04 March 2021

News Flash

जंबो-जेटची पन्नाशी!

जगभरात आज अत्याधुनिक प्रवासी विमाने दिसत असली तरी त्यांना बोइंग-७४७ सारखी प्रसिद्धी, वलय किंवा सन्मान मिळणार नाही.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जगभरात आज अत्याधुनिक प्रवासी विमाने दिसत असली तरी त्यांना बोइंग-७४७ सारखी प्रसिद्धी, वलय किंवा सन्मान मिळणार नाही.

प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रातले सर्वाधिक यशस्वी, सर्वाधिक परिचित आणि सर्वाधिक देखणे म्हणवले जाणारे बोइंग-७४७ अर्थात जंबो-जेट या विमानाने नुकतीच पन्नाशी ओलांडली. विमानांच्या उत्पादनमालिकेचे सरासरी आयुष्य विचारात घेतल्यास जंबो-जेट लवकरच अस्तालाही जाईल. तूर्तास प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या या विमानाची दखल घेणे समयोचितच ठरेल. ३० सप्टेंबर १९६८ रोजी सीअ‍ॅटलजवळील एव्हरेट शहरात बोइंग कंपनीचे हे विमान पहिल्यांदा जनतेसमोर सादर झाले. त्या वेळी सर्वसामान्य जन त्याच्या भव्यतेने विस्मयचकित झाले, तर विश्लेषकांच्या मनात त्याच्या भविष्याविषयी शंका निर्माण झाल्या. आजूबाजूच्या घडामोडींकडे फारसे लक्ष न देता, आपल्या भविष्याविषयी नकारात्मक चर्चा होऊनही वैफल्यग्रस्त न होता, स्वतच्या क्षमतेवर आणि यशाविषयी खात्री असल्यास जंबो-जेटसारखे असामान्य उत्पादन अस्तित्वात येऊ शकते हे बोइंग, पॅन अ‍ॅम आणि पर्यायाने अमेरिकेने जगाला दाखवून दिले. बोइंग-७४७च्या प्रसूतिवेणा सुरू होत्या त्या काळात म्हणजे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात हवाई वाहतूकजगताला आणि विशेषत: युरोपला स्वनातीत (सुपरसॉनिक) प्रवासी विमानांच्या भन्नाट कल्पनेने पछाडले होते. इंग्लंड आणि फ्रान्स स्वनातीत प्रवासी विमानांच्या निर्मितीचा आराखडा बनवीत होते. अवघ्या तीन तासांमध्ये अटलांटिक ओलांडण्याची कल्पना अमेरिकेतही अनेक राजकारणी, उद्योगपती, बँकरांना खुणावत होती. याउलट पॅन अ‍ॅम आणि बोइंग कंपनीचे उद्दिष्ट अधिकाधिक प्रवाशांना सामावून घेऊ शकेल, असे अजस्र पण किफायतशीर विमान बनवायचे होते. अनेक विश्लेषकांच्या मते ते अवसानघात करण्यासारखे होते. कारण एकदा का स्वनातीत विमाने उडू लागल्यावर, मोठय़ा आणि ‘धिम्या’ विमानांची मातब्बरी ती काय राहणार होती?

मुळात बोइंग-७४७चा जन्मही काहीशा अपघातानेच झाला! अमेरिकी हवाई दलाला एक मोठे मालवाहतूक विमान बनवायचे होते. त्यासाठी काही कंपन्यांकडून संकल्पचित्रे मागवण्यात आली होती. बोइंगनेही एका अजस्र मालवाहतूक विमानाचे संकल्पचित्र पाठवले, जे मंजूर होऊ शकले नाही. पण यातून बोइंगला असे एखादे विमान प्रवासी वाहतुकीसाठी बनवण्याची स्फूर्ती मिळाली. योगायोग म्हणजे त्याच काळात पॅन अ‍ॅम कंपनीचे अध्यक्ष हुआन ट्रिप एका मोठय़ा प्रवासी विमानाच्या शोधात होते. त्या वेळी पॅन अ‍ॅमच्या ताफ्यात बोइंग-७०७ ही विमाने प्रामुख्याने होती. या विमानाची कमाल प्रवासी क्षमता होती १९०! पण प्रवाशांची संख्या वाढत होती आणि अधिकाधिक उड्डाणे म्हणजे तोटय़ाचा व्यवहार होता. बोइंग-७०७च्या दुप्पट आकाराचे विमान निर्माण झाले, तर प्रवासी अधिक नि उड्डाणे कमी असे नफ्याचे गणित त्यांनी जुळवले होते. हवाई दलाच्या विमानाच्या निमित्ताने बोइंगकडे कच्चा आराखडा तयार होताच. विमान भविष्यात यशस्वी होईल की नाही, याविषयी बोइंग किंवा पॅन अ‍ॅमला खात्री नव्हती. त्यामुळे उद्या स्वनातीत विमाने आली आणि अवस्वनिक (सबसॉनिक – ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेगाने उडणारी) जमिनीवरच उभी करण्याची वेळ आल्यास ईप्सित विमान मालवाहू म्हणून वापरता येऊ शकेल, अशा चलाखीने त्याची रचना करण्यात आली. त्यामुळे विमानाच्या पुढील बाजूस नाकाडाच्या कुपीचे दार उघडून तेथून माल/सामान भरता येईल अशा पद्धतीने ते बनवले गेले. त्यामुळे नाकाडाच्या समांतर नव्हे, तर वरच्या बाजूस कॉकपिट बसवले गेले. बोइंग-७४७च्या सर्वाधिक परिचित दृश्य वैशिष्टय़ाचा – डोक्यावरील उंचवटय़ाचा – जन्म अशा प्रकारे झाला. पॅन अ‍ॅम कंपनीने पाठबळ देऊन पाठपुरावा केल्यामुळे हत्तीसारख्या अजस्र जंबो-जेटची संकल्पना मूर्तरूपात उतरली. बोइंग-७४७ अक्षरश: अवाढव्य होते. तब्बल २१० फूट लांब अशा या विमानाच्या दोन पंखांच्या बाहेरील टोकांतील अंतर १९५ फूट इतके असते! जमिनीपासून विमानाच्या उभ्या शेपटीच्या टोकापर्यंतची उंची एखाद्या सहा मजली इमारतीएवढी भरते. जवळपास ४०० प्रवासी घेऊन उडण्याची या विमानाची क्षमता आहे. हा आकडा अर्थातच कमी-जास्त होत राहतो.

इतक्या मोठय़ा प्रकल्पाची उभारणी करता करता बोइंगचे कंबरडे मोडलेच होते. जवळपास दोन अब्ज डॉलरचे कर्ज त्या काळात डोक्यावर उभे राहिले होते. आजच्या डॉलरमूल्याचा विचार केल्यास ही रक्कम किती तरी अधिक भरेल. सात वेगवेगळ्या बँकांकडून बोइंगला निधी उभा करावा लागला होता. त्या काळात जगभर मंदीसदृश स्थिती होती. तशातच १२ ‘ओपेक’ सदस्य देशांनी अमेरिकेला तेल विकण्यास नकार दिल्यामुळे विमान वाहतूक उद्योगासमोर मोठी समस्या उभी राहिली होती. विमान प्रवासाभोवतीचे वलय संपू लागले होते, कारण मंदीमुळे महागडा आणि बराचसा छंदी-स्वच्छंदी विमान प्रवास करणे आवाक्याबाहेरचे ठरू लागले होते. अशा परिस्थितीत बोइंग-७४७च्या दुहेरी गुणवैशिष्टय़ांमुळे हे विमान आणि पर्यायाने बोइंग कंपनीही वाचली. एकीकडे स्वनातीत विमानाचा प्रकल्प युरोपात प्रलंबित होत होता. बोइंगने तर आणखी एक प्रायोगिक धाडस नको म्हणून तो केव्हाच गुंडाळून टाकला. दुसरीकडे, प्रवासी नसतील तर मालवाहतूक विमान म्हणून तरी वापरता येईल या कारणास्तव पॅन अ‍ॅमसारख्या कंपन्यांनी बोइंगकडे नोंदणी करण्यास सुरुवात केली होती. बोइंगच्या धुरीणांनी या विमानाच्या उभारणीसाठी वापरलेली कल्पकता आता फलद्रूप होऊ लागली होती. बोइंगच्या सुदैवाने १९७०च्या मध्यावर आणि उत्तरार्धात जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आणि एक यशस्वी प्रवासी विमान म्हणूनही बोइंग-७४७चा उदय होऊ लागला.

आज दीर्घ पल्ल्याची उड्डाणे किंवा लाँग-हॉल फ्लाइट्स हा परवलीचा शब्द आहे. पण ४० वर्षांपूर्वी बोइंग-७४७ने ही संकल्पना पहिल्यांदा यशस्वीपणे राबवली. एकदाही इंधनथांबा न घेता सलग साडेआठ हजार किलोमीटर उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता हुकमी एक्का ठरू लागली. विमानप्रवास हा केवळ अतिश्रीमंतांची मक्तेदारी न राहता, उच्च-मध्यमवर्ग आणि नवश्रीमंतांच्याही आवाक्यात आला याचे श्रेय बोइंग-७४७ला द्यावे लागेल. जवळपास तीन दशके प्रवासी वाहतूक क्षेत्रात या विमानाची मक्तेदारी राहिली. त्याच्या जवळपास समांतर विकसित झालेले काँकॉर्ड हे युरोपचे स्वनातीत विमान केवळ धनदांडग्यांच्याच आवाक्यात राहिले आणि उपयुक्तता नव्हे, तर प्रतीकात्मकतेवर भराऱ्या घेत राहिले. पहिल्या अपघातानंतर तर काँकॉर्ड हा प्रकल्पच गुंडाळला गेला. तशी नामुष्की अनेक अपघातांनंतरही जंबो-जेटवर ओढवली नाही हे दखलपात्र आहे. आज अधिक शक्तिशाली इंजिने असलेली पण तुलनेने अधिक स्वस्त अशी बोइंग-७७७ आणि बोइंग-७८७ ही या विमानांचीच भावंडे अधिक चलनात आहेत. एअरबस कंपनीने सुपर-जंबो म्हणून    ए-३८० या अधिक अजस्र विमानाला बाजारात आणले. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला नाही, कारण अधिक प्रवाशांपेक्षा दीर्घ पल्ला हे यशस्वी प्रवासी विमान वाहतुकीचे नवीन सूत्र आहे. एअरबस कंपनीनेही त्यामुळेच ए-३३० आणि लवकरच येऊ घातलेले ए-३५० ही विमाने प्रवासी संख्या नव्हे, तर विनाथांबा दीर्घ पल्ला हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून बाजारात आणलेली आहेत. यांपैकी कोणत्याही विमानाला बोइंग-७४७ सारखी प्रसिद्धी, वलय किंवा सन्मान मिळणार नाही. सध्या प्रवासी विमान वाहतुकीसाठी हे विमान फारसे चलनात नसले, तरी अजून तब्बल २० वर्षे मालवाहू बोइंग-७४७ उड्डाण करीतच राहील. इतक्या वर्षांमध्ये तब्बल साडेतीन अब्ज प्रवाशांनी या विमानातून प्रवास केल्याचा अंदाज आहे. म्हणजे सध्याच्या लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या! विमानप्रवासाचे लोकशाहीकरण यापेक्षा वेगळे काही असते का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 2:28 am

Web Title: how the boeing 747 reigned over air travel for 50 years
Next Stories
1 जा रे चंदा..
2 प्रतीकांच्या पलीकडे
3 जरबेतून जबाबदारी
Just Now!
X