News Flash

एक नाणे, एक बाजू!

एके काळी भाजप काही किमान मूल्यांसाठी ओळखला जात असे.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi, bhartiya janta party bjp faridabad election demonetization

केवळ निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषावर वाटेल त्यास आपले म्हणण्याचा सपाटा भाजपने लावला आहे.

उत्तर प्रदेशात काय आणि नागपूर, मुंबई, पुणे, सातारा, ठाणे आदी शहरांत काय, आयारामांना भाजपने मुक्तद्वार दिले. गुंडगिरीची पाश्र्वभूमी, काँग्रेसवासी असताना त्या नेत्याचे कर्तृत्व या कशाकडेही लक्ष दिले नाही. हे काँग्रेसपेक्षा वेगळे, असे का मानावे?

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल हे म्हणे भाजपच्या वाटेवर आहेत. विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या अशा आशयाच्या वृत्ताचा खुद्द अग्रवाल यांनी जरी इन्कार केला असला तरी त्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. या अशा अविश्वासामागील कारण म्हणजे अग्रवाल यांचा भूतकाळ आणि भाजपचा वर्तमानकाळ. एके काळी भाजप काही किमान मूल्यांसाठी ओळखला जात असे. पार्टी विथ ए डिफरन्स, म्हणजे इतरांपेक्षा आम्ही वेगळे असे भाजप स्वत:विषयी म्हणत असे. परंतु कालौघात हा इतरांपेक्षा असलेला फरक कधी गळून पडला हे भाजपलादेखील कळले नाही आणि आता तर परिस्थिती अशी की भाजप एके काळी असा काही वेगळा होता हे खुद्द त्या पक्षातील नेत्यांनाही आठवणार नाही. त्या कथित नीतिमूल्य आदींना भाजपने तिलांजली दिली त्यालाही आता बराच काळ लोटला. त्यानंतर गंगेतून बरेच पाणी वाहून गेले. परिणामी भाजपचीच गटारगंगा होते की काय, अशी शक्यता संभवते. याचे कारण भाजप ज्या गतीने एकापेक्षा एक नग, इतरांनी ओवाळून टाकलेले गणंग, सर्वसाधारण सभ्य मंडळी ज्यास मवाली आदी नावांनी ओळखतात अशा मान्यवरांना स्वपक्षात स्थान देत आहे ते पाहता याबाबत काँग्रेसचे ‘नाव’देखील इतिहासातून नेस्तनाबूत करेल. पदरी पडले, पवित्र झाले, अशा आशयाची एक म्हण आहे. ही म्हण सध्या भाजपचे घोषवाक्य झाले असून केवळ निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषावर वाटेल त्यास आपले म्हणण्याचा सपाटा भाजपने लावला आहे.

गेल्या वर्षी उत्तराखंडात भाजपच्या या नव्या धोरणाची चुणूक दिसली. काँग्रेसच्या तब्बल नऊ आमदारांना भाजपने आपले म्हटले. या सगळ्यांना आताच्या निवडणुकांत तिकिटे दिली जाणार आहेत. किंबहुना तसे आश्वासन देण्यात आल्यामुळेच हे ९ जण काँग्रेसचे बुडते जहाज सोडून भाजपकडे धावले. उद्या भाजपचीही अवस्था अशीच झाली तर ते पुन्हा काँग्रेसकडे जाण्यास कमी करणार नाहीत आणि काँग्रेसही त्यांना पुन्हा स्वगृही घेतल्याशिवाय राहणार नाही. सत्ता हेच एकमेव ध्येय असेल तर असेच होणार. त्याचमुळे नारायण दत्त तिवारी यांच्यासारख्या बनेल उपटसुंभास आपले म्हणण्याची तयारी भाजपने दाखवली. या नारायणाच्या गोवऱ्या कधीच जेथे जायला हव्यात तेथे गेल्या आहेत. पण नव्वदी आली तरीही देहभोगाचा मोह काही त्यांचा सुटलेला नाही. सहस्रचंद्रदर्शनानंतरही पितृत्व प्राप्त करण्याइतके ते कर्तृत्ववान. राजभवनाच्या भिंतीही या अफाट पुरुषोत्तमास रोखू शकल्या नाहीत. त्या वेळी नैतिक भाजपने त्यांच्याविरोधात कोण गहजब केला होता. परंतु निवडणुका एकदा लागल्या की आपलेच बोल आणि भूमिका विसरावयाच्या असतात. भाजपचे तसेच झाले आणि थेट तिवारी पितापुत्रांसह विजय बहुगुणांनाही हा पक्ष आपले म्हणू लागला. या बहुगुणा यांच्या भ्रष्टाचारी कृत्यांविरोधात याच भाजपने आकाशपाताळ एक केले होते. त्याचे फळ त्यांना भाजपने सभगिनी प्रवेश देण्यात झाले. या भगिनी रीटा बहुगुणा या उत्तर प्रदेशी. अनेक पक्षांची चव घेऊन आलेल्या. उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेऊन भाजपने त्यांनाही आपले म्हटले.

शाळा तशी बाळा या उक्तीप्रमाणे जे मुंबईत घडते ते अन्यत्र घडल्याखेरीज थोडेच राहणार? तेव्हा दिल्लीने सत्तेसाठी काहीही असा केलेला इशारा भाजपच्या राज्य शाखांनी टिपला आणि साऱ्या गावावर ओवाळून टाकलेल्यांसाठी आपल्या पक्षाचे दरवाजे सताड उघडले. हे असे झाले हे एक वेळ उत्तर प्रदेशापुरते क्षम्य मानता आले असते. कारण तेथे निदान राज्य विधानसभेच्या निवडणुका आहेत. परंतु महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. येथे तर जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांसाठी रणकंदन सुरू झाले आहे. परंतु तरीही कोणालाही आपले म्हणा हेच भाजपचे सूत्र असून भाजपतील हा बदल थक्क करणारा आहे. अलीकडच्या काळात भाजपने नागपुरात मुन्ना यादव या थोर व्यक्तीस पदाधिकारी केले. या यादवांचे मती गुंग करणारे अनेक मुन्ने मुन्ने उद्योग नागपुरात विख्यात असून तरीही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावळीत मानाचे स्थान पटकावून आहेत, असे म्हणतात. इकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशकात तर साक्षात पोलिसाच्या हत्ये प्रकरणातील एक आरोपी हा भाजपवासी झाला असून मोठय़ा दिमाखात तो आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करू लागला आहे. पलीकडच्या पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे आयात खासदार, संभाव्य टोलसम्राट संजयनाना काकडे यांच्यात तर पक्षात ओवाळून टाकलेले अधिक कोण आणतो अशीच स्पर्धा सुरू आहे. या बापट यांचे मंत्री म्हणून कर्तव्य त्यांच्या केशकलपाइतकेच वरवरचे आहे. त्यांच्या आणि त्यांच्या खात्यासंदर्भातील अनेक चविष्ट कथा मंत्रालयात आवडीने चघळल्या जात असतात. परंतु ते आणि या काकडे यांच्यातून विस्तव जात नाही. राजकारणासाठी आवश्यक साधनसामग्री बापट यांच्यापेक्षा काकडे यांच्याकडे अधिक असली तरी ही दरी लवकरात लवकर कशी भरून निघेल यासाठी बापट यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत हे समस्त भाजपवासी जाणतात. याच साधनसंपत्ती संचयनाचा एक भाग म्हणून जास्तीत जास्त गणंगांना पक्षात आणण्यासाठी बापट प्रयत्नशील आहेत. असे प्रयत्न एकदा का सुरू झाले की पक्षप्रतिमा आदी मुद्दे गौण ठरतात. पुण्यात भाजपचे तसेच झाले आहे. पुण्यापलीकडील साताऱ्यातही भाजप याच मार्गाने जाताना दिसतो. तेथे तर समस्त महाराष्ट्राने ओवाळून टाकलेल्या उदयनराजे भोसले यांनाच भाजप नेते लवलवून मुजरा करताना दिसतात. या उदयन राजांचा लौकिक काय आहे ते समस्त सातारा जिल्हाच नव्हे तर सारा महाराष्ट्रच जाणतो. अशा वेळी आपण कोणत्या व्यक्तीस आवतण देतो याची कसलीही शरम भाजप नेत्यांना नाही. मुंबईखालोखाल आकाराने आणि संपत्ती निर्मितीक्षमतेत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे महापालिका निवडणुकांतही हेच सुरू आहे. त्या शहरात रवींद्र आंग्रे या अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यास भाजपने पवित्र करून घेतले तेव्हाच या पक्षाने नैतिकतेचे नेसू डोक्याला गुंडाळल्याचे स्पष्ट झाले.  पोलिसांच्या वर्दीतील टोळीवाले ही मुंबईच्या गुन्हेगारी टोळीयुद्धांवर आधारित चित्रपटांतील कल्पना. ती वास्तवात कशी असेल, याचे प्रतिनिधित्व आंग्रे करीत. आता ते भाजपचे प्रतिनिधित्व करतात. या जोडीला या वेळच्या निवडणुकीसाठी साध्या वेशातील गुंडगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अशा अन्य काहींना भाजपने जवळ केले आहे. या असल्या गुंड पाटलांना थेट पक्षश्रेष्ठींच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा अधिकार देऊन भाजपने या मुद्दय़ावरदेखील काँग्रेसला किती तरी मैलांनी मागे टाकल्याचे दिसते.

काँग्रेसच्या बरकतीच्या काळात कोणताही नेता ‘संकुचित’, ‘संप्रदायी’ अशा शिवसेना, भाजपतून काँग्रेसवासी झाला की लगेचच तो निधर्मी म्हणून गणला जात असे. छगन भुजबळ, नारायण राणे हे याचे काही स्थानिक मासले. आता उलट होते. म्हणजे ‘भ्रष्ट’, ‘स्युडो सेक्युलर’, ‘अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणाऱ्या’ काँग्रेस आदी पक्षांतून जेव्हा एखादा मान्यवर नेता भाजपत येतो तेव्हा तो एकदम प्रामाणिक, सदसद्विवेकबुद्धीवादी वगैरे होतो. भाजपमध्ये आता अशा अनेक धर्मवीरांची गर्दी होताना दिसते. एके काळी ती काँग्रेसमध्ये होत होती. यावरून धडा घ्यायचा तो इतकाच की काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हणणे अयोग्य आहे. गेल्या काही दिवसांतील ही आयाराम संख्या पाहता या दोन पक्षांतील हे अंतरही आता पुसले गेले आहे. भाजप आणि काँग्रेस हे पक्ष आता एका नाण्याच्या एकाच बाजूला आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 4:07 am

Web Title: incoming issue in bjp
Next Stories
1 संस्कृती की संविधान?
2 आलिया भोगासी..
3 नापासांतले गुणवंत
Just Now!
X