03 June 2020

News Flash

जमिनीवर या..

रामाच्या नावे राजकारण करू पाहणाऱ्या पक्षास मग सुखराम आपला वाटू लागला.

(संग्रहित छायाचित्र)

भाजप/सेनेस महाराष्ट्रात आणि भाजपस हरयाणात निरंकुश विजय मिळाला नाही इतकेच या निवडणुकांचे महत्त्व नव्हे..

‘‘आमच्या समोर कोणी विरोधकच नाही’’ आणि ‘‘आम्हाला कोणाचे आव्हानच नाही’’ असे दावे करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या तोंडाला महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांतील मतदारांनी या निवडणुकीत चांगलाच फेस आणला. हे होणारच होते. याचे कारण सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखे या नेत्यांचे वर्तन. विद्येप्रमाणेच सत्तादेखील विनयात शोभून दिसते, या उदात्त हिंदू सांस्कृतिक मूल्याचा विसर स्वत:ला संस्कृतीरक्षक म्हणवून घेणाऱ्या पक्षालाच पडला आणि त्यामुळे जिथे फुले वेचण्याची अपेक्षा होती तेथे सत्तेसाठी टिपे गाळण्याची वेळ भाजपवर आली. एकेकाळी भाजपच्या नैतिक दंभास काहीएक अर्थ होता. त्या वेळी या पक्षाचा रथ जमिनीपासून दशांगुळे नाही तरी दोनपाच बोटे वरून चालत असे. त्याचे लोकांना सुरुवातीला कौतुकही होते आणि नंतर काही काळ जनतेने ते सहनही केले. त्या वेळी भाजपच्या या रथासमोर काहीएक लक्ष्य होते. परंतु पुढे फक्त आणि फक्त सत्ता हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करू लागल्यावर आपला रथ कधी जमिनीवर उतरून दलदलीत वाटचाल करू लागला, हे त्या पक्षालाही कळले नाही. रामाच्या नावे राजकारण करू पाहणाऱ्या पक्षास मग सुखराम आपला वाटू लागला. तथापि राष्ट्रीय पातळीवर यापेक्षाही वाईट अवस्था असलेला काँग्रेस हा पर्याय असल्याने तेथे भाजपची सद्दी टिकून राहिली. पण म्हणून राज्य पातळीवरही आपणास आव्हान देणारे कोणी नाही, असे त्या पक्षास वाटले आणि तेथेच त्याची चूक झाली.

याचे कारण विरोधक म्हणजे कोणी व्यक्ती वा पक्ष असे भौतिक रूपच असायला हवे, असे भाजपच्या मनाने घेतले. पण विरोध ही प्रामुख्याने संकल्पना आहे आणि ती प्रथम माणसाच्या मनात जन्माला येते हे तो विसरला. असे झाले की ज्यास धडा शिकवायचा त्याच्या विरोधात हलकासलका उमेदवार जरी उभा राहिला तरी जनता त्यास पाठिंबा देते. देशाच्या निवडणुकांचा इतिहास हे दर्शवतो. पण भाजपस याचा विसर पडला. अखेर मतदारांनी त्यास याची आठवण करून दिली. उदयनराजे भोसले, हर्षवर्धन पाटील आदींचा पराभव हे दाखवून देतो. हे वा असे अनेक, उदाहरणार्थ राणे पितापुत्रादी गणंग ही कोणी महान व्यक्तिमत्त्वे आहेत आणि काँग्रेस वा राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय होत होता असे दाखवत भाजपने त्यांना निवडणुकांच्या तोंडावर आपले म्हणत या सद्गुणांच्या पुतळ्यांस आपल्यातर्फे उभे केले. वास्तविक हे असे नेते काँग्रेस वा राष्ट्रवादीत होते तेव्हाही गणंगच होते आणि भाजपने त्यांना आपले म्हटल्यामुळे त्यांच्यात काही गुणात्मक बदल होणार नव्हता. पण आपल्या पक्षाहाती सद्गुणांचा परीस आहे आणि कोणत्याही गंजलेल्या लोखंडी कांबीचे तो सोने करू शकतो, असा भाजपचा ग्रह झाला असावा. अखेर मतदारांनाच तो दूर करावा लागला.

मतदारांनी भाजपची ही नैतिक अरेरावी एकवेळ सहनही केली असती. पण कधी? जर आर्थिक आणि औद्योगिक आघाडीवर तो काही भरीव करून दाखवू शकला असता तर. पण त्या आघाडीवर भाजपची साग्रसंगीत बोंब. आर्थिक विकास ठप्प, नोकऱ्या नाहीत, कारण औद्योगिक गुंतवणूक नाही आणि तरीही या वातावरणात आपण म्हणू ते मतदारांनी मान्य करावे असे भाजपचे वागणे. मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुकांतील निकालाने तर त्या पक्षाच्या कानात वारे शिरले आणि आपण म्हणू ती आणि तीच पूर्व असे त्या पक्षाचे काही नेते वागू लागले. अशा वेळी मतदारांनी शहाणपणा दाखवणे गरजेचे होते. तो त्यांनी दाखवला. म्हणून ही निवडणूक हा एका अर्थी लोकशाहीचा विजय ठरतो. भाजप/सेनेस महाराष्ट्रात आणि भाजपस हरयाणात निरंकुश विजय मिळाला नाही इतकेच या निवडणुकांचे महत्त्व नव्हे. याहीआधी आम्ही ‘पण समोर आहेच कोण?’ हा युक्तिवाद किती फसवा असतो, हे दाखवून दिले होते. त्यावर भाजप आणि त्या पक्षाच्या समाजमाध्यमी अर्धवटरावांनी अत्यंत हिंसकपणे अविश्वास दाखवला. मात्र त्याची रास्त शिक्षा मतदारांनी दिली, असे या निकालावरून दिसते.

या निवडणुकीत मतदारांनी आपला हिसका दाखवलेला दुसरा पक्ष म्हणजे शिवसेना. मराठी ते हिंदुत्ववाद अशा झोक्यांवर पुढेमागे करण्यात हा पक्ष मशगूल राहिला. सत्तेतही राहायचे आणि वर विरोधी भुणभुण लावायची, असे या पक्षाचे हास्यास्पद वर्तन. या निवडणुकांत तर विरोधी बाकांवरच बसावे लागते की काय, अशी परिस्थिती या पक्षावर येता येता टळली. म्हणजे मतदारांनी त्या पक्षास कडय़ापर्यंत नेले. पण कडेलोट केला नाही. हा इशारा आहे. त्यामुळे आता तरी आपण मोठे झाल्याचे या पक्षास दाखवून द्यावे लागेल. बालकलाकाराची भूमिका दीर्घकाळ करणाऱ्या कलाकारास वास्तविक आयुष्यातही मोठे होणे अवघड जाते. आपले तसे झाले आहे किंवा काय, हे शिवसेनेस आता तपासून पाहावे लागेल. तीच गत राज ठाकरे यांच्या मनसेची. पक्षपाठिंब्यासाठी नेता महत्त्वाचा हे खरेच. पण हा नेताच सर्व भूमिका करू शकत नाही. त्यास कार्यकर्ते आणि दुसऱ्या फळीचे नेतेही लागतात. ते तयार करावयाचे तर काहीएक उद्दिष्ट हाती घेऊन बारा महिने कष्ट करावे लागतात आणि पक्षास निवडणुका लढवण्याखेरीज काही कार्यक्रम द्यावा लागतो. राजकीयदृष्टय़ा कालसुसंगत राहावयाचे असेल तर असा काही कार्यक्रम राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना द्यावा लागेल.

त्यासाठी काय करायचे हे शिकावयाचे असेल तर शरद पवार हे त्यासाठी उत्तम उदाहरण. त्यांच्या राष्ट्रवादी या पक्षास काही भवितव्य असेल यावर या निवडणुकांआधी कोणीही विश्वास ठेवता ना. पण पवारांनी या वयात जे कष्ट घेतले, त्यामुळेच या निवडणुकांचे चित्र बदलले. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर बारामतीत पायधूळ झाडायची, आपण पवारांचे बोट धरून राजकारणात आलो.. ते आपले गुरू असे म्हणायचे आणि इतकेच नव्हे तर त्यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी  सन्मानाने गौरवायचे आणि निवडणुकांच्या तोंडावर त्यांना भ्रष्टाचाराचे मेरुमणी ठरवत सक्तवसुली संचालनालयाची नोटीस पाठवायची हा उच्च प्रतीचा दुतोंडीपणा झाला. तो यंदाच्या निवडणुकांत पाहावयास मिळाला. पण पवारांनी या कारवाईचे स्वत:साठी सोने केले आणि अंमलबजावणी कार्यालयावर चाल करत सरकारलाच एक पाऊल मागे घ्यायला लावले. हा या निवडणुकीस कलाटणी देणारा क्षण. पवारांनी तो खेचून आणला आणि भाजपचा विजयरथ एक हाती रोखला. हे यश हे पवार यांना मतदारांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र नाही. तर भाजपच्या दुहेरी राजकारणाविरोधात दिलेले मतपत्र आहे.

त्याचा विचार खरे तर काँग्रेसनेही करायला हवा. ऐन निवडणुकांत अजगरासारखा सुस्त पक्ष काँग्रेसखेरीज अन्यत्र सापडणार नाही. या पक्षाची या निवडणुकीतील कामगिरी त्यांना मतदारांनी दूर का केले, हे दाखवून देणारी होती. मुळात आपण राहणार की जाणार अशी अवस्था असताना या पक्षाचे भुक्कड नेते ओसाड गावच्या पाटलांसारखे एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात मग्न होते. शुद्ध मराठीत यास भिकेचे डोहाळे लागणे असे म्हणतात. प्रकृतीच्या कारणास्तव या निवडणुकांत सोनिया गांधी यांनी प्रचार केला नाही, हे समजून घेता येईल. पण प्रियांका गांधी यांचे काय? लोकसभा निवडणुकांच्या वेळेस त्यांनी सक्रिय राजकारणात आपण प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले होते, त्याचे काय झाले? भातुकलीप्रमाणे ‘राजकारण, राजकारण’ खेळता येते असे त्यांना वाटते की काय? तसेच काही राहुल गांधी यांचे. या गृहस्थाने महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या खऱ्या. पण त्याकडे काँग्रेस नेत्यांनीच पाठ फिरवली, या कर्मास काय म्हणावे? उपाशी पोटी राहावयाची वेळ आलेल्याच्या अंगी असे मांद्य शोभत नाही. ते सोडून या पक्षासही आता झडझडीतपणे काम सुरू करावे लागेल.

तोच या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ आहे. सत्तेत असाल तर माजू नका आणि नसाल तर तुम्हास सत्ता का द्यावी या मतदारांच्या प्रश्नाचे उत्तर आपल्या कामातून देत राहा, हा या निकालांचा सांगावा. स्वत:च्या सत्तामस्तीत असलेले आणि ती नसल्यामुळे सुस्तीत असणारे अशा दोघांनाही ही निवडणूक जमिनीवर आणणारी ठरते. यातून योग्य तो बोध घेत जे जमिनीवर येतील ते टिकतील. एरवी हरी हरी करणे हा पर्याय आहेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 12:28 am

Web Title: haryana and maharashtra election results voters surprised rulling bjp in haryana maharashtra zws 70
Next Stories
1 दारिद्रय़हनन
2 कोण कान पिळी?
3 शब्दांना संख्येची धार!
Just Now!
X