देशात वेगवेगळ्या ठिकाणी अलीकडेच घडलेल्या घटनांचे बिंदू जोडले, की दिसते ती स्वत:कडे मोठेपणा घेणारी आणि महिलांना दुय्यम लेखणारी पुरुषी प्रवृत्तीच!

या घटना एकत्र पाहिल्या की त्यातून एक निश्चित आकृतिबंध दिसतो आणि तो लाजिरवाणा आहे. जवळपास १२० वर्षे जुन्या, सुमारे ३८ हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात संस्थापकाच्या वारशास ती मुलगी आहे म्हणून स्थान नाकारले जाणे, आपली पत्नी राजीनामा देईल अशी घोषणा केंद्रीय मंत्र्याच्या पतीने करणे आणि कथित अमली पदार्थ सेवन चौकशीत रिया चक्रवर्ती ते दीपिका पदुकोण अशा अनेक महिलाच प्राधान्याने असणे, हे सारे काय दर्शवते? एखाद्या धर्माची पताका मिरवणाऱ्या राजकीय पक्ष/संघटनेने आपला सर्वधर्मसमभाव दर्शवण्यासाठी तोंडी लावण्यापुरता एखादा अन्यधर्मीय घेणे, उच्चवर्णीयांनी आपण जातपात कसे मानत नाही हे दाखवण्यासाठी एखादा दलित आसपास बाळगणे आणि वर उल्लेखिलेल्या तीन घटना यांचा थेट संबंध आहे. कसा ते समजून घेणे आत्मक्लेशी आहे. पण त्यास इलाज नाही.

यातील हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर गेल्या आठवडय़ात या स्तंभातून भाष्य होते. त्यांच्या राजीनाम्याची कारणे, त्यांच्या अकाली दल या पक्षाचे राजकारण वगैरे मुद्दे या संदर्भात गौण ठरतात. हरसिमरत या केंद्रीय मंत्री होत्या. ज्या अर्थी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेतले गेले त्या अर्थी त्यांच्याकडे निश्चितच काही गुण आणि अधिकार असणार. पण कृषी विधेयकांच्या मुद्दय़ावर त्यांच्या अकाली दलाचे आणि केंद्रीय सत्ताधारी भाजपचे जेव्हा फाटले तेव्हा मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय या मंत्रीणबाईंनी घेतला नाही. तो त्यांचे पती, लोकसभा सदस्य सुखबिरसिंग बादल यांनी घेतला आणि त्यांनीच जाहीर केला. म्हणजे हरसिमरत कौर यांच्याकडे फक्त नवऱ्याने जाहीर केलेल्या निर्णयास मम म्हणून अनुमोदन देणे इतकेच काम राहिले. ते त्यांनी चोख बजावले आणि नंतर भाजपविरोधी निदर्शनांत ट्रॅक्टरधारी पतीच्या मागे उभे राहून धर्मपत्नीची जबाबदारी निभावली. हा प्रसंग सर्वानीच पाहिला.

याहून लाजिरवाणा दुसरा प्रकार आहे दक्षिणेतील १२० वर्षे जुन्या, ३८ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या मुरूगप्पा समूहासंदर्भात. १९०० साली स्थापन झालेल्या या समूहात २८ उद्योग आहेत आणि अनेक क्षेत्रांवर त्याचे प्रभुत्व आहे. या समूहाचे माजी अध्यक्ष, प्रमुख एम. व्ही. मुरूगप्पन यांचे २०१७ साली निधन झाले. त्यांना दोन्ही कन्या. त्यातील वल्ली अरुणाचलम या संशोधक आहेत आणि न्यू यॉर्क येथे असतात. अंबाडी इन्व्हेस्टमेंट्स ही या समूहाची मुख्य आणि शिखर संस्था. या शिखर संस्थेच्या संचालक मंडळावर स्थान मिळावे यासाठी अरुणाचलम काही काळ प्रयत्नशील आहेत. पण गेल्या आठवडय़ात अरुणाचलम यांना या संचालक मंडळावर स्थान देण्याबाबतचा ठराव सर्वानुमते नामंजूर झाला. त्यामागील एकमेव कारण म्हणजे अरुणाचलम यांचे स्त्रीत्व. या समूहाच्या संचालकपदी फक्त पुरुष आहेत आणि कुटुंबातील एकाही महिलेस तेथे स्थान नाही. बरे, अरुणाचलम यांची पात्रता नाही आणि त्या केवळ गृहिणी आहेत असेही नाही. वल्ली अरुणाचलम यांची स्वतंत्र अशी ओळख आहे. शिवाय या बलाढय़ कंपनीच्या मालकीतील साधारण साडेआठ टक्के वाटा त्यांच्या हाती आहे. पण तरीही या कंपनीच्या निर्णयप्रक्रियेत त्यांना मुळीच स्थान नाही. झाल्या प्रकाराबद्दल खुद्द अरुणाचलम यांनीही नाराजी व्यक्त केली. वास्तविक त्यांनी जानेवारी महिन्यातच कुटुंबातील अन्यांशी या मुद्दय़ावर चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मला संचालक मंडळावर स्थान द्या अथवा माझा मालकीवाटा बाजारभावाने विकायची अनुमती तरी द्या, म्हणजे मी माझा मालकीहक्क सोडू शकेन, असे त्यांनी औपचारिकपणे कळवले होते. पण त्यांच्या या प्रस्तावावर साधी प्रतिक्रियाही कोणी व्यक्त केली नाही. ‘‘उद्योगांच्या उभारणीत वा विस्तारात महिला कसा वाटा उचलू शकतात हेच यांना माहीत नाही,’’ अशी त्यांची स्वकीयांबाबतची प्रतिक्रिया.

तिसरा प्रकार म्हणजे अमली पदार्थाचे सेवन वा ते बाळगल्याच्या चौकशीचा वेडाचार. मुळात हे प्रकरण सुशांतसिंह राजपूत या कोणा कलाकाराच्या आत्महत्येचे. हा कोणी लोकोत्तर युगपुरुष होता आणि त्याच्या निधनाने जणू भारतीय कलाक्षेत्राच्या आकाशातील मोठा तेज:पुंज ताराच निखळला. प्रसिद्धीच्या क्षणभंगुर विश्वात स्थिर होण्याइतके शांत डोके नसलेला हा तरुण खरे तर हाती आलेल्या पैशामुळे वाहवत गेला. ते ठीक. तो त्याच्या आयुष्याचा प्रश्न. पण हा म्हणजे कोणी कुक्कुले बाळ होता आणि रिया चक्रवर्ती म्हणजे कोण पुतनामावशी त्याचे अपहरण करू पाहत होती, असा समज सध्याचे चित्र पाहून होतो. हे दोघेही वयाने सज्ञान होते आणि त्यांनी जे काही बरेवाईट केले ते पूर्ण समजून केले असणार. असे असताना सारा दोष एकटय़ा रिया हिच्याच माथी कसा? कोणाचेही अकाली प्राण जाणे वाईटच. पण सुशांतने स्वत:चे प्राण घालवले असतील, तर त्यात हिचा दोष कसा काय? की केवळ महिला आहे आणि जिवंत आहे म्हणून सुशांत बिच्चारा आणि ही कजाग? या प्रकरणी माध्यमांचा जो काही नंगानाच सुरू आहे तो पाहता, मानवाची उत्क्रांती म्हणजे शेपूटच नष्ट झाली आणि बाकी सारे तसेच असल्याचा संशय बळावतो. यापलीकडे यावर काय बोलावे? आपल्या अतृप्त इच्छा, वासना या असल्या प्रकरणातून माध्यमी कल्पनारंजनाद्वारे शमवणाऱ्या धर्माभिमानी, संस्कृतीप्रेमी आणि हजारो वर्षांची उदात्त परंपरा वगैरे असलेल्या समाजातील विकृतीची दखल आपण घेणार की नाही? हा सुशांत नरपुंगव बिहारी होता. म्हणून त्या राज्याचे माजी पोलीसप्रमुख गुप्तेश्वर पांडे सुशांतशी संबंध असलेल्या रियाची ‘औकात’ काय, असा प्रश्न विचारतात. यातून काय दिसते? पण आपल्या राज्यबंधूने मुंबईत जाऊन काय दिवे लावले याविषयी या पोलीसप्रमुखास काहीच वाटत नाही? तसेच, सुशांतच्या बिहारी पालकांनी आपल्या चिरंजीवावर केलेल्या ‘संस्कारा’चे काय, हा प्रश्न विचारावा असे ना बिहारी पोलीसप्रमुखास वाटते, ना त्या राज्याच्या निधर्मी ते धर्मवादी असा प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्र्यास. काहींनी यास बिहार विरुद्ध महाराष्ट्र असे वळण देण्याचा प्रयत्न केला. तसे करणे सर्वाच्या सोयीचे. खरे तर हा प्रश्न स्वत:कडे मोठेपणा घेणाऱ्या आणि महिलांना दुय्यम लेखणाऱ्या पुरुषी प्रवृत्तीचा आहे.

आणि हीच वृत्ती दीपिका पदुकोण आणि अन्य काहींच्या कथित चौकशीमागे आहे. कोणाच्या तरी फोनवरील खासगी गप्पा हा अमली पदार्थप्रकरणी चौकशीचा आधार कसा काय? तसा तो ठरू शकत असेल तर भारतातील जवळपास प्रत्येक मोबाइलधारी पुरुष त्याच्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट शोधल्यास महिलांशी गैरवर्तनाचा वा गैरवर्तनहेतूंचा आरोपी ठरायला हवा. परंतु ते शोधण्याचे शौर्य भारतातील एकाही सरकारी यंत्रणेने दाखवल्याचे ऐकिवात नाही. दुसरे असे की, अमली पदार्थाचे सेवन काय फक्त चित्रपट दुनियेतील, तेही फक्त महिलाच करतात की काय? सर्व नामांकित पुरुष मग काय गुणसंपन्न कुलदीपक आणि श्रावणबाळ? अमली वा बिनअमली पदार्थाचे सेवन हे व्यवसायाधिष्ठित नसते. म्हणजे अमुक एखाद्या व्यवसायात अमुक एखादे व्यसन असायला हवे असा काही नियम नाही. इतकेही कळण्याइतकी समज आपणास असू नये, यास काय म्हणावे? आणि विविध धर्मस्थळी चिलिमींतून धूर निघतो तो काय आरोग्यदायी बालगुटीचा असतो? रियाकडे किती ग्रॅम काय सापडले याचा तपशील पुरवणाऱ्या यंत्रणांनी चिलिमींत किती ग्रॅम काय असते हे पाहण्याचे शौर्य कधी दाखवले आहे काय?

हे प्रश्नही आपणास पडत नसतील तर लाजिरवाणेच म्हणायचे. आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होईल. स्त्रीशक्तीचा जागर वगैरे उद्घोष होईल. पण प्रत्यक्षात ते साध्या वेशातील पुरुषसूक्ताचेच सादरीकरण असेल. हे मान्य करून त्याकडे लक्ष दिले तरच आपला समाजपुरुष सुधारेल.