समाजाला हादरवणाऱ्या घटनांनी आपण अस्वस्थ होतो आहोत, हे निदर्शने वा आंदोलनांच्या पलीकडेही दिसायला हवे..

‘एवढय़ा मोठय़ा देशात एखाददुसरी घटना घडली तर त्यात एवढे अवडंबर माजविण्यासारखे काय आहे’, असा निर्लज्ज सवाल या देशाचा एखादा केंद्रीय मंत्री करतो, ‘भरमसाट वाढणाऱ्या लोकसंख्येच्या देशात असे प्रकार घडणारच’, असा निर्ढावलेला निर्वाळा सत्ताधारी पक्षाची एखादी महिला खासदार देऊन जाते, तेव्हा संवेदना जाग्या असलेल्या प्रत्येक मनाचा विलक्षण संताप होतो. ते साहजिकच असते. संतापाचा सामूहिक उद्रेक हे मानवी मनाच्या संवेदना जाग्या असल्याचेच लक्षण असल्याने, जेव्हा असा संताप रस्त्यावर उमटू लागतो, तेव्हा निर्ढावलेल्या जिभांना लगाम घालण्याचा सल्ला देण्याची वेळ थेट पंतप्रधानावर येते. जम्मू काश्मीरमधील कथुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नावसारख्या भीषण घटनांनंतर सामाजिक संवेदनांना आव्हानच दिले गेले आणि संवेदनांच्या ठिणग्यांनी संतापाची धग सर्वदूर पसरविली. सामूहिक उद्रेकाचा हा परिणाम असतो. समाजाच्या संवेदना जाग्या असल्याचेही त्यातून स्पष्ट दिसते. कथुआ किंवा उन्नावच्या घटनांनी देश हादरला, कानाकोपऱ्यातून निषेधाचे सूर उमटले आणि समाजात काही तरी चुकते आहे, याची भयाण जाणीवही त्या घटनांनी अधोरेखित केली. अशा घटनांनंतर नेहमीच होतो त्याप्रमाणे, त्या चुकांचा शोध आता पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. बलात्कारासारख्या घटना घडून गेल्या, की त्याचे ‘पाशवी’ मानसिकता असे वर्णन केले जाते. पण पाशवी हा शब्द अन्यायकारकच आहे. माणसाच्या जिद्दी अतिक्रमणामुळे अस्तित्वाच्या आव्हानाचा रेटा चहूबाजूंनी दिवसागणिक तीव्र होत असतानादेखील आपल्या नसर्गिक संस्कृतीचा विसर पशूंना पडत नाही, निसर्गाने आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीतून पशू सहसा बाहेर पडत नाही आणि त्यामुळे त्याच्याकडून अन्य पशूंवर अकारण अन्यायदेखील होत नाही, हे स्पष्ट झालेले असतानाही, माणूस मात्र जेव्हा समाजाकडून आखल्या गेलेल्या नतिकतेच्या किमान चौकटी भेदून टाकतो, तेव्हा त्याला पाशवी प्रवृत्ती म्हणणे हा त्या पशूंवर अन्याय असतो. असा अमानवीपणाचा कळस गाठणाऱ्या घटना वारंवार घडत असताना, त्यावर एवढय़ा सहजपणे पांघरूण घालणारी वक्तव्ये करणे हे तर या प्रवृत्तींकडे पाहण्याचे गांभीर्य संपल्याचेच लक्षण असते. त्यामुळे अशी वक्तव्ये जेव्हा कुणी जबाबदार व्यक्ती करते, तेव्हा सामाजिक संवेदनांच्या दबावातून त्याला तात्पुरता तरी शहाणपणा शिकविणे गरजेचे असते. ती समाजाची जबाबदारीही असते. पण अशी जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी संवेदना मात्र पूर्ण समावेशक आणि पारदर्शक असणे आवश्यक असते.

प्रत्यक्षात आज तसे दिसते का? समाजाच्या संवेदना सर्वकाळ तेवढय़ाच तीव्रपणे उमटतात काय, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा अशी परिस्थितीच अलीकडे अधिक प्रमाणात जाणवते. उन्नाव-कथुआ ही प्रकरणे भयंकरच असल्याने, संवेदनशील मनांनी अशा घटनांचा तीव्र निषेध केलाच पाहिजे. पण जेव्हा अशा घटनांनी संवेदनशील मने व्याकूळ झालेली असतात, त्यांचे पडसाद सर्वत्र उमटत असतात, तेव्हा या व्याकूळ मनांचे कोपरे अन्य घटनांचा वेध घेण्यासाठीदेखील मोकळे ठेवणे हीदेखील गरजच ठरली आहे. मनाचा थरकाप उडविणाऱ्या, अमानवीपणाचाही अतिरेक वाटावा अशा घटनांचे लोण देशात भयानकपणे पसरत असताना, खरे तर मनातील संवेदनांचा कोपरादेखील आता अपुरा ठरू लागला आहे. किंवा कदाचित, संवेदनशील मनांवर वारंवार असे आघात होऊ लागल्याने, सर्वकाळचे हळवेपण आता मनांनाही सोसवेनासे झाले असावे की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती अधूनमधून दिसते. असे झाले, की उगीचच भीती वाटू लागते. सातत्याने आघात सोसणारी मने भविष्यात संवेदनाहीन तर होणार नाहीत ना, या भयाचे सावट दाटू लागते. अगदी दोनचार दिवसांपूर्वी मुंबईतील मुलुंडच्या उपनगरी रेल्वे स्थानकावरील गर्दीत एका प्रवाशाचा एका महिला प्रवाशास चुकून धक्का लागला. त्या महिलेने त्या प्रवाशास ढकलून दिले. धावत्या गाडीखाली तो चिरडला गेला. नंतरचे काही क्षण त्या वेळच्या वर्तमानासही स्तब्ध करणारे, थरकाप उडविणारे ठरले. पुढच्या काही मिनिटांतच, एका आयुष्याचे, एका भविष्याचे, ‘होत्याचे नव्हते’ झाले. अंगावर शहारा आणणारी, जगण्यामरण्याच्या संघर्षांतील अंधूकशी रेषा क्षणात पुसून टाकणारी आणि जगण्यातील क्षणभंगुरपणाचा साक्षात अनुभव देणारी ही भयावह घटना त्या दिवशी अनेकांनी प्रत्यक्ष पाहिली असेल. गर्दीच्या रेल्वे स्थानकावरील तो थरकाप ज्यांनी अनुभवला असेल, त्यांची मने आजही त्या धक्क्यातून बाहेर आलेली नसतील. माणुसकीचा किंवा दुसऱ्याच्या जगण्याचा आदर करण्याच्या, ‘जगा आणि जगू द्या’ या माणुसकीच्या सामान्य समजुतीलाच या घटनेने प्रचंड धक्का दिला. त्यानंतर मात्र, या घटनेमुळे पुन्हा सामाजिक संवेदनांचा मुद्दा ऐरणीवर आला. उन्नाव-कथुआच्या घटनांत कारवाईसुद्धा धड होत नसल्यामुळे विदीर्ण झालेल्या, पेटून उठलेल्या मनांवर मुलुंडमधील या जीवघेण्या घटनेचा अंधूकसा ओरखडा उठला असता, तरी संवेदनांच्या सामाजिक दबावाचे ते दर्शन पुन्हा एकदा घडले असते.. आंदोलन वा निदर्शनांनीच ते घडते असेही नव्हे. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर काही दिवस मुंबईकर पुलांवरून जपून चालले तसे; किंवा आदरांजलीच्या फलकापाशी थबकलेली पावले दिसतात, तसेदेखील. मुंबईतील माध्यमांनी मुलुंडच्या त्या घटनेची बातमी लगोलग सर्वदूर पोहोचविली. दोन दिवसांनंतर त्या घटनेसाठी जबाबदार असलेल्या महिलेस पोलिसांनी ताब्यातही घेतले. वरवर पाहता, एका गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनेनंतर जे काही करावयाचे, ते कर्तव्य पोलिसांनी पार पाडले. पण या घटनेचे पडसाद समाजात मात्र फारसे उमटलेच नाहीत.

खरे म्हणजे, ही भीषण घटना असंख्य मनांवर ओरखडे उठवून गेलीच असेल. असंख्य हृदये या घटनेची बातमी वाचून, ऐकून वेदनेने कळवळलीदेखील असतील आणि मानवी द्वेषभावनांनी गाठलेल्या अमानुष परिसीमेच्या या धक्कादायक अनुभवातून समाजाच्या भविष्यावर काजळी धरल्याच्या काळजीने अनेक मने काळवंडलीदेखील असतील. पण ही संवेदनशील मने संघटितपणे व्यक्त होणे गरजेचे असते. संवेदनशीलतेचे सामूहिक दर्शन घडले, की त्यामध्ये होरपळलेल्या मनांना मोठा दिलासा मिळत असतो. मुलुंडमधील त्या घटनेनंतर काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका आयुष्याने वर्तमानातील काही आयुष्यांपुढे कदाचित अनपेक्षित अंधार दाटू लागला असेल. भविष्याचे भय कदाचित त्यांना भेडसावू लागले असेल. अशा वेळी, संवेदना जाग्या असल्याची साक्ष पटविणे हीदेखील समाजाची जबाबदारी असते. तसे झाले, की अंधारलेल्या भविष्यातही आधाराच्या उजेडाचा एखादा कवडसा त्या आयुष्यांना दिलासादायक ठरू शकतो. माणुसकीचे असे निरपेक्ष दर्शन घडविणे ही समाजाची जबाबदारी असते. आजच्या, संवेदनाहीनतेचे सत्तांध दर्शन घडविणाऱ्या काळात तर संवेदनशील मनांच्या सामुदायिक आधाराची समाजाला मोठीच गरज आहे. तेव्हा, मनाच्या कप्प्यातील संवेदनशीलतेच्या कोपऱ्याची जागा आता आणखी वाढविण्याची वेळ आली आहे. वर्तमानकाळाला भेडसावणारी आणि भविष्यभर मानगुटीवर ठाण मांडणारी भयाची भुते दूर ठेवण्याचे सामथ्र्य याच एका कोपऱ्यात आहे. म्हणून तो कोपरा जपला पाहिजे. तिथला ओलावा नाहीसा होणार नाही याची काळजी घेतली, तर जगण्यातील अवघडपणा कमी होईल, जगविण्याच्या जबाबदाऱ्याही सोप्या होतील.