News Flash

यशाचे द्वैत

या अपेक्षित यशासाठी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना अनपेक्षित संघर्ष करावा लागला.

भाजपच्या विरोधात जनतेत असंतोष असला तरी त्या शिडात वारा भरण्याची क्षमता काँग्रेस दाखवू शकलेली नाही..

सलग सहा खेपेस राज्य विधानसभा निवडणुका जिंकणे हा एका अर्थाने विक्रमच. सत्ताधारी भाजपने तो गुजरात राज्यात नोंदवला. त्याची बरोबरी साम्यवाद्यांनी सलग ३५ वर्षे पश्चिम बंगालात केलेल्या राज्याशीच होऊ शकते. या असाध्य वाटणाऱ्या साध्यास कवेत घेतल्याबद्दल भाजपचे – आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या दुकलीचे-  निश्चितच मन:पूर्वक अभिनंदन. त्याच वेळी या पक्षाने हिमाचल प्रदेशातही काँग्रेसला धूळ चारली. त्या राज्यात काँग्रेसची सत्ता होती. म्हणजे विरोधी पक्षाकडून सत्ता हिसकावून घेण्यातही भाजप यशस्वी ठरला आणि त्याच वेळी आपली सत्ता सलग सहाव्या खेपेत राखण्यातही त्यास यश आले. पक्षाला जनमानसात किती खोलवर रुजवण्यात भाजपचे नेते यशस्वी झाले आहेत हे यावरून दिसून येते. यामागे अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महत्त्वाचा वाटा आहे. संघाने गुजरातच्या डांग आदी भागांत स्वत:स रोवून काम केले नसते तर आज भाजपचा हा असा विजय होता ना.  रा. स्व. संघाने लावलेला भाजपचा वृक्ष अजूनही तितकाच सक्षम टिकून आहे हे यातून दिसून येते. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोघांत कोणता फरक असलाच तर तो हा आहे. भाजपच्या तळाशी तगडी कार्यकर्त्यांची फौज आहे आणि त्या तुलनेत काँग्रेसला तळच नाही. सगळेच नेते. अशा वेळी विरोधी पक्ष हतबल असताना या दोन्हीही राज्यांत भाजप यशस्वी होणार यात कोणाच्याही मनात संदेह नव्हता. तेव्हा भाजपचे यश तसे अपेक्षितच ठरते.

परंतु या अपेक्षित यशासाठी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना अनपेक्षित संघर्ष करावा लागला. या निवडणुका जाहीर होईपर्यंत भाजपला स्पर्धा नव्हती. निवडणुका जाहीर झाल्या, प्रचार तापू लागला तसतशी भाजपला आपल्या समोरील आव्हानांची जाणीव होऊ लागली. ती इतकी तीव्र होती की एका क्षणी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीने या निवडणुकीतील प्रचाराची सूत्रे हाती घेतली. ते आणि पक्षाध्यक्ष गुजरातचे. परंतु पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे नाणेही या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चालत नसल्याचे जाणवल्यावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ४३ सभा/ संमेलने घेतली. हाही एक विक्रमच ठरावा. उत्तर प्रदेश वा बिहारातील निवडणुकांतही मोदी यांनी इतका रस घेतला नव्हता. उत्तर प्रदेशातील निवडणुकांत मोदी यांनी २६/२७ सभा/संमेलने घेतली. या निवडणुकीत त्यांना असा हात आखडता घेऊन चालले नसते. कारण जनमत वाटत होते तितके भाजपच्या मागे नव्हते. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तर परिस्थिती इतकी बिघडली की मोदी यांना आपल्या मातृराज्यात तळ ठोकूनच बसावे लागले. मोदी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली नसती तर भाजपला इतके भरघेस यश मिळते ना. तेव्हा मोदी हेच या यशाचे निर्विवाद  शिल्पकार ठरतात.  केंद्रात  सत्ता, कार्यकत्रे, नेते यांची फौजच्या फौज, सहानुभूतीदार निवडणूक आयोग, अवाढव्य प्रचार यंत्रणा आणि अमाप साधनसंपत्ती असूनही भाजपला आपले ईप्सित गाठण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागले. काही काळ  त्या पक्षाच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे दिसले.

या निवडणुकीत भाजपने १५० वा अधिक जागांचे लक्ष्य ठेवले होते. पक्षाध्यक्ष अमित शहा ते गल्लीतील फुटकळ कार्यकर्ता हे सर्व जण छातीठोकपणे त्या लक्ष्यपूर्तीची ग्वाही देत होते. २०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने या राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २६ जागा पदरात टाकल्या. त्या वेळी त्या पक्षास ६० टक्के इतकी मते मिळाली. त्या वेळी काँग्रेसच्या वाटय़ास ३३ टक्के इतकी मते आणि शून्य खासदार आले. याचा अर्थ या दोन प्रमुख दावेदारांतील मतांच्या टक्केवारीतील फरक २७ टक्के इतका प्रचंड होता. त्या न्यायाने भाजपला १८२ सदस्यांच्या विधानसभेत किमान १६५ जागा मिळावयास हव्यात. परंतु हा पक्ष शंभरच्या टप्प्याआतच अडखळला अशी परिस्थिती. याचाच दुसरा अर्थ असा की डोक्यावरचा हा २७ टक्के मताधिक्याचा डोंगर पार करून काँग्रेसने या निवडणुकीत भाजपच्या मताधिक्याचा वाटा खेचून नेला. तरीही या दोन पक्षांत साधारण आठ टक्के मतांचा फरक उरला, यास प्रचंड अर्थ आहे. म्हणजे भाजपच्या विरोधात जनतेत असंतोष असला तरी त्या असंतोषाच्या शिडात वारा भरण्याची क्षमता काँग्रेस दाखवू शकली नाही. याचा अर्थ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने आश्वासक वातावरण निर्माण केले असले तरी अजूनही या पक्षास मोठी मजल मारावयाची आहे. परंतु ती मारण्यासाठी काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने पोषक वातावरण निर्माण करू शकला हे या निवडणुकीचे सर्वात मोठे यश. तेच भाजपसाठी धोक्याची घंटा ठरताना दिसते.

ज्या गुजरातेत नरेंद्र मोदी यांना आव्हान उभे राहू शकतच नव्हते, ज्या गुजरातेत मोदी यांच्या विरोधात ब्र काढण्याची कोणाची शामत नव्हती आणि ज्या गुजरातेत मोदी यांच्या विरोधात कोणी नेताच नव्हता त्याच गुजरातने मोदी आणि भाजप यांच्यावरचे अजेयतेचे कवच काढून टाकले असे म्हणावे लागेल. या आव्हानामुळे असेल किंवा काय उभय पक्षांकडून प्रचाराची पातळी घसरली.  भाजपने अल्लाउद्दीन खिलजी, औरंगजेब ते पाकिस्तान अशा सूचक प्रतीकांचा आश्रय घतला तर काँग्रेसचे वाचाळवीर मणिशंकर अय्यर यांनी आपल्या जिभेने मोदी यांच्या हाती कोलीत दिले. ते दिले नसते तर कदाचित भाजपच्या आणखी काही जागा कमी झाल्या असत्या. याचे कारण मोदी यांना यानिमित्ताने आपल्या हातातील हुकमी एक्का काढण्याची संधी मिळाली.

तो म्हणजे गुजरातची अस्मिता. काँग्रेस बघा कसा गुजरातचा अपमान करीत आहे, असे म्हणून मतदारांच्या हृदयाला हात घालण्याचा प्रयत्न मोदी यांनी करून पाहिला. त्यात फारसे काही यश आले नाही. अखेर ‘हुं गुजरात छुं’ असे मोदी म्हणाले.  याचा अर्थ मी म्हणजे गुजरात. इतके करूनही मोदी यांच्या पदरात मतदारांनी आपले माप भरभरून टाकले असे झाले नाही. हे पुरेसे बोलके ठरते. याचा स्पष्ट अर्थ असा की मतदार आता भाजप जे काही सांगतो ते ऐकून घेतीलच असे नाही. गुजरात हे मोदी यांचे राज्य. त्याचा काही एक फायदा निश्चितच त्यांना मिळाला यात शंका नाही. तो अन्य राज्यांत मिळण्याची शक्यता नाही. या निवडणुकीत भाजपचा पारंपरिक महिला मतदारसंघ मोठय़ा प्रमाणावर मतदानापासून लांब राहिला. तसेच भाजपपासून दूर गेलेल्या तरुणांची संख्याही लक्षणीय म्हणावी लागेल अशीच आहे. २०१९ साली सत्ता राखण्याचे स्वप्न भाजप पाहात असेल तर यात बदल करण्यासाठी भाजपला मोठी पावले उचलावी लागतील. आहे तो मतदार तर राखावा लागेलच. पण त्याच वेळी अन्यत्र असलेला मतदारही ओढून आणावा लागेल. हे आव्हान मोठे आहे. गुजरात असो वा हिमाचल प्रदेश. दोन्ही ठिकाणच्या निकालांत एक निर्णायक स्पष्टता दिसते. ती म्हणजे मतदार कोणत्याही एका पक्षाच्या वा नेत्याच्या दबदब्याखाली राहण्यास तयार नाही. गुजरातेत भाजपला सत्तेची संधी मतदारांनी दिली खरी. पण ही सत्ता जेथे गडगंज मताधिक्याची फुले वेचली तेथे कशाबशा बहुमताच्या गोवऱ्या वेचण्याची वेळ भाजपवर आली. अर्थात तरीही विजय तो विजयच असतो. हिमाचल प्रदेशचेही तेच. तेथे तर भाजपला दोनतृतीयांश मताधिक्य मतदारांनी दिले. परंतु त्या पक्षाचा तेथील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारच घरी बसला.

या दोन्ही राज्यांतील निवडणुकांत लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी खेळून दाखवण्याचे भाजपचे.. आणि त्यातही मोदी यांचे.. कौशल्य. सत्ताधारी असतानाही बळी ठरत असल्याचे राजकारण मोदी यांनी केले. वास्तविक गेली २० वर्षे भाजपने गुजरातेत आपण बळी ठरत असल्याचे राजकारण केले. काँग्रेसप्रणीत केंद्र सरकार आपल्यावर अन्याय करीत असल्याची आवई त्याने सातत्याने उठवली. परंतु केंद्रात सत्ता आल्यावरही भाजप तसेच करताना दिसला. आत्ताच्या या निवडणुकीत भाजपच्या यशाचे हे द्वैत दिसून आले. आगामी निवडणुाकांत हीच क्लृप्ती किती चालते यावर भाजपचे पुढचे यश अवलंबून असेल. तूर्त या दुहेरी भूमिकेसाठी भाजपचे अभिनंदन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 1:50 am

Web Title: gujarat election result 2017 bjp congress narendra modi rahul gandhi
Next Stories
1 पुण्यकर्माची संधी
2 कानकोंडेपणाची कानगोष्ट
3 सभ्यतेचा विजय
Just Now!
X