.. हा केवळ गरीब आणि श्रीमंत इतकाच भेद नाही. या भेदामागे एक श्रेष्ठत्वाची आणि कष्टकऱ्यांना कमी लेखण्याची भावना आहे. हे कशाचे लक्षण?

आव्हानात्मक परिस्थितीत व्यक्तींमधील गुणसमुच्चयाची जशी बेरीज होऊ शकते त्याचप्रमाणे त्यांच्यामधील दोषांचाही गुणाकार होण्याचा धोका असतो. व्यक्तींस लागू असलेले हे सत्य व्यक्तींनी बनलेल्या समाजासही तितक्याच प्रमाणात लागू होते. मुंबईत गेल्या आठवडय़ात एका निवासी संकुलात घडलेल्या प्रसंगातून हेच दिसून येते. त्याचबरोबर त्यातून सामाजिक आणि आर्थिक विषमता आपल्या देशात हाती हात घालून किती प्रबळ झाल्या आहेत याचीही अस्वस्थ करणारी जाणीव होते. अंकगणितात दोन उणे एकत्र आल्यास त्यांची बेरीज होते पण तरीही त्याचे चिन्ह उणे असेच राहते. त्याप्रमाणे आर्थिक आणि सामाजिक विषमता या दोन उण्यांची आपल्याकडे अद्यापही बेरीजच होते, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. जे मुंबईत घडले ते कमीअधिक प्रमाणात देशाचेच प्रातिनिधिक चित्र. त्यामुळे त्याची चर्चा आवश्यक ठरते.

एकेकाळच्या गिरण्यांच्या चिमण्यांना आधी मारून आणि नंतर गाडून त्यावर आज मुंबईत अनेक पंचतारांकित गृहसंकुले उभी आहेत. एका अर्थी यात छाती पिटून अश्रू गाळावेत असे काही नाही. काळाच्या ओघात असे बदल होतच असतात. तथापि या संकुलांत राहणाऱ्यांचे वर्तन हा यातील गंभीर मुद्दा. वाटेल तितके पैसे फेकून या संकुलात आपण निवासस्थाने विकत घेतली आहेत म्हणजे आसपासच्या भागातील नागरिकांचा जगण्याचा हक्कही आपणच विकत घेतलेला आहे असा त्यांचा आविर्भाव असतो. ही अशी संकुले आणि आसपासचा परिसर हे आजच्या ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांचे प्रतिनिधित्व करतात. आपली ‘इंडिया’ हे एक श्रीमंत सार्वभौम प्रजासत्ताक असून त्याच्या अधिक प्रगतीच्या आड हे ‘भारता’तील नागरिक आहेत, असा या उच्चभ्रू इंडियन्सचा समज आहे आणि दिवसेंदिवस तो वाढतानाच दिसतो. वास्तविक या पंचतारांकित नागरिकांच्या जगण्यातील सौख्य या बाहेर राहणाऱ्या नागरिकांच्या श्रमांवर अवलंबून असते. म्हणजे या श्रीमंतांकडची घरकामे, त्यांच्या मोटारींना आणि श्वानांना फिरवणे आदी कामे या भारतातील श्रमिकांकडून केली जातात. या सर्वास अलीकडच्या काळात सेवा क्षेत्र (सव्‍‌र्हिस इंडस्ट्री) असे म्हणतात. भारताच्या आर्थिक विकासात या सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. देशातील कारखानदारी आणि शेती यांतून मिळणारे उत्पन्न आटत असताना या सेवा क्षेत्राने अनेकांच्या पोटाची व्यवस्था केली. या सेवा क्षेत्राच्या वाढत्या प्रभावामुळेच आपल्या शहरांत ग्रामीण भागांतून स्थलांतर होत असते. तथापि करोनाची साथ पसरू लागली आणि देशातील अनेकांप्रमाणे या सेवा क्षेत्रांवर अवलंबून असणाऱ्यांचा जगण्याचा संघर्ष वाढला. या करोनाकाळात अनेक उद्योगधंदे बंद असले तरी आधीच्या श्री-शिलकीच्या अथवा आटलेल्या वेतनाच्या आधारावर ‘इंडिया’तील नागरिक तुष्ट राहू शकले आणि अजूनही काही काळ तरी ते तसे राहू शकतील. पण खरे आव्हान निर्माण झाले आहे ते हातावर पोट असणाऱ्या ‘भारतीयां’समोर. ते कसे हे या मुंबईच्या उदाहरणावरून दिसेल.

या पंचतारांकित गृहसंकुलाने घरकाम आदींसाठी येणाऱ्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना कामावर येण्यास मनाई केली. कारण या ‘भारता’तील नागरिकांकडून करोना प्रसाराचा धोका आहे असे त्यांना वाटले म्हणून. वास्तविक कोणत्याही नैसर्गिक आपत्तीप्रमाणे या साथीतही गरिबांचाच बळी जात असला तरी करोना हा गरिबांचा आजार नाही. तो भारतात विमानाने आला. तोसुद्धा पर्यटन, व्यवसाय आदींसाठी परदेशात गेलेल्या भारतीयांच्या साथीने. म्हणजे पारपत्रधारी भारतीयांनी तो आणला. असे असतानाही या साथीचे खापर गरिबांवर फोडून त्यांना मोठय़ा प्रमाणावर अस्पृश्य ठरवण्याचा उद्योग आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. तेच या गृहसंकुलाबाबतही झाले आणि आसपासचे नागरिक हे जणू साथीच्या विषाणूचे वाहकच आहेत असे समजून सरसकट साऱ्यांना दूर ठेवले गेले. असे झाल्यावर सर्वात भरडल्या जातात त्या घरकाम करणाऱ्या महिला. नवऱ्याच्या तुटपुंज्या कमाईस हातभार लावण्यासाठी त्यांच्यावर धुणीभांडी करायची वेळ येते. हे असे जगणाऱ्या या सर्वाना सदर संकुलाने बेरोजगार केले. साथीच्या काळात उद्योगव्यवसाय रोडावल्याने नवऱ्यावर घरात राहायची वेळ आणि घरकाम करणाऱ्या बायकांस प्रवेशबंदी अशी ही परिस्थिती. शहरात रोजगार हमी योजनाही नाही. त्यामुळे सर्वाचे जगणेच संकटात. ही बाब स्पष्ट झाल्यावर या सर्वावरील प्रवेशबंदी उठवावी यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले. पण या संकुलातील पंचतारांकितांचे हात ‘वर’पर्यंत पोचलेले असतात आणि सर्व विरोधी आवाज दाबण्याची त्यांची ताकद असते. त्यामुळे सुरुवातीस त्यास यश आले नाही. तथापि प्रश्न जगण्याचाच असल्याने आसपासच्यांनी पंचतारांकितांच्या ताकदीस भीक न घालता आपला लढा चालूच ठेवला. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्या पोलिसी खाक्याची जाणीव झाल्यावर या गृहसंकुलाने आपल्या परिसरातील नागरिकांवर घातलेली प्रवेशबंदी उठवली आणि त्यांना कामावर येऊ देण्यास मान्यता दिली. त्यातही तरी वेगळी जातव्यवस्था आहेच. म्हणजे या सेवकांसाठी आणि घरमालकांसाठी स्वतंत्र उद्वाहन वगैरे. ही बाब खरेतर तितकीच लाजिरवाणी. पण निदान या ‘इंडियन्स’ना निदान एक पाऊल तरी मागे घ्यावे लागले.

देशातील सर्व महानगरांत आसपासच्या परिसराशी आणि म्हणून वास्तवाशी फटकून राहणारी गृहसंकुले आता बोकाळली आहेत. कमीअधिक प्रमाणात त्यातूनदेखील अशीच नवी जातव्यवस्था दिसते. हा केवळ गरीब आणि श्रीमंत इतकाच भेद नाही. या भेदामागे एक श्रेष्ठत्वाची आणि कष्टकऱ्यांना कमी लेखण्याची भावना आहे. हे कशाचे लक्षण? समाजात मुळातच असलेल्या सामाजिक विषमतेस आर्थिक विषमतेने कसे खतपाणी घातले आणि त्यातून ही दरी कशी अधिकच रुंद झाली हे यातून दिसते. वास्तविक आर्थिक प्रगतीने हे भेद मिटण्यास मदत व्हायला हवी. जगभरातील अनेक समाजांत असे झाले. आपल्याकडेही हा बदल होत असला तरी त्याची गती अत्यंत मंद आहे. यामागील प्रमुख कारणे प्रामुख्याने दोन. पहिले म्हणजे आपल्या आर्थिक प्रगतीचा वेग अतिमंद आहे आणि त्यामुळे आर्थिक प्रगतीची फळे उतरंडीवरील तळाच्या पायरीवरील घटकापर्यंत ती ज्या वेगाने झिरपायला हवीत त्या वेगाने झिरपताना दिसत नाहीत. आणि दुसरे म्हणजे आधीपासूनच खोलपर्यंत गेलेला सामाजिक विषमतेचा दुरावा. हा जात आणि धर्म या दोन्ही पातळ्यांवर दिसून येतो. त्यामुळे आर्थिक विषमतेच्या मुद्दय़ाचे दुष्परिणाम अधिक वाढताना दिसतात. याचा दृश्य परिणाम असा की या अशा संकुलातील रहिवासी हे प्राधान्याने ‘निवासी अभारतीय’ असतात आणि ‘अनिवासी’ होण्याची त्यांना आस असते. यातील बहुतांशांना या देशाशी बांधून ठेवणारा एकमेव घटक म्हणजे त्यांचे पारपत्र. त्यासाठी सरकार नामक यंत्रणेशी त्यांचा जो काय तो संबंध येत असेल तितकाच.

हे चित्र बदलण्यासाठी ठरवून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाश्चात्त्य देशांच्या धर्तीवर स्थानिक प्रशासनात नागरिक सहभाग अधिकाधिक वाढवायला हवा. आपल्या पंचतारांकित सुविधा उपभोगत जगात काय व्हायला हवे याचे शहाणपण सांगणाऱ्यांना आपल्या गावातील, परिसरातील उणे दूर करण्यासाठी काय करायला हवे, याचे काहीही भान नसते. हे असे तुटलेपण संपवण्यासाठी सामाजिक अभिसरणाची गरज आहे. या अशा अभिसरणातच ‘आतले’ आणि ‘बाहेरचे’ यांच्यातील सौहार्दाचे स्थैर्य अवलंबून असते. करोनाकालीन सद्य:स्थितीने याची जाणीव करून दिली आहे. त्या विषाणूचा नि:पात करताना हा विषमतेचा विषाणूही दूर करण्याचे उपाय हवेत. शारीरिक आजारापेक्षा हा सामाजिक आजार पसरवणारा विषाणू अधिक घातक आहे.