जरब बसवण्याचा हेतू बालाकोट येथील बिगर-लष्करी प्रतिबंधात्मक कारवाईमुळे संयमितपणे साध्य होऊ शकला, हे महत्त्वाचे ..

सुडाचा आक्रोश देशभर घुमत असताना त्यास बळी न पडता दाखवलेल्या संयमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. पुलवामा घडल्यानंतर  ‘खून का बदला खून..’ छापाची हाळी देणाऱ्यांचा अजिबात दबाव पंतप्रधानांनी घेतला नाही. या कथित राष्ट्रवादी मंडळींचे ऐकले असते तर पंतप्रधानांना पाक लष्कराविरोधातच काही कारवाई करावी लागली असती. लोकप्रियतेचे म्हणून एक दडपण येते. कारण लोकच आपल्या नेत्याने कसे वागायला हवे हे ठरवू लागतात. समाजमाध्यमांतून तर अशांचा हैदोस पुलवामा हत्याकांड घडल्यापासूनच सुरू होता. पुलवामात केंद्रीय पोलीस दलांचे तब्बल ४० जवान मारले गेले. हे कृत्य केले ते पाकिस्तानच्या आश्रयाने फोफावलेल्या जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने. पाकिस्तानच्या आश्रयाने याचा अर्थ पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर यंत्रणा आयएसआय यांच्या आश्रयाने. आपल्या शेजारी देशाच्या नाडय़ा या दोघांच्या हातात असतात. तेव्हा त्यांच्या पाठिंब्यावर फोफावलेल्या दहशतवादी संघटनेने भारतीय भूमीत येऊन वारंवार इतका हाहाकार उडवल्यानंतर ‘इंद्राय स्वाहा.. तक्षकाय स्वाहा..’ या वृत्तीने भारताने पाकिस्तानी लष्कराविरोधातच काही कारवाई करायला हवी अशी भाषा सुरक्षित वातावरणात राहून देशास युद्धाची हाक देणारे स्वघोषित राष्ट्रप्रेमी करू लागले होते. त्यांच्या मते पाकिस्तानी लष्करालाच धडा शिकविण्याची वेळ येऊन ठेपली असून भारताने आताच काय ती तातडीने कारवाई करून आपले शौर्य दाखवून द्यायला हवे. तथापि पंतप्रधान मोदी यांनी या प्रचाराच्या दबावाखाली न येता जैश-ए-महंमद या संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रांवर तेवढी कारवाई केली म्हणून ते अभिनंदनास पात्र ठरतात. यामुळे स्वघोषित राष्ट्रप्रेमींचा कदाचित हिरमोड होईल. पण त्यास इलाज नाही.

भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार भारतीय विमानांनी मंगळवारी पहाटे जी कारवाई केली ती ‘बिगर-लष्करी प्रतिबंधात्मक’ अशा स्वरूपाची होती. याचा अर्थ आपण जे काही केले ते लष्करी कारवाईच्या रूपात नव्हते. याचा अर्थ उरी घडल्यानंतर ज्या प्रकारचे लक्ष्यभेदी हल्ले आपल्या लष्कराने केले त्या प्रकारची ही कारवाई नव्हती. त्या लक्ष्यभेदी हल्यांनतर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कर प्रमुख जातीने हजर होते. मंगळवारची कारवाई हवाई दलाने केली. पण त्याची माहिती दिली ती मात्र परराष्ट्र सचिवांनी. ही बाबदेखील पुरेशी बोलकी ठरते. भारत सरकारने सविस्तर खुलासा केला ते बरे झाले. कारण त्याअभावी या कारवाईबाबत वाटेल त्या वदंता उठल्या होत्या आणि किती ठिकाणी कारवाई केली गेली त्याचे छातीठोक चित्रप्रदर्शनही सुरू झाले होते. वास्तव तसे नाही. मंगळवारच्या कारवाईत बालाकोट या एका ठिकाणालाच लक्ष्य करण्यात आले होते. भारतीय विमानांनी अवघ्या ९० सेकंदांत, म्हणजे दीड मिनिटांत ही कारवाई केली. ही जागा पाकव्याप्त काश्मीरपासून ८० किमीच्या अंतरावर आहे. पण तेथे मारगिरी करण्यासाठी आपली विमाने पाकव्याप्त काश्मिरात गेली, पण त्यांना पाकिस्तानी हवाई हद्दीचा भंग करावा लागला नाही. तसे केले असते तर ती वेगळीच आगळीक गणली असती. आपल्या विमानांनी दोन देशांच्या सीमांतील मधल्या प्रदेशातून पाकिस्तानात मारगिरी केली. त्यामुळे आपण कायदेशीर अर्थाने पाकिस्तान हद्दीत घुसलो असे म्हणता येणार नाही. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या अनुषंगाने ही बाब फारच महत्त्वाची. तसेच आपण या कारवाईचे वर्णन बिगर-लष्करी प्रतिबंधात्मक असे केले आहे.

ही बाबदेखील लक्षणीय म्हणावी लागेल. ही कारवाई लष्करी अशी गणली गेली असती तर पाक सन्यास आपणास लक्ष्य करण्याची भाषा- वा कृती- करण्यास वाव राहिला असता. आपण तसे केलेले नाही. पाकिस्तानी सुरक्षा दल वा पाक आस्थापने यांतील कशालाही आपण हात लावलेला नाही. आपण कारवाई केली ती बालाकोट पर्वतावरील लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांवर. ही अशी प्रशिक्षण केंद्रे तेथे होती ही बाब पाकिस्तान अधिकृतपणे कदापिही मान्य करणार नाही. तशी ती केली तर दहशतवादास अधिकृतपणे फूस असल्याचा पाकिस्तानवरील आरोप त्या देशास मान्यच होईल. तेव्हा पाकिस्तानची ही अडचण ओळखूनच आपण आपल्या लक्ष्याची निवड केली. तेथे शेकडो प्रशिक्षणार्थी दहशतवादी होते असे म्हणतात. ही जागा घनदाट जंगलात आहे असे आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनीच सांगितले. त्यामुळे प्रत्यक्षात तेथे किती दहशतवादी टिपले गेले याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. तसेच ती जागा किती ध्वस्त झाली हा तपशीलही उपलब्ध होण्यास वेळ लागेल. पण त्यामुळे या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्न निर्माण होणार नाही.

ही अशी कारवाई केली जाणार अशी अटकळ जवळपास सर्वानीच बांधली होती. विशेषत ज्या निर्घृणपणे पुलवामाकांड घडले ते पाहता भारतास प्रत्युत्तर देणे भाग होते. ते तसे दिले जाईल याची हमी खुद्द पंतप्रधांनानीच दिली. तेव्हा पुढील आठवडय़ात निवडणुका जाहीर व्हायच्या आत भारतास काही करून दाखवावेच लागणार हे उघड होते. हे काही करणे म्हणजे किती करणे हाच काय तो प्रश्न होता. त्याचे उत्तर आज मिळाले. आजच्या कारवाईत जैश-ए-महंमदचा म्होरक्या मसूद याचे काही जवळचे नातेवाईकही मारले गेल्याचे समोर येते. हे खरे असले तरी या तपशिलास तसा काही अर्थ नाही. याचे कारण याआधी जम्मू-काश्मिरातही या मसूदचा पुतण्या आदी नातलग मारले गेलेच आहेत. तेव्हा मंगळवारच्या कारवाईत आणखी काही नातेवाईक मारले गेल्याने जैशच्या हालचालींस काही खीळ बसेल असे मानण्याचे काहीच कारण नाही. हे सर्व अतिरेकी मरणाच्या तयारीनेच दहशतवादाच्या मदानात उतरलेले आहेत. आणि जो मरावयास तयार असतो त्यास परावृत्त करणे अवघड असते आणि जगातील अनेक देशांना ते साध्य झालेले नाही. तेव्हा आपणासही अशा एका कारवाईत हे जमेल असे समजण्याचे कारण नाही.

त्याचमुळे ही कारवाई हा पूर्णविराम नाही. जैश वा अन्य कोणाचा कायमचा बीमोड करावा असाही तिचा हेतू नव्हता. असू शकत नाही. तर एक प्रकारची जरब बसवणे आणि आपण काय करू शकतो याची जाणीव करून देणे हेच या कारवाईचे उद्दिष्ट होते. हे समजून घेण्यासाठी चीनचे उदाहरण रास्त ठरावे. चीनने १९६२ साली भारताविरोधात जे काही केले त्यामुळे त्या देशाबाबत आपल्या मनात कायमच साशंकतेची भावना राहिलेली आहे. इतक्या वर्षांनंतर अजूनही चीनबाबत संशयाचे जोखड अद्याप आपणास फेकून देता आलेले नाही. आधुनिक युद्ध हे रणापेक्षा मनांत लढले जाते. त्यामुळे शत्रूच्या मनात साशंकता निर्माण करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी प्रत्यक्ष युद्धच करावे लागते असे नाही. ते करण्याची क्षमता निर्माण करणे आणि प्रतिपक्ष काय करेल याच्या अंदाजात त्यांस गुंगवून ठेवणे अधिक गरजेचे.

सूड, बदला वगरे भावना या मुत्सद्देगिरीच्या पहिल्या पायरीवर असतात. तेथून पुढे जाणे हे सामान्य भक्तांना अशक्य असेल. पण ज्यास नेतृत्व करावयाचे आहे त्याच्याकडे पुढे जाण्याची क्षमता हवीच हवी. ‘‘सुडाची भावना प्रामुख्याने अशक्त व्यक्त करतात,’’  असे आईन्स्टाईन म्हणत असे. ते सत्य आहे. म्हणून या सूडभावनेच्या दबावास बळी न पडता भारत सरकारने केलेल्या संयत कृतीचे महत्त्व.