पाकिस्तानी नेते आणि त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांना शहाणपण येणे शक्य नसल्याने काश्मीर सीमेवरील तणाव आणि संघर्ष संपणारा नाही..

यासाठी आपल्यालाच बदलावे लागेल. सीमेवर कमालीची जागरूकता दाखवणे गरजेचे आहे. जिथे याबाबत मानवी प्रयत्नांच्या मर्यादा आहेत तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे किती चोख सुरक्षा व्यवस्था ठेवता येते हे इस्रायलने अनेकदा दाखवून दिले असून त्याचे अनुकरण करावे लागेल.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या आगळिकीस उत्तर देताना भारतीय सैन्याने त्या देशातील १२ जणांना ठार केले. त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानने तीन भारतीय जवानांची हत्या केली आणि त्यातील एकाच्या मृतदेहाची विटंबना केली. पाकिस्तानच्या या कृतीस भारताचे उत्तर अधिक कडवे आणि कठोर असेल असे वक्तव्य या संदर्भात भारतीय लष्कराकडून केले गेले. ते योग्यच होते. त्याप्रमाणे भारताने उत्तर दिले आणि तीन भारतीयांच्या बदल्यात १२ पाकिस्तान्यांना या जगातून संपवले. त्यानंतर अद्याप पाकिस्तानकडून काही प्रत्युत्तर वा प्रतिवाद आलेला नाही. एक बातमी तेवढी आली. ती पाकिस्तानी लष्करी संचालनालयाच्या प्रमुखाने भारतीय लष्करी संचालनालयाच्या प्रमुखाशी केलेल्या चर्चेच्या विनंतीसंदर्भात आहे. भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिल्याने पाकिस्तानची भंबेरी उडाली आणि हात बांधून तो चर्चेस तयार झाला असे या संदर्भात सांगितले गेले. पाकिस्तानी वृत्तपत्रांत आणि समाजमाध्यमांत बरोबर याच्या उलट वृत्तान्त आले असतील, यात शंका नाही. भारतीय लष्करी व्यवस्थेस आपण कसे चर्चेस भाग पाडले असा यावर पाकिस्तानचा दावा असेल. दोन्हीही देशांना आपापल्या देशांतील राष्ट्रवाद्यांना चुचकारावयाचे असल्याने दोन्हीही देश आपापल्या प्रदेशांत शड्डू ठोकत बसणार हे उघड आहे. यामागील साधे कारण असे की दोन्हीही देशांना जम्मू-काश्मिरात आपण नक्की काय करू इच्छितो हे ठाऊक नाही. पाकिस्तानला वाटते आपण आज ना उद्या भारताकडून काश्मीर हिसकावून घेऊ आणि भारताची इच्छा पाकिस्तानला कायमचे नामोहरम करून आपण हा प्रश्न एकदाचा काय तो सोडवू. हे दोन्हीही होणारे नाही.

याचे कारण वास्तवापासून सुटलेले दोन्हीही देशांचे भान. ते फक्त नेत्यांचेच सुटते असे नाही. देशवासीयांचेही ते तसेच हरपते. मध्यंतरी लक्ष्यभेदी हल्ल्यांच्या निमित्ताने आपण ते पाहिले. हे हल्ले करून आपल्या सैन्याने आणि त्याहीपेक्षा राजकीय नेतृत्वाने मोठेच शौर्य गाजवल्याचे वाटून अनेक भारतीयांची छाती ५६ इंची फुगली. त्या फुगीर वातावरणात पाकिस्तानचा प्रश्न जणू सुटलाच असेच भासवले गेले. परंतु ताजी आकडेवारी दर्शवते की हे लक्ष्यभेदी हल्ले केल्यापासून, म्हणजे २९ सप्टेंबरपासून आजतागायत भारत-पाक सीमेवर जवळपास २८५ इतक्या चकमकी झडल्या आहेत. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यापासून भारत आणि पाकिस्तानात झडलेल्या एकूण चकमकींची संख्या तर ६०० पेक्षाही अधिक होते. हे अजूनही सुरूच आहे आणि आपले जवान प्राण गमावत आहेत. त्या तुलनेत पाकिस्तानची होणारी हानी कमी म्हणता येईल. कारगिल युद्धापासून हे असे सुरू आहे. कारगिल युद्धात भारताने ५२१ सैनिक, अधिकारी गमावले. पण तेव्हापासून सलग चार वर्षे विविध मार्गानी पाकिस्तानची जी घुसखोरी सुरू होती, अजूनही आहे, त्यात भारताने तब्बल २,१२५ इतके सैनिक गमावले. म्हणजे कारगिल युद्धाच्या चौपट सैनिक नंतरच्या चार वर्षांतील कथित शांतता काळात मारले गेले आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात पठाणकोट आणि उरी येथील लष्करी केंद्रांवर हल्ले झाले तर मोदी यांचे पूर्वसुरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात थेट संसदेवरच हल्ला झाला. त्याही वेळी आजच्याप्रमाणे पाकिस्तानला धडा शिकविला जाण्याची भाषा केली गेली आणि आपल्या फौजा सीमेवर तैनात केल्या गेल्या. परंतु पुढे काही झाले नाही. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती मोदी यांच्या काळात झाली आणि लक्ष्यभेदी हल्ल्याचा गवगवा वगळता अधिक काही घडले नाही. वास्तविक मोदी यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीने झाली. त्यामुळे मोदी हे शांततेचा पैगाम घेऊन सत्तेवर आल्याचा भास पाकिस्तानला झाला असणार. त्याच वेळी मोदी यांनाही आपण हा प्रश्न सोडवू शकतो असे वाटले असणार. त्यात गैर काही नाही. नाहीतरी भारताच्या प्रत्येक पंतप्रधानास आपली ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्दी म्हणून व्हावी असे वाटत असतेच. त्याच हेतूने पंतप्रधान मोदी वाकडी वाट करून गतसाली नाताळाच्या मुहूर्तावर थेट पाकिस्तानातच जाऊन शरीफ यांना नाताळाच्या आणि जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन आले. त्याची परतफेड पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्याने केली. खरे तर मोदी सरकारला तेव्हाच भान यावयास हवे होते. ते आले नाही. त्याचमुळे पुढे उरी-कांड घडले. त्यातून फक्त उघड झाला तो भारतीय लष्कराचाच गलथानपणा. या दोन्हीही प्रकरणांत पाकिस्तान घुसखोर थेट भारतीय लष्कराच्या मध्यवर्ती केंद्रात पोहोचेपर्यंत आपणास जाग आली नाही. तेव्हा या दोन प्रकरणांत बूंद से गेलेली अब्रू काही प्रमाणात का होईना भरून काढण्यासाठी २९ सप्टेंबरला लक्ष्यभेदी हल्ल्यांचा घाट घातला गेला. परंतु तेथून पुढे आजतागायत त्याचाच फोलपणा दिसून आला. तेव्हा आता प्रश्न असा की या पाकिस्तानचे आपण नक्की काय करू इच्छितो? जे काही करू इच्छितो, किंवा विरोधी पक्षात असताना मोदी जे काही करू इच्छित होते त्यातले काहीही त्यांना करता येणार नाही, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. हीच बाब पाकिस्तानलाही लागू पडते. भारताविषयी काहीही भावना त्या देशाच्या लष्करप्रमुखांच्या मनात असली तरी त्या भावनेस मुरड घालण्यापलीकडे पाकिस्तानचे लष्करप्रमुख काहीही करू शकत नाहीत. तरीही भारतीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणे, शक्य होईल तितके घुसखोर पाठवून उत्पाताचा प्रयत्न करणे, दहशतवादी कारवायांना जमेल तितकी मदत करणे आदी कुटिरोद्योग पाकिस्तानी लष्कराकडून सुरूच राहणार. कारण ते केल्याखेरीज त्यांच्या अस्तित्वाचे काही प्रयोजनच राहत नाही. आणि हे प्रयोजन बदलण्याइतका राजकीय शहाणपणा आणि लष्करी पोक्तपणा पाकिस्तानकडे नाही. तो केव्हा येईल, किंवा खरे तर येईल की नाही याचीही हमी नाही. तेव्हा परिस्थिती आहे ती तशीच राहणार. ती काही आपण बदलू शकणार नाही.

अशा वेळी निदान आपण स्वत:ला बदलणे हाच पर्याय उपलब्ध राहतो. हे स्वत:स बदलणे म्हणजे सीमेवर १२ महिने २४ तास कमालीची जागरूकता दाखवणे. जिथे याबाबत मानवी प्रयत्नांच्या मर्यादा आहेत तेथे तंत्रज्ञानाचा वापर करून ती उणीव भरून काढावी लागेल. असे करावयाचे तर खर्च वाढणार हे उघड आहे. त्यासाठी तरतूद करावी लागेल. तसा तो खर्च केला की तंत्रज्ञानाची मदत घेत किती चोख सुरक्षा व्यवस्था ठेवता येते हे इस्रायलने अनेकदा दाखवून दिले आहे. त्याचे अनुकरण करावे लागेल. या अशा तयारीअभावी स्वत:ची तुलना इस्रायलशी करणे अगदीच फुकाचे ठरते. इस्रायली लष्कराच्या मध्यवर्ती केंद्रापर्यंत सोडाच पण जवळपासही कधी घुसखोर वा शत्रुराष्ट्राचे सैनिक पोहोचू शकले नाहीत. तेव्हा भारताने शिकण्यासारखे बरेच आहे. ते काहीही न शिकता केलेल्या फुकाच्या वल्गना निर्थक आहेत. भारताशी सतत संघर्षांत्मक अवस्थेत राहण्यात पाकिस्तानी राजकारण्यांचा स्वार्थ आहे आणि त्यावर सतत आक्रोश करीत राहणे आपल्या सत्ताधाऱ्यांना सोयीचे आहे. हे असे केल्याने दोन्हीही देशांत गंभीर प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जात नाही. अशा संघर्षांत संधी शोधण्याची सवय दोन्हीही देशांना सोडावी लागेल. कारण या युद्धज्वरात मानवी जिवांचा बळी जात आहे.