोधक आणि पाकिस्तान हे समीकरण जोडून दाखवले. म्हणून ते अधिक धोकादायक ठरते. या असल्यांच्या परिघाचे केंद्र होणे पंतप्रधानांना शोभणारे नाही.